IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

एक खिडकी हजारो आठवणी...

9 mins. read

Published in the Sunday Maharashtra Times on 10 August 2025

...विमान उतरू लागतं तेव्हा असं वाटतं की आपण फक्त जमिनीवर उतरत नसून एका वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत. खालचं लँडस्केप नाट्यमयरित्या बदलत जातं, सपाट मैदानांच्या जागी खडे पहाड, बर्फाच्छादित डोंगरकडे, नागमोडी दऱ्या दिसू लागतात आणि...

मला विमान प्रवास आवडतो, खरं तर मला विमानंच आवडतात आणि आता तर त्यांच्यावर प्रेम करायला मला आणखी एक कारण मिळालं आहे आणि ते म्हणजे ‌‘राया‌’, आमची सव्वा वर्षाची चिमुकली. आता जेव्हा जेव्हा ती आमच्याबरोबर विमानाने प्रवास करते तेव्हा तेव्हा तो प्रवास, म्हणजे ती कोणत्या एअरक्राफ्टने प्रवास करते हे माझ्या मनात आपोआप नोंदलं जातं. (तसा मी त्याची ‌‘डिजिटल नोंद‌’ही ठेवतोच.) मला स्वतःला तुम्ही कोणत्या डेस्टिनेशनवर जाताय या इतकंच तुम्ही कोणत्या विमानाने जाताय, त्याचा प्रकार काय, नंबर काय या सगळ्यात खूप रस असतो, त्यामुळे माझ्या छोट्या मुलीच्या बाबतीत या नोंदी ठेवायला मला आवडतं.

तिच्या प्रवासाला आत्ता कुठे सुरवात झाली आहे आणि तिचं छोटंस ‌‘फ्लाइट लॉग‌’ एकदम अफलातून नोंदींनी भरू लागलं आहे. त्यात बोइंग 777 -300 इ आर, ड्रीमलायनर, एअर बस ए 330, अनेक ए 320 विमाने आणि काही बोइंग 737 यांची नोंद झाली आहे, यावरुनच कल्पना येईल की तिचा प्रवास किती वैविध्यपूर्ण सुरु आहे. मी एक पालक म्हणून हे जाणीवपूर्वक करतो आहे. काहीशा अभिमानानेच मी यातली प्रत्येक नोंद करतो. कदाचित यामुळे तिलाही माझ्यासारखंच विमानांचं वेड लागेल आणि मग मोठी झाल्यावर तिच्या बालपणीच्या या लॉगबुकचा तिलाही अभिमान वाटेल.

एअरक्राफ्ट मॉडेल्सबद्दल मी पानंच्या पानं लिहू शकतो, पण मला आज काहीतरी वेगळं सांगायचं आहे. म्हटलं तर अगदी साधी गोष्ट, पण सार्वत्रिक आणि म्हणूनच एकदम प्रभावी अशी ती म्हणजे ‌‘विमानातली विंडो सीट‌’. एक छोटासा चौकोन ज्याचे कोपरे मात्र गोल आहेत आणि जो तुम्ही ज्या शहरात उतरणार आहात त्याची फक्त झलकच दाखवत नाही, तर त्याचा झटपट परिचयही करुन देतो. माझ्यासाठी विंडो सीट ही जगाकडे बघण्याची खिडकी तर आहेच, पण जरा बारकाईने पाहिलंत तर स्वतःकडे बघण्याचीही खिडकी आहे. या खिडकीत अशी एक विलक्षण जादू आहे, ज्यामुळे तुमचा प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा मार्ग राहत नाही. जमिनीवर उतरण्याआधीच ती तुमच्या अनुभवात भर घालायला सुरूवात करते.

डावीकडून दिसणारी मुंबई:

मुंबईतून उड्डाण करणं नेहमीच खास असतं, पण जेव्हा एखाद्या सकाळी हवा स्वच्छ असताना किंवा दुपारी उन्हं उतरत असताना तुम्ही विमानाच्या डाव्या भागात बसलेले असता, तेव्हाचा अनुभव अगदी अवर्णनीय असतो. अरबी समुद्रावरुन उंची गाठताना विमान जेव्हा वळतं तेव्हा तुमच्या नजरेसमोर बॅन्ड्रा-वरळी सी लिंक, वळणदार आणि शोभिवंत मरीन ड्राईव्ह आणि साऊथ मुंबईची स्कायलाइन याचा अप्रतिम नजारा उलगडतो. काही वेळा तुम्हाला मुंबईचा सगळा सागरकिनारा बघायला मिळतो, जो हळूहळू ढगांमुळे दिसेनासा होतो.

जर तुम्ही दक्षिणेकडे जात असाल तर याच बाजूला ती अनोखी जादू अनुभवायला मिळते. विमान प्रवासातील काही दुर्लक्षित आनंदांपैकी एक तुम्ही यावेळी अनुभवता. कुठल्याही ट्रॅव्हल गाइडमधे नसलेला हा अनुभव तुम्ही जर वारंवार प्रवास करत असाल तरच लक्षात येईल. माझ्यासारख्या शंभरवेळा मुंबईतून विमान प्रवास करणाऱ्यासाठी तर डावीकडच्या खिडकीत बसणं हे एखाद्या समारंभासारखं असतं. कारण याच खिडकीतून मी जेव्हा मुंबईचा फक्त नजरेतून निरोप घेतो, त्यावेळी मला जाणवतं की 30,000 फूटांवरून देखील या गजबजलेल्या मुंबईचं सौंदर्य जराही कमी भासत नाही.

लेहकडे जाताना:

भारतातल्या कुठल्या प्रवासात विमानाची खिडकी तुम्हाला सर्वात अफलातून अनुभव देते? असा प्रश्न मला विचारला तर माझं उत्तर असेल लेहकडे जाताना. विमान उतरू लागतं तेव्हा असं वाटतं की आपण फक्त जमिनीवर उतरत नसून एका वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत. खालचं लँडस्केप नाट्यमयरित्या बदलत जातं, सपाट मैदानांच्या जागी खडे पहाड, बर्फाच्छादित डोंगरकडे, नागमोडी दऱ्या दिसू लागतात आणि मग दिसणारं दृश्य खरं का खोटं असा प्रश्न पडतो. या प्रवासात तुम्हाला हिमालयाचं फक्त दर्शनच घडत नाही, तर त्याचं अस्तित्त्व ठळकपणे जाणवतं.

लेहचा एक प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. नेहमीप्रमाणे मी खिडकीला चिकटून होतो. आम्ही ढगांमधून जसजसे खाली उतरू लागलो तसं नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला तो खडक आणि बर्फाचा पसारा पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. त्या दिवशी मी ‌‘गोइंग नॉर्थ ऑफ द वॉल‌’ या कॅप्शननेच इन्स्टाग्रामवर माझी स्टोरी टाकली होती. असं वाटलं होतं की ओळखीच्या जगापलीकडे एका अज्ञात, प्राचीन, सुंदर दुनियेत आपण प्रवेश करत आहोत. त्या दिवशीचं फ्लाइट हे फक्त पुढच्या प्रवासाची आतुरता वाढवणारं नव्हतं, तर मुळात आपण प्रवास कशासाठी करतो याची जाणीव करुन देणारं होतं.

आकाशातून दिसणारा ऑस्ट्रेलिया:

गेल्या वर्षी मी आणि हेताने मुंबई ते मेलबर्न असं एअर इंडियाचं डायरेक्ट फ्लाइट घेतलं होतं. त्या लांबच्या प्रवासासाठी ते सोयीचं तर होतंच, पण त्या प्रवासातलं मुख्य आकर्षण ठरलं खिडकीतून दिसलेलं दृश्य. आमचा प्रवास अर्धा झाल्यावर आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आलो. त्यावेळी मी विमानाच्या डाव्या भागातील माझ्या खिडकीतून बाहेर डोकावलो आणि जे नजरेला दिसलं त्याने अवाक झालो. आम्ही ऑस्ट्रेलियाच्या सदर्न किनारपट्टीवरुन सलग चार तास प्रवास केला. तेव्हा जणू ऑस्ट्रेलिया आमच्या डोळ्यांसमोर आपोआप उलगडत गेला. आकाशातून दिसणारे विस्तीर्ण, लांबलचक किनारे आणि निर्मनुष्य जमिनीचे लांबच लांब पट्टे. खाली बघताना दिसणारा नजारा पाहून मी भारावून गेलो आणि ज्या देशात मी प्रवेश करणार होतो, त्याचे तपशील नजरेनंच टिपून घ्यायला सुरवात केली. जे पाहिलं ते सर्वात सुंदर होतं या माझ्या समजाला परतीच्या प्रवासात तडा गेला. यावेळी मी विमानाच्या उजव्या भागात बसलो होतो. सदर्न ऑस्ट्रेलियावरुन जाताना मी सहज खिडकीतून बाहेर बघितलं तर मला पिंक लेक्सचं विलक्षण दृश्य दिसलं. निसर्गाच्या रंगपेटीतून धरतीवर जागोजागी विखुरल्यासारखे गुलाबी रंगाचे ठिपके पडावेत तसे ते तलाव दिसत होते, अगदी स्वप्नवत. मी त्यांच्याविषयी आधी वाचलं होतं पण ध्यानीमनी नसताना अचानक त्यांचं जे हवाई दर्शन घडलं ते अविस्मरणीय होतं.

खिडकीतलं जग जे मी अजून पाहिलेलं नाही:

तर जमिनीवर उतरण्याआधीच तुमच्या प्रवासाची रंगत वाढवणारी विमानाची खिडकी आणि तिच्यातून दिसणाऱ्या दृश्यांची जादू अनुभवलेली असल्यामुळेच, आणखी कोणती कोणती ठिकाणं विमानाच्या खिडकीतून मला लवकरात लवकर पहायची आहेत याची एक छोटीशी यादी (अं... तितकीही छोटी नाही ती!) माझ्या मनात तयार आहे. या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे, टोकियोत शिरताना निरभ्र आकाशातून माऊंट फुजीचं शिखर बघण्याचा क्षण. जपानची ओळख ठरलेला हा पर्वत आणि नेहमी ढगांच्या वर डोकावणारं त्याचं त्रिकोणी शिखर आकाशातून बघणं यापेक्षा आणखी रोमांचक क्षण दुसरा काय असेल? माझं दुसरं स्वप्न म्हणजे मला विमानाच्या खिडकीतून नॉर्दर्न लाइट्‌‍स बघायचे आहेत. आइसलँड, फिनलँड किंवा नॉर्दर्न कॅनडामध्ये हा क्षण प्रत्यक्षात येऊ शकतो. ज्यांनी आकाशातून ‌‘ऑरोरा‌’ बघितला आहे, अशांनी लिहिलेलं वर्णन आणि काढलेले फोटो मी पाहिले आहेत, ते बघताना असं वाटतं की जणू तुम्ही त्या जादूई किमयेचा हिस्सा बनला आहात. न्यूझीलंडमधील क्वीन्स टाऊनचा नजाराही मला विमानाच्या खिडकीतून बघायचा आहे. इथे तुम्ही लँडिंग करताना बर्फाच्छादित शिखरं, पहाडांमधल्या नागमोडी नद्या, आकाशाचं प्रतिबिंब आरशाप्रमाणे दाखवणारी सरोवरं असा अफलातून नजारा बघता. विमानाच्या पायलटसाठी हा नजारा म्हणजे जमीन जवळ आल्याचं चिन्ह असलं तरी प्रवाशांसाठी मात्र ते स्वप्नवत दृश्य असतं. असंच आणखी एक ठिकाण म्हणजे साऊथ आफ्रिकेतील केप टाऊन. इथे लँडिंगच्या आधी या शहराच्या पार्श्वभूमीला उभा असलेला टेबल माउंटन त्याच्या भव्य आकाराने तुम्हाला आश्चर्यचकित करतो. एक दिवस मी या फ्लाइटच्या उजव्या भागात बसून हे दृश्य नक्की बघणार आहे. या यादीत ‌‘सॅन्तोरिनी‌’चा समावेश अर्थातच आहे. त्याचा अर्धचंद्राकार आकार, त्यावरील पांढऱ्या शुभ्र इमारती, इथल्या डोफ्लगरकड्यांवरची दिसणारी छोटीशी गावं हे सगळं दृश्य आकाशातून, विशेषतः तुम्ही जेव्हा ‌‘गोल्डन अवर्स‌’मध्ये उडत असाल तेव्हा इतकं अप्रतिम दिसतं की विचारू नका. त्याचप्रमाणे बोराबोरा किंवा मालदीव्जचं विलोभनीय दृश्यही मला पहायचं आहे. तिथल्या वॉटर विलाज्‌‍ चा अद्भुत नजारा मला आकाशातून बघायचा आहे. रिओ दे जानेरो शहरात आकाशातून प्रवेश करता करता एका दृष्टिक्षेपात सामावणारं ख्राइस्ट द रिडीमर, शुगर लोफ माऊंटन आणि कोपाकबाना बीच याचं दृश्य तर पहायलाच हवं असं आहे.

माझ्या यादीत भूतानच्या पारो विमानतळावरचं लँडिंगही आहे. इथला निसर्ग तर सुंदर आहेच, पण या एअरपोर्टवर विमान उतरवणं हे फार कौशल्याचं काम आहे. इथल्या उंच पर्वतांच्या मधल्या चिंचोळ्या जागेतून विमान उतरवण्याची क्षमता फार मोजक्या वैमानिकांकडे आहे. जर तुम्ही इथे लँडिंग करताना विंडो सीटवर असाल तर जगातल्या निवडक भाग्यवंताना बघायला मिळणारं दृश्य तुम्हाला नक्की बघायला मिळेल.

विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या जगाबद्दल बोलत असताना ट्रान्स ॲटलांटिक उड्डाण करणाऱ्या ग्रीन्सलँडच्या फ्लाईट्‌‍सना कसं विसरून चालेल? या प्रवासात खिडकीतून बघताना खाली पसरलेले विस्तीर्ण ग्लेशिअर्स आणि निळ्या अथांग फियोर्ड पाहायला मिळतात. याउलट तुम्ही जेव्हा युरोप आणि आफ्रिकेमध्ये हवाई प्रवास करताना सहारा वाळवंटावरुन उडत येता, तेव्हा खाली पसरलेला वाळूच्या टेकड्यांचा अफाट विस्तार खराच वाटत नाही.

जगभरातल्या अशा एकापेक्षा एक भन्नाट नजाऱ्यांची मेजवानी तुम्हाला अगदी जवळून अनुभवता येते ती विमान प्रवासातच. यातले सगळे नजारे मी पाहिलेले नाही. काही बघण्यासाठी मी अगदी आतुर आहे, पण तीच तर विमान प्रवासाची गंमत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी विमानात बसताना मी कुठे जाणार यापेक्षा मला आज काय दिसणार? याचीच एक्साइटमेंट जास्त असते. तेव्हा यापुढे तुम्हीही विमान प्रवास करताना, विंडो सीट बुक करायला विसरू नका, काय माहीत, खिडकीबाहेरचं कोणतं जग तुम्हाला पहायला मिळेल ते...

August 08, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top