India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

प्रवासाला निमित्त कशाला?

13 mins. read
Neil Patil
Neil Patil
13 Mins Read
May 22, 2026
May 22, 2026

Quick Summary

दररोज एका वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचं 30 दिवसांचं चॅलेंज घेतल्याने आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबतं.

पुढचं ठिकाण निवडताना असलेली उत्सुकता आणि दररोज काहीतरी नवीन करण्याचा उत्साह हा अनुभव अधिक रंजक बनवतो.

या प्रयोगात सातत्य महत्त्वाचं ठरतं, कारण दररोज ठरलेली गोष्ट न कंटाळता करणे अर्थपूर्ण ठरते.

पर्यटन वर्षभर 365 दिवस करता येत नाही, पण त्याचा आनंद क्वचितच घडणारी गोष्ट म्हणूनच ठेवण्याची गरज नाही.

आठवड्याच्या मधल्या दिवसांतही शॉर्ट ब्रेक किंवा बाहेर पडणं मानसिक स्तरावर तितकंच ताजंतवानं करू शकतं.

वर्षातून दोन मोठ्या ट्रिप्सऐवजी वर्षभरात बारा छोटे प्रवासाचे भाग अधिक आनंदी आणि समाधानी बनवू शकतात.

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026

...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यात त्या आनंदाला जागा करून देता...

 

तम्ही माझा कॉलम रेग्युलरली वाचत असाल तर तुम्हाला एव्हाना कळलंच असेल की मी वेगवेगळे पदार्थ खाण्याचा मोठा शौकीन आहे. माझ्या सुट्ट्या जेवणाभोवतीच फिरतात. मला शहरं लक्षात राहतात ती तिथल्या स्वादामुळे आणि आयुष्यातील सर्वात संस्मरणीय संभाषण जेवणाच्या टेबलावरच घडतं यावर माझा पक्का विश्वास आहे.

काही वर्षांपूर्वी असंच गंमत म्हणून आणि बरंचसं कुतुहलापोटी मी एक चॅलेंज घेतलं की रोज एका वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये खायचं, असं सलग 30 दिवस करायचं. त्यातून मला फार मोठं काही साधायचं नव्हतं. मी सोशल मिडियावरचा कुठलाही ट्रेंड फॉलो करत नव्हतो. मी हे रेटिंग्ज किंवा रिव्ह्यूजसाठी सुद्धा करणार नव्हतो, तर फक्त एकच कुतूहल होतं की ‌‘मला हे जमू शकेल का?‌’ आणि ‌‘यातून मला काय मिळेल?‌’

मग काय? पुढचा सगळा महिना म्हणजे आनंदाचा लाँग प्लेच होता. काही वेळा मी ओळखीच्या ठिकाणी निवांतपणे जेवणाचा आस्वाद घेतला, तर काही वेळा जरा अनोळखी ठिकाणी ज्यावरुन मी अनेकदा गेलो होतो पण कधी आत शिरलो नव्हतो अशा ठिकाणी जाऊन तिथली चव चाखली. यातली काही जेवणं लक्षात राहिली, काही विसरण्यासारखीच होती, तर काही ठिकाणी सुखद सरप्राईज अनुभवायला मिळालं. पण या सगळ्या प्रवासातील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे त्या रेस्टॉरंट्समध्ये मिळणारे पदार्थ नव्हते, तर या प्रकारच्या अनुभवाची गंमतच अधिक रंजक ठरली. पुढच्या ठिकाणाची निवड करतानाची अधीरता आणि उत्सुकता, दररोज काहीतरी नवीन खायचं याबद्दलची एक्साइटमेंट यामुळे हा सगळा प्रयोग रंगतदार झाला.

30 दिवसांनंतर मला जे कळलं ते फार महत्त्वाचं होतं. मी खाल्लेले सगळेच पदार्थ मला काही आठवत नव्हते. पण या चॅलेंजमुळे मला नेमकं काय काय वाटत होतं ते मात्र चांगलं लक्षात राहिलं. मला एकाच वेळी एक्साइटमेंट होती, नवीन काहीतरी करण्यात मी गुंतलो होतो आणि त्याचवेळी मला अतिशय उत्साही सुद्धा वाटत होतं. रोज नव्या रेस्टॉरंटमध्ये जेवणं यात उधळपट्टी नव्हती, तर यातलं सातत्य महत्त्वाचं होतं. दररोज ठरलेली गोष्ट न कंटाळता करायची आणि छोट्या छोट्या अनुभवांचं रुपांतर अर्थपूर्ण गोष्टीत करायचं हे महत्त्वाचं होतं.

द रिॲलिटी चेक

आता हे सुद्धा खरं आहे की मला जरी रोज एक नवीन अनुभव घ्यायला आवडलं तरी प्रत्यक्षात तसं करता येणं कठीण आहे. म्हणजे जे मी रेस्टॉरंट्सच्या बाबतीत केलं, ते पर्यटनाच्या बाबतीत वर्षभर म्हणजे 365 दिवस करता येणार नाही. कामाच्या जबाबदाऱ्या आणि रोजची बसलेली आयुष्याची घडी यामुळे आपण ठरवलं तरी ते करता येत नाही. खरंतर त्याबद्दल काहीच तक्रार नाही, बहुतेकांचं आयुष्य असंच असतं. आपल्यापैकी अनेकांसाठी पर्यटन ही गोष्ट, वर्षभरात ज्या दोन - तीन मोठ्या सुट्ट्या मिळू शकतात त्यात बसवलेली गोष्ट असते. एक तर उन्हाळी सुट्टीत तरी बाहेर जायचं, नाहीतर इयर एन्डचा तरी फायदा घ्यायचा. आपण या तारखांची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो आणि स्वतःलाच दिलासा देत असतो की ‌‘या ट्रिपवर जाऊन आलो की मी एकदम रिफ्रेश होईन.‌’ या काळात समोर आलेलं बाकी सगळं फार दगदगीचं म्हणून किंवा अगदीच छोटं म्हणून पुढे तरी ढकललं जातं किंवा टाळलं जातं.

पण त्या रेस्टॉरंट चॅलेंजनंतरच्या काही महिन्यांमध्ये एक विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा डोकावत होता. आणि तो हा की एखाद्या सहलीचा किंवा ट्रिपचा आनंद ती क्वचित घडणारी गोष्ट आहे म्हणूनच जास्त असतो का? पर्यटन हा वर्षातून कधीतरीच होणारा इव्हेंट न राहता ती सवय का होत नाही? खरंतर पर्यटन किती दूरच्या प्रदेशातलं आहे किंवा किती जास्त दिवसांचं आहे यावर त्याचं मोल ठरत नाही. आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये केलेलं डिनर रंगतदार असण्यासाठी ते मिशेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये करण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे एखादा शॉर्ट ब्रेक घेण्यासाठी अनेक महिन्यांच्या प्लॅनिंगची गरज नसते आणि फार मोठी रजाही जमवावी लागत नाही. काही वेळा तर फक्त बाहेर पडण्याची क्रिया केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्तरावरही महत्त्वाची असते.

काही महिन्यांपूर्वी मी माझ्या काकांबरोबर अशाच गप्पा मारत होतो आणि बोलता बोलता अचानक ते इतकंच म्हणाले की ‌‘वर्षातून फक्त दोन वेळाच का प्रवास करायचा? मी तर ठरवलंय की मी महिन्यातून एकदा तरी फिरायला जाणार!‌’. त्या एका वाक्यामुळे जणू त्यांचं सगळं वर्ष हे छोट्या छोट्या पण आनंदी भागांमध्ये विभागलं गेलं. आपल्या सगळ्या पर्यटनविषयक अपेक्षांचं ओझं त्या दोनच मोठ्या ट्रिप्सवर टाकण्याऐवजी वर्षभरातले बारा छोटे भाग अधिक आनंदी, समाधानी आणि मजेदार होऊ शकतात. अशा ट्रिप्स प्लॅनिंगसाठी अधिक सोप्या-सुटसुटीत असतील, कमी त्रासाच्या असतील आणि सहज करण्याजोग्या असतील. आम्ही याबद्दल जसंजसं आणखी बोलत गेलो, तसं माझ्या लक्षात आलं की ही काही एकदम अनोखी, क्रांतिकारी वगैरे कल्पना नाहीये, उलट ही अगदी सहज करण्यासारखी गोष्ट आहे. पर्यटन ही वेळ नाही म्हणून पुढे ढकलण्याची गोष्ट नाहीये, तर ती जरा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गोष्ट आहे.

पर्यटनाचा थोडा वेगळा विचार

म्हणजे बघा हं, समजा पर्यटन हे कॅलेंडरवर अनेक महिने आधीच मार्क करुन मग वर्षातून एकदाच करण्याऐवजी जर आपण त्याला आपल्या वर्षभराच्या जगण्यात मिसळून गेलेली गोष्ट बनवली तर? महिन्यातून एकदा प्रवास करणं म्हणजे बारा लांबलचक सुट्ट्या घेणं नाही, तर आपला पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलणं आहे. ट्रिप म्हणजे फक्त फ्लाइट्स, भरगच्च स्थलदर्शन आणि तपशीलवार प्लॅनिंग नाही. कधी कधी तो एक छोटासा वीकेंड ब्रेक असू शकतो, तर कधी असं एखादं ठिकाण जे तुम्हाला फारसं महत्त्वाचं वाटत नसतं आणि म्हणून तुम्ही ते टाळत असता.

दर महिन्याला एक तरी ट्रिप करायची सवय तुम्हाला अधिक ॲडजस्टेबल, लवचिक बनवते. एखाद्या महिन्यात तुम्ही शॉर्ट रोड ट्रिपचा आनंद घेता, तर पुढच्या महिन्यात जरा निवांतपणे ओळखीच्या ठिकाणाचा आनंद घेता. काही सहली तुम्ही कुटुंबियांबरोबर करता, तर काही मित्र-मैत्रिणींबरोबर आणि काही कदाचित एकट्यानेच एन्जॉय करता. बरोबरची माणसं आणि ठिकाणं यांचं स्केल जरी बदललं तरी उद्देश तोच राहतो. मी घेतलेल्या रेस्टॉरंट चॅलेंजप्रमाणेच इथेही आनंद आहे तो त्याच्या सातत्यपूर्ण लयीत. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे याची उत्सुकताच पुरेशी असते. रुटीनमधला छोटासा पॉज आणि अवतीभवतीचं बदललेलं वातावरण आपल्याला जाणीव करुन देतं की मीटिंग्ज आणि डेडलाइन्सच्या पलीकडेही आयुष्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे वर्षातल्या एकाच सहलीवर येणारं प्रेशर आपोआप कमी होतं. नाहीतर तुम्ही सुट्टीच्या सगळ्या अपेक्षा त्या एकाच सहलीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करता आणि काहीतरी राहून जातं. त्याऐवजी निवांतपणे, सातत्याने घेतलेला प्रवासाचा अनुभव तुमच्या जगण्यालाही नवा आयाम मिळवून देतो.

कसं असेल पर्यटनाने भरलेलं वर्ष?

आता वर्षाची विभागणी क्वार्टर्स आणि डेडलाइन्समध्ये न करता वेगवेगळ्या अनुभवांमध्ये करुन बघा. बारा महिने, त्यातल्या बारा छोट्या छोट्या ट्रिप्स. प्रत्येक सहल दुसरीपेक्षा वेगळी आणि प्रत्येकीचा अंदाज निराळा. एका महिन्यातील पर्यटन हे फक्त ‌‘खादाडी‌’साठी करता येईल. प्रवास करायचा तोच मुळी वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी, स्थानिक मार्केट्समध्ये भटकण्यासाठी आणि निवांतपणे वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी. पुढच्या महिन्यातलं पर्यटन करायचं ते निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, जिथे दिवस लवकर उजाडेल आणि मग सगळा वेळ निसर्गातच जाईल. एखादा महिना हा खास कल्चरल टूरिझमसाठी राखून ठेवता येईल. हा महिना म्युझियम्स, जुन्या वस्त्या, ऐतिहासिक जागा आणि त्यांच्या कहाण्यांसाठीच राखून ठेवायचा. मग कदाचित एखादा महिना हा अनप्लॅन्ड असेल, जेव्हा फारसं काही आधी न ठरवता आयत्या वेळी जे सुचेल ते करायचं यावर भर असेल.

काही ट्रिप्स जरा सोशल असतील म्हणजे कुटुंबातील सदस्यांबरोबरच्या, मित्रांबरोबरचं रियुनियन... जिथे हसतखेळत भोजनाचा आस्वाद घेतला जाईल. याउलट काही अगदी शांत असतील म्हणजे सोलो ट्रिपसारख्या, जिथे फक्त निवांतपणे वाचन, थोडी धीमी भटकंती आणि बाकी वेळ मनन-चिंतन हाच अजेंडा असेल. एखादा महिना असाही असेल की ठिकाण तर परिचयाचं आहे, पण त्याचा आनंद घेण्याचा नजरिया बदललेला आहे. जणू काही नवीन दृष्टीने जुनंच ठिकाण बघण्याचा अनुभव. प्रत्येक महिन्यात सुटकेस पॅक करण्याची किंवा फ्लाईटची तिकिटं बुक करण्याची गरज नाही. छोटे प्रवासही करता येतीलच की. पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं हे सर्वात महत्त्वाचं. पर्यटन म्हणजे योग्य वेळेची वाट बघत पुढे ढकलायची गोष्ट नसून ती तुमच्या जगण्याचा भाग झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही या दृष्टीने पर्यटनाकडे बघाल तेव्हा बारा ट्रिप्स म्हणजे खूप काही असं वाटणारच नाही, उलट त्या अगदी स्वाभाविक, मॅनेजेबल आणि हव्याहव्याशा वाटतील.

जेव्हा पर्यटन ही सवय बनते

जेव्हा तुम्ही पर्यटनाकडे एक दुर्मिळ, क्वचित मिळणारं पारितोषिक म्हणून न बघता, तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग म्हणून बघू लागता तेव्हा एक हलका, पटकन न जाणवणारा बदल तुमच्यात घडू लागतो. मग ‌‘परफेक्ट‌’ असण्याचं प्रेशर राहत नाही. सगळ्या गोष्टी सावकाशपणे करता येतात हे लक्षात येतं. सगळं काही एकाच वेळी पाहायची, प्रत्येक क्षणी काही करत राहण्याची गरज उरत नाही. त्या ऐवजी पर्यटन ही विरंगुळ्याची गोष्ट बनते. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमची पुढची ट्रिप फार लांब नाही, तेव्हा तुम्ही रोजच्या आयुष्याकडे आपोआप जरा वेगळ्या नजरेनं पाहू लागता. मग काम अधिक बॅलन्स्ड वाटू लागतं. दर आठवड्याला तेच तेच जगतोय असं वाटणं कमी होतं. तुम्ही रिचार्ज होण्यासाठी कायम त्या एकाच लाँग ब्रेकची वाट पाहत बसत नाही. उलट तुम्ही तो अनुभव अधिक वारंवार, छोट्या छोट्या डोसेसमधून घेऊ लागता.

तुम्हाला जणू नव्यानेच काळाचं भान येतं. मग ऋतू तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ज्या ठिकाणी पावसाळ्यात भेट दिलेली असते, तेच ठिकाण हिवाळ्यात गेल्यावर अगदी वेगळं भासतं. एखाद्या शहरात तुम्ही कधी जाताय आणि किती काळ राहताय यावर त्या शहराची ओळखही बदलते. मग पर्यटन हे डेस्टिनेशन्सपेक्षा ऑब्झर्वेशन्सशी जास्त जोडलं जातं. मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यात त्या आनंदाला जागा करून देता. माझ्या त्या 30 दिवसांच्या रेस्टॉरंट चॅलेंजप्रमाणेच इथेसुध्दा तुम्हाला प्रत्येक ट्रिपचे तपशील लक्षात राहत नाहीत. पण रुटीनवर मात करण्यासाठी पुन्हा पुन्हा तुम्ही तुमच्या कुतूहलाला कसा वाव दिलात ते मात्र तुमच्या पक्कं लक्षात राहतं.

हे नक्की लक्षात ठेवा

जर तुम्ही पर्यटनासाठी प्रत्येक वेळी ‌‘परफेक्ट‌’ वेळेची वाट पाहिली नाही तर काय होईल? जर मोठ्या सुट्ट्यांची उपलब्धता, स्पेशल ऑकेजन किंवा तपशीलवार प्लॅनिंगशिवाय पर्यटन करायचं ठरवलं तर काय होईल? जर या सगळ्याऐवजी अगदी साधेपणानं छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये, अधिक अर्थपूर्णपणे, वारंवार पर्यटन करण्याची सवय तुम्ही लावून घेतलीत तर काय होईल? आत्ता लगेच काही तुम्ही बाराच्या बारा ट्रिप ठरवण्याची आवश्यकता नाही. सगळ्या वर्षाचा विचार आत्ता करूच नका. फक्त एक महिना आणि त्यातलं ठिकाण ठरवा. रुटीनमधला एक पॉज तर नक्की घेता येईल. कारण एकदा तुम्ही सुरुवात केलीत की तुमच्या लक्षात येईल पर्यटन तुम्हाला जीवनापासून अजिबात दूर नेत नाही, उलट ते तुम्हाला अधिक ताजंतवानं करुन, सजग करुन, तुमच्यातल्या कुतूहलाला वाव देऊन जीवनाकडे परत घेऊन येतं. म्हणजे विचार करा, एक वर्षानंतर तुम्ही एकाच मोठ्या हॉलिडेकडे नाही, तर तुमचं आयुष्य नकळत समृध्द करणाऱ्या बारा छोट्या आठवणींकडे मागे वळून पाहात असाल.

जाण्यापूर्वी आणखी एक कहाणी

या आठवड्यात तुमचा निरोप घेताना मला तुम्हाला एक अशी कहाणी सांगायची आहे जी मला नव्याने समजली, पण माझ्या कायमची लक्षात राहिली. त्याचं कारण त्या गोष्टीच्या स्वरुपात नाही, तर शिकवणीत आहे. जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होणाऱ्या प्रदेशांपैकी एका प्रदेशात, मेघालयात पावसाळी अरण्यांमध्ये जे पूल असतात ते बांधलेले नसतात, तर ते उगवलेले असतात. हे आहेत भारताची खासियत असलेले ‌‘लिव्हिंग रूट ब्रिज‌’ जे संपूर्ण जगात फक्त मेघालयातच पाहायला मिळतात. खासी आणि जैंतिया जमातीचे लोक पिढ्यानपिढ्या डोंगर उतारावरच्या रेनफॉरेस्टमध्येच आढळणाऱ्या रबर फिगच्या जातीतील  फिकस इलास्टिका या झाडाच्या पारंब्यापासून हे पूल तयार करत आले आहेत. झाडांची छाटणी करुन त्यांना आकार न देता, स्थानिक लोक अतिशय संयमाने झाडाच्या पारंब्यांना प्रवाह आणि ओढ्यांवरुन पुढे नेतात. त्यासाठी बांबूचा आधार देतात किंवा पोकळ ओंडक्यांचा वापर करुन त्यांना योग्य दिशेला वळवतात. या सगळ्यासाठी लागणारा वेळच यांना खास बनवतो. एका रूट ब्रिजला मजबूत आणि पायी चालणाऱ्या लोकांचा भार पेलण्यासाठी सक्षम बनायला साधारण 15 ते 20 वर्षे लागतात. पण एकदा का हे पूल पुरेसे सक्षम झाले की मग वर्षानुवर्षे टिकतात. एकावेळी हे पूल 50 लोकांचं वजन पेलू शकतात. शिवाय दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरांना ते व्यवस्थित तोंड देतात आणि लाकडी किंवा काँक्रिटच्या ब्रिजेसप्रमाणे सडत नाहीत. यातले अनेक ब्रिज तर शंभर वर्षांपूर्वीचे आहेत. यातला सर्वात आयकॉनिक ब्रिज म्हणजे नॉनग्रिएट गावातील डबल डेकर ब्रिज. या पुलापर्यंत पोहोचण्यासाठी 3000 दगडी पायऱ्या उतरण्याची पायपीट करावी लागते आणि परतीच्या वेळी त्याच चढाव्या लागतात. पण दरीच्या तळाशी जे पाहायला मिळतं ते अक्षरशः स्वप्नवत असतं. आपल्याला इथे एकमेकात गुंफलेल्या पारंब्यांचे एकावर एक जिवंत थर पाहायला मिळतात, ज्यातून तयार झालेला पूल जरी किंचित हलत असला तरी जमिनीशी घट्ट जखडलेला असतो.

हे लाईव्ह ब्रिज आहेत, त्यामुळे हे पूल कधीच पूर्ण तयार झालेत असं मानलं जात नाही याचं मला खरोखरच आश्चर्य वाटतं. या पुलांचा एखादा भाग कमकुवत झाला तर इतर ब्रिजची जशी दुरुस्ती होते तसं न करता गावकरी तिथे फक्त नवीन पारंब्या जोडून देतात आणि ब्रिज आपला आपण दुरुस्त होतो. त्याचा वापर जितका जास्त होतो, तितका तो अधिक मजबूत होतो. स्पीड, इन्स्टंट रिझल्ट्स आणि शॉर्ट टर्म सोल्यूशन्स यांनी झपाटलेल्या या जगात हे पूल आपल्याला सांगतात की शाश्वत गोष्टी उभारण्याचे इतरही मार्ग आहेत. काही गोष्टी तत्काळ करण्यापेक्षा त्या सावकाशपणे, संयमाने, भक्कम पायाभरणी करून उभारणं महत्त्वाचं असतं. आणि कदाचित पर्यटन हे सुध्दा ह्या लिव्हिंग ब्रिजेसप्रमाणेच असतं... म्हणजे ती घाईघाईने टिकमार्क करून टाकण्याची गोष्ट नाही, तर पुन्हा पुन्हा सतत अनुभवावी अशी एक सुंदर कहाणी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात, तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नमस्ते लंडन!
13 mins, read

नमस्ते लंडन!

Published in Loksatta Lokrang. Date 24th May, 2026 ...लंडनच्या राणीला भेटायला उत्सुक असलेल्या पुसी कॅटपासून ते कायम स्मरणात राहणाऱ्या ‌‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन‌’पर्यंत अनेक नर्सरी ऱ्हाइम्स अनेकां

अनुभवावं ते नवलच!
13 mins, read

अनुभवावं ते नवलच!

Published in Sakal Saptrang. 17th May, 2026 काही प्रवास हे केवळ सुट्ट्या नसतात, तर खऱ्या अर्थाने एक एक्सपेडिशन असतात. दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका एकत्र अनुभवणं म्हणजे विरोधाभासांनी भरलेला, भव्य

व्यवहारी
13 mins, read

व्यवहारी

Published in Maharashtra Times. 17th May, 2024 ...पोटात भूक असते म्हणून डेझर्ट नाही मागवले जात, तर ती सुंदर संध्याकाळ संपू नये, जरा आणखी लांबली जावी म्हणून डेझर्टचं निमित्त केलं जातं. मात्र जेव्हा.

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top