IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

फुजिसान कोनबिनी आणि...

10 mins. read

Published in the Sunday Maharashtra Times on 20 July 2025

...पण तिथली ती संपूर्ण शांतता मात्र मला अजिबात अपेक्षित नव्हती. सामना सुरू होण्यापूर्वीची ती घनगंभीर शांतता एखाद्या ध्यान मंदिराला शोभणारी होती. एका क्षणात ती शांतता भंगली आणि...

वीणा वर्ल्डच्या साप्ताहिक न्यूज लेटरपासून ते पॉडकास्टपर्यंत डिजिटल माध्यमात भरपूर मुशाफिरी करुन झाल्यानंतर आता प्रिंट मिडिया मधून मी तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. या माध्यमातलं माझं हे पहिलंच पाऊल आहे, त्यामुळे जरा सांभाळून घ्या प्लीज.

नमस्कार मंडळी! मी नील पाटील, वीणा वर्ल्डच्या संस्थापकांपैकी एक, सध्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. तुमच्याशी संवाद साधताना सुरुवात कुठून करायची? तर अर्थातच मला सर्वात आवडणाऱ्या देशापासून म्हणजेच उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌‘जपान‌’पासून.

जगाच्या पाठीवरील ज्या मोजक्या देशांना मी पाचपेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे, त्यातला एक म्हणजे जपान. माझ्या प्रत्येक जपान भेटीत मी त्याची नवनवीन रुपं बघितली, स्प्रिंग्जमधील चेरी ब्लॉसम, ऑटम मधील फॉल, जॅपनीज आल्प्स मधील शुभ्र धवल हिमवर्षाव... मात्र प्रत्येक ऋतूत नवा साजशृंगार धारण करणाऱ्या जपानचं शांत, रेखीव, मायाळू, विस्मयकारक अंतरंग कधीच बदलत नाही.                    यावेळी माझी पत्नी हेता आणि मुलगी राया यांना बरोबर घेऊन, पुन्हा एकदा जपानला भेट द्यायचा बेत आखतोय, तेव्हा वाटलं की ज्या पाच मुख्य कारणांमुळे मी पुन्हा पुन्हा जपानकडे आकर्षित होतो, त्याची माहिती तुम्हालाही द्यावी. तर ही आहेत मला आकर्षित करणारी जपानची पाच वैशिष्ट्ये :

कोनबिनी- जपानची 24x7 कल्चर कॅप्सुल:

जपानला गेल्यावर तिथल्या पुरातन मंदिरांपेक्षा, कॅसल्सपेक्षा आणि म्युझियम्सपेक्षा जास्त वेळा तुम्ही भेट द्याल असं ठिकाण म्हणजे जपानच्या कोणत्याही शहरातल्या कोपऱ्यांवर आढळणारं ‌‘कोनबिनी‌’. हे ‌‘कोनबिनी‌’ म्हणजे काय तर जपानी कन्व्हिनियन्स स्टोअर्स. थोडक्यात आपल्याकडचं सुपर मार्केट.

तुम्ही कल्पना करा की मध्यरात्रीनंतर दोन वाजता एका दिव्यांनी उजळलेल्या, स्वच्छ, नीटनेटक्या दुकानात शिरता, जिथे ताज्या उकळलेल्या कॉफीपासून ते ओनिगिरी - राइस बॉल्स पर्यंत, इतकंच नव्हे तर नीट पॅक केलेले बेन्तो बॉक्सेस (लंच बॉक्स), स्टेशनरी, फोन चार्जर्स, ए.टी.एम. मशीन, अगदी कुरिअर सर्व्हिसपर्यंत सारं काही उपलब्ध आहे, त्यासाठी तुम्हाला मदत करायला पारंपरिक जपानी पध्दतीने वाकून अभिवादन करणारा नम्र मदतनीसही आहे, अशा ठिकाणाला फक्त कन्व्हिनियन्स स्टोअर्स  कसं म्हणायचं बरं?

मी तेव्हा नव्यानेच जपानला गेलो होतो. जेट लॅगमुळे टोकियोतल्या त्या हॉटेलात मला अगदी अवेळीच जाग आली, परत झोप लागणार नव्हती. उलट भूक लागल्यासारखं वाटलं म्हणून मी हॉटेलमधून बाहेर पडून समोरच्या फूटपाथवर असलेल्या सेव्हन-इलेव्हनमध्ये डोकावलो. अशा ऑड वेळेला तिथे फार फार तर सँडविच (ते ही कदाचित काल सकाळचं!) आणि पाण्याची बाटली इतकंच मिळू शकेल असं वाटलं होतं, पण मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला कारण तिथे रेडी टू इट प्रकारच्या पदार्थांचे अनेक पर्याय होते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या नूडल्सच्या पाकिटांनी भरलेले शेल्फ होते, काऊंटरजवळ वाफाळते पदार्थही होते आणि मला लगेच काही गरम करुन खायचं असेल तर एक मायक्रोवेव्ह ओव्हनही तिथे ठेवलेला होता. मला असं वाटलं की मी जणू जपानच्या आदरातिथ्याची झलकच कोनबिनीमध्ये अनुभवली.

यातला सर्वात चांगला भाग म्हणजे कोनबिनीमधल्या पदार्थांची चव अतिशय मस्त होती. जपानमध्ये तीन मोठ्या कोनबिनी चेन्स आहेत, ज्यांचे आउटलेट्‌‍स तुम्हाला सगळ्या शहरांमध्ये आढळतात, सेव्हन-इलेव्हन, लॉसन आणि फॅमिली मार्ट. या प्रत्येकाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. क्योटो शहरातील कोनबिनीमध्ये चाखलेलं लिमिटेड एडिशन ‌‘मॅट्‌‍चा डेझर्ट‌’, ओसाकामध्ये प्यायलेलं सिझनल साकुराच्या स्वादाचं पेय, होक्काइदो मध्ये खाल्लेलं चविष्ट मिसो सूप अशा माझ्या अनेक आठवणी जपानभर विखुरलेल्या कोनबिनीशी निगडीत आहेत.

जपानी स्थानिकांसाठी कोनबिनी म्हणजे एक सांस्कृतिक चिन्ह आहे, तर तुमच्या माझ्यासारख्या पर्यटकांसाठी कोनबिनी म्हणजे जणू लाईफ लाईनच. छत्री आणायला विसरलात? प्रवासात चार्जर हरवला? शिंकानसेन (बुलेट ट्रेन) पकडायच्या आधी पटकन पोटपूजा करायची आहे? तर मग या सगळ्यासाठी तुमचा हक्काचा आधार म्हणजे जवळचं 24x7 सुरू असलेलं कोनबिनी.

माउंट फुजी - पवित्र आणि प्रसन्न राखणदार:

इतका भव्य असूनही तो मायावीच कसा वाटतो म्हणून मला त्याच्याविषयी नेहमी आश्चर्यच वाटतं, मी बोलतोय माउंट फुजीबद्दल ज्याला जपानी लोक प्रेमाने ‌‘फुजिसान‌’ म्हणतात. हा फुजिसान जपानमधला सर्वोच्च पर्वत तर आहेच, त्याबरोबरच तो या देशाचं सर्वात पवित्र मानचिन्हही आहे. जेव्हा वातावरण साफ, स्वच्छ असतं तेव्हा थेट टोकियोमधून म्हणजे सुमारे 100 कि.मी.वरुन तुम्ही माउंट फुजीचा ढगांच्या दाटीतून डोकावणारा आखीवरेखीव त्रिकोणाकृती शिरोभाग स्पष्ट पाहू शकता. मात्र तो अनेकदा एखाद्या बुजऱ्या रक्षकाप्रमाणे धुक्याच्या पडद्यामागे लपून बसतो, त्यामुळे मधूनच त्याचं होणारं दर्शन जादूईच वाटतं.

शतकानुशतके जपानी लोकांनी माउंट फुजीला आदरणीय मानलं आहे, कारण त्यांच्यासाठी तो फक्त एक पर्वत नाही तर आध्यात्मिक केंद्र आहे. शिंटो उपासकांसाठी ते देवतांचं निवासस्थान आहे. कवी आणि चित्रकारांसाठी तो चिरंतन प्रेरणास्थान आहे. हायकर्स आणि ट्रेकर्ससाठी भल्या पहाटे फुजीच्या शिखरावर चढाई करुन तिथून सूर्योदय बघणं म्हणजे एखाद्या धार्मिक विधीप्रमाणे असतं, म्हणून तर त्याला ‌‘गोराइको‌’ असं म्हणतात.

मी घेतलेल्या फुजीच्या लक्षणीय दर्शनामधील सर्वात संस्मरणीय दर्शन मला फुजिक्यु रेल्वेने प्रवास करताना रेल्वे कोचच्या खिडकीतून झालं होतं. काही क्षणांपुरता तो ढगांचा पडदा दूर हटला आणि त्याच्या मागचा फुजिसान आम्ही बघितला, भव्य, अचल आणि माथ्यावर बर्फाचा मुकुट मिरवणारा तो नगाधिराज पाहून कोचमधल्या सगळ्यांनी एकाचवेळी आश्चर्योद्गार काढले, ज्यात स्थानिक जपानी लोकही तितक्याच मनःपूर्वकतेनं सहभागी झाले होते.

तुम्ही चुरिआतो पॅगोडाच्या टोरी गेटच्या चौकटीतून, शेजारच्या लेक कावागुचिच्या शांत पाण्यात पडलेलं फुजिसानचं प्रतिबिंब बघता तेव्हा काय, किंवा तुमच्या ग्रीन टी बॉटलच्या लेबलवर त्याचं चित्र बघता तेव्हा काय, सगळीकडे त्याचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं, कायम सुंदर, लक्ष ठेवून असणारा आणि म्हणूनच अस्सल जपानी फुजिसान.

सुशीच्या पलिकडे - एक चटकदार खाद्ययात्रा:

जेव्हा जेव्हा जपानी पदार्थांचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी आठवण होते ती ‌‘सुशी‌’ची. ते स्वाभाविकच आहे कारण सुशी त्याच्या नावलौकिकाला जागणारा आहे यात काही शंकाच नाही. पण जपानी खाद्य परंपरा ही अतिशय वैविध्यपूर्ण तसेच चटकदारही आहे, तिला सुशीच्या मर्यादेत अडकवता येणार नाही.

मी जेव्हा जपानच्या वेगवेगळ्या प्रांतांना भेट दिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की या प्रत्येक प्रांताची भारतासारखीच स्वतःची अशी खाद्य संस्कृती आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक शहरात, रस्त्यावरच्या जॉइंट्‌‍स मध्ये आणि प्रत्येक कन्व्हिनियन्स स्टोअर्समध्ये तुम्हाला वेगळा स्वाद, वेगळी चव नक्कीच चाखायला मिळते. जपानमधल्या माझ्या खादाडीतला संस्मरणीय क्षण म्हणजे साप्पोरो मध्ये बर्फाने गारठलेल्या संध्याकाळी वाफाळत्या मिसो रॅमनचा घेतलेला आस्वाद!

जपानमध्ये असताना काहीतरी चटपटीत, क्रिस्पी खायची इच्छा झाली तर करागे अवश्य ट्राय करा. हे आहे जॅपनीज्‌‍ स्टाइल फ्राइड चिकन. सोया आणि गार्लिकमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन नंतर मस्त खरपूस तळलं की झालं ‌‘करागे‌’. दुसरं ‌‘ओकोनोमियाकी‌’ हा चविष्ट नमकिन पॅनकेक खाऊन बघाच. बरं गोड खाऊंसाठीही जपानमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे मोची, तैयाकी म्हणजे माशाच्या आकाराचा केक ज्यामध्ये रेड बिन्स किंवा कस्टर्डचं सारण भरलेलं असतं किंवा मॅट्‌‍चा चहा बरोबर सर्व्ह केला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे ‌‘वागाशी‌’ तर आहेच.

जपानमध्ये बौध्द धर्म रुजलेला असल्याने शाकाहारी भोजनाची परंपराही तितकीच चवदार आहे. बौध्द मंदिरांमधील पारंपारिक ‌‘शोजिन रायोरी‌’ पदार्थ, जे शुध्द शाकाहारी असल्याने सात्विक आहाराचे समाधान देतात. शिवाय आता पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन जपानभर स्थानिक गोष्टींचा वापर करुन शाकाहारी आणि ‌‘वीगन‌’ भोजन देणाऱ्या अधिकाधिक सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. जपानी खाद्य परंपरा सुशीच्या बरीच पल्याडपर्यंत पसरलेली आहे. या खास जपानमध्येच बहरलेल्या खाद्य खजिन्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही जपानला जाताना तुमची उत्सुकता आणि भूक मात्र जागी ठेवा.

सुमो कुस्ती - ताकद, रिवाज आणि जल्लोश:

सुमो कुस्तीच्या प्रेक्षागृहात पाऊल ठेवण्यापूर्वीच तिथे काय वातावरण असेल याची मला पूर्ण कल्पना होती. त्या प्रमाणे तिथे एका रिंगणात दोन महाकाय मल्ल एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज होते. पण तिथली ती संपूर्ण शांतता मात्र मला अजिबात अपेक्षित नव्हती. सामना सुरू होण्यापूर्वीची ती घनगंभीर शांतता एखाद्या ध्यान मंदिराला शोभणारी होती. मात्र एका क्षणात ती शांतता भंगली आणि प्रेक्षकांच्या आरोळ्या, पैलवानांचे हुंकार, पारंपारिक पध्दतीची सामर्थ्याची टक्कर यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमला

शतकानुशतकांच्या परंपरेतून आकाराला आलेल्या सुमो कुस्तीवर शिंटो कर्मकांडांमधून उगवलेल्या पारंपारिक रिवाजांचा पगडा दिसतो. प्रत्येक लढत ही ठराविक हालचालींनीच सुरू होते, दुष्ट शक्तींना घालवण्यासाठी केलेले पदाघात, रिंगणाच्या शुध्दीसाठी शिंपडलेले मीठ, सुरवातीची दीर्घ, नाट्यपूर्ण नजरबंदी, जेव्हा दोन्ही स्पर्धक एकमेकांना स्पर्शही न करता एकमेकांकडे अनेक क्षण फक्त रोखून पाहतात, अंदाज घेतात... या सगळ्याशिवाय सुमोला पूर्णत्वच येत नाही. टोकियोमधल्या ‌‘रोगोकु कोकुगिकान‌’ स्टेडियममधलं सगळं वातावरण सुमो लढतींच्या वेळी कसं ‌‘चार्ज्ड‌’ असतं ते नक्कीच अनुभवण्याची गोष्ट आहे.

जपानमध्ये दरवर्षी सहा वार्षिक ग्रँड सुमो टूर्नामेंट्‌‍स होतात, तुमची जपान वारी जर याच काळात होणार असेल तर सुमोची लढत प्रत्यक्ष बघायची संधी गमावू नका. जर तुमच्या भेटीच्या तारखांना या टूर्नामेंट्‌‍स नसतील तरी तुम्ही जपानभर असलेल्या सुमो प्रशिक्षण केंद्रांवर जाऊन दररोज सकाळच्या प्रॅक्टिस सेशनचा अनुभव घेऊ शकता जो मॅच इतकाच थरारक असतो.

जॅपनीज कॅफे - एकमेवाव्दितीय:

जपानमधील टोकियो, ओसाका किंवा क्योटो अशा कोणत्याही मोठ्या शहरातल्या नाक्यावर तुम्हाला हमखास एक तरी कॅफे लागेलच. या देशाच्या कल्पनाशक्तीची झलक या कॅफेंमधून पहायला मिळते. उदाहरण घ्यायचं तर इथल्या ‌‘कॅट कॅफे‌’चं घ्या, या कॅफेत गेल्यावर तुम्ही बसताना पायातले शूज काढता, तुमची ऑर्डर देता आणि मग अवतीभवती बागडणाऱ्या मांजरींच्या सान्निध्यात पुढचा तासभर कसा जातो कळतही नाही. तुमच्या समोरच्या बुकशेल्फपासून ते खिडकीच्या चौकटीपर्यंत सगळीकडे आरामात पहुडलेल्या मांजरीचा सहवास तुम्हाला शांत आणि प्रसन्न करतो. याशिवाय जपानच्या कॅफेमध्ये आणखी काही पर्याय आहेत जसे की आऊल कॅफे, हेजहॉग कॅफे, अगदी गोट कॅफेही आहेत इथे. तुम्हाला हव्या असलेल्या प्राण्यांसोबत मजेत वेळ घालवायची सोय केली आहे जपानी कॅफेंनी.

जपानमधील कॅफेंचं विश्व आपल्याला थक्क करून सोडतं. रेल्वेच्या थीमचा कॅफे, निन्जाज्‌‍ कॅफे, ॲलिस इन वंडरलँड थीम, इतकंच काय पण शांततेत चिंतन करण्याचे कॅफे असे एकाहून एक अनोखे कॅफे जपानमध्ये बघायला मिळतात. हे कॅफे म्हणजे रोजच्या ताणतणावांनी भरलेल्या, घाई-गडबडीच्या जगण्यातून सुटका म्हणून कल्पनाशक्तीच्या मदतीने निर्माण केलेली समांतर दुनिया आहे. जिथे तुम्ही तुमच्या मुक्त कल्पनाशक्तीच्या अद्भुत जगात किमान तासभर तरी मजेत वेळ घालवू शकता.

तर मंडळी ही आहे जपानची थोडक्यात ओळख. जपान म्हणजे एक असा देश जो तुम्हाला पावलोपावली आश्चर्याचे सुखद धक्के देतो, त्यामुळे तुम्ही कितीही वेळा जपानला भेट दिली असेल तरी प्रत्येक नवीन भेटीत काहीतरी नवीन गोष्ट इथे तुमचं स्वागत करायला तयार असतेच आणि म्हणून तर जपान हा जपान आहे!

July 18, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top