Published in the Sunday Lokmat on 10 August 2025
...मला वृक्षांना मिठी मारायला खूप आवडतं. मी या जंगलातही ते केलं. त्या वृक्षांना मिठी मारून त्यात वर्षानुवर्षं साठलेल्या सृष्टीच्या ज्ञानाचा स्पर्श आपल्याला करून घेणं मला भावतं...
‘तैवानच का?’ एअर होस्टेसने पाण्याचा ग्लास माझ्या हातात देताना विचारलं. तीही योगायोगाने तैवानचीच होती. आम्ही मैत्रिणी तैवानची अतिशय संस्मरणीय अशी ट्रिप करून सिंगापूर एअरलाइन्सने परतत होतो. एअर होस्टेसच्या प्रश्नाचं मला जराही आश्चर्य वाटलं नाही, कारण आम्ही या ट्रिपच्या तयारीला लागल्यापासून जवळपास सर्वच जणींना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
एकतर आम्हाला आशियामध्येच कुठेतरी फिरायला जायचं होतं. फार दूरही नको आणि अगदी जवळही नको, असं ठिकाण हवं होतं. जिथे शहरांमधील चमकधमकही असेल आणि निर्सग सौंदर्याची लयलूटही पाहता येईल, शिवाय आमच्यापैकी कोणीही तिथे गेलेलं नाही, अशा ठिकाणाच्या शोधात आम्ही होतो. आणि मनापासून सांगते, आमच्या या सगळ्या अपेक्षा तर तैवानने पूर्ण केल्याच, आणखीही बरंच काही आम्हाला दिलं.
व्हिसासाठी अतिशय सोपी ऑनलाइन प्रक्रिया होती. त्यामुळे ट्रिपची तयारी करणंही एकदम आनंददायी ठरलं. तैपेईला उतरल्याबरोबर आम्ही थेट रेल्वे स्टेशनकडे निघालो. तिथून आम्ही शहराच्या दक्षिण दिशेला जाणार होतो. या प्रवासात तैवानमधील किमान दोन शहरांना भेट द्यायचीच असा आम्ही मनोमन निश्चय केला होता. त्यापैकी एक तैपेई हे राजधानीचं शहर. इथल्या ट्रेन स्टेशनवर आमचं ज्या नजाकतीने स्वागत झालं त्यांनी आम्ही पुरते हरखून गेलो.
स्टेशनच्या बाहेरच चेरी ब्लॉसमचा बहर आला होता. जपान किंवा कोरिया या दोन देशांमध्येच चेरी ब्लॉसमचा सीझन असतो अशीच बहुतेकांची कल्पना असते. पण प्रत्यक्षात तैवानमध्ये हा सीझन सगळ्यात आधी सुरू होतो. स्वाभाविकच आमच्यासाठी ते एकदम खास स्वागत होतं. दुसरी गोष्ट नजरेत भरली ती म्हणजे इकडची स्वच्छता. स्टेशन परिसर स्वच्छतेमुळे चकाकत होता. सगळीकडे लोक रांगेत उभे होते. कुठेही गडबड गोंधळ नाही. त्या सगळ्याचं आम्हाला कौतुक वाटलं. लगेच आम्ही दक्षिण दिशेला असलेल्या काओशुंगकडे जाणाऱ्या हाय स्पीड रेल्वेत बसलो. ताशी तीनशे किलोमीटरच्या वेगाने आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.
काओशुंग: मंदिरे, पॅगोडा आणि नाईट मार्केट्स.
काओशुंग हे उर्जेनं सळसळणारं व्हायब्रंट शहर आहे. या बंदराच्या शहरात आम्हाला आश्चर्याचे एकापोठापाठ एक धक्के बसले. इथून 45 मिनिटांच्या अंतरावर जगातल्या सगळ्यात मोठ्या बुद्ध विहारांपैकी असलेलं प्रख्यात फो गुआंग शान बुद्धविहार आहे. या बुद्ध विहारामध्ये आम्हाला बुद्धाच्या शिकवणीची काही सूत्रं मँडरिन भाषेत लिहून बघण्याची संधीही मिळाली. या बुद्ध विहारातील सर्व रेस्टॉरंट्स शाकाहारी होती, हेही आश्चर्यच! भारतीय पर्यटकांना परदेशात जेवणाचे मोजकेच पर्याय उपलब्ध असतात. त्यांच्या दृष्टीने ही चैनच. शाकाहारी असलेल्यांविषयी तैवानमध्ये अनेक ठिकाणी विशेष संवेदनशीलता असल्याचं मला जाणवलं.
पुढे आम्ही ड्रॅगन आणि टायगर पगोडा बघायला लोटस पाँडला पोहोचलो. इथे ड्रॅगनच्या तोंडातून आत शिरायचं आणि वाघाच्या तोंडातून बाहेर पडायचं अशी एक आख्यायिका सांगितली जाते. म्हणजे, वाईट नशीब मागे टाकून चांगल्या भविष्याकडे जायचा हा मार्ग, असा त्याचा अर्थ. त्याच्या समोरच, रंगीत टाओइस्ट मंदिरे होती. ती पाहताच मला लडाखमधल्या तेजस्वी बुद्ध विहारांची आठवण झाली. या सर्व ठिकाणी नीरव शांतता होती. त्याचा आम्हा सगळ्यांवरच सकारात्मक परिणाम झाला.
त्या संध्याकाळी आम्ही शहरातल्या सी फूडचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलो. ताजे मासे, खास निवडलेले आणि आपल्याला हव्या त्या सॉसमध्ये शिजवून मिळणारे... ही जागा म्हणजे अट्टल खवय्यांसाठी स्वर्गच. तैवानमध्ये अत्यंत आपुलकीने जेवण वाढलं जातं. आपल्या आजूबाजूला हास्यविनोद रंगलेला असतो. एकमेकांच्या ताटातून शेअरिंग चालू असतं आणि सोबतीला तैवानीज् बीअर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या रात्री मी सी फूडच्या वाटेला गेलेच नाही. त्या रात्रीची माझी फेव्हरिट डिश होती अगदी ताज्या, जणू नुकत्याच शेतातून खुडून आणलेल्या फ्रेश ग्रीन व्हेजिटेबल्स. एका प्लेटमध्ये त्या घेऊन मी त्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
अर्थातच, तैवानमधील नाईट मार्केटला भेट दिल्याशिवाय इथला प्रवास पूर्ण होऊच शकत नाही. खाद्य पदार्थांचे स्टॉल, वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स, वेगवेगळे खेळ यांच्या साथीने अतिशय उत्फुल्ल वातावरण असा सगळा माहोल तिथे होता. याच शहरात नदीकिनारी असलेल्या पीअर-टू आर्ट सेंटरमध्ये भरलेल्या प्रदर्शनात आम्ही स्थानिक कलाकृती पाहिल्या. वेगवेगळी दुकानं, कॅफे आणि ज्यावर उभे राहून बोटींची ये-जा न्याहाळता येईल, अशी सोय असलेला सुंदरसा पूल असं फार देखणं वातावरण तिथे होतं.
ढगांच्या दुनियेतील अलिशान:
काओशुंगहून आम्ही निघालो ते अलिशानमधील रात्रीच्या वास्तव्यासाठी. या प्रवासात निर्सगाचं रुप पूर्णपणे पालटून ते आणखी देखणं बनलं. या अलिशान फॉरेस्ट रिक्रिएशन एरियामध्ये आपल्याला प्राचीन सायप्रस वृक्ष भेटतात. त्या वृक्षराजीतून चालण्याचा सुंदर अनुभव घेता येतो. सुमारे 2000 वर्षं जुन्या असलेल्या वृक्षांच्या जंगलातून आम्ही चालत गेलो. काही झाडांवर आम्ही ‘थ्री जनरेशन ट्रीज’ अशी नोंद पाहिली. ती झाडं दीर्घायुष्याचं मूर्त उदाहरण होती.
मला वृक्षांना मिठी मारायला खूप आवडतं. मी या जंगलातही ते केलं. त्या वृक्षांना मिठी मारून त्यात वर्षानुवर्षं साठलेल्या सृष्टीच्या ज्ञानाचा स्पर्श आपल्याला करून घेणं मला भावतं. पायवाटेवरून चालताना साथ होती ती ताज्या हवेची. त्यामुळे एकदम उत्साही वाटलं.
अलिशानचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथला धुक्याच्या पर्वतरांगांमधून जाणारा जुना रेल्वे मार्ग. जपानी वसाहतीच्या काळात म्हणजे 1895 ते 1945 या काळात हा मार्ग बांधण्यात आला. धुक्यात हरवलेल्या पर्वतामधून ट्रेन वाट काढत जाते. आम्हाला तिथे रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली, कारण आम्हाला तिथला प्रसिद्ध सूर्योदयही पहायचा होता. तो सगळा प्रसंग जादुई होता. सूर्योदय पाहण्यासाठी खास तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर गर्दी होती. आम्ही त्यात सामावून गेलो. सूर्योदय होऊ लागताच खाली असलेले ढग सोनेरी होऊन गेले. जणू काही सोनेरी समुद्रच. तेवढ्यात शेजारी कोणीतरी मोठ्यमोठ्याने बोलतंय हे जाणवलं. आधी आम्हाला वाटलं तो या निसर्गसौंदर्याचं वर्णन करतो आहे. मग कळलं की तो सायप्रस वृक्षांपासून बनवलेल्या तेलाची जाहिरात करत होता. एवढा एक भाग वगळला तर सूर्योदयाचा तो नजारा अदभुत होता.
तैवानचा चहा, वॉटरफॉल्स आणि संस्कृतीची ओळख:
परतीच्या प्रवासात आम्ही ओलाँग चहाच्या मळ्यात थांबलो. तैवानच्या ओलाँगची जगभरात उत्तम दर्जाबद्दल ख्याती आहे. आम्ही तिथे मळ्यातच टी टेस्टिंगचा आनंद घेतला. चहाचे मळे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर धुक्यात हरवलेले डोंगर हे दृश्य म्हणजे एकदम इन्स्टा मोमेंट असल्याने सगळ्यांनी भरपूर फोटो काढले. मग, कुटुंबीय आणि मित्रमंडळींसाठी हा खास ‘मेड इन तैवान’ चहा बांधून घेत आम्ही पुढे निघालो.
पुन्हा उत्तरेकडे आलो. इथे आम्ही येहीलिऊ जिओ पार्कची सैर केली. लाखो वर्षांपासून इथल्या दगडांना भलतेच आकार मिळालेले आहेत. भूगर्भातील हालचालींमुळे समुद्राच्या पोटातून तैवानचा प्रदेश वर आलेला आहे. त्याचा जिवंत पुरावा या जिओ पार्कमध्ये जागोजागी दिसतो. क्वीन्स हेड, कॅण्डल रॉक, क्यूट प्रिन्सेस अशा काही नैसर्गिक रचना आम्ही पाहिल्या. समुद्र आणि वारा यांच्या कलाकारीतून ही शिल्पं साकारली आहेत. जिथे भूगोल ही सुद्धा एक कविता होते, अशीच ही जागा!
तेथून जवळच असलेल्या शिफेन वॉटरफॉलपाशी आम्ही थोडावेळ विसावलो. मग, डोंगरात वसलेल्या जिऊफेन शहरात आलो. एकेकाळी इथे सोन्याची खाण होती. इथल्या चिंचोळ्या गल्ल््या आणि कंदिलांच्या प्रकाशात उजळलेली टी हाऊसेस यामुळे हा सगळा परिसर एकदम जुन्या जमान्यातल्या सिनेमातल्या एखाद्या जागेसारखा वाटत होता.
तैपैई: उंच इमारती, खाद्य जत्रा आणि बरंच काही...
आमच्या प्रवासातील शेवटचं ठिकाण होतं तैपेई. आम्ही या शहराबद्दल जे काही एकलं होतं ते सगळं तिथे प्रत्यक्ष पाहिलं. एकेकाळी जगातील सगळ्यात उंच असलेली प्रसिद्ध तैपेई 101 ही गगनचुंबी इमारत पाहणं मस्ट होतं. भूंकप आणि वादळाच्या माऱ्यातही ही इमारत सावरून धरणारा 660 टनाचा लंबक आतून बघण्यासारखा आहे. अशा प्रकारची रचना बहुदा केवळ तैवानमध्येच असावी.
तैपेईमध्ये खरेदी करायचीच हे माझं स्वप्न होतं. मेकअपचा स्वर्ग असलेल्या पोयापासून स्थानिक मिठाई, हस्तकलेच्या वस्तू आणि दादोओचँगवरील भटकंती हे म्हणजे वर्तमान आणि भूतकाळ या दोन्ही काळांमध्ये एकसारखी ये जा करण्यासारखंच होते. चेओंगसम हा स्थानिक पोशाख केलेली एक मुलगी तिथल्या नगरदेवता आणि त्याच्या पत्नीच्या मंदिरात प्रार्थना करतानाही आम्ही पाहिली.
झियाओ लाँग बाओ म्हणजे लहानशा वाडग्यातील डंपलिंगचा आस्वाद घेण्यासाठी डीन तायफुंगला जाणं हा तैपेईच्या ट्रिपचा अविभाज्य भाग असतो. अठरा पदराची घडण असलेला, 21 ग्रॅम वजनाचा हा खास पदार्थ. त्या रात्री आम्ही झिमेडिंगला पोहोचलो. तैपेईमधील ही एकदम खास खरेदीची जागा. तिथे माझ्या आवडत्या ‘झिन फु टँग’ या बोबा टी चा आस्वाद घेतला. हाही खास तैवानचाच शोध.
तैवानला का जायचं? या प्रश्नाला माझा प्रतिप्रश्न आहे की, का जायचं नाही?
तैवान हा वेगवेगळ्या प्रभावांचा संगम असलेला अद्भुत प्रदेश आहे. स्पॅनिश, डच, चीन, जपानी या सगळ्यांनी तैवानवर वेगवेगळ्या काळात राज्य केलं. त्या सगळ्या अंमलाचा प्रभाव एकत्रितपणे तैवानमध्ये पाहता येतो. आमच्या एका गाईडने फार मार्मिक टिप्पणी केली. तो म्हणाला, तैवान हे चीनने टाकून दिलेलं पोर. ते वाढवलं जपानी सावत्र आईने. अमेरिकेन काकाने दत्तक घेतलं आणि हे सगळं बुद्धाच्या नजरेसमोर घडलं. तैवानच्या इतिहासाचा हा पैलू कळला तेव्हा तैवानचे लेखक वू चो-लिउ यांच्या ‘द ऑर्फन ऑफ एशिया’ या पुस्तकाची आठवण झाली. मोठ्या सत्तांच्या कोंडीत सापडलेल्या सांस्कृतिकदृष्ट्या अनाथ असलेल्या बेटाची ती कहाणी आहे. या सगळ्या मिश्रणामुळेच तैवान अतिशय मोहवून टाकतो. खास ठरतो.
तेच वैविध्य आणि चिकाटी तिथल्या लोकांमध्येही आहे. पाहुणचाराच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. आम्ही जिथे गेलो त्या सर्व ठिकाणी आम्हाला हाच अनुभव आला. प्रामाणिक, संवेदनशील आणि सदा हसतमुख अशी ही माणसं. त्यामुळे आता मला कोणी, मी प्रवासाला कुठे जाऊ असा प्रश्न विचारला की माझं उत्तर तयार असतं. तैवान! जायलाच हवं असं खास ठिकाण!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.