अमेरिका अंटाक्टिर्र्का

0 comments
Reading Time: 9 minutes

मानवनिर्मित आश्‍चर्ये आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना म्हणजेच ‘दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका.नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील अर्जेंटिना, सेंट्रल अमेरिकेतील  पनामा असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे तरी कशी? कोणता काळ अमेरिका भेटीसाठी उत्तम आहे?काय काळजी घ्यावी? या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देणारा आणि अमेरिका सहलीची रंगत वाढवणारा पर्यटकांचा मार्गदर्शक मित्र म्हणजे वीणा  वर्ल्डचे  ‘अमेरिका आणि अंटार्क्टिका

वीणा वर्ल्डच्या डेस्टिनेशन गाइड मालिकेतील दुसरा भाग ‘अमेरिका अंटार्क्टिका’ हा पाचशे नव्वद पानांचा, दोन खंड, एकोणिस देश, एकशे पंचवीस शहरे, पंधरा वंश आणि बारा भाषांना स्पर्श करणारा आणि सदतीस वर्ल्ड हेरिटेज साइट्सना एकाच ठिकाणी संकलित करणारा पर्यटन मार्गदर्शक आता वाचकांना उपलब्ध झाला आहे. या आधी याच प्रकारचा ‘युरोप’ हा पर्यटक मार्गदर्शक प्रकाशित झाला आणि असंख्य पर्यटकांनी युरोप बघताना त्याचा खूप उपयोग झाला याची पोचपावती आवर्जून दिली ह्याचं समाधान वाटलं. पर्यटनासाठी जाणार्‍या कोणत्याही प्रकारच्या पर्यटकाला मग तो ग्रुप टूरवर गेलेला असो, वैयक्तिकरित्या कस्टमाईज्ड पॅकेज घेऊन गेलेला असो, बॅकपॅकर असो किंवा अ‍ॅडव्हेंचरिस्ट प्रत्येकाला जिथे जाणार तिथली माहिती मराठीमध्ये एकत्रितपणे संकलित केलेली मिळावी आणि त्याच्या सहलीचा आनंद आणखी वाढावा ह्यासाठीच हा डेस्टिनेशन गाइड सिरीजचा प्रपंच. तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकाला हवी तेव्हढी माहिती मिळावी हा साधा विचार मुळाशी असल्याने, ‘थोडक्यात पण महत्वाचे’ हा नियम पाळूनच या गाइड सिरीजची आखणी केली आहे. त्यामुळे आधीच्या ‘युरोप’ प्रमाणेच हे ‘अमेरिका अंटार्क्टिका’ देखील वाचकांचा आणि पर्यटकांचा मार्गदर्शक मित्र बनून त्यांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करेल याची मला खात्री आहे.

पंधराव्या शतकाच्या अखेरीला युरोपमधून भारताकडे जाण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला आणि युरोपला ‘न्यू वर्ल्ड’ सापडले. कोलंबसने अमेरिका शोधली असे आपण म्हणतो खरे, पण आपण आता ज्याला अमेरिका म्हणतो त्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या भूमीवर कोलंबस कधी गेलाच नाही. त्याने आपल्या सगळ्या मोहिमांमध्ये भेट दिली ती सेंट्रल अमेरिकेतील बेटे आणि देशांना. गेल्या काही दशकांपर्यंत आपल्या पर्यटकांची अवस्थाही अशीच काहीशी होती. ते अमेरिकेला जाऊन आलो, अमेरिका पाहून आलो म्हणायचे तेंव्हा त्यांनी फक्त युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाला भेट दिलेली असायची. हा देश ज्या नॉर्थ अमेरिका खंडात येतो त्यातील कॅनडा किंवा मेक्सिको हे देश जणू भारतीय पर्यटकांसाठी अस्तित्वातच नसायचे. मग साउथ अमेरिकेचे नाव ही घ्यायला नको. पण पर्यटन व्यवसायातील माझ्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मी हे चित्र बदलताना पाहिले. एकतर प्रसारमाध्यमांतील क्रांतीने जग अधिक जवळ आलं आणि नोकरी व्यवसायासाठी देशापार जाणार्‍या आपल्या मराठी लोकांनी खरोखरच क्षितिजे ओलांडायला सुरुवात केली, त्यामुळे अमेरिका म्हणजे फक्त यु.एस.ए. नाही याची जाणीव होऊ लागली. ही जाणीव अधिक स्पष्ट व्हावी आणि ‘दि अमेरिकाज’ या महाखंडातील महत्वाच्या, पर्यटनाला अनुकूल अशा देशांची ओळख व्हावी म्हणूनच हे मार्गदर्शक पुस्तक. गेल्या दशकभरात तर साउथ अमेरिका ओलांडून आपली मंडळी थेट अंटार्क्टिकाकडे कूच करू लागली आहेत, त्यामुळे यामध्ये अंटार्क्टिकाचाही आवर्जून समावेश करण्यात आला आहे.

‘दि अमेरिकाज’ या महाखंडातील देशांचे वर्णन करायला ‘भव्य दिव्य’हा एकच शब्द मला योग्य वाटतो. यु.एस.ए. मधील मानवनिर्मित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ असो किंवा डिस्ने वर्ल्डमधील मायानगरी, ‘ग्रँड कॅन्यॉन’चे निसर्गशिल्प असो किंवा अलास्कातील ग्लेशियर्सची बर्फाची दुनिया, कॅनडातील यलोहेड हायवे असो किंवा मेक्सिकोमधील ‘चिचेन इत्झा’ असो किंवा ग्रीन लँडमधील ‘इंडिपेंडस फियोर्ड’असो, नॉर्थ अमेरिकेत पर्यटकांसाठी जणू खजिनाच ठेवलाय. आता नॉर्थ अमेरिकेत खजिना आहे म्हटलं तर साउथ अमेरिकेत कुबेराचं भांडारच आहे म्हणावं लागेल. शब्दांत किंवा नजरेत कशातच न मावणारा ‘इग्वाझू धबधबा’, आधुनिक जगातील सात आश्‍चर्यांमधील दोन – ‘माचू पिचू’ आणि ‘ख्राइस्ट द रिडीमर’, अ‍ॅमेझॉनचा भलामोठा प्रवाह आणि त्याकाठचं घनदाट जंगल, जगातले सर्वात उंचावरचे टिटिकाका सरोवर, जगातील सर्वात मोठे मिठागर ‘सालार डि युयुनी’, ‘गॅलोपॅगस’ बेटावरील वन्यजीवन, चिलीमधील ‘इस्टर आयलंड’, साउथ अमेरिकेच्या आकर्षणांची यादी न संपणारीच आहे. बरं, नॉर्थ आणि साउथ अमेरिका पाहून झाल्यावर जगाच्या तळाशी असलेल्या अंटार्क्टिकाचे वेध लागणारच. आता या खंडाची गंमत म्हणजे इथे मानवनिर्मित काहीच नाही, भव्य वास्तू नाहीत की शॉपिंग मॉल्स नाहीत, रेस्टॉरंट्स नाहीत की म्युझियम्स नाहीत. पण निसर्गाने उभारलेली इथली बर्फाची दुनिया आणि या दुनियेतील पेंग्विन आणि व्हेल्स सारखे मानकरी पाहायचे असतील तर इथेच यायला हवे. माझ्या सुदैवाने एक सहल संयोजक म्हणून नॉर्थ, साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका पाहायचे भाग्य मला लाभले. साहजिकच मी जे पाहिले ते अनेकांनी पाहावे म्हणून तर ही डेस्टिनेशन गाइड बुक सिरीज. ‘अमेरिका अंटार्क्टिका’या पुस्तकाच्या आधारे जरा या खंडांची एक झलक तर पाहूया.

संपूर्णतः पृथ्वीच्या पश्‍चिम गोलार्धातच पसरलेला खंड म्हणजे अमेरिका. आपण अनेकदा ‘यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ अर्थात ‘यू.एस.ए.’ या देशालाच ढोबळपणे अमेरिका म्हणतो. प्रत्यक्षात ‘नॉर्थ अमेरिका’ आणि ‘साउथ अमेरिका’ असे दोन खंड मिळून अमेरिका हा महाखंड तयार होतो. या महाखंडाला ‘अमेरिकाज’ म्हणायची पध्दत आहे. मात्र यू.एस.ए. मधील बहुसंख्य लोक आपल्या देशाला अमेरिका आणि स्वतःला अमेरिकन म्हणवणे पसंत करतात. तर अमेरिका खंडातील इतर देशांतील लोकांना हे ‘अतिक्रमण’ मान्य नाही. कॅनडासारखे नॉर्थ अमेरिकन देशातले लोक कटाक्षाने मात्र या देशाचा ‘यूनायटेड स्टेट्स’ किंवा फक्त ‘स्टेट्स्’ म्हणूनच उल्लेख करतात.

अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असं आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो, पण नव्याने झालेल्या संशोधनानुसार या भूमीवर कोलंबसच्याही आधी काही अन्य दर्यावर्दी संशोधकांनी पाऊल ठेवले होते आणि इसवी सन पूर्व एक हजार या काळात व्हायकिंग, इन्यूइट लोकांनी नॉर्थ अमेरिकेच्या विविध भागात वसाहती बनवल्या होत्या. बरं कोलंबस तर भारत समजून या भूमीवर उतरला होता, त्यामुळे तो या भूमीला अमेरिका म्हणणे शक्यच नव्हते, त्याने आपल्या एका पत्रात या भूमीचा उल्लेख ‘न्यू वर्ल्ड’ असा केला आहे. मग ‘अमेरिका’ हे नाव कुठून आलं? तर एका सर्वमान्य सिध्दांतानुसार कोलंबसच्या आधी या खंडाला ‘अमेरिगो वेस्पुस्सी’ या इटालियन व्यापार्‍याने भेट दिली होती. त्याच्या नावाचे लॅटिन रुप होते ‘अमेरिकस वेस्पुसीयस’. इतर खंडांची नावे लॅटिन भाषेतील स्त्री लिंगी शब्द आहेत म्हणून या खंडाचे नाव पडले ‘अमेरिका’. हे नाव जर्मन नकाशातज्ञ मार्टिन वाल्डसिम्युलर याने 1750 साली बनवलेल्या नकाशावर आणि पृथ्वीच्या गोलावर पहिल्यांदा उमटले.

अमेरिकाज म्हणजे नॉर्थ आणि साउथ अमेरिका या दोन्ही खंडांनी मिळून पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या 8.3% भूभाग व्यापलेला आहे. या भूभागावर पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या 14% लोक राहातात. संपूर्ण अमेरिका खंडाची विभागणी भाषेच्या आधारावर ‘लॅटिन अमेरिका’ आणि ‘ग्लो अमेरिका’ अशी करता येते. ढोबळमानाने नॉर्थ अमेरिका ग्लो अमेरिका म्हणजे जिथे इंग्लिश भाषा प्रामुख्याने वापरली जाते असा भाग ठरते, कारण या खंडातील यू.एस.ए. आणि कॅनडा या देशांची पाळंमुळं ब्रिटनमध्ये रुजलेली आहेत. मात्र कॅनडात फ्रेंचसुध्दा अधिकृत भाषा आहे. तर यू.एस.ए. मध्ये तीनशेहून अधिक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. लॅटिन अमेरिका हे संबोधन प्रामुख्याने साउथ अमेरिकेसाठी वापरले जाते, कारण लॅटिनमधून निर्माण झालेल्या स्पॅनिश आणि पोर्तुगिज या भाषा साउथ अमेरिकेतील देशात प्रचारात, वापरात आहेत. याच लॅटिन अमेरिकेच्या भूमीवर झटेक, टॉलटेक्स, कॅरिब्स, तुपी, माया, इंका अशा स्थानिक जमाती बहरल्या, वाढल्या. निसर्गपुत्र असलेल्या या जमाती अनेक बाबतीत प्रगत होत्या. कोलंबसच्या शोधयात्रेनंतर म्हणजे सोळाव्या शतकात या भूभागाकडे युरोपियन साम्राज्यांची वक्र दृष्टी वळली आणि इथल्या स्थानिकांची साम्राज्ये लयाला गेली. विविध वंशियांमुळे लॅटिन अमेरिकेचा सांस्कृतिक पट बहुरंगी, उठावदार झालेला आहे. या भूमीच्या मूळ रहिवाशांची प्राचीन संस्कृती, युरोपियन सत्ताधिशांनी आणलेली त्यांची संस्कृती, आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्यांची संस्कृती या सगळ्यातून लॅटिन अमेरिकेची संस्कृती विणली गेली आहे.

तर मंडळी साउथ अमेरिकेतील ब्राझील असो, सेंट्रल अमेरिकेतील कोस्टा रिका असो, नॉर्थ अमेरिकेतील ग्रीन लँड असो, आता सगळी अमेरिका आणि अंटार्क्टिका आम्ही तुमच्यासाठी एकाच पुस्तकात आणली आहे. सगळ्या प्रकारच्या पर्यटकांना मार्गदर्शक असल्याने या पुस्तकात अमेरिकेची तयारी असे प्रकरण तर आहेच. या प्रकरणात यु.एस.ए. चा व्हिसा किती प्रकारचा असतो, त्यासाठी काय करावे लागते, साउथ अमेरिकेतील देशांचा व्हिसा वेगवेगळा काढावा लागतो का? या माहिती बरोबरच कॅनडाला कोणत्या काळात भेट द्यावी, सेंट्रल अमेरिकेसाठी कोणता काळ योग्य आहे, साउथ अमेरिकेतील पर्यटन करण्यासाठी कोणते महिने योग्य आहेत याचे मार्गदर्शनही केले आहे. अमेरिकेला पर्यटक म्हणून भेट देताना सोबत काय काय न्यावे, खाण्या पिण्याची सोय काय करावी याच्या टिप्सही दिल्या आहेत. अलिकडच्या काळात स्वतंत्रपणे पर्यटन करणार्‍यांची संख्या वाढत आहे. अशा पर्यटकांसाठी आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची टीम सज्ज असतेच, याच टीमकडून अशा पर्यटकांनी आपल्या मनासारखी अमेरिका कशी अनुभवावी याचेही एक प्रकरण या पुस्तकात आहे. मग मेक्सिकोच्या भेटीत तिथले ‘अंडर वॉटर म्युझियम’, कोस्टारिकामध्ये गेल्यावर जायलाच हवा असा ‘अरेनल ज्वालामुखी’, पेरूला गेल्यावर चुकवू नये असं ‘माचू पीचू’, कॅनडातील ‘रॉकी माउंटेनियर’ रेल्वेचा प्रवास अशा अमेरिकेतील प्रत्येक देशांतील खासम खास अनुभवांची माहिती एकत्रितपणे या प्रकरणात मिळेल.

आता इतकी सगळी माहिती एकत्र करुन तिचे संकलन आणि संपादन करुन ती वाचनिय पध्दतीने मांडायची म्हणजे जरा वेळखाऊच काम पण आमच्या मकरंद जोशीने ही जबाबदारी वाटून घेतली आणि हे पुस्तक आकाराला आलं. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या अशोकराव कोठावळेंनी मॅजेस्टिकतर्फे ही सगळी मालिकाच प्रकाशित करायची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या बुक डेपोंमध्ये युरोप आणि अमेरिका अंटार्क्टिका ही दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत. आमचे पुढच्या भागावरचे म्हणजे  ‘आशिया’ वरचे काम सुरू आहेच. लवकरच आशियाचे पर्यटन मार्गदर्शक पुस्तकही आपल्याला उपलब्ध होईल, तोपर्यंत शुभ यात्रा.

America, Language, Marathi, Offbeat Travel, World

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*