Published in Loksatta Lokrang. Date 24th May, 2026
...लंडनच्या राणीला भेटायला उत्सुक असलेल्या पुसी कॅटपासून ते कायम स्मरणात राहणाऱ्या ‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन’पर्यंत अनेक नर्सरी ऱ्हाइम्स अनेकांना तोंडपाठ असतील. या नर्सरी ऱ्हाइम्सना ...
एखाद्या नवीन ठिकाणी आपण प्रथमच जातो आणि तिथे पोहोचताच आपल्याला एकदम घरच्यासारखं वाटतं. असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? सारं काही नवीन असलं तरी आसपासच्या वातावरणात एक ओळखीचा सूर जाणवत राहतो. आनंद आणखीच वाढतो. जणू काही त्या ठिकाणी येण्याचं स्वप्न आपण वर्षानुवर्षं उराशी बाळगलेलं असतं. माझ्या बाबतीत असं ठिकाण सांगायचं झालं तर ते असेल लंडन!
मी प्रथम 1999 साली शिक्षणासाठी लंडनला गेले होते. आता विचार करताना तो सगळा अनुभव म्हणजे एकदम वेगळ्याच आयुष्याचा भाग वाटतो. किती गोष्टी बदलल्या आता. त्याकाळी भारत पूर्णपणे वेगळा होता. टेक्नॉलॉजी आणि टेलिकॉम सेवा आजच्यासारख्या प्रगत नव्हत्या. शिवाय परदेशी प्रवास करायचा म्हणजे एकदम काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता असायची. त्यात माझा लंडनमध्ये वर्षभराचा मुक्काम होता. असं सगळं असलं तरी लंडनमध्ये पाय ठेवताच मला ते एकदम ओळखीचं वाटलं. एकदम घरी आल्याचीच जाणीव झाली. लंडनच्या रुपाने मला तत्काळ प्रभावित केलं. तिथल्या वास्तव्याच्या पहिल्या महिन्यातच माझ्या लक्षात आलं की हे शहर संपूर्ण समजून घेण्यासाठी एक वर्षाचा कालावधी सुद्धा अपुराच पडणार आहे. लंडन म्हणजे जगाच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण. या शहरातील नमुनेदार वास्तुकला, भूमिगत आणि जमिनीवरची रेल्वे व्यवस्था... या सगळ्याविषयी मी वाचलं होतं, तरीही त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने मी थक्क झाले.
मुंबईचा फोर्ट भाग, कोलकात्यामधील व्हिक्टोरिया मेमोरिअल... एवढंच काय तर सिमल्यातील पुरातन भाग याची आठवण करून देणाऱ्या वसाहतकालीन गोष्टी लंडनमध्ये सर्वत्र नजरेस पडत होत्या. त्या कमानी, ते खांब, त्या प्रशस्त दगडी इमारती... यांच्यामुळे लंडन आणखी ओळखीचं वाटलं. त्यात जोडीला इंग्रजीचा सर्वत्र होणारा वापर यामुळे माझ्यासारख्या भारतीय पर्यटकाला लंडन अनोळखी वाटणं शक्यच नव्हतं!
त्या माझ्या पहिल्या प्रवासापासून मी अगदी दरवर्षी लंडनला जाते आहे. आजही हे शहर मला तेवढंच भावतं आणि स्तिमित करतं. या प्रत्येक भेटीत मला काही ना काही वेगळं सापडतंच, एखादा अलौकिक हिरा अचानक गवसावा तसं. आधी हे कसं लक्षात आलं नाही, असं वाटतं खरं, पण हीच तर लंडन शहराची गंमत आहे. हे शहर सतत काहीतरी नवीन उलगडून दाखवत असल्याने त्याच्याविषयी असलेलं अप्रूप संपत नाही. अशात माझ्या एका बालमैत्रिणीने तिला लंडन फारसं काही भावलं नाही, असं सहज बोलता बोलता म्हटलं. त्याचा मला किती धक्का बसला असेल याची कल्पना करा. मी तत्काळ तिचं लंडनविषयी असणारं मत बदलण्याची जबाबदारी घेतली आणि माझं मनपसंत लंडन शहर तिला दाखवायचं असा मनोमन निश्चय केला. मला खात्री होती की, तिच्या मनातील लंडनबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि प्रत्येक वेळी मला जशी या शहराची जादू भारून टाकते, ती करामत मी तिलाही दाखवू शकेन.
लंडनची विभागणी 32 प्रशासकीय विभाग (त्यांना ‘बरो’ म्हणतात) आणि सिटी ऑफ लंडन (लंडन शहर) अशी केली जाते. लंडन शहराचे ऐतिहासिकदृष्ट्या स्वतंत्र अस्तित्व आहे. 32 प्रशासकीय विभागांचे इनर लंडन (मध्य, ऐतिहासिकदृष्ट्या जुना प्रदेश) आणि आऊटर लंडन (उपनगर जिल्हे) असे दोन गट आहेत. लंडन शहराला ‘द स्क्वेअर माईल’ म्हणतात. हा एक छोटेखानी, ऐतिससिक पार्श्वभूमीचा भाग असून त्याचे स्थान ग्रेटर लंडनच्या ह्दयस्थानी आहे. लंडनपेक्षा लंडन शहराचे रुपडे पूर्णपणे आगळेवेगळे आहे. युनायटेड किंग्डमचे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र या लंडन शहरात आहे. इसवीसन 43 मध्ये रोमनांनी मूळ लंडन शहर वसवलं. यावेळी त्याचं नाव ‘लंडीनियम’ असं होतं. रोमन काळापासून हे शहर व्यापार-उदिम आणि प्रशासनाचं महत्त्वाचं केंद्र बनलं. लंडन शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, इसवीसन 43 मध्ये रोमनांनी लंडीनियम वसवलं. थेम्स नदीकाठी वसलेल्या या शहराला महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र म्हणून अल्पावधीतच मान्यता मिळाली. रोमनांची सद्दी संपल्यावर शहराला काहीशी उतरती कळा लागली. पुढे सॅक्सन राजवटीत या शहराचं पुनरुज्जीवन झालं. नॉर्मन राजवटीत लंडन शहराभोवती तटबंदी उभारली गेली. त्यांच्याच काळात 11 व्या शतकात टॉवर ऑफ लंडनचं बांधकाम झालं.
बालपणी लंडन आणि इंग्लडचा संदर्भ असलेल्या नर्सरी ऱ्हाइम्स आम्ही म्हणत असू. त्यांची लंडनमध्ये फिरताना हमखास आठवण येते. लंडनच्या राणीला भेटायला उत्सुक असलेल्या पुसी कॅटपासून ते कायम स्मरणात राहणाऱ्या ‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन’पर्यंत अनेक नर्सरी ऱ्हाइम्स अनेकांना तोंडपाठ असतील. या नर्सरी ऱ्हाइम्सना जुन्या काळातील लंडनचा संदर्भ आहे. या ऱ्हाइम्ससोबत कायम लंडनच्या प्रख्यात टॉवर ब्रिजचे चित्र असते. हा ब्रिज म्हणजे व्हिक्टोरियन काळातील इंजिनिअरिंगचा अद्भुत नजराणा आहे.
त्याच्या जवळच ऐतिहासिक ‘टॉवर ऑफ लंडन’ आहे. तिथेच आहे जगप्रसिद्ध हिरेजडित राजमुकुट. त्यात विराजमान आहे देखणा, अर्वणनीय कोहिनूर हिरा. कोहिनूर हा जगातील सगळ्यात मोठ्या आकाराच्या हिऱ्यांपैकी एक आहे, या टॉवरचे रक्षण करण्यासाठी बीफिटर्स म्हणजेच योमेन वॉर्डर कायम तैनात असतात. तिथे वावरणाऱ्या रेव्हन्स पक्ष्यांविषयी अशी एक आख्यायिका सांगतात की रेव्हन्स ज्यावेळी इथून निघून जातील, तेव्हा या साम्राज्याचा अंत होईल. या रेव्हन्सची निगा देखभालीचे कामही हे वॉर्डर करतात. नदीच्या काठाने थोडं पुढे गेलो की आपल्यासमोर येतो लंडन आय. काचेच्या कॅप्सूल्स असलेला हा अजस्र पाळणा आहे. त्यातून आपल्याला लंडनचा परिसर आणि थेम्स नदी यांचं चित्तथरारक, विहंगम दर्शन घेता येतं. आपलं नशीब चांगलं असेल तर एखाद्या स्वच्छ, नितळ दिवशी दूरवर असणारे राजाचे अधिकृत निवासस्थान ‘विंडसर कॅसल’ही दिसू शकते.
त्याशिवाय शहराच्या लगत असलेला बकिंगहम पॅलेस आणि त्या राजवाड्याच्या सभोवताली असलेली उद्याने, बगीचे आपण फिरून पाहू शकतो. इथे दररोज संपन्न होणारा ‘चेंज ऑफ गार्ड’ हा सोहळा म्हणजे ऐतिहासिक परंपरेची आठवण आहे. अर्थात, मला स्वत:ला राजवाड्याच्या सभोवताली असणाऱ्या ग्रीन पार्क आणि सेंट जेम्स पार्क या भल्यामोठ्या उद्यानांविषयी अधिक ममत्व वाटतं. इथून जवळच हाईड पार्क आहे. या पार्कातील प्रख्यात ‘स्पीकर्स कॉर्नर’वर कोणीही, कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने मते मांडू शकतो. ती ऐकण्यासाठी सभोवताली श्रोतेही असतात. खुल्या चर्चेची, संवादाची ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे, हे विशेष !
लंडनमध्ये मला भावणारी गोष्ट कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझं उत्तर असेल... चालणं! लंडनमध्ये पायी चालणं यासारखा अनुभव जगात इतरत्र कोठेही घेता येत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात हाईड पार्कसारखी जागा असेल तर चालण्याचा अनुभवही खास असतो. पायी फिरताना शहरातील छोट्या गल्ल््या, तऱ्हेतऱ्हेचे कॅफेज्, भन्नाट स्ट्रीट आर्ट यांच्या सोबतीने इतिहासाचा धागा उलगडून दाखवणारा एखादा कोपरा आपल्यासमोर अवचितपणे उलगडला जातो.
लंडनचा पूर्ण परिचय होण्यासाठी आपल्याला या शहराच्या अंतरंगात पायरी-पायरीने अलगद उतरत शहराशी एकरूप व्हावं लागतं. माझ्या मैत्रिणीसोबत हा अनुभव वाटून घेण्यासाठी मी कमालीची उत्सुक होते. आम्ही दोघींनीही लंडनमधील प्रस्थापित, लोकप्रिय ठिकाणं यापूर्वीच पाहिलेली होती. त्यामुळे आता त्या वाटेने न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही दोघींनीही कळत्या वयापासून पी.जी. वुडहाऊस वाचलेले होते. जीव्स आणि बर्टी वूस्टर यांचे कारनामे वाचून त्यांचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला होता. त्यांच्या लेखनात वर्णन केलेली ठिकाणं, ते रस्ते, जंटलमन्स क्लब, हॅट शॉप, ट्रेन स्टेशन्स हे सारं आम्ही कल्पनेत रंगवलेलं होतं. त्यामुळे आमचा हा वेगळ्या वाटेचा दौरा मेफेअरपासून सुरू करणं एकदम योग्य ठरणार होतं.
लंडनमधील प्रतिष्ठित अशा जिल्ह्यांपैकी एक म्हणजे मेफेअर. इथलं सगळंच एकदम खास आहे. भव्य आहे आणि ऐषोआरामाचं एक मानक आहे. जॉर्जियन शैलीची वास्तूरचना, ऊंची बुटीक, पंचतारांकित हॉटेल्स, जागतिक दर्जाची खानपान सेवा यातून सर्वत्र खास लक्झरीवाल्या जीवनशैलीची प्रचिती येते. लंडनमध्ये भटकंती करताना वेगवेगळ्या इमारतींवरील नील फलक आपले लक्ष वेधून घेतात. थोरामोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या वास्तव्याने भारलेल्या या वास्तूंचं दर्शन घेताना आपण इतिहासातील त्या संदर्भाशी आपसूकच जोडले जातो, ब्रिटिश लायब्ररीपाशी रसेल स्क्वेअर इथे चार्ल्स डिक्सन यांचं वास्तव्य असलेली इमारत आम्ही पाहिली. मेफेअरमध्ये एके ठिकाणी ‘बी गीज’ या ख्यातनाम म्युझिक बँडचे वास्तव्य असणारी इमारतही आम्हाला पाहता आली. अखेरीस आम्ही पी. जी. वुडहाऊस जिथे वास्तव्याला होते त्या डनरेव्हन रोडवर पोहोचलो आणि वुडहाऊस यांच्या साहित्य प्रतिभेपुढे नतमस्तक झालो. पुढे आम्ही नॉटिंग हिल, पोर्टीबलो रोड येथील व्हिन्टेज मार्केटमध्ये गेलो. नॉटिंग हिल या रोमँटिक कॉमेडीमुळे अजरामर झालेल्या या भन्नाट बाजारपेठेची पर्यटकांना कायम भुरळ पडते. रंगीबेरंगी घरे, जुन्या कलात्मक वस्तू, चैतन्यमय वातावरण याचे सगळ्यांना नेहमीच आर्कषण वाटते. आमच्या या भटकंतीची सांगता आम्ही ‘द रिट्झ’ या हॉटेलमध्ये केली. खास ब्रिटिश धाटणीच्या या हॉटेलमधला चहा ए वन होता.
दुसरा दिवस कॉव्हेंट गार्डनच्या भेटीचा होता. रस्त्यावर कला सादर करणारे कलाकार, बुटिक शॉप्स, वेगवेगळे आकर्षक फूड स्टॉल्स ही या भागाची खासियत आहे. कॉव्हेंट गार्डनमध्ये जादुई करिश्मा आहे. ऐतिहासिक वास्तुकला आणि आधुनिक जीवनाची नवी शैली यांचा इथे संगम झालेला आहे. जगभरातील स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असलेले, खाद्यपदार्थांसाठीचा स्वर्ग मानले जाणारे कॅमडेन मार्केट इथून जवळच आहे. भारतीय आधुनिक खाद्यपदार्थांच्या चवीच्या शोधात आम्ही ‘डिशूम’ या रेस्टॉरंटमध्ये जेवलो. या हॉटेलमध्ये लंडनच्या कॉस्मोपोलिटन फ्लेवरसह मुंबईतील उत्तम चवीचाही आम्ही आस्वाद घेतला. आमच्या भटकंतीची सांगता आम्ही ‘द गार्ड’ या रेस्टॉरंटमधील सेलिब्रिटी डिनरने केली. खिडकीजवळच्या टेबलापाशी बसून या भव्य शहराच्या विहंगम दृश्याचा मनमुराद आनंद घेतला. खाली लंडनच्या भूतकाळाला वर्तमानाशी सांधणारा टॉवर ब्रिज दिव्यांच्या रोषणाईने प्रकाशमान झालेला होता. लंडनच्या प्रवासाचा एकंदर विचार करताना आमच्या लक्षात आलं, की लंडन हे केवळ एक शहर नसून ती एक न संपणारी, सुरेख कहाणीच आहे. मग तुम्ही या शोधयात्रेवर कधी निघताय?






































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.