नेव्हर एव्हर गिव्ह अप!

0 comments
Reading Time: 8 minutes

संकट आलं की व्यक्तिमत्त्व, मग ते स्वत:चं वा दुसर्‍याचं, अगदी खरंखूरं समोर येतं. संकटाला आपण कसं तोंड देतो, संकटानंतर येणार्‍या घडामोडीचा कसा सामना करतो आणि त्या संकटातून बाहेर पडत पूर्वीचा दिमाख-आत्मसन्मान कसा परत मिळवतो ही अग्निपरीक्षा असते. ही एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादित नसते तर ही अग्निपरीक्षा एखाद्या शहराची असू शकते, एखाद्या संस्थेची असू शकते, एखाद्या राज्याची असू शकते किंवा एखाद्या देशाचीसुद्धा…

गेले वीस-पंचवीस दिवस सततची भटकंती सुरू आहे. ईस्टर्न युरोपमधली काही छोटी-छोटी शहरं राहून गेली होती बघायची. त्यांचा पंधरा दिवसांचा दौरा सुरू होता, त्यानंतर बँकॉकला सीनियर्स स्पेशल आणि वुमन्स स्पेशलच्या पर्यटकांना भेटायचं होतं आणि नंतर अति-महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे आम्हा सर्वांच्या आणि आमच्या पर्यटकांच्या आवडत्या केरळला भेट द्यायची होती. भारतात महाराष्ट्र, गुजरात आणि पश्‍चिम बंगालमधून जास्तीत जास्त पर्यटक देशविदेशात पर्यटन करीत असतात. त्यातही महाराष्ट्र नंबर वन आहे ज्याला कारण अर्थातच कनेक्टिविटी. मुंबईने आपल्याला भारतातल्या प्रत्येक राज्याला रोडवेज, रेल्वेज आणि विमानमार्गे जोडलेलं आहे, कनेक्टिविटी व्यवस्थित असेल तर व्यापार उद्योगाला जशी चालना मिळते तसंच पर्यटनवृद्धीसाठीही पोषक वातावरण निर्माण होतं. त्यामुळेच म्हणजे मुंबईमुळे महाराष्ट्रातून देशात आणि विदेशात पर्यटन करणार्‍या पर्यटकांची संख्या सर्वात जास्त आहे. वरील तीनही राज्यांच्या पर्यटकांचा विचार केला तर त्यांची भारतातील पर्यटनात सर्वात जास्त पसंती असते ती उत्तरेकडे हिमाचल काश्मीरला, पूर्वेकडे सेव्हन सिस्टर्सना, मध्य भारतात राजस्थानला आणि दक्षिणेकडे केरळला. पर्यटन म्हणजे काय? पर्यटनसदृश परिस्थिती कशी निर्माण करायची? आपल्या देशातल्या पर्यटकांना आपल्याकडे कसं खेचून घ्यायचं? परदेशातल्या पर्यटकांपर्यंत कसं पोहोचायचं? त्यांचं आगत-स्वागत कसं करायचं? ‘अतिथी देवो भव:’चा अतिशय सुंंदर अनुभव येणार्‍या पर्यटकांना कसा द्यायचा? गूड वर्ड ऑफ माऊथने पर्यटन कसं वाढवायचं? आनंदी पर्यटकांमुळे होणारी कर्णोपकर्णी जाहिरात किती महत्वाची आहे? हे जर आपल्या देशात कुणाला कळलं असेल तर ते राजस्थान आणि केरळला. आत्ता-आत्ता म्हणजे अजून कोसो दूर असलं तरी गुजरातने त्याची ‘री’ ओढलीय म्हणायला हरकत नाही. राजस्थानने ऐतिहासिक समृद्धीचा वापर करीत कला-परंपरांच्या साह्याने वाळवंटात पर्यटन फुलवलं, वाढवलं आणि ‘पधारो म्हारो देस’ म्हणत सगळ्या जगाला वेड लावलं. केरळ तसं बघायला गेलं तर भारताच्या नकाशावरचं एक छोटं राज्य पण टुमदार, हिरवंगार, शिकलं-सवरलेलं आणि ‘शांतंम पापम’ची जातकुळी असणारं देखणं राज्य. मसाल्याचे पदार्थ, रबर प्लान्टेशन्स, चहाच्या मैलोनमैल पसरलेल्या बागा, वरूण राजाच्या कृपेमुळे जंगलसदृश हिरवंगार सभोवताल, एका बाजूला समुद्र तर दुसर्‍या बाजूला वेस्टर्न घाट म्हणजेच सह्याद्रीच्या दक्षिणेकडे पसरलेल्या पर्वतरांगा, बॅक वॉटर्सची अप्रतिम देणगी,आयुर्वेद आणि योग ही संस्कृती, कथकलीची परंपरा, कल्पवृक्षाची कृपादृष्टी… तसंच प्रत्येक घरातलं कुणीतरी कामानिमित्त परदेशात-आखातात त्यामुळे पैशाचा प्रचंड ओघ केरळमध्ये, त्यातून निर्माण झालेली एकसे एक केरळीयन घरं ह्यांनी केरळचं सौंदर्य आणखी खुलवलं. केरळने स्वत:मधलं पोटेंशियल जाणलं. ‘गॉड्स ओन कंट्री’ ही टॅगलाईन घेतली आणि स्वत:च्या राज्याला भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर अव्वल स्थान मिळवून दिलं. गेल्या दोन दशकात ज्या तर्‍हेने केरळला भारतीय आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढली ती बघून केरळला सलाम करावासा वाटतो आणि म्हणावसं वाटतं, हॅट्स ऑफ टू यू!

सगळं काही चांगलं चालू असताना कुणाचीतरी नजर लागली म्हणतात नं तसं झालं केरळच्या बाबतीत. ऑगस्टमध्ये प्रचंड पर्जन्यवृष्टीने केरळला घेरलं. संततधार-मुसळधार पाऊस, वातावरणात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, ईस्टर्न आणि नॉदर्न पार्टमध्ये म्हणजे इडुक्की आणि वायनाड भागात कोसळलेले पहाड आणि खचलेले रस्ते, राज्यातल्या चोपन्न धरणांपैकी चौतीस धरणांचे उघडावे लागलेले दरवाजे, आणि त्यामुळे आलेला महाभयंकर पूर होत्याचं नव्हतं करून गेला. अनेकांनी प्राण गमावले. कुणाची आयुष्यभराची कमाई एका फटक्यात नाहीशी झाली. मुळापासून उखडणं म्हणजे काय हे अनेकांनी ह्या आरिष्टामध्ये जाणलं. भारतातल्या बिझी एअरपोर्टस्पैकी एक असलेला आणि संपूर्णपणे सोलर एनर्जीवर चालणारा देशातला पहिला असा प्रेरणादायी कोचीन एअरपोर्टही पंधरा-सोळा दिवस बंद ठेवावा लागला. संकटाची तीव्रता आपण ह्या एका गोष्टीवरूनही जाणू शकतो. ज्यावेळी हे घडलं त्यावेळी वीणा वर्ल्डच्या दोन ग्रुप्समधले पर्यटकही केरळमध्ये होते. त्यांना मदुराईमार्गे मुंबईला आणण्यात आलं. त्रास झाला त्या अडनिड्या प्रवासाचा आमच्या पर्यटकांना पण अशावेळी सुखरूप बाहेर पडणं हे सगळ्यात महत्वाचं. एकोणीसशे चोवीसमध्ये म्हणजे जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी केरळमध्ये ‘द ग्रेट फ्लड ऑफ ९९’ने हाहाकार माजवला होता. (ते वर्ष मल्याळम कॅलेंडरनुसार एक हजार नव्याण्णव होतं) यावर्षी ऑगस्टमध्येही केरळची परिस्थितीही हाहाकार उडवून देणारीच ठरली. दुर्देवाचा प्रचंड आघात होता तो.

केरळचा हा महापूर मानवी इच्छा आकांक्षांच्या हव्यासाचा परिणाम होता की वेळीच खबरदारी घेतली नाही त्याचं फळ होतं, की निसर्गाला शह देणार्‍या-त्यावर कुरघोडी करू पाहणार्‍या मानवजातीला निसर्गाचा इशारेवजा धडा होता, हा वेगळा विषय आहे पण ही गंभीर परिस्थिती आपल्या एका राज्यावर ओढवली ही वस्तुस्थिती आहे. ह्या संकटाचा मुकाबला करणं मात्र तातडीचं काम होतं. सगळा देश मदतीला आला म्हणायला हरकत नाही, केरळवर प्रेम करणार्‍या विदेशी पर्यटकांनीही त्यांच्यापरीने फुल ना फुलाची पाकळी म्हणत मदत पाठवली. काही देशांनी पाठवलेली मदत आपल्या देशाने स्वाभिमानाने त्यांचे आभार मानत स्विकारली नाही, ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आमच्यावर संकट आलंय, आम्ही निश्‍चितपणे हतबल झालोय पण त्या संकटावर मात करण्याची -त्यातून बाहेर यायची, त्यासाठी पडतील ते कष्ट घ्यायची आमची तयारी आहे. आम्ही लाचार नाही किंवा तसे कुणाचे मिंधे होणार नाही ही गोष्ट आपल्या देशाने आपल्यासमोर ठेवली, हे महत्वाचं आहे, आपल्या देशाच्या आणि तरूणाईच्या मानसिकतेसाठी. मेरा भारत महान! हे रेस्क्यू ऑपरेशन सर्वात मोठ ठरलं. सदर्न नेव्हल कमांड, सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स, नॅशनल डिझास्टर रीकव्हरी सपोर्ट टीम, लोकल फिशरमन्स यासर्वांनी मिळून पासष्ट हजारहून अधिक माणसांना पुरातून बाहेर काढून वाचवलं. आता ज्या ठिकाणी लोकं अक्षरश: बेघर झालेयत त्यांचं पुनर्वसनाचं काम सुरू आहे. ह्या सर्व परिस्थितीत केरळच्या लोकांची एकजूट प्रकर्षाने जाणवत होती.

केरळच्या सरकारने पहिली गोष्ट केली ती वर्षभराची सर्व सेलिब्रेशन्स रद्द केली आणि तो पैसा पुरग्रस्तांच्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या डागडूजीकरिता रीअलॉकेट केला. सर्व सेलिब्रेशन्स रद्द झाल्यामुळे दरवर्षी दिमाखात साजरं होणारं, केरळसाठी-देशविदेशातल्या ट्रॅव्हल कंपन्यांसाठी-लोकल रोजगारासाठी अतिशय महत्वाचं ठरणारं ‘केरला ट्रॅव्हल मार्ट’ सरकारने आर्थिक मदत दुसरीकडे वळविल्याने अडचणीत आलं. आता बहुतेक हे KTM होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा केरळच्या एकजूटीचं चांगलं उदाहरण देशासमोर आलं. सरकारचा नाईलाज लक्षात घेऊन सर्व हॉटेल्सवाले, ट्रान्सपोर्टर्स, छोटे मोठे संलग्न व्यावसायिक एकत्रित येऊन त्यांनी ‘केरला ट्रॅव्हल मार्ट’ घडवून आणलं. संबधित प्रत्येकाने आपला सहयोग दिला. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या ह्या ट्रॅव्हल मार्टसाठी आम्ही आणि आमच्या आणखी चार टीम मेंबर्सनी भेट दिली. मी त्यांना नंतर जॉइन झाले कारण माझा बँकॉक दौरा सुरू होता. आणि तसंही माझं महत्वाचं काम होतं ते जिथे जिथे पर्यटक जातात त्या सर्व जागा बघायच्या. संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घ्यायचा. पर्यटकांची सारखी विचारणा होतेय की, ‘दिवाळीच्या सुट्टीत आम्ही केरळला जाऊ शकतोय की नाही? तिथली परिस्थिती सुधारली का?’ जरी केरळमधून सर्व ठिकाणाहून फर्स्ट हँड रीपोर्ट मिळत असला तरी स्वत: जाऊन तिथला आढावा घ्यायला आम्हाला आवडतं. शेवटी प्रश्‍न आमच्या पर्यटकांचा आहे. तिथे नो क्रॉम्प्रमाईज ही मानसिकता असल्याने ‘चलो केरळ’ असा ग्रीन सिग्नल आमच्या पर्यटकांना देण्यापूर्वी आम्ही शहानिशा करून घेतली. आश्‍चर्य वाटलं ते केरळच्या पर्यटनस्थळांच्या पूर्वपदावर येण्याचा वेग बघून. ऑलरेडी पर्यटक केरळमध्ये पर्यटन करायला लागलेत. त्यातही बर्‍यापैकी फॉरिन टूरिस्ट बघून आनंद झाला आणि थोडंसं वाईटही वाटलं कारण की आपले पर्यटक सुरू होण्याआधीच परदेशी पर्यटकांनी केरळवर ‘ऑल इज वेल’चा शिक्का मारला. केरळची सर्व पर्यटनस्थळं पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार आहेत. एक पर्यटनसंस्था म्हणून जास्तीत जास्त पर्यटकांना आम्हाला केरळला घेऊन जायचंय, आमचं हे कर्तव्य आहे. आमचं आणि आमच्या पर्यटकांचं हेच योगदान असणार आहे केरळसाठीच्या मदतकार्यात.

अहोरात्र कष्ट घेत, युद्धपातळीवर काम करीत केरळ पुन्हा एकदा दिमाखाने उभं राहतंय. ‘नेव्हर एव्हर गिव्ह अप’चं चांगलं उदाहरण केरळने आपल्या सर्वांपुढे ठेवलंय. त्यांच्या कष्टांना आणि एकजूटीला सलाम करीत आपण सर्वांनीच केरळला यावर्षी जास्तीत जास्त पर्यटक मिळतील आणि पर्यटनाद्वारे निर्माण होणार्‍या रोजगारामुळे वर्ल्ड टूरिझम मॅपवरचं केरळचं स्थान अबाधित राहील ह्यासाठी शुभेच्छा देऊया.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*