Published in the Saturday Lokasatta on 28 June 2025
एखादी गोष्ट घडते, संदर्भ बदलतात, त्याचे शॉर्ट टर्म लाँग टर्म पडसाद उमटतात आणि आपल्यालाही बदललेल्या संदर्भाचा विचार करून पावलं टाकावी लागतात...
सुट्टया संपल्या, शाळा सुरू झाल्या, पावसाळा तर वेळेआधीच दाखल झालेला, त्यामुळे त्यालाही सरावलेलं प्रत्येक घर... गणपती दसरा दिवाळी ख्रिसमस सीझनच्या पर्यटनासाठीच्या जाहिरातींचा परफेक्ट स्टार्ट मिळण्याची ही वेळ. आणि गेल्या आठवडयात सर्व कॅम्पेन्स तयार झाली. पहिली जाहिरात शुक्रवारी तेरा जूनला गुजरातमध्ये होती. मोठं कॅम्पेन होतं, त्यामुळे शेवटची एक नजर टाकण्याची माझी सवय. मार्केटिंग टीम प्रिंटआऊट दाखवताना म्हणाली, ‘तुम्हाला कळलं का?’आत्ताच एका मीटिंगमधून बाहेर येऊन उत्साहाने कामाला सुरुवात केलेल्या मी चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन त्यांच्याकडे पाहिलं. अहमदाबादला... घटनेची भयावह व्याप्ती विचारात घेऊन कॅम्पेन पुढे ढकललं गेलं. कॅम्पेनसाठी हा फ्रायडे ‘द थर्टीन्थ’ ठरला होता. ही भीषण घटना कमी होती की काय, इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि एअरस्पेस बंद झाली. आकाशात झेपावलेली अनेक विमानं पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन होऊन मुंबई दिल्ली विमानतळावर परत आली. युरोप अमेरिकेला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या गर्दीत असहाय्यता, अनिश्चितता, गोंधळ, राग, आरडाओरड आणि अनेक प्रश्नचिन्हांनी एंट्री घेतली. आमच्या युरोप अमेरिकेकडे जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या टूर्स जिथे तिथे अडकल्या. एअर रिझर्वेशन्स टीम प्रचंड बिझी झाली. हॅट्स ऑफ टू देम! चाळीस चाळीसच्या ग्रुप्ससाठी एका दिवसात पर्यायी व्यवस्था करणं सोप्पं नव्हतं, कारण एअरलाईन्स पण गोंधळलेल्या होत्या अचानक एअरस्पेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे. दोन दिवसांत सगळं सुरळीत झालं आणि आम्ही हुश्शss केलं. अहमदाबाद हादस्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मागच्या शुक्रवारी प्रॉडक्ट ट्रेनिंग मीट होती. काय करायचंय त्यामध्ये ह्याचा आमचा प्लॅन रेडी होता. पण काल आणि आज ह्यामध्ये बरंच काही घडलं होतं. आपण प्रत्येकजण सुन्न झालो होतो. कुठेही असं काही घडलं की त्याचा कोणताही फोटो व्हिडिओ न बघण्याची माझी सवय. एखाद्या ऑथेंटिक वृत्तपत्राची साईट उघडून त्यात त्या बातमीचा मुख्य पॅराग्राफ वाचायचा आणि त्यापासून दूर जायचं हे साहजिकच घडतं. पण सर्वांचं तसं नसतं, सोशल मिडिया आणि कोणत्याही बातमीचं नाटकीकरण करणाऱ्या टीव्ही चॅनल्सचा मोह इतका जबरदस्त आहे की पुन्हा पुन्हा त्याच त्याच बातम्या बघून उसासे टाकण्यात आणि त्याची निरर्थक चर्चा करण्यात वेळ घालवणारी मोठी संख्या सर्वत्र असल्याने तर सोशल मिडीयाचं जाळं निर्माण करणाऱ्या कंपन्या जगावर राज्य करताहेत, मानव जातीची मती गुंग करताहेत.
एक जण म्हणाला, ‘सोशल मिडियावरच्या उलटसुलट बातम्या बघून ऐकून डोकं सुन्न झालंय. काहीच सुचत नाहीये.’ ‘अरे मग नको नं बघूस. तुझ्या डोक्याचा भुगा करण्याचाच तर मास्टरप्लॅन आहे त्याचा, म्हणजे एकदा का तुझी विचारशक्तीच नष्ट झाली की तू चिकटलास चोवीस तास त्यांच्या कंपनीचं भलं करायला सोशल मिडियावर.’ असो, तो वेगळा विषय आहे. तर शुक्रवारी आम्ही चाळीस जणांची टीम लर्निंग सेंटरमध्ये जमा झालो. मीटिंगची सुरुवात गायत्री मंत्राने होते नेहमी. त्या दिवशी आम्ही ती आदल्या दिवशीच्या अपघातात बळी गेलेल्या निष्पाप प्रवाशांसाठी श्रद्धांजली वाहून केली. मीटिंगला सुरुवात करताना वाटलं आज टीमच्या डोक्यात कालचा अपघातच असणार, कितीही काही सांगायचा प्रयत्न केला तरी ते वरवरचं ठरणार. काल केलेला विचार आणि आज बदललेला संदर्भ हया दोन्ही गोष्टी विचारात घेणं गरजेच होतं. ‘कॉन्टेक्स्ट चेंज्ड, लेट्स चेंज द टॉपिक’ ने सुरुवात केली. ‘कालचा अपघात भीषण होता, खरंच असं का घडलं ?’ हा प्रश्न आपण सारखा स्वतःला विचारतोय, कल्पनेपलीकडची आणि शत्रूच्या बाबतीतही घडू नये अशी ही गोष्ट. ब्रम्हदेवाला सुद्धा रिव्हर्स करता येणार नाही असं अघटित घडून गेलंय. आता त्यापासून धडा घेणं हेच आपलं काम. या अपघातानंतर जग बदलेल, विचार बदलतील, मागण्या वाढतील, वेगळे निर्णय घेतले जातील. हाच विचार घेऊया आणि आजचं सेशन सुरू करूया. पहिल्यांदा ‘लेट्स बी ॲन एअरलाईन’. म्हणजे हा हादसा ज्यांच्या बाबतीत घडला त्या एअरलाइनचे तुम्ही मुख्य संचालक बना, पायलट बना, एअरहोस्टेस बना, सेल्सपर्सन बना किंवा एअरपोर्ट ग्राऊंड हँडलिंग टीम. आणि आता सांगा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतील आणि तुम्ही कसं त्याला सामोरं जाल? हळूहळू एकेक करीत सर्वजण आपापले विचार मांडू लागले. इतके इंटेलिजंट फीडबॅक्स आले आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या आयडियाज् पुढे आल्या की चकित व्हायला झालं. प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या सिनियर मॅनेजर भावनाला म्हटलं हे लिहून घे सगळं, एअरलाईन म्हणून जेवढं काही करता येईल तेवढं सांगून संपल्यावर त्यांना म्हटलं, ‘आता तुम्ही एक ट्रॅव्हलर बना आणि सांगा आता यापुढे पर्यटक कसे वागतील? काय बघतील, काय काय डिमांड करतील?’ पुन्हा एकदा टीमने ट्रॅव्हलर बनून एवढ्या गोष्टी सांगितल्या की आम्ही चक्रावून गेलो.
काही काही गोष्टी तर एकदम ‘आऊट ऑफ द बॉक्स’ म्हणता येतील अशा होत्या. ‘ट्रॅव्हलर’ च्या सगळ्या डिमांड्स आणि फ्युचर रिक्वायरमेंट्स संपल्यावर म्हटलं, ‘चला, आता आपण इंडियन गव्हर्नमेंट बनूया. येत्या पंधरा मिनिटांसाठी प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, एव्हिएशन मिनिस्टर, डीजिसिए ऑफिशियल्स काय बनायचं ते बनूया आणि गव्हर्नमेंट म्हणून आपण काय करायला पाहिजे या सगळ्या माहोलमध्ये ते ठरवूया.’ पुन्हा एकदा टीमने त्यांच्या हुशारीचं दर्शन घडवलं. ‘चला, आता गव्हर्नमेंटनंतर आपण बनूया ह्या एअरलाईनची पेरेंट कंपनी जी आपल्या भारतातली सर्वात विश्वसनीय कंपनी मानली जाते. त्या कंपनीमध्ये आज काय चालू असेल? काही वर्षांपूर्वी त्यांनी ही एअरलाईन आपल्या भारत सरकारकडून विकत घेतली होती. एकंदरीत घटनेचं गांभीर्य बघता आज त्यांच्या मनात काय विचार असतील? त्यांच्यासाठी हा मोठा वेकअप कॉल असेल का? त्यांना रीग्रेट वाटत असेल?’ या पेरेंट कंपनीविषयी चर्चा करताना, विचार मांडताना सर्वांनाच एक वेदना जाणवत होती. असं व्हायला नको होतं त्यांच्या बाबतीत हीच प्रत्येकाची भावना होती. या थोड्या निराशाजनक परिस्थितीवर इनपुट्स दिल्यानंतर शेवटचा रोल प्ले होता तो बोईंग कंपनीचा. ‘लेट्स बी बोईंग कंपनी मॅनेजमेंट’. ही आमची शेवटची असाइनमेंटही व्यवस्थित पार पडली. झालेल्या घटनेचा आणि त्यामुळे वर्तमानात आणि भविष्यात होणाऱ्या परिणामांचा परामर्श आम्ही घेतला होता सर्वांगाने. त्या दोन तासात एखाद्या घटनेचा 360 डिग्रीज् विचार कसा करायचा याचा एक मास्टर क्लासच झाला आम्हा चाळीस जणांच्या टीमचा. एखादी गोष्ट घडते, संदर्भ बदलतात, त्याचे शॉर्ट टर्म लाँग टर्म पडसाद उमटतात आणि आपल्यालाही बदललेल्या संदर्भाचा विचार करून पावलं टाकावी लागतात. कधी छोटे बदल करावे लागतात तर कधी अक्षरशः आमूलाग्र बदल करणं गरजेचं ठरतं. त्यामुळेच आमच्याकडे आम्ही एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारतो, ‘कॉन्टेक्स्ट बदललाय, 360 डिग्रीज्ने विचार केला का? आणि त्याप्रमाणे बदल केले का?’ व्यवसाय सांभाळताना हे अवधान ठेवणं सध्याच्या टोटली अनप्रेडिक्टेबल जगात अपरिहार्य बनून गेलंय. आपल्या वैयक्तिक जीवनातही आपण अनेकदा हा अनुभव घेतो. तिथे तर सर्वात मोठं आव्हान आपल्या व्यक्तिमत्त्वालाच दिलं जातं. एआय, चॅट जीपीटी, डीपटेक ह्या सर्वांनी आपल्या ट्रेडिशनल थिंकिंगलाच शह दिलाय. ‘मला वापरा अन्यथा नामशेष व्हा’ हा इशाराच जणू त्यांनी दिलाय. आणि का नाही, जगाच्या वेगाबरोबर चालायचं असेल तर आपला वेग वाढवला पाहिजे, आणि आपल्या वेगाला, बुद्धीला आणि विचारांनाही मर्यादा आहेत.
अशावेळी जगातले आजी माजी विचारवंत, शास्त्रज्ञ, अगदी प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ त्यांची एक्सपर्टीज् घेऊन तुमच्यासोबत ‘घेशील किती रे दोन करांनी’ म्हणत उभे असतील तर त्यांचं सहकार्य न घेणं म्हणजे मूर्खपणा किंवा आडमुठेपणा. अर्थात मुख्य विचार आपला असावा, तो कसा पुढे न्यावा तो आपल्या स्ट्रॅटेजीचा भाग असावा. पण तो विचार, ती स्ट्रॅटेजी तावून सुलाखून पहायला किंवा त्याचा 360 डिग्रीज्ने परामर्श घ्यायला आपल्या पायाशी नव्हे हाताशी लोळण घेतलेल्या, आश्चर्यचकित करणाऱ्या नव तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपल्याला जगाचा वेग थोडाफार साधता येईल. किमान आपण त्या शर्यतीतून बाहेर तरी पडणार नाही किंवा बाद होणार नाही.गेल्या आठवड्यातल्या घडामोडींनंतर त्याचे पडसाद आमच्या काही टूर्सवर झाले. खासकरून युरोपला जाणाऱ्या आणि येणाऱ्या टूर्सची विमानं रद्द होणं, त्यांची पर्यायी व्यवस्था करणं, टूर्सचं ओरिजिनल शेड्यूल बदलणं, नव्या बदललेल्या कार्यक्रमाचं नव्याने शेड्यूल करणं आणि हे सर्व होत असताना प्रत्येक गोष्टीचा 360 डिग्रीज्ने विचार करणं हे चालूच होतं, कारण एक गोष्ट बदलली की त्याच्यामुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागत होत्या. ‘हे पाह्यलं, पण हे पाहिलं का? ह्यामुळे ह्या अमुक एका गोष्टीवर परिणाम तर होणार नाही नं?’ एक ना अनेक गोष्टी. त्यात अनिश्चिततेमुळे पर्यटकांचाही संयम सुटत होता, जे साहजिक होतं. पण काही वेळा निर्विकारपणे त्यांची लाखोलीही ऐकून घ्यावी लागत होती आपला दोष नसलेल्या परिस्थितीसाठी. अर्थात या सगळ्यात परिस्थितीला सामोरं जाण्याची आमची ताकद वाढत होती हे निश्चित. अनेकदा ट्रेनिंग सेशनमध्ये आपण ‘इफ नॉट व्हॉट’ अशा काल्पनिक गोष्टींवर रोल प्ले करीत असतो. बहुतेक देव म्हणत असावा, ‘रोल प्ले कशाला करताय मी तुम्हाला अक्युअलमध्येच त्या सिच्युएशन्स देतो नं, काल्पनिक जगात राहण्याची गरज नाही.’ आम्हीही त्याच्या आज्ञेबरहुकूम आव्हानाला सामोरं जातो, शांतपणे प्रथम त्याचा स्वीकार करतो, नाऊ व्हॉट्स नेक्स्ट? त्याची स्ट्रॅटेजी बनवतो, 360 डिग्रीज् मधून त्याचा अभ्यास करतो आणि येतो बाहेर त्यातून. एक मात्र आहे की देवाची जी काही स्ट्रॅटेजी असेल ही संकटं अशी वारंवार आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणण्याची, ती असो, पण त्याचा शांतपणे स्वीकार केला, त्यावर तोडगा काढण्याची धडपड केली तर तो त्या संकटातून आपल्याला सहीसलामत किंबहुना आधीपेक्षा जास्त स्ट्राँग बनवून बाहेरही काढतो. कोविडपासून गेली पाच वर्षं ह्याचा अनुभव आम्ही घेतलाय.
एक शिकलोय, त्याला काय करायचं आहे ते तो करेल, त्या बाबतीत आपला कंट्रोल नाही, पण त्यावर आपल्याला जे करायचं आहे ते व्यवस्थित कसं करता येईल हाच विचार असावा आणि त्यानुसार वागावं. दिवस संपतो नं, तसा मार्ग मिळालेला असते, काहीतरी तोडगा निघतोच. संताप मनस्ताप आकांडतांडव करण्याची गरज नसते.गेल्या आठवड्यातल्या घडामोडीनंतर आमच्या प्रॉडक्ट मीटमध्ये आम्ही जो एक्सरसाईज केला त्यात ‘वी लिटरली पुट अवरसेल्ज इन टू देअर शू.’ जे आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यासाठी महत्वाचं आहे. 360 डिग्रीज्चा विचार म्हणजे काही एक पूर्ण सर्कल नव्हे वा ती केवळ एक संकल्पना नव्हे, तो आहे प्रत्येक घडामोडीकडे, प्रत्येक निर्णयाकडे, प्रत्येक नात्याकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टीकोन. जग वेगाने बदलतंय, प्रत्येक ॲक्शनला अनेक रीॲक्शन्स मिळतात आपल्याला. अशावेळी एकाच दृष्टीकोनावर ठाम राहिलो तर निर्णय चुकण्याची शक्यता असते. म्हणूनच थोडा वेळ थांबूया, विचार करूया 360 डिग्रीज्नी, सगळ्या बाजू पाहूया आणि मगच पावलं उचलूया. निर्णय छोटा असो वा मोठा, आपल्याला 360 डिग्रीज्चं भान असेल तर यश, समाधान आणि शांतता ह्या त्रिसूत्रीची निश्चिती.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.