Marathi

कॉल करायचा नाही!

Reading Time: 5 minutes

वीणा वर्ल्ड झालं तेव्हा आता पुढे काय? असे अनेक प्रश्‍न होते. खिसा रिकामा होता पण स्वप्न चंद्रावर जायची. आपण आज ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षा आपल्याला कुठे पोहचायचंय ह्यावर लक्ष केंद्रित करून कसोशीने प्रयत्न करण्यामध्ये सगळ्यांनी स्वत:ला गुंतवून घेतलेलं. अजून लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं दहा टक्केही कामझालेलं नसलं तरी…

परवा आमची मार्केटिंग मॅनेजर प्रणोती जोशीच्या केबीनमधून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. तिथूनच जात होते, आत डोकावले आणि म्हटलं, मलाही सांगा बरं काय आनंदोत्सव घडतोय या चार भिंतींच्या आत. प्रणोती म्हणाली, आत्ता फोन आला होता, अमूक एका बँकेचा होता, लोन पाहिजे का म्हणून, म्हटलं, द्या! तर म्हणाले, तुम्हाला एवढं लोन सँक्शन होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्ही दर महिन्याला एवढा हप्ता भरायचा, तेव्हा त्यांना म्हटलं की, मी का हप्ता भरायचा? लोन तुम्ही देताय, मी थोडंच तुमच्याकडे मागितलंय, हप्ताही तुम्हीच भरा, तर रागाने फोन आपटला. आम्ही काहीतरी काम करीत होतो महत्त्वाचं त्यात हा फोन. त्याने डिस्टर्ब होण्यापेक्षा त्या फोन करणार्‍यालाच डीस्टर्ब केलं, ह्या फोन्सचा नुसता वैताग आहे. सकाळ दुपार संध्याकाळ, कसलंच भान नाही कधीही येतात हे फोन्स. आता किमान हा माणूसतरी त्याच्या लिस्टमधून माझा नंबर काढून टाकेल. डिस्टबर्न्सचा एक फोन कमी केला. रागाने फोन डिस्कनेक्ट करण्याचा त्याचा प्रकार बघून आम्ही हसतोय. त्यांना म्हटलं, म्हणूनच सहा वर्षांपूर्वी आपण ठरवलं जरी वीणा वर्ल्ड नवीन असलं तरी आपल्याकडे अशातर्‍हेचं फोन मार्केटिंग किंवा ज्याला कोल्ड कॉलिंग म्हणतात ते आपण करायचं नाही. आणि तो आपला डीसिजन बरोबर होता म्हणायचा.

टेलिव्हिजन हा प्रकार नवीन होता तेव्हा म्हणजे साधारण 1970-80 चा काळ असेल, ब्लॅक अँड व्हाइट टी व्ही होता ज्यावर अनेक छान छान कार्यक्रम असायचे, अजूनही आठवतात ते म्हणजे विनायक चासकर, सुरेश खरें, विनय आपटे, नीना राऊत, विजय कदम, दया डोंगरे, अशा निर्माते, लेखक आणि कलाकारांच्या जोड्यानीं मिळून केलेले अनेक कार्यक्रम त्यापैंकी गजरा, नाट्यावलोकन, प्रतिभा आणि प्रतिमा, शंब्दाच्या पलिकडले, आव्हान, किलबिल असे अनेक शोज आणि मालिका आजही आपली जादू राखून आहेत. प्रदीप भिडे, स्मिता पाटील आणि भक्ती बर्वेच्या बातम्यांचा आवाज आजही डोळे बंद करून आठवला तर खणखणीत ऐकू येतो. टीव्ही ब्लॅक अँड व्हाइट असला तरी त्याने आपल्या मनावर अशा छान छान रंगबिरंगी आठवणी कोरल्यात की त्या गप्पा नॉस्टॅल्जिक करून जातात. त्या वेळी दिलिप प्रभावळकर आणि बाळ कर्वे ह्यांची एक सीरियल असायची चिमणराव आणि गुंड्याभाऊ. काय असायचा तो प्रत्येक एपिसोड! डोळे लावून बसायचे ती सीरियल बघायला. आता लिहितानाही मला वाटतंय की लिखाण थांबवून यू ट्युबवर शोधावं ते एपिसोड्स आहेत का म्हणून. त्यातला एक एपिसोड ह्या कोल्ड कॉलिंगवरून आठवला. तेव्हा लँडलाईन फोन कात टाकत होतं. फोनच्या अनेक मजेशीर गोष्टी- जोक्स-गमतीजमती ऐकायला मिळायच्या. राँग नंबर हा प्रकार त्यावेळी असाच कोल्ड कॉलिंगसारखा सतवायचा. फोन ह्या प्रकाराचंच नाविन्य होतं, त्यामुळे फोन वाजला रे वाजला की उत्साहाने आपण तो घ्यायला जायचो, समोरचा पण कुणीतरी अनोळखी निघायचा आणि दात-ओठ खात थोड्या नम्रतेने त्या समोरच्या व्यक्तीला राँग नंबर असं म्हणत आपल्याकडून फोन जवळजवळ आपटलाच जायचा. ह्या राँग नंबर किश्श्यावर चिमणराव-गुंड्याभाऊ ह्या सीरियलचा एक दे धम्माल एपिसोड होता. सतत येणार्‍या राँग नंबरचं काय करायचं ह्यावर चिमणराव फोनवर जे-जे काही करतात त्या समोरच्या अनोळखी माणसाचं ते आत्ता आठवूनंही हसू येतंय. तेव्हा राँग नंबर येणं ही टेक्निकल बाब होती. आता प्रगत तंत्रज्ञानाने त्या गोष्टी काळाच्या पडद्याआड ढकललेल्या असल्या तरी आज ह्या कोल्ड कॉलिंग मार्केटिंगने बर्‍यापैकी उपद्रव दिलाय असं म्हणायला हरकत नाही.

वीणा वर्ल्ड झालं तेव्हा आता पुढे काय? असे आम्हाला अनेक प्रश्‍न होते. खिसा रिकामा होता पण स्वप्न चंद्रावर जायची. आपण आज ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षा आपल्याला कुठे पोहचायचंय ह्यावर लक्ष केंद्रित करून कसोशीने प्रयत्न करण्यामध्ये सगळ्यांनी स्वत:ला गुंतवून घेतलेलं. अजून लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं दहा टक्केही काम झालेलं नसलं तरी सहा वर्षांनी आपण राइट ट्रॅकवर आहोत ह्याचं समाधान आहे. त्यावेळी सुरुवातीला लोकांना कळणार कसं वीणा वर्ल्ड ही नवीन कंपनी सुरू झालीय ते? ह्यावर चर्चा होती. दोन-तीन पी.आर. कंपन्यांनी अप्रोच केलंय. ते म्हणताहेत, आम्ही तुम्हाला एक रोड मॅप देऊ कशा तर्‍हेने वीणा वर्ल्ड जनमानसात माहीत होईल त्यासाठी. तुम्हाला डेटा बेस देऊ, एक टीम बसवून तुम्ही लोकांना कॉल करून माहिती द्या. तुम्हाला वेगवेगळ्या तर्‍हेने सतत लोकांसमोर ठेवू जेणेकरून वीणा वर्ल्ड हा ब्रँड फास्ट पेनिट्रेट होईल. अनेक योजना सांगून त्यांनी त्यासाठी येणार्‍या खर्चाचं भलंमोठं एस्टिमेट आमच्यासमोर ठेवलं. त्यांची फी आम्हाला झेपते की नाही हा प्रश्‍न होताच पण दुसरा महत्त्वाचा प्रश्‍न होता, आपल्याला परफॉर्मन्सने मोठं व्हायचंय की पी.आर. ने? जेव्हा असे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसतो, चर्चा करतो आणि निर्णय घेतो. आजही ही प्रथा सुरू आहे. नील नेहमी एक प्रश्‍न विचारतो, आर वुई ऑन द सेम पेज? सगळ्यांची एकवाक्यता झाली की मीटिंग संपते. अशाच त्या चर्चेत आम्ही मुद्दे मांडले, आपल्याजवळ काय आहे आणि काय नाही ह्याचे. तीस वर्षांच्या अखंड मेहनतीने निर्माण झालेलं गूडविल, ह्या लेखांद्वारे पर्यटकांशी आणि वाचकांशी असलेला संवाद, देशविदेशात जोडले गेलेले सप्लायर्स आणि साथीला असलेली टीम ही मिळकत होती. संस्था सुरू झाली की रविवारच्या लेखाद्वारे, जे अ‍ॅक्चुअली अ‍ॅडव्होटेरियल्स असतात, एकप्रकारची जाहिरातच असते ती, त्याद्वारे पर्यटकांशी संवाद साधूया, जाहिराती दिल्या की पर्यटक येतील आणि त्यांना आपल्या चांगल्या कामाने आपण आपल्याशी बंाधून घेऊया, ही कार्यपद्धती असेल. आपण वीणा वर्ल्डमध्ये कोणतीही पी.आर. कंपनी अपॉईंट करायची नाही तसंच कोल्ड कॉलिंग हा प्रकार आपल्याकडे सुरू करायचा नाही. आपल्याला सचिन तेंडूलकर बनायचंय, हाय परफॉर्मन्सने पुढे जाऊया. सर्वानुमते हे ठरलं. जाहिराती सुरू झाल्या आणि पर्यटकांनी जी काही साथ दिली पहिल्या वर्षी ती विचारू नका. असं भाग्य क्वचितच कुणाच्या पदरी येत असेल. पहिल्या समर व्हेकेशनमध्ये तर आम्ही पर्यटकांच्या त्या प्रचंड प्रतिसादाने कोसळलोच, इतकं प्रेम केलं पर्यटकांनी. त्या वर्षी काही टूर्सवर पर्यटकांना त्रासही झाला त्याची अजूनही खंत आहे. ते पर्यटक जेव्हा परत वीणा वर्ल्डकडे यायला लागले तेव्हा झालेला आनंद केवळ शब्दातित. त्यांची क्षमा मागतानाच त्यांचे आभारही मानते. पण कोल्ड कॉलिंग न करता, पी.आर. एजन्सी न नेमता आपण बरंच काही करू शकतो जर आपल्यात आत्मविश्वास आणि काम करण्याची धडाडी असेल तर. पी.आर. एजन्सीवर माझा रोष नाही पण आपण आधी स्वत:ला आजमवायला पाहिजे. आडात नसेल तर पोहर्‍यात येणार कुठून अशी आपल्या मराठीत म्हण आहे. आधी आपल्यात किती धम्मक आहे ते तर बघूया. जर ती नसेल तर पी.आर. एजन्सीने कितीही काही केलं तरी त्याला यश येत नाही हे आपण अनेक कंपन्यांच्या बाबतीत बघितलंय.

समर सीझनचा धमाका संपल्यानंतर आमच्याकडे सुरू होते ती एम्पॉवरमेंट मूव्हमेंट. ब्रांचेस, प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स, टीम मेंबर्स ह्या सगळ्यांचा आढावा घेतला जातो आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे करेक्शन्स-अपग्रेडेशन्स केली जातात. आपल्या ब्रांचेस काय अवस्थेत आहेत? इंटीरियर-एक्स्टिरीयर-टीम सगळे व्यवस्थित आहेत का? आणखी काय करायला पाहिजे? त्यांना कोणता सपोर्ट द्यायला पाहिजे? ह्यासाठी मार्केटिंग टीमने सगळीकडे दौरा केला. त्याचा साग्रसंगित रीपोर्ट जाणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र बसलो होतो. एकापाठून एक मुद्दे येत होते. त्यात एक विचार आला, आपल्याकडे आपण कोल्ड कॉलिंग करीत नाही पण आपल्यासोबत जाऊन आलेल्या गेस्टना आपण अधूनमधून फोन करूया का? आपल्या एका सेल्स ऑफिसने असे फोन केल्यावर त्यांना बुकिंग आलं. मुद्दा गैर नव्हता, फोन ज्यांना करायचाय ते गेस्ट आपल्याला माहीत आहेत, हा अगदी कोल्ड कॉल नाही म्हणता येणार. असा विचार करायला आम्ही सुरुवात करतोय तोच पाठी बसलेला आमचा धाकटा मुलगा राज म्हणाला, नाही, कॉल करायचा नाही! आम्ही सगळेजण आश्‍चर्यचकित होऊन राजकडे वळलो. हायर स्टडीज्साठी युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटीच्या मधला जो वेळ मिळालाय त्यात राज ऑफिसमध्ये योगदान देतोय. पुन्हा त्याने म्हटलं, कॉल करायचा नाही!. अरे पण का करायचा नाही हे तर सांग, हे आपल्या माहितीतले गेस्ट आहेत, त्यांनाही नवीन काय आलंय ते माहीत करून घ्यायचं असतं, त्यामुळे आपण शक्यता पडताळून पाहतोय की असा फोन करायचा की नाही? राज आपला मुद्दा पुढे दामटवत म्हणाला, मला मॅकडॉनल्डस आवडतं, पण त्यांनी जर मला असा फोन केला तर मी नाही पुन्हा जाणार मॅकमध्ये. मला ते जोपर्यंत आवडतं तोपर्यंत मी कुणीही न बोलावता जाणार तिथे, त्यासाठी त्यांनी मला फोन करायची गरज नाहीये, आणि त्यांना असा फोन करायची वेळ का यावी? दे शूड रादर कॉन्सन्टे्रट ऑन देअर क्वालिटी. आणि समजा जर पुढे मला मॅक आवडेनासं झालं तरी त्यांनी कितीही कॉल्स केले तरी मी थोडाच जाणार आहे तिथे? म्हणजे प्रॅक्टिकली धिस काईंड ऑफ कॉल डझन्ट हेल्प आणि माझी प्रायव्हसी अशी डिस्टर्ब केलेली मला आवडणार नाही, सो, कॉल करायचा नाही!. हूऽऽऽऽ नेक्स्ट जनरेशन बोलली आणि येणार्‍या काळाची पावलं मला दिसली. सहा वर्षांपूर्वी आम्ही कोल्ड कॉलिंगला नाही म्हटलं होतं. आमच्या पुढची जनरेशन येणार्‍या जनरेशनची मानसिकता समोर उलगडून दाखवित होती. परफॉर्मन्स इज द की हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त कळलंय हे जाणून आनंद झाला आणि आम्ही ठरवलं, कोल्ड कॉलिंग तर नाहीच, पण आपल्या गेस्टनाही असे कॉल करायचे नाहीत. लेट्स परफॉर्म अँड विन. लढत राहूया, कष्ट घेत राहूया, आयुष्य काय किंवा व्यवसाय- प्रचंड अडथळ्यांची शर्यत असणार आहे त्याला प्रामाणिक धडाडीने सामोरं जाऊया. एक डायलॉग आठवला, हिंदीत आहे, साला ये किस्मत मुझे जितने नही दे रही है और मैं तो हार मानने के लिये तैयार नही हूँ।

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*