पन्नाशीच्या आत शंभरी

0 comments
Reading Time: 9 minutes

नो डाऊट, महिलांवर जास्त जबाबदारी आहे आणि जबाबदारी जास्त असण्याचं कारण, तिची क्षमता आहे ती पेलण्याची. जबाबदारीने आयुष्य मार्गक्रमण करीत असताना जगण्यातला आनंद वाढवत नेता आला पाहिजे, आणि ह्या आनंदाची कारणं आपली आपण शोधली पाहिजेत. ‘महिलांचा आनंद’ ही गोष्ट माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची, म्हणूनच ‘पन्नाशीच्या आत शंभरी’ हे लक्ष्य निर्माण केलंय आणि ते साध्य करण्याची साधनसामग्रीही.

आम्ही पंधरा वर्ष एकमेकींना ओळखत होतो, अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी नव्हतो पण तिच्या घरी माझं एकदा जाणं झालं होतं. अचानक एक दिवस माझी मैत्रिण शर्मिला ठाकरेला, तिचा प्रश्‍न आला, ‘काय म्हणतेस? वीणाचं लग्न झालंय? तिला मुलंही आहेत?’, तिच्या त्या भाबड्या प्रश्‍नाचं कारण होतं माझी सततची जगभ्रमंती आणि व्यवसायातला गुरफटलेपणा. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी असं वाटणं स्वाभाविक होतं. ‘मुलीला व्यवसाय आणि घर ह्या दोन्ही गोष्टी एकावेळी जमू शकत नाहीत’, असा सर्वसाधारण समज होता,परिस्थितीही काहीशी तशीच होती. आई-वडील, सासू-सासरे, सुधीर, नील, राज आणि सर्वच कुटुंबाने मला सर्व बाजूंनी इतकी छान सपोर्ट सिस्टिम दिली की गेली पस्तीस वर्ष माझं व्यवसायातलं झोकून देणं अव्याहतपणे सुरू आहे. म्हणजे कधी-कधी ते अति होतं, किंवा मुलांवर आपण अन्याय करतोय अशी खंत (गिल्ट) मनाला टोचत राहते. पण मुलांनीही समजून घेतलं हे माझं सुदैव. नेहमी असं वाटतं, की आपण निःस्वार्थ मनाने एखादी प्रामाणिक इच्छा बाळगली आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न केले तर तुम्ही तुमचं इच्छित लक्ष्य साधू शकता आणि ते साध्य करण्यासाठी आजुबाजूची परिस्थिती तुम्हाला साथ देते. माझ्या बॉलीवूड प्रेमी, फिल्मी मनाला डायलॉग आठवला,‘ओम शांती ओम’ चित्रपटातला, ‘‘कहते हैं, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है…’’ भले डायलॉग फिल्मी असो, पण आपण सर्वांनी आयुष्यात ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाच असेल. माझ्याही मनाच्या कोपर्‍यात अशीच एक इच्छा होती, ‘‘व्यवसाय आणि घर-कुटुंब ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. घर मोडून व्यवसाय करायचा नाही आणि व्यवसाय सोडून घरी बसायचं नाही’’ आणि हे जमलं, अर्थात ह्याचं श्रेय जास्त आप्त-स्वकियांना जात असलं तरी हे घडून आलं, परिस्थिती साथ देत गेली, ही महत्त्वाची गोष्ट. सांगण्याची गोष्ट अशी की आपल्या मनात जर एखादी अशी सुप्त इच्छा दबा धरून बसली असेल तर तिला बाहेर येऊ देऊया, त्यासाठी घाबरायचं नाही. सगळं काही शक्य आहे, खासकरून कोणतीही विधायक इच्छा पूर्ण होण्यासाठी परिस्थिती आपोआप अनुकूल बनत जाते, अगदी काही वर्षांनी मागे वळून पाहिलं तर चमत्कार  वाटावा अशी. ‘सो लेट्स एम फॉर समथिंग मीनिंगफूल इन लाईफ, थिंग्ज विल हॅप्पन!’

पर्यटनक्षेत्रातलं माझं हे पस्तिसावं वर्ष. एखाद्या क्षेत्रात एवढी वर्ष तुम्ही ज्यावेळी आनंदाने कार्यरत असता तेव्हा तुमचे विचार, कृती, सवयी ह्या सर्व त्याच्याशीच निगडीत होत राहतात. बिझनेस माईंड, मार्केटिंग, इनोव्हेशन्स… ह्यातून पर्यटनात वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. ही लेखमाला हा सुद्धा त्याचाच परिपाक, पण गेली वीस वर्ष त्यातूनच तर तुमच्याशी संवाद टिकून राहीला. इनोव्हेटीव्ह आयडीयाज्मधूनच आली वुमन्स स्पेशलची संकल्पना, एकदम लार्ज स्केलवर आज त्याचं आयोजन होतंय. भारतातच नव्हे तर जगात कुठेही महिला पर्यटनाची ही चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकली नाही. प्रयत्न खूप जणांनी केले पण त्यात सातत्य राखणं ही महत्त्वाची गोष्ट होती, तसंच ती जरी एखादं बिझनेस व्हर्टिकल असलं तरी त्यात आमच्या संपूर्ण टीमचे जे मनापासूनचे प्रयत्न असतात ते वर्षानुवर्ष वाढतच चाललेयत. गेली बारा वर्ष म्हणजे एका तपाची ही तप:श्‍चर्या आहे. नोव्हेंबर दोन हजार सहामध्ये आम्ही ह्याचा श्रीगणेशा केला होता. वीणा वर्ल्ड झाल्यानंतरही पहिली सहल म्हणजे शुभारंभ हा वुमन्स स्पेशल सहलीनेच झाला, आणि नंतर तर आम्ही आणि महिलांनी मागे वळून पाहिलं नाही. मोठ्या आत्मविश्‍वासाने आणि आनंदाने-वीणा वर्ल्डवर विश्‍वास टाकून महिला अमेरिकेपासून स्कॅन्डिनेव्हियापर्यंत आणि लेहपासून अंदमानपर्यंत अक्षरश: जगभ्रमंती करताहेत, स्वत:मध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स घडवताहेत. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनूजा चातुर्य येतसे फार’ हे अनुभवताहेत.

‘सी द वर्ल्ड’ आणि ‘सेलिब्रेट लाईफ’ ह्या वीणा वर्ल्डच्या टॅगलाईन्स. वेगवगेळ्या वेळी आमच्या जाहिरातीत आम्ही त्या वापरतो. वुमन्स स्पेशलसाठी मी ह्या दोन्ही एकत्रितपणे वापरल्या किंवा त्या वापराव्याशा वाटल्या. ‘सी द वर्ल्ड अ‍ॅन्ड सेलिब्रेट लाईफ’. मी आणि आमच्या महिला त्याप्रमाणे अ‍ॅक्च्युअली जगताना दिसताहेत. जग सुंदर आहे आणि प्रत्येक महिलेतल्या सौंंदर्याला ते आणखी खुलवतं मग ते कॉन्फिडन्स बिल्डिंगच्याबाबतीत असेल, आचार-विचार-सवयींमध्ये असेल, पेहरावात किंवा चालण्या-बोलण्यात. गेल्या बारा वर्षांत मी ट्रान्सफॉर्मेशन्स पाहिलीयत. माझ्या स्वत:मध्येही खूप चांगले बदल झाले ह्या पर्यटनामुळे हे मी स्वत: अनुभवलंय, पर्यटन मला घडवतंय ह्यात शंकाच नाही, आणि माझ्यासोबत वुमन्स स्पेशलवर येणार्‍या महिलांनासुद्धा. या आणखी एका बाबतीत मी खूप भाग्यवान आहे कारण ज्यावेळी नव्याने वीणा वर्ल्ड सुरू करण्याचा घाट घातला तेव्हा महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या महिलांनी मनोमन शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन आमचं मनोबल वाढवलं. महिला महिलांना जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा वीणा वर्ल्डसारखं काहीतरी उभं राहण्यात मदत होते ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच वुमन्स स्पेशलवर आम्ही एक गोष्ट एकमेकींना सांगून पक्की ठरवतो की, ‘आपल्या घरात जर कुणी महिला, मग ती नात-आजी-आई-सासू-सून-मुलगी-नणंद-भावजय-मैत्रिण.. कुणीही असो, कोणत्याही वयाची असो, तिने जर काही नव्याने एखादा छोटा-मोठा बिझनेस करायचं ठरवलं किंवा काही वेगळी वाट पकडायची ठरवली तर तिला मनापासून पाठिंबा देऊया आणि जर काही मदत लागली तर तीही करूया’.

चांगलं शिक्षण, घर, संसार, मुलं, कुटुंब आणि त्यातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास ह्यामध्ये महिलांचं योगदान निश्‍चितपणे जास्त असतं. ती प्रायॉरिटी आहे आणि आजच्या युगात मोठ्या संख्येने महिला ती जबाबदारी लिलया पार पाडताहेत. पर्यटन-भटकंती-जगभ्रमंती ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर येतात. आणि रास्त आहे ते. पर्यटनाला नेहमीच शेवटची प्रायॉरिटी, खासकरून महिलांकडून. पण इथेच माझं ऑब्जेक्शन आहे. पर्यटन हा व्यवसाय आहे म्हणून नव्हे तर पर्यटनातल्या आनंदाने महिलांमध्ये आलेलं रीज्यूविनेशन मी पाहिलं आहे, त्या आनंदाचं पुढे ढकलणं मला मान्य नाही. म्हणजे ‘मुलं नर्सरीत गेली की आपण कुठेतरी भ्रमंती करू’,‘एकदा चौथीची स्कॉलरशीप संपली की कुठेतरी जाऊ’,‘एकदा दहावी झाली नं की नक्की’,‘कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे तेवढं संपू दे बस’, ‘एकदा मुलीचं लग्न झालं की सुटलो रे बाबा, मग काय जग फिरू नं सगळं’… आठवून तर बघा तुमच्या घरातला डायलॉग. आपल्या सर्वांच्या घरात थोड्याफार फरकाने हे असंच चालू असतं. जग मल्टिटास्किंगचं आहे, सायमलटेेनियस्ली गोष्टी करण्याचं आहे. तंत्रज्ञानाने आयुष्य खूप सुकर बनवलंय, आता फक्त पर्यटनातलीच नव्हे तर कोणत्याही बाबतीत ‘चालढकल-प्रोक्रॅस्टिनेशन’ ह्या गोष्टीला आपण आळा घातलाच पाहिजे. ‘इफ इट इज गूड-डू इट नाऊ’ हे आपण प्रत्येकाने आचरणात आणलं पाहिजे.

महिला सख्यांना एकच सांगणं असतं की ‘वर्षातले फक्त आठ दिवस द्या आणि स्वत:मधला फरक बघा’. एकटं कसं जायचं? घरातले काय म्हणतील? मुलांना सोडून एकटीने अशी मजा करायची, छे छे… काहीतरीच काय? हे प्रश्‍न रास्त आहेत आणि ते पडतील तुम्हाला. पण गेल्या बारा वर्षांत जे काही प्रयोग आम्ही करीत राहीलो त्याने आम्ही पाहिलंय, की घराला-शेजारपाजारला अगदी पूर्वी तिरकस शेरा मारणार्‍या मित्र-मैत्रिणीलाही कळून चुकलंय, महिला पर्यटनाची किती गरज आहे ते. आता तर मैत्रिण, सासू-सून, शेजारीण सगळेच ग्रुपने येताहेत. वर्षातले कमीत-कमी आठ दिवस स्वत:ला देणं मस्ट आहे. आठवा बरं, कधी स्वत:ला असा पूर्ण वेळ दिलाय? कधी स्वत:शीच गप्पा मारल्यात? सर्वांवर प्रेमाची पाखर घालता घालता स्वत:वर प्रेम करायचंच विस्मरणात गेलंय. आयुष्याच्या धावपळीत स्वत:कडे बघायलाही वेळ मिळाला नाही. कॉलेजमधले फोटो आणि आजची मी. अहो, चंद्रकोरीचा चंद्र कधी झाला तेच कळलं नाही. घरावर मेहनत घेतली, घेतेय आणि घेत राहीन तो प्रश्‍नच नाही, पण आता सायमलटेनियस्ली मला माझ्यावरही मेहनत करायचीय. थोडक्यात मला माझ्यावर प्रेम करायला शिकायचंय. माझं वजन, माझं मन:स्वास्थ्य, माझी प्रकृती आणि माझा

आनंद ह्याही माझ्या प्रायॉरिटीज आहेत. जेवढं शिक्षण महत्त्वाचं तेवढाच आनंदही. म्हणतात नं, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’. मी म्हणते ‘मुलगी आनंदी झाली तर

पूर्ण घर आनंदी झालं’.

मुलीच्या आनंदाची-अचिव्हमेंटची अनेक कारणं आहेत. त्यातील एक म्हणजे पर्यटन, जर महिला पर्यटन एवढं महत्त्वाचं असेल तर एक जबाबदार पर्यटन व्यावसायिक म्हणून जसं सस्टेनेबल टूरिझम हे एक लक्ष्य आहे तसंच महिला पर्यटनासाठी लाँग टर्म गोल निर्माण करणं हे कर्तव्य आहे. पर्यटनाचे फायदे लक्षात आल्यावर ‘समाजातल्या कोणत्याही थरातल्या महिलेला पर्यटन करता आलं पाहिजे’, हे वीणा वर्ल्डचं ध्येय आहे. आणि त्यासाठीच आज एक लक्ष्य समोर ठेवावंसं वाटतंय समस्त महिलांबाबत, ते म्हणजे ‘पन्नाशीच्या आत शंभरी’गाठूया. हे मोठ्ठ लक्ष्य आहे. आणि लक्ष्य नेहमी मोठंच ठेवावं. देवाकडे मोठंच काहीतरी मागावं, प्रयत्न केले तर ऐंशी टक्के तरी हासिल होतं. वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा चंद्रावर सहली न्यायची मनिषा ठेवली. आजही आहे आणि का असू नये? स्वप्न बघण्यात कंजूसपणा नको. आणि सांगायला आनंद वाटतो की, चंद्रावर सहली नेणं आता शक्यता बनलीय. असाध्य ते साध्य होतं ते असं. आता ‘पन्नाशीच्या आत शंभरी’ हे नेमकं काय आहे ते पुढच्या रविवारी बघूया. क्रमश:

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*