We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

बालीला गेलात की नाही अजून?

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

बालीला जाण्याचा प्लॅन गणपतीच्या सुट्टीत ठरवा, कारण वेळा जुळल्या की तयारी सहज होते.

उबुदच्या वाटेवर घटोत्कचाच्या भव्य पांढऱ्या शिल्पाकडे लक्ष द्या आणि वायंग कुलित कळसुत्रीची कथा जाणून घ्या.

आयुंग नदीत रिव्हर राफ्टिंग करा, कारण खळाळत्या पाण्याचा थरार आणि एक्स्पर्ट राफ्टर्सचा सपोर्ट अनुभवाला खास बनवतो.

उबुदमध्ये पायऱ्यांची भातशेती, कारागिरांची गावे आणि सुशेगाद कॅफे पाहा, तसेच हाताने विणलेला इकत खरेदी करा.

माऊंट बटूरला सूर्योदयासाठी रात्रीच ट्रेक सुरू करा आणि सूर्योदयाच्या काही क्षण आधी शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करा.

कॉफी मळ्यात कोपी लुवाक चाखा, पण आधी त्याची प्रक्रिया आणि वादग्रस्तता समजून घ्या.

Published in Loksatta Lokrang 5th July 2026

...आणि आम्ही तिथून खोल निळ्या समुद्रात उडी मारली.

कसला भन्नाट अनुभव होता तो... सभोवताली मोकळे आकाश

आणि निळेशार पाणी... आम्ही मनसोक्त पोहलो...

‌‘आपण इथे यायला एवढा उशीर का केला?‌’ बालीच्या किनाऱ्यावर पाऊल टाकलं आणि हाच विचार माझ्या मनात आला. आपल्याला भेट देण्याची इच्छा असलेल्या स्थळांची आपली खास यादी असते. त्यात बालीसारखी ठिकाणं हमखास असतात. पण बरेचदा आपण तिथे जाण्याचा योग जुळून येण्याची वाट पाहतो किंवा आणखी चांगली संधी मिळेल तेव्हा जाऊ असं म्हणून तो विचार पुढे ढकलतो. त्यातही मी तर बालीसाठी आमच्या कितीतरी पर्यटकांच्या फिरस्तीचं नियोजन केलं आहे. पण स्वत:साठी किंवा कुटुंबीयांसह एकत्रित सुट्टी घालवण्यासाठी इथे येण्याचं नियोजन मात्र रेंगाळलेलंच होतं. अखेर एका गणपतीच्या सुट्टीत आमचा बालीचा प्लॅन ठरला. सगळ्यांच्या वेळा जुळून आल्या आणि आम्ही तयारी करून निघालो. सोबत होत्या भरलेल्या बॅगा आणि बालीला निघाल्याचा अमाप उत्साह!

त्या प्रवासाने मला पावलोपावली आश्चर्याचे धक्के दिले. मी जे जे पाहिलं, अनुभवलं, ते अद्भुत होतं. परंपरा आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम आपल्याला बालीमध्ये दिसतो. तिथला प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्त एखाद्या पोस्टकार्डसारखा असतो. प्रत्येक गोष्ट इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यासारखी असते. अर्थात, हे बालीचं देखणं दर्शनी रुप आहे, पण बालीच्या अंतरंगात शिरलो तर त्याचं खास वैभव अनुभवता येतं. विशेष म्हणजे संस्कृतीला कोणत्याही सीमांची आडकाठी नसते हे आपल्याला इथे जाणवतं. आपण राहतो वेगवेगळ्या जगात, पण शेवटी काही मूल्यं, धारणा या इथूनतिथून सारख्याच असतात. एखादं ठिकाण आपल्याला अतिशय ओळखीचं वाटतं, पण प्रत्यक्षात मात्र ते कितीतरी वेगळं आणि अधिक सुंदर असल्याची प्रचिती येते. इंडोनेशिया या देशातील बालीच्या बाबतीत माझं तसंच झालं. या मुस्लिमबहुल देशातल्या, बाली शहरात 85 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. इथल्या बालीनीज्‌‍ हिंदू धर्माचा विकास भारतीय वैदिक तत्त्वज्ञान, स्थानिक निसर्गपूजा, पूर्वजांचे स्मरण आणि बौद्ध धर्म यांच्या शतकानुशतकांच्या समन्वयातून झालेला आहे. त्यामुळे इथली आध्यात्मिक संस्कृती प्रत्येक गोष्टीत खोलवर रुजलेली, वैभवशाली आहे.

आम्ही उबुदच्या वाटेवर होतो. विमानतळावरून गाडीने निघतानाच आम्हाला बालीमधील पहिला सुखद अनुभव मिळाला. घटोत्कचाचे सुंदर आणि भव्य पांढरे शिल्प तिथे स्वागतासाठी सज्ज होते. शिवाय इथे कुरुक्षेत्रावरील भीमपुत्र आणि कर्ण यांच्यातील लढाईचे दृश्यही शिल्पबद्ध करण्यात आले आहे. हे अतिशय देखणे आणि गतिमान असे शिल्प आहे. निष्ठावान, बुद्धिमान आणि शक्तिशाली घटोत्कच बालीवासीयांना पूजनीय आहे. तो इंडोनेशियातील ‌‘वायंग कुलित‌’ या पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांच्या छायानाट्यातील नायक आहे.

पुढचा सुखद धक्का आयुंग नदीत रिव्हर राफ्टिंग करताना मिळाला. मुळात राफ्टिंग हाच रोमांचक अनुभव असतो. खळाळत्या पाण्याचा थरार, थंडगार तुषारांचा शिडकावा आणि मार्गदर्शन करणाऱ्या एक्स्पर्ट राफ्टर्सचे प्रोत्साहन यामुळे खळाळत्या नदीतले प्रत्येक वळण विलक्षण नाट्यमय होऊन जाते. आपण त्या कैफात असतो. यापेक्षा जबरदस्त काहीच असू शकत नाही, असं वाटत असतं. आणि नेमक्या त्याच वेळी एक जादुई कलाकृती आपल्यासमोर अवतीर्ण होते. आजूबाजूला न्याहाळत असताना आपल्याला दगडांवर रामायणातील महत्त्वाचे प्रसंग कोरून ठेवलेले दिसतात.

मी तर उबुदच्याही प्रेमात पडले. तिथली पायऱ्यांची भातशेती, कारागिरांची गावे आणि सुशेगाद कॅफे यांच्यामुळे ती जागा म्हणजे कला आणि संस्कृती यांचे माहेरघर वाटते. इथे पारंपरिक बालिनी हँडिक्राफ्ट्स पाहण्यात, हाताने विणलेल्या ‌‘इकत‌’ची खरेदी करण्यात आनंद मिळतो. शिवाय इथे हिरव्यागार शेतांवर बरसणाऱ्या पावसाची मौज बघत गरमागरम कॉफीचाही (बालीमधली कॉपी) आस्वाद घेता येतो. उबुदमधली बाजारपेठही मला खूप आवडली. तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू पाहत भटकंती करताना वेळेचं भानच राहिलं नाही. बालीमधली माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक पावलावर साधलेला संस्कृती आणि साहस यांचा अनोखा संगम. आयुंगमधील राफ्टिंगच्या साहसी अनुभवानंतर आम्ही माऊंट बटूर येथे सूर्योदयाचा ट्रेक केला. त्यासाठी रात्रीच निघालो आणि सूर्योदयाच्या काही क्षण आधीच आम्ही शिखरावर पोहोचलो. तिथे अद्भुत विहंगम दृश्य आमची वाट बघत होतं. त्या विलक्षण अनुभवानंतर कडक कॉफीची गरज होती. बहुदा आमच्या गाईडने माझ्या मनातली गोष्ट ओळखली. कारण आम्ही लगेचच एका कॉफीच्या मळ्यात पोहोचलो. इथे आम्हाला मिळाली कोपी लुवाक. तीच ती प्रसिद्ध आणि काहीशी वादग्रस्त अशी. एशियन पाम सिव्हेट मांजराच्या विष्ठेतून (होय, विष्ठेतूनच!) बाहेर पडलेल्या बियांपासून ही कॉफी बनवली जाते. सिव्हेट मांजर पिकलेल्या चेरीज निवडून फस्त करते. तिच्या पचनसंस्थेत त्या फळांचं विघटन होतं. बिया शाबूत राहतात. या बिया स्वच्छ करून वाळवतात आणि भाजतात. आणि त्या दळल्यावर तयार होते जगातल्या सगळ्यात महागड्या कॉफीपैकी एक असलेली कोपी लुवाक. ही कॉफी अतिशय मुलायम, मोहक असते. मी प्यायलेल्या इतर कोणत्याही कॉफीपेक्षा या कॉफीची चव आणि अनुभव पूर्णपणे वेगळाच होता.

उबुदमध्ये आणखी एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं. तिथल्या कितीतरी घरांच्या बाहेर फुलांनी भरलेलं पात्र ठेवलं होतं. इथली मंडळी रोज सकाळी घराच्या, दुकानाच्या, मंदिरांच्या बाहेर ही ताडपत्रीची छोटेखानी ताटं ठेवतात. त्यात फुलं, तांदूळ, उदबत्ती अशी रंगीबेरंगी सजावट असते. त्याला ‌‘कनांग सारी‌’ म्हणतात. परमेश्वराचं स्मरण करून, त्याचे दररोज आभार मानून आशीर्वाद घेण्याची ही इथली पद्धत. तिथल्या परंपरेनुसार प्रत्येक अपत्याचे नाव जन्माच्या क्रमानुसार.. वायन, मादे, न्योमान, केतुत अशी ठेवण्याची प्रथा आहे. प्रसूतीपूर्व विधी, बारसे, विवाह आणि अंत्यसंस्कार यांचा समावेश असलेल्या प्रथा-परंपरा ‌‘मानसा यज्ञ‌’ या नावाने ओळखल्या जातात. त्यापैकी, संक्रमण विधी हा वेगळाच प्रकार आहे. त्याला ‌‘मेटाटाह‌’ किंवा ‌‘मेपांडेस‌’ असेही म्हणतात. त्याचा अर्थ ‌‘कोरणे किंवा घडवणे‌’. हा विधी वयात येत असताना तोंडातील सुळ्यांच्या तीक्ष्ण कडा काढून टाकण्यासाठी केला जाई. त्यातून व्यक्तीमधील वाईट गुणांचं निर्दालन होतं, असे मानत. आताच्या काळात ही प्रक्रिया बऱ्यापैकी प्रतिकात्मक झाली आहे. मात्र पूर्वीच्या काळी सुळ्यांचा धारदारपणा नाहीसा होईपर्यंत दातांच्या कडा ‌‘घासण्याचा‌’ कार्यक्रम चालत असे!

बालीचे नववर्ष साका कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात साजरे केले जाते. योगायोगाने त्या विशिष्ट दिवशी बालीमध्ये असू तर तिथली शांतता... स्तब्धता पाहून आश्चर्य वाटू शकते. नववर्षाची सुरुवात ‌‘शांतता दिवसा‌’ने होते. या दिवशी इथे मौन पाळले जाते. इतरत्र नववर्षाच्या स्वागतासाठी आतषबाजी, उत्सव असे वातावरण असते, तर बालीमध्ये ‌‘न्येपी‌’ हा आत्मपरीक्षणाचा दिवस असतो. संपूर्ण बाली बेट ‌‘जैसे थे‌’ राहतं. रस्ते ओस पडतात. विमानतळ बंद असतात. पर्यटकांनीही हॉटेलमध्ये थांबावं अशी त्यांची सूचना असते. आदल्या दिवशी तिथेही उत्सवी वातावरण असतं. दुष्ट आत्म्यांचे प्रतीक असलेल्या भव्य आणि भीतीदायक ‌‘ओगो-ओगो‌’ या पौराणिक राक्षसांच्या पुतळ्यांची रस्त्यांवरून मिरवणूक काढली जाते. रात्री हे पुतळे जाळले जातात. त्यानंतर असलेला न्येपीचा दिवस म्हणजे शांत राहणं. नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही अनोखी पद्धत आहे.

बालीत धम्माल करण्यासाठीही भरपूर ठिकाणं आहेत. पोटॅटो हेड आणि रॉक बार अशा काही ख्यातनाम बीच क्लबमध्ये अगदी सूर्योदयापर्यंत पार्टी करता येते. त्यामुळेच हे क्लब्ज, नवविवाहित जोडपी आणि मौजमस्तीसाठी आलेल्या पर्यटकांच्या ग्रुप्सच्या एकदम पसंतीचे आहेत. ‌‘इन्सेंटिव्ह टूर्स‌’साठी बालीपेक्षा उत्तम ठिकाण नाही. या टूर्समध्ये प्रायव्हेट बीच पार्टीज, फेमस स्थळांची भटकंती, चर्चा-मीटिंग्जसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उत्तम आदरातिथ्य असलेली आलिशान हॉटेल्स असं सारं काही असतं. थोडक्यात, एखाद्या कंपनीच्या डीलर्ससाठी किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ‌‘माईस टूर्स‌’साठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे. इथे सूर्यास्त पाहण्यासाठी प्रायव्हेट बोट रेंटवर घेऊन सफरीवर जाता येतं. अर्थातच ही सुविधा केवळ इन्सेंटिव्ह टूर्ससाठीच नसून फॅमिली टूरवर आलेल्यांसाठीही आहे. आम्हीही तेच केलं! गिली आयलंड्सवर जाण्याचं माझं अनेक दिवसांपासूनचं स्वप्न होतं. तिथे रात्रभर मुक्काम करावा अशीही माझी इच्छा होती. पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता. म्हणून मग आम्ही यॉट रेंटवर घेतली आणि दिवसभराच्या सहलीवर गेलो. त्या सहलीत आम्ही तिथल्या शांत सौंदर्याचा मनापासून आनंद घेतला. शिवाय परतीच्या वाटेवर कॅप्टनला समुद्रकिनाऱ्याआधीच यॉट उभी करण्याची विनंती केली आणि आम्ही तिथून खोल निळ्या समुद्रात उडी मारली. कसला भन्नाट अनुभव होता तो... सभोवताली मोकळे आकाश आणि निळेशार पाणी... आम्ही मनसोक्त पोहलो. मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आठवणींपैकी तो एक दिवस होता. या समुद्राप्रमाणेच प्रत्यक्ष बालीमध्येही अनेक अविस्मरणीय क्षण आमच्या हाती लागले. इन्फ्लुएन्सर्स आणि इंस्टाग्रामर्स यांच्यामुळे ‌‘बाली स्विंग‌’ हे इथले एक खास आकर्षण बनले आहे. ती सोय आता अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. या स्विंगसाठी घालण्यायोग्य ड्रेससुद्धा इथे देतात! इथल्या मंदिरांचे सौंदर्यही नयनमनोहारी आहे. या बेटावर सुमारे 20 हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त मंदिरे आहेत. बहुतांश मंदिरे ज्वालामुखीने बनलेल्या पाषाणात कोरण्यात आलेली आहेत. समुद्रकिनारी कड्यावर असलेले उलुवाटु मंदिर... झऱ्याच्या पाण्यात शुद्धीकरण विधी सुरू असलेले तिर्ता (तीर्थ) एम्पुल... ‌‘तानाह लोट‌’ म्हणजे ‌‘समुद्रातील जमिनीवरील‌’ मंदिर... हे तर जणू काही सागराच्या लाटांवर तरंगत असल्यासारखे वाटते... अशी कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं इथे आहेत. विशेषत: सूर्यास्ताच्या वेळी तर या तानाह लोटचा नजारा लोभस दिसतो. शिवाय ‌‘लेम्पुयांग टेम्पल‌’ आणि तेथील ‌‘गेट्स ऑफ हेवन‌’ अद्भुत आहे. मंदिराच्या पार्श्वभूमीला उंचच उंच ‌‘माऊंट अगुंग‌’ आहे. त्या मंदिराची ठेवण, जडणघडण हे सारे आताच्या भाषेत एकदम इन्स्टाजेनिक आहे. हे पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील प्रतीकात्मक प्रवेशद्वार वाटते.

बालीमध्ये प्रत्येक वयोगटातील पर्यटकांसाठी पाहण्यासारखं आणि करण्यासारखं बरंच काही आहे. म्हणून आम्ही ‌‘वीणा वर्ल्ड‌’मध्ये प्रत्येकासाठी खास सुट्टीचे नियोजन केलेले आहे. यात फॅमिली टूर, रोमँटिक हनिमून, वुमन्स स्पेशल आणि सिनियर्स स्पेशल असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हीवीणा वर्ल्डच्या अनुभवी मंडळींनी काळजीपूर्वक आखलेल्या ग्रुप टूर्समधून तुमच्या आवडीनुसार सहल निवडा किंवा वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ डिव्हिजनला तुमच्या हनिमून टूरच्या प्लॅनिंगची संधी द्या. ते तुमची राजमहालात राहण्याची, खाजगी यॉट भाड्याने घेण्याची, उबुदमध्ये बांबूच्या घरात किंवा बालीमध्ये प्रायव्हेट पूल व्हिलामध्ये राहण्याची, अशी कोणतीही इच्छा सहज पूर्ण करू शकतील. असं हे स्वप्नवत वाटणारं बाली तुम्हाला साद घालतंय... मग वाट कसली बघताय?

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
9 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
9 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
9 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!