द माघ्रेब

0 comments
Reading Time: 9 minutes

तू इथे पहिल्यांदाच आली आहेस का? सुंदर आहे ना आमचा देश? आवडला का तुला? त्या विशीतल्या मुलाने संभाषण सुरू केले. मला आठवत नाही की कधी एखाद्या स्थलदर्शनाच्या जागी कुठल्या मॉन्युमेंटजवळ गर्दी नसून असा एकांत मला मिळाला असेल, पण ही जागा मात्र त्या एकांत वेळेत मिळालेल्या शांततेमुळे खास वाटून गेली. काहीही माहीत नसलेल्या ठिकाणी भेट देताना अगदी ख्रिस्तोफर कोलंबस झाल्यासारखं उगाचंच वाटून गेलं.

काही काळ तिथल्या कलोसियममध्ये मी चक्क एकटी होते. जणू काही इतिहासाचे गुपित त्या कलोसियमच्या दगडांमध्ये दडलंय, अनं ते उलगडण्याचा प्रयत्न मी करतेय ह्या जाणीवेत मी तिथे बसून होते. सूर्यास्ताची वेळ होत आली आणि भव्य-दिव्य रोमन मॉन्युमेंट सोनेरी प्रकाशात न्हाऊन चमकायला लागले. तेवढ्यात माझ्यासारखाच, जणू वाट चुकलेला एक पर्यटक दिसला व काही न बोलता आम्ही दोघे त्या कलोसियमच्या विशालतेची मनोमनी प्रशंसा करीत शांत बसलो. तू इथे पहिल्यांदाच आली आहेस का? सुंदर आहे ना आमचा देश? आवडला का तुला? त्या विशीतल्या मुलाने संभाषण सुरू केले. मला आठवत नाही की कधी एखाद्या स्थलदर्शनाच्या जागी कुठल्या मॉन्युमेंटजवळ गर्दी नसून असा एकांत मला मिळाला असेल, पण ही जागा मात्र त्या एकांत वेळेत मिळालेल्या शांततेमुळे खास वाटून गेली. ट्युनिसिया या देशाला मी प्रथमच भेट देत होते, पण तेथे होणार्‍या निसर्गाच्या आविष्काराचा एक वेगळाच आनंद मला मिळत होता. काहीही माहीत नसलेल्या ठिकाणी भेट देताना अगदी ख्रिस्तोफर कोलंबस झाल्यासारखं उगाचंच वाटून गेलं. त्यात गम्मत म्हणजे भारतीय पर्यटकांना ट्युनिसियाला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज नाही. केवळ पासपोर्टवर इमिग्रेशनचा स्टॅम्प पडला की आपण ट्युनिसियात प्रवेश करतो.

आफ्रिकेच्या उत्तरेकडच्या टोकावर मोरोक्को, आलजिरिया आणि ट्युनिसिया या माघ्रेब भागात एका बाजूला सहारा वाळवंट तर दुसर्‍या टोकाला मेडिटरेनीयन समुद्राच्या मध्ये ट्युनिसिया स्थित आहे. नॉर्थ वेस्ट आफ्रिकेला माघ्रेब म्हणून ओळखले जाते. मोरोक्को, आलजिरिया, ट्युनिसिया, लिब्या व मॉरिटानिया हे देश समाविष्ट आहेत या माघ्रेब भागात. युरोप खंडाच्या सर्वात जवळ असलेले आफ्रिका खंडाचे टोक असल्याने या भागाला खास महत्त्व लाभलंय. या भागात पूर्वीपासून शांतताप्रिय बर्बर ट्राईब्सचं वास्तव्य राहीलं आहे. त्यानंतर इथे फीनीशियन्स, रोमनस्, अरेबिक, इस्लामिक देशांतल्या लोकांचे आक्रमण होऊन शेवटी फ्रेंच व स्पॅनिश लोकांचे राज्य होते. १९५६ मध्ये मोरोक्को आणि टयुनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. इतक्या विविध साम्राज्यांच्या राजवटींमुळे  ट्युनिसिया व मोरोक्को सारख्या देशांना एक अनोखे वैविध्य लाभलं आहे आणि ह्याची जाणीव इथल्या स्थलदर्शनात, राहणीमानात, खाद्यपदार्थांमध्ये, भाषेत व आर्किटेक्चरमध्ये थोडक्यात रोजच्या जीवनात आजसुद्धा जाणवते.

ट्युनिसिया असो किंवा मोरोक्को, इथे सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे अरेबिक व त्यानंतर फ्रेंच भाषेचा नंबर लागतो. इथल्या लोकांना इंग्रजी समजते आणि थोड्याफार प्रमाणात बोललीसुद्धा जाते. ट्युनिसिया एअरपोर्टवरून माझ्या शोफर ड्रिव्हन गाडीने मी निघाले ते ट्युनिसियाच्या काईरुआन शहराकडे. काईरुआन हे इस्लामिक अभ्यासाचे एक फारच महत्त्वाचे ठिकाण. इथे पोहोचताच रस्त्याच्या मधोमध एक सिरॅमिकचा गालिचा बांधलेला दिसला. जणू ते शहर प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी गालिचाच्या पायघड्या घालून स्वागतासाठी सज्ज आहे की काय असा भास त्या क्षणी मला झाला. सातव्या शतकात इस्लामिक स्कॉलरशिपसाठी व कुराण शिकण्यासाठी काईरुआनचे जगभरात महत्त्वाचे स्थान होते. मक्का व मदिनाच्या मागोमाग काईरूआनचे महत्त्व होते. आज इथल्या मदिना म्हणजेच ओल्ड टाऊनला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा खिताब मिळालाय. इथली प्रशस्त मशिद पाहण्यासारखी आहेच पण हार्ट ऑफ द काईरूआन असण्याचा मान  मात्र  इथल्या मदिनांनी पटकावलाय. त्या जुन्या गल्लीबोळांमध्ये आजसुद्धा टुरिस्ट शॉप्सबरोबर लोकल शॉपिंगची दुकानं देखील पाहता येतात. असेच लोकप्रिय दुकान म्हणजे इथले मिठाईचे दुकान व तिथे मिळणारे खजूराचे बनलेले मखरूद. ट्युनिसियाच्या प्रत्येक शहरातले मदिना व त्यातले मॉकेट आणि दुकाने म्हणजेच सूक्समध्ये फिरण्याचा मोह कुणालाच आवरत नाही, अगदी हॉलीवूडच्या प्रोड्युसर्सनासुद्धा. इजिप्त दर्शविणार्‍या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रिकरण हे ट्युनिसियामध्ये झालंय. ह्याचं प्रसिद्ध आणि माहितीतलं उदाहरण घ्यायचं झालं तर इंडियाना जोन्स मालिकेतल्या रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्कचे शूटिंग हे काईरूआनच्या मदिनामध्येच पार पडलंय. काईरूआन वरून पुढे दीड दोन तासांवरच रोमन साम्राज्याचे एक महत्त्वाचे मॉन्युमेंट म्हणजेच एल जेमचे कलोसियम बघायला मिळते. रोमच्या कलोसियमनंतर शांततेचा, निवांतपणाचा अनुभव देणार्‍या ट्युनिसियातील एल जेमच्या कलोसियमचा क्रमांक लागतो. इथे जवळच रोमन म्युझियममध्ये रोमन घरांचे बांधकाम, त्यातले मोझॅक वर्क बघता येेते.

ट्युनिसिया म्हणजे केवळ मॉन्युमेंट्स आणि ऐतिहासिक स्थलदर्शनाचे ठिकाण नव्हे तर समुद्र किनार्‍यांचा देखील मनसोक्त आनंद इथे घेता येतो. कारण मेडिटरेनीयन सी च्या काठीच आहेत, ट्युनिसियाचे कोस्टल टुरिस्ट पॅरेडाईज्, सूस व हामामेत. इथल्या मेदिनाच्या सूक्समध्ये लेदरवर्क, सिरॅमिक्स व मेटलवर्कचे गिफ्ट आर्टिकल्स व सुवेनियर्सचे शॉपिंग करत वेळ कसा जातो हे कळतच नाही. पण सूस किंवा हमामेतमध्ये मुळात हॉटेलमधून वेळ काढणेच कठीण आहे. इथले बहुतेक रीसॉर्ट्स समुद्राच्या काठी असल्याने अतिशय सुंदर पांढर्‍याशुभ्र वाळूने व निळ्याशार पाण्याने सजलेले आहेत. तिथे नुसते पाण्यात डुंबून, सॅन्ड कॅसल बनविण्याबरोबरच अनेक वॉटर स्पोर्टस्चा आनंदसुद्धा आपण घेऊ शकतो. मी हॉटेलमध्ये चेक-इन केले तेव्हा एका आलिशान प्रशस्त हॉटेल लॉबीने माझे स्वागत केले. सवयीप्रमाणे रूममध्ये जाताच सर्वप्रथम मी रूमच्या खिडक्या उघडल्या व बाल्कनीमधून पूलकडे बघितले, तर एक नव्हे दोन नव्हे तर चक्क तीन-तीन स्विमिंग पूलचा चॉईस तिथे होता. एक समुद्राच्या खार्‍या पाण्याचा, एक केवळ प्रौढांसाठी आणि तिसरा चिल्ल्या-पिल्ल्यांना मनसोक्त खेळण्यासाठी. बहुतेक युरोपियन प्रवाशांनी बीच व पूल भरलेला दिसला. सूस व हामामेतच्या समुद्रातले द्रव्य थॅलगो थेरेपीसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच इथे पर्यटकांचा ओढा  स्पा व वेलनेस टूरिझमसाठी अधिक दिसतो. वेलनेससाठी ही जागा इतकी प्रसिद्ध आहे की मला स्पा ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट मिळणं अवघड होतं तिथे. इथल्या पर्यटकांचा व लोकल्स्चा पेहराव अगदी मॉर्डन असून बहुतेक ठिकाणी सगळे फ्रेन्डली आणि मदत करायला कायम तत्पर असे होते, ह्याचा अनुभव मी देखील घेतला तिथे.

सूसला वास्तव्य केल्यानंतर मी इथल्या एका अनोख्या शहराकडे वळले. सिदी बऊ सेद हे ट्युनिसियाचे सर्वात रोमँटिक शहर असे म्हणायला हरकत नाही. या शहरात प्रवेश करताच, आपण चुकून ग्रीसला पोहोचलो की काय? असा प्रश्‍न पडणे साहजिक आहे. संपूर्ण शहर हे पांढर्‍या व निळ्या रंगाने सजविलेले दिसते. त्यात पांढर्‍याशुभ्र भिंतींवर लाल-गुलाबी बोगनबेलाची गच्च बहरलेली फुले आणि सभोवती दरवळणारा जास्मिन फुलांचा मधुर सुवास आपल्या डोळ्यांना ताजेतवाने करून टाकतात. अगदी पावलोपावली जास्मिनचे वेल लावलेले दिसतात. तसे सूस व हामामेतमध्ये देखील मदिनाची काही घरे पांढर्‍या व निळ्या रंगाने सजविलेली दिसतात पण सिदी बऊ सेदची बातच वेगळी आहे. इथे राहणार्‍या एका सेंटच्या नावाने या शहराला हे नाव देण्यात आले असले, तरी एका फ्रेंच आर्टिस्टला या शहराला सुंदर बनविण्याचे श्रेय दिले जाते. डोंगरावर स्थित या शहराच्या सौंदर्यामुळे इथे कायमच आर्टिस्ट व कलाकार आकर्षित झालेयत. तसेच, रोडॉल्फ डी एरलान्जर या फ्रेंच आर्टिस्टने साधारण १९२० साली ही निळी व पांढरी रंगसंगती इथे आणल्याचा समज आहे. अगदी ग्रीसच्या सॅन्तोरिनी शहराची आठवण देणारे हे सिदी बऊ सेद अगदी अरसिक लोकांनाही फोटोग्राफर बनवून टाकते. इथले मेडिटरेनीयन रीजनचे ऋणानुबंध प्राचीन काळापासूनच दिसतात ते जवळच्या कार्थेज शहरात. कार्थेज हे मेडिटरेनीयन इतिहासातले एक अतिशय महत्त्वाचे शहर. सर्वप्रथम लेवांट या मेडिटरेनीयन भागातल्या खासकरून लेबननच्या लोकांनी कार्थेज स्थापन केले. ह्या शहराच्या स्थापनेचे श्रेय जाते ते क्वीन डीडो या राणीला. इथे पोहोचताच इथल्या एका स्थानिक जमातीकडून तिने एका बैलाच्या कातडीएवढी जागा विकत घेतली व कातडीचे तुकडे करून ती जेवढी पसरेल तितकी पसरवून ती जागा आपलीशी केली आणि एक अतिशय सुजलाम सुफलाम अशा शहराची स्थापना केली, अशी कथा इथे प्रचलित आहे. असे म्हणतात की, त्या काळात रोमला जर कुणाची कॉम्पीटिशन होती तर ती कार्थेजची. या फीनीशियन साम्राज्यावर मग रोमन रीपब्लिकने हल्ला केला आणि रोमन साम्राज्य स्थापन केले. आज ठीक-ठिकाणी या प्राचीन शहराचे अवशेष पाहता येतात, त्यात रोमन बाथ्स् व रोमन व्हिलास् सुद्धा आहेत.

रोमन व्हिला जरी नेस्तनाभूत झाले असले तरी ट्युनिसियामध्ये एकदातरी एखाद्या डार मध्ये राहून पहा. सिदी बऊ सेद मध्ये मला अशाच एका डारमध्ये वास्तव्य करता आले. ट्युनिसियाचे पारंपरिक डारम्हणजे ऐतिहासिक घरे ज्यांचे आज हॉटेल्समध्ये रूपांतर झालेले आहे. इथे सुंदर रूम्स व ओपन एअर कोर्टयार्डस्, अतिशय अप्रतिम लोकल कारागिरी मोहवून टाकतात तर इथे काहीडारमध्ये स्विमिंगपूल सुद्धा आहेत. झाडाफुलांनी बहरलेले सुंदर गार्डन व कोर्टयार्ड सोडून जावेसे वाटत नाही आणि अप्रतिम हॉस्पिटॅलिटीचा आस्वाद घेता येतो.

सिदी बऊ सेद ट्युनिसियाची राजधानी ट्युनिसच्या अगदी जवळ आहे. केवळ तासाभरात आपण ट्युनिसला पोहोचू शकतो. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे बार्डो म्युझियम, ज्यात ट्युनिसियाच्या इतिहासाची झलक पहायला मिळते. एका पॅलेसचे रूपांतर या म्युझियममध्ये करण्यात आले आणि हे ट्युनिसचेच नव्हे तर संपूर्ण मेडिटरेनीयन भागातले सर्वात महत्त्वाचे व विशाल म्युझियम आहे. ट्युनिसियाच्या मेदिना व तिथले सूक म्हणजे रंगांची उधळण. कार्पेट्स, दागिने, सुवेनीयर्स, खाद्यपदार्थ व कॅफेस्ने भरलेल्या त्या मेदिनाच्या भूलभूलैय्यात हरवलो तरीही कुठलेतरी सुंदर गुपितच आपल्याला सापडेल. एका बाजूला हे प्राचीन मेदिना असले तर दुसर्‍या बाजूला ट्युनिस शहर अगदी मॉर्डन भासते. अगदी पॅरिस शहराची आठवण करून देणारे रूंद-रूंद रस्ते व रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली सुंदर झाडे फ्रेंच स्टाईल अ‍ॅव्हेन्युजची जादू अनुभवत आपल्याला भुलवून टाकतात हे तितकंच खरं.

ट्युनिसियाचे काही भाग अगदी मॉडर्न आहेत आणि काही जणू इतर जगापासून लांब लपून बसलेले. पण इथे सुद्दा आपल्या बॉलीवूडची जादू पोहोचलेली आहे व बहुतेक बॉलीवूड कलाकारांना सगळेच ओळखतात. काळाच्या ओघात जणू इतर जग ट्युनिसियाला थोडेसे विसरून गेले असले, तरी ह्याचा फायदा असा की ख्रिस्तोफर कोलंबस सारखेच नवीन जागेच्या शोधात आपण निघालो की पुढे काय घडणार हे पूर्णपणे लिखित नसून दररोज एक नवे अ‍ॅडव्हेंचर अनुभवायला मिळते. सो, इज माघ्रेब युअर नेक्स्ट हॉलिडे?

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*