मीटिंग रूम – फ्रॉम स्काय टू सी

0 comments
Reading Time: 9 minutes

नवीन युगात जशा बिझनेस करायच्या नवनवीन कल्पना सुचतात तशाच बिझनेस मीटिंग्जसाठी पण नवीन कल्पना पुढे येतायत. हवेतील केबल कार किंवा समुद्राखालचे हॉटेलच नाही तर अगदी तुमच्या कंपनीसाठी संपूर्ण गावही रेन्टवर घेता येते, त्या गावाला तुमच्या कंपनीचे नाव दिले जाते आणि त्यानंतर तुमच्या कंपनीच्या इव्हेन्टपुरते आल्प्सच्या डोंगरांमधील ते सुंदर गाव तुमच्या कंपनीच्या मालकीचे होऊन जाते.

मुंबईच्या माझगाव डॉककडे गाडी वळली आणि हल्लीच उद्घाटन झालेल्या डोमेस्टिक क्रुझ टर्मिनलवर मी पोहोचले. अमेरिकेच्या भारतातील टूरिझम बोर्डच्या म्हणजेच ‘ब्रॅन्ड युएसए’च्या आमंत्रणाखातर मी इकडे एका नेटवर्किंग इव्हेन्टसाठी आले होतेे. युएसएच्या ‘सनशाईन स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॅलिफॉर्निया टूरिझम आणि शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या साइमन शॉपिंग मॉल्सने भारतातल्या ट्रॅव्हल एजंट्सबरोबरच्या बिझनेस मीटिंग्जसाठी मुंबईतल्या प्रायव्हेट क्रुझची निवड केली होती.  बिझनेस मीटिंगसाठी या आगळ्या-वेगळ्या व्हेन्युची निवड केलेली बघून मला त्याचे कुतूहल वाटले. तिथे क्रुझवर खालच्या डेकवर कॉन्फरन्स फॅसिलिटीस् व वरच्या डेकवर ओपन बार होता. संधीप्रकाश होताच स्टाटर्स आणि वेलकम ड्रिंक्सने सर्वांचे स्वागत करीत त्या क्रुझचे मुंबईच्या पाण्यात सेलिंग(नौकायन) सुरू झाले. लुकलुकत्या तार्‍यासारखी दिसणारी मुंबईची स्कायलाईन पाण्यातून फार मोहक दिसत होती. थोड्या वेळानंतर समुद्रात पुढेपुढे नौकायन सुरू असतानाच खालच्या डेकवर टूरिझम प्रेझेंटेशन्स सुरू झाली.

आजकाल एंटरटेन्मेंटशिवाय कुठलाच बिझनेस इव्हेन्ट अपूर्ण वाटतो आणि इथेसुद्धा आमच्यासाठी एक सरप्राईस होते. आमची क्रुझ थोडी पुढे जाताच पाण्यात सेलिंग करत पुढे गेलेली दुसरी क्रुझ दिसली,जिच्या वरच्या डेकवर चक्क फॅशन शोचा रन वे तयार केला होता.  डिस्को लाइट्स चमचमत होते आणि डी.जेने पाय थिरकायला लावणारी गाणी लावली होती. बघता-बघता त्या रन वे वर फॅशन शो सुरू झाला व आमच्या बोटीवरून आम्ही त्या समोरील बोटीवर सुरू असलेल्या फॅशन शोचा एक्सक्लुसिव्ह अनुभव घेतला. एखाद्या हॉटेलच्या बोर्डरूम किंवा बॉलरूमच्या चार भिंतीत कोंडून न राहता हा असा ओपन एअर, एंटरटेन्मेंटने नटलेला इव्हेन्ट फार प्रसन्न वाटला. दुसर्‍या दिवशी टीम बिल्डिंग करण्यासाठी याच मंडळींनी गेट वे ऑफ इंडियावरून सेलिंगचे आयोजन केले होते. प्रत्येक याटवर एक टीम काम करत होती. एकत्र निघालेल्या त्या याट्समध्ये व याट्सवर बनलेल्या टीम्समध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग प्रकर्षाने जाणवत होते.

‘मीटिंग’ या शब्दाचा अर्थच वेबस्टर्सच्या डिक्शनरीप्रमाणे, अ‍ॅन असेम्बली ऑफ पीपल फॉर अ कॉमन पर्पस् असा होतो. कॉर्पोरेट जगात अर्थातच फॉर्मल डिस्कशन किंवा एखादे ध्येय साधण्यासाठी मीटिंग्ज आयोजित केल्या जातात. पण आजकाल या मीटिंग्जसुद्धा जास्त इंटरेस्टिंग व इनोव्हेेटीव्ह कशा करता येतील याकडे कंपन्यांचा कल असतो.  ब्रँन्ड युएसएचा  मीटिंग्जचा हा अनोखा अंदाज मला खूप आवडला. क्रुझवर मीटिंग्ज करण्याचे बरेच फायदे आहेत. एक अनोखा व्हेन्यु आणि प्रसन्न वातावरण तर इथे मिळतेच पण त्याशिवाय क्रुझ एकदा निघाली की इतर कोणताही व्यत्यय मध्ये येत नाही आणि क्रुझवरच्या प्रत्येकाचे पूर्ण लक्ष मीटिंगमध्येच लागते. शिवाय हॉटेलसारखे क्रुझवरून दुसरीकडे कुठे निघून जाता येत नाही त्यामुळे आपल्या सहकर्मचार्‍यांची पूर्ण वेळ मीटिंगला उपस्थिती राहील ह्याची १०० टक्के गॅरन्टी!

कॉर्पोरेट जगात नियमितपणे अनेक मीटिंग्ज घडतच असतात, अगदी दररोजसुद्धा. पण काही मीटिंग्ज खास उद्देशानं ठरविल्या जातात व काही वार्षिक ध्येय ठरविण्यासाठीही आयोजित केल्या जातात, तर कधी-कधी टीम बिल्डिंगची गरज असते म्हणूनही. बर्‍याच छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी  आपल्या कंपनीच्या डीलर्स, कर्मचारी इ. लोकांना भेटणे ही अत्यंत महत्त्वाची निकड आहे. अशावेळी बर्‍याचदा आपल्या डीलर्सनी किंवा कर्मचार्‍यांनी त्यांना दिलेल्या ध्येयाची पूर्तता केल्यानंतर, त्यांना  प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन एक महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणूनच आज बिझनेस टूरिझम हा एक पर्यटनाचा महत्त्वाचा भाग ठरतोय.

स्वित्झर्लंड टूरिझम आपली वार्षिक ट्रॅव्हल मीट जेव्हा भारतात ठरवितात तेव्हा ती नाविन्यपूर्णच असणार हे वेगळं सांगायलाच नको. म्हणूनच आपल्या ट्रेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडने  भारतात टूरिझमसंदर्भातल्या मीटिंगसाठी मीटिंग रूम म्हणून ट्रेनची निवड केली तर त्यात नवल ते काय! यावर्षी स्वित्झर्लंड टूरिझमच्या बिझनेस नेटवर्किंग मीटिंग्जसोबतच, प्रोजेक्टर लावून करायचे प्रेझेंटेशनसुद्धा चक्क ट्रेनमध्ये पार पडलं,ही यामागची मोठी बातमी. महाराष्ट्र टूरिझमच्या डेक्कन ओडीसी या लक्झरी ट्रेनमध्ये एका रात्रीच्या वास्तव्याबरोबर मीटिंग्जचा रॉयल टचही तेव्हा अनुभवण्यास मिळाला. मागच्या वर्षी तर हा रॉयल टच परिपूर्ण अनुभवला,जेव्हा मीटिंग्जचा व्हेन्यु होता हैदराबादचा फलकनुमा पॅलेस. इथे राहण्यासाठी  लक्झरी रूम्स तर होत्याच पण मीटिंग्जसाठीसुद्धा रॉयल रूम्स उपलब्ध होत्या आणि जेवणसुद्धा पूर्णपणे रॉयल स्टाईलमध्येच होतं बरं का!

भारतात मीटिंग्जसाठी इतके सुंदर पर्याय शोधण्याचे श्रेय स्वित्झर्लंड टूरिझमला जातेच पण त्यात फारसे काही नवल नाही. स्वित्झर्लंडमध्ये मीटिंग्ज कुठेही घडू शकतात, अगदी बर्फाच्छादित डोंगरांवर जाताना केबल कारमध्येसुद्धा. दहा हजार फुटांवर जेम्स बॉन्डच्या सिनेमाचे शूटिंग झाले तिथे आपण जेम्स बॉन्ड स्टाईलमध्ये थीम बेस्ड मीटिंग्ज व पार्टीजचा आनंद घेऊ शकतो. एवढेच काय,अगदी जगावेगळे काही करायचे असेल तर तुमच्या कंपनीसाठी संपूर्ण गावच्या गाव रेन्टवर घेता येते. ऑस्ट्रिया,जर्मनी व स्वित्झर्लंडच्या काही गावांमध्ये हे शक्य आहे. निसर्गसौंदर्याने भरभरुन नटलेल्या या गावांमध्ये लाकडी ट्रेडिशनल घरे व फुलांनी बहरलेले संपूर्ण गावच तुमच्या स्वाधीन केले जाते. त्या गावाला तुमच्या कंपनीचे नाव दिले जाते आणि गावाचा मेयर एका समारंभात बॅन्ड-बाजाच्या इतमामात गावाची चावी तुमच्या हाती देतो. त्यानंतर तुमच्या कंपनीच्या इव्हेन्टपुरते आल्प्सच्या डोंगरांमधील ते सुंदर सुबक गाव तुमच्या कंपनीच्या मालकीचे ठरते. स्वित्झर्लंडच्या अनेक माऊंटन टॉप्सवर बर्फाचे टनेल्स् आणि बर्फाने कोरलेले आर्ट पीसेस बघायला मिळतात. अगदी तसेच आपल्या कंपनीच्या लोगोचे आर्टपीस बर्फामध्ये कोरून घेता येते. बर्फातल्या मीटिंग्ज व कॉन्फरन्सेससाठी हा बर्फाचा लोगो म्हणजे केकवरच्या चेरीसारखाच! आपल्या कर्मचार्‍यांना अगदी वेगळाच अनुभव द्यायचा असेल किंवा आपल्या गेस्टसाठी अगदी हटके असा इव्हेन्ट आयोजित करायचा असेल तर, स्कॅन्डिनेव्हियाच्या उत्तरेकडच्या टोकाला आर्क्टिक सर्कल ओलांडून स्वीडनमधील आईस हॉटेलचा पर्याय बेस्ट. या आईस हॉटेलमधील मेन हॉल आणि आईस बारमधील बर्फाच्याच खुर्च्यांवर बसून बर्फाच्याच ग्लासेसमधून वेलकम ड्रिंक्स घेण्याचा आनंदही काही औरच. तर इथल्या हॉटेलमधील बर्फाच्याच बेड्सवर झोपण्याचा अनोखा अनुभवही कमाल. याचबरोबर इथे आईस स्कल्पटिंग कॉम्पीटिशनमध्ये बर्फाचे वेगवेगळे कोरीव काम करीत मूर्त्या बनवणं, हस्की डॉग्जच्या स्लेज राईड्सचा आनंद घेत टीम बिल्डिंगचा अगदी वेगळ्या प्रकारे अनुभव घेता येतो.

असे म्हणतात की, या जगात सर्वात मोलाची कुठली वस्तू असेल तर ती म्हणजे मनुष्याचा मेंदू आणि कल्पनाशक्ती. याच कल्पनाशक्तीची ताकद लक्षात घेत आपल्या मीटिंग्जमधून याच कल्पनाशक्ती पलिकडच्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर सॅन डिएगोच्या कोर्टयार्ड बाय मॅरियटमध्ये मीटिंग करायला हवी. अमेरिकेतल्या सॅन डिएगो शहरात पूर्वीच्या ‘सॅन डिएगो सेव्हिंग अ‍ॅन्ड ट्रस्ट बँक’ेच्या ओरिजिनल सेफ डीपॉझिट वॉल्टचे रूपांतर मीटिंग रूममध्ये झाले असून, आपण या वॉल्टमध्ये मीटिंग्ज करू शकता.  जगभरात आणखीही बरीच अशी ठिकाणं आहेत जी आपल्याला अनोख्या मीटिंग्ज रूमचा अनुभव घेण्याचं दालन खुलं करतात. मोठमोठे क्रिकेटर्स ज्या ग्राउंडवर सेंच्युरी मारण्याची स्वप्न पाहतात किंवा निदान ह्या ग्राउंड्सवर खेळायला मिळावं अशी इच्छा मनी धरून असतात, अशा लॉर्डस् आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची मीटिंग रूम जर तुमच्या मीटिंगसाठी व्हेन्यु म्हणून मिळाली तर काय मजा येईल नाही.  एखाद्या गुहेमध्ये आपली मीटिंग होऊ शकते,यावर तुमचा विश्‍वास नसेल तर तो आता करायला लागा,कारण  केव्हज सिटी म्हणून प्रसिद्द असलेल्या टर्कीतील कॅपाडोशियामध्ये खर्‍याखुर्‍या गुहेतच  मीटिंग रूमची लक्झुरी आणि तिथल्या स्टेची रीफ्रेशमेंट अनुभवताना आपल्या मीटिंग्ज,कॉन्फरन्स किंवा इव्हेन्टसाठी वेगळा हटके ऑप्शन असूच शकत नाही यावर तुम्ही शिक्कामोर्तब कराल. क्रोएशियाच्या पोस्तोयना केव्हज पार्कमधील हॉटेल जामाच्या कॉन्फरन्स सेंटरमध्ये घडलेली तुमची मीटिंग हा देखील केव्हजचा आनंद देणारा एक संस्मरणीय अनुभव ठरू शकेल यात दुमत नाही.

नवीन युगात जशा बिझनेस करायच्या नवनवीन कल्पना सुचतात तशाच बिझनेस मीटिंग्जसाठी पण नवीन कल्पना पुढे येतायत. कझाकिस्तान हे आज कॉर्पोरेट टूर्ससाठी बरंच प्रसिद्ध होतंय.  नव्या जगाचे प्रतिक ठरणार्‍या या देशामध्ये बरेच नवे बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळते.  कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये आहे एक अनोखे मॉडर्न पिरॅमिड- ‘पॅलेस ऑफ पीस अ‍ॅन्ड रीकन्सिलिएशन’. या पिरॅमिडच्या पायथ्याशी एक १५०० मीटर भव्य-दिव्य ऑपेरा हाऊस आहे तर पिरॅमिडच्या टोकाशी दोन मजल्याचे काँग्रेस चेंबर बनविले आहे. या काँग्रेस चेंबरच्या सभोवती १०००० स्क्वेअर फूटाची स्टेन्ड ग्लास बघायला मिळते. मीटिंग रूम जर एवढी इन्स्पिरेशनल असेल तर मीटिंगमध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाण-घेवाण होणार हे नक्कीच.

मालदीवमध्ये जगातले पहिले अंडरवॉटर व्हिला व त्याचबरोबर अंडरवॉटर मीटिंग रूम्सदेखील बनणार आहेत. मग तर समुद्राच्या तळाला समुद्राखालच्या रंगीबेरंगी दुनियेत मीटिंग्ज अजूनच रंगतदार होतील. पण तिथपर्यंत वाट कशाला बघायची? केरळमध्ये काही कंपन्यांच्या मालकांनी कोवलम बीचवरून स्कुबा डायव्हिंग करीत समुद्राच्या तळावर वीस मिनिटांची मीटिंग करत समुद्राचे रक्षण करण्याची जबाबदारी स्विकारली. हवेतली केबल कार असो किंवा समुद्राखालचे हॉटेल,आज आपल्या कंपनीच्या भविष्याचे प्लॅनिंग व पुढची वाटचाल ठरविण्यासाठी कुठल्याही प्रकारची मीटिंग रूम या धरतीवर उपलब्ध आहे. मग अशी आगळी-वेगळी मीटिंग रूम तुम्हाला आपल्याच शहरात, आपल्याच देशात सापडली तर आश्‍चर्य नसावे.

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*