ब्रेकिंग ब्रेड

0 comments
Reading Time: 9 minutes

‘ब्रेड’ या खाण्याच्या साध्या प्रकारावरून बरेच वाक्यप्रचार प्रसिद्ध झाले आहेत. ब्रेडपेक्षाही स्लाईस्ड ब्रेडच्या शोधाला इतकं क्रांतिकारी समजलं जातं की, कुठलाही चांगला शोध लागल्यावर लगेच, ‘द बेस्ट थिंग सीन्स स्लाईस्ड ब्रेड’ म्हणण्याची पद्धतच आता रुळलीय. इतकंच काय तर, ‘गिव्ह अस अव्हर डेली ब्रेड’ अशी देवाकडे आपल्याला काही कमी पडू नये ह्यासाठी केलेली प्रार्थनादेखील आहे.

‘एवढ्या मोठ्या ब्रेडचे नक्की काय करायचे हे कळले नाही म्हणून तो लांबलचक दिसणारा ब्रेड दुकानातच ठेवून आले’, माझ्या आईचं हे बोलणं ऐकून मला गम्मत वाटली. जागतिकीकरणामुळे आजकाल आपल्याला जगातली कुठलीही वस्तू अगदी आरामात कुठेही मिळते. मग फ्रान्सच्या त्या लांबट ‘फ्रेन्च बॅगेट’ ह्या ब्रेडने जर मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या एका छोट्याशा बेकरीचा रस्ता धरला तर त्यात नवल ते कसल! फ्रेन्च बॅगेट, ब्रिओश, इटालियन फोकाचा, चिबाटा, मेक्सिकन टॉर्टिया, भारतीय नान, चपाती, फुलके… अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणार्‍या ब्रेडशिवाय जेवणाची थाळी अपूर्णच राहते. साधारण ईसवी सन पूर्व ८०००च्या दरम्यान इजिप्तमध्ये धान्य दळण्याचा शोध लागला व त्याबरोबर ब्रेडचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या ब्रेडचे साम्य आपल्या चपात्या किंवा मेक्सिकन टॉर्टियाशी जुळणारे होते. तेव्हापासून आतापर्यंत ब्रेडचे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला पहायला मिळतात.

ह्या सर्व गोष्टींनी आपल्यासमोर खाण्यासाठी चॉईस तर वाढविलाच आहे पण त्यामुळे मनातला गोंधळही तितकाच वाढला आहे. युरोप-अमेरिकेत तर आपल्या दिवसाची सुरुवातच ब्रेकफास्ट करताना ब्रेडने होते. काहीवेळा हा स्लाईस्ड ब्रेड टोस्ट करण्यासाठी ठेवलेला दिसतो, तर बर्‍याचदा टेबलवर प्रत्येकी एक असा कडक ब्रेडचा एक रोल ठेवलेला दिसतो. हा सहजासहजी चावता येणार नाही इतका कडक असलेला ब्रेड ह्या युरोपीयन मंडळींना का आवडतो? असा मला नेहमी प्रश्‍न पडायचा. त्यापेक्षा लुसलुशीत पांढराशुभ्र स्लाईस्ड ब्रेड बरा नाही का, असे वाटायचे. साधारण वीस वर्षांपूर्वी मी लंडनमध्ये शिकत असताना माझी एक जर्मन मैत्रिण ‘तान्या’ ब्रिटिश लोकांच्या स्लाईस्ड ब्रेडला नाव ठेवत, ‘हा एवढा सॉफ्ट ब्रेड कसा खातात ही लोकं?’ असा प्रश्‍न करीत असे. या ‘प्रॉसेस्ड ब्रेडला’ काही चवच नाही आणि बेकरीमधून आलेल्या ‘कडक ब्रेड’लाच खऱा ब्रेड म्हणतात अशी तिची समजूत होती. मल्टिग्रेन धान्यापासून बनविलेला कडक ब्रेड रोल कधीही स्लाईस्ड ब्रेडपेक्षा जास्त चविष्ट व जास्त पौष्टिक आहे, हे बर्‍याच वेळा ऐकल्यावर मला हळूहळू पटू लागलं, त्या ब्रेड रोल्सची नंतर मला सवय झाली आणि आता हा ‘कडक ब्रेड’ मला आवडू लागलाय.

युरोपमध्ये प्रवास करताना एका टूरवर दर दोन-तीन दिवसांनंतर आपण देश बदलतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ब्रेड्सची ओळख होते. बर्‍याच वर्षांपूर्वी पॅरिसच्या लॅटिन क्वार्टर भागात, एका कॅफेमध्ये मी काही फ्रेन्च बिझनेस पार्टनर्सबरोबर बसले होते. तेव्हा अनेक ठिकाणी जसे केले जाते तसेच जेवणाआधी ब्रेडचे बास्केट टेबलवर ठेवण्यात आले. मला भूक लागली होतीच आणि तो गरमागरम ब्रेडदेखील खुणावत होता, पण पंचाईत अशी होती की आमच्या वेटरने अजून प्लेट्स आणल्या नव्हत्या, ‘मग ब्रेड घेऊन कुठे ठेवावा? ब्रेड घेऊ की थांबू?’ अशी माझी द्विधा मनःस्थिती सुरू असताना त्या फ्रेच मंडळींनी चक्क ब्रेडचा एक घास घेऊन उरलेला ब्रेड डायरेक्ट टेबलवर ठेवला. युरोपमध्ये बर्‍याच ठिकाणी आणि खासकरून फ्रान्समध्ये अनेकदा ब्रेडसाठी प्लेट्स देण्याची पद्धतच नाहीये हे कळले व आपला ब्रेड चक्क टेबलवर ठेवणे योग्य आहे हे ही समजले. जेवणाआधी ब्रेड देण्याची प्रथा सुरू झाली, ती जुन्या टॅवर्नास्मध्ये. पुरातन काळात या ‘टॅवर्नास्’मध्ये एकच जेवण अगदी वाजवी दरात दिले जायचे. थोडक्यात आपल्याकडे थाळी असते असेच हे सेट मील असायचे. मग अशावेळी फिश, मीटसारखे मेन कोर्समधले महाग खाद्यपदार्थ लोकांनी कमी खावे, म्हणून लोकांचे पोट भरण्यासाठी आधीच ब्रेड दिला जायचा. रेस्टॉरंट मालकांचे पैसे वाचविण्यासाठी केले जाणारे हे सगळे उद्योग असायचे. आज मात्र हे जेवणाआधीचे ‘ब्रेड बास्केट’ आपल्याला त्या रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित करण्यासाठी दिले जाते, किंवा आपल्या मेन कोर्सची प्रस्तावना म्हणायला हरकत नाही. ब्रेड एकमेकांसोबत शेअर करून खायला सुरुवात झाल्यापासून ‘ब्रेकिंग ब्रेड’ या वाक्यप्रचाराचा वापर होऊ लागला. पूर्वीच्या काळी जेव्हा अखंड ब्रेड असायचा, तेव्हा तो ब्रेड तोडून आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर किंवा परिवाराबरोबर तुकडे करून वाटून खायला जायचा. तेव्हापासून एखादी गोष्ट शेअर करण्याला मग ते जेवण असो, पैसे असो किंवा इतर कुठलीही वस्तू असो, ह्याला ‘ब्रेकिंग ब्रेड’ असे म्हटले जाऊ लागले. एखाद्या बरोबर आपण ब्रेड शेअर करू शकलो म्हणजे त्या व्यक्तीवर आपण विश्‍वास ठेवतोय, त्याच्यावर भरोसा करून त्याला आपलंसं करतोय, असाच ब्रेकिंग ब्रेडचा अर्थ सर्वमान्य ठरलाय.

‘ब्रेड’ या खाण्याच्या साध्या प्रकारावरून तसे बरेच वाक्यप्रचार प्रसिद्ध झाले आहेत. ब्रेडचा शोध बराच जुना असला तरी स्लाईस्ड ब्रेडचा शोध शंभर वर्ष जुनासुद्धा नाहीये. अमेरिकेत मिसूरी भागातल्या ऑटो रोहवेडर नावाच्या एका ज्वेलर्सने या स्लाईस्ड ब्रेडचा शोध लावला. स्लाईस्ड ब्रेडच्या शोधाला इतकं क्रांतिकारी समजलं जातं की कुठलाही चांगला शोध लागल्यावर लगेच, ‘द बेस्ट थिंग सीन्स स्लाईस्ड ब्रेड’ म्हणण्याची पद्धत आहे. ब्रेडचा उल्लेखतर बाईबलमध्येसुद्धा होताना दिसतो. ‘गिव्ह अस अव्हर डेली ब्रेड’ अशी देवाकडे आपल्याला काही कमी पडू नये ह्यासाठी केलेली प्रार्थनादेखील आहे. तसेच आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन काय आहे ते सांगण्यासाठीही ‘ब्रेड अ‍ॅन्ड बटर’ चा वापर केला जातो. जी गोष्ट आपल्या अस्तित्वासाठी बेसिक नीड आहे, ज्या गोष्टीशिवाय आपण जगू शकत नाही ती म्हणजे ‘ब्रेड अ‍ॅन्ड बटर’. रशियामध्ये ‘ब्रेड अ‍ॅन्ड सॉल्ट’ हे समीकरण प्रसिद्ध आहे. रशियामध्ये सर्वात महत्त्वाचे खाद्यपदार्थ असलेलं ‘ब्रेड’ आणि मैत्रिचे प्रतिक मानलं जाणारं ‘मीठ’ ह्या दोन गोष्टींनी एखाद्या महत्त्वाच्या, आदरणीय किंवा प्रशंसनीय व्यक्तीचे स्वागत केले जाते. आपल्याकडे घरी पाहूणे म्हणून आलेल्या महिलेची तांदूळ-नारळाने ओटी भरण्याची पद्दत अजूनही आहे तशीच काहीशी पूर्वपारंपार चालत आलेली पद्धत रशिया आणि काही युरोपीयन देशांमध्ये आहे, ती म्हणजे तिथे आजसुद्धा ‘ब्रेड अ‍ॅन्ड सॉल्ट’ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाते.

काळाच्या ओघात ब्रेडसारख्या अगदी क्षुल्लक गरजेला समाजात अनेक वेगवेगळ्या स्तरांवर दर्जा प्राप्त होत गेलाय. रोमन साम्राज्य, फ्रान्स व इग्लंडमधल्या उच्च स्तराच्या नोबल्स्मध्ये गव्हाचा व मैद्याचा पांढरा ब्रेड प्रसिद्ध होऊ लागला, तर खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राय, बार्लीसारख्या स्वस्त धान्यांपासून तयार झालेला ब्रेड लोकप्रिय झाला. आपल्या भारतातसुद्दा ‘गरीबांची भाकरी व श्रीमंतांची पुरी’ असे चित्र दिसू लागले. कुतूहल वाटते की, आज जगभर ब्रेडमध्येसुद्दा पौष्टिकतेचे महत्त्व वाढल्याने भाकरी, मल्टिग्रेन ब्रेड, जास्त ब्लीच व प्रोसेस न केलेल्या ह्या ‘गरीबाची’ मागणी वाढतेय. आजच्या हेल्थ कॉन्शियस लोकांमध्ये, फॅक्टरीत बनविलेल्या मास प्रोड्युस्ड ब्रेडपेक्षा लोकल बेकरीमध्ये बनविलेल्या ब्रेडची मागणी पुन्हा एकदा वाढतेय. ब्रेडचा इतिहास सांगतो की, फ्रान्समध्ये १७व्या-१८व्या शतकात शोषिक गरीबांसाठी ब्रेड हे रेवोल्युशनचे कारण ठरले. फ्रान्समध्ये एकीकडे, श्रीमंत समाजातल्या लोकांचा लोकप्रिय ब्रेड होता, ‘ब्रियोश’, या ब्रेडमध्ये बटर व अंड्याचे प्रमाण जास्त असल्याने हा ब्रेड जवळ-जवळ केकसारखा लागायचा. तर दुसरीकडे मात्र, गरीबांकडे खायला साधा ब्रेडसुद्धा नव्हता. हे समजल्यावर एका राजकन्येने, ‘देन लेट देम इट केक’ असे उद्गार काढले होते, जे पुढे जाऊन फ्रान्स रेवोल्युशनचा पाया ठरले.

आपल्या आहारातले ब्रेडचे महत्त्व बहुधा कधीच संपणार नाही. आज प्रत्येक देशात तिथे उपलब्ध असलेल्या धान्यांप्रमाणे, हवामानाप्रमाणे आणि रीती-रिवाजांप्रमाणे अनेक प्रकारच्या ब्रेडची चव आपण घेऊ शकतोय. प्रवास करताना ब्रेडचे सॅन्डविचेस् हे सर्वात उत्तम खाद्यपदार्थ ठरते. आजही सॅन्डविचेस्शिवाय शाळेच्या पिकनिक्स्चा विचारही आपण करू शकत नाही. इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की, इतर अनेक गोष्टींसारखाच सॅन्डविचचा शोधही चुकूनच लागला. अठराव्या शतकात ब्रिटनमधील ‘सॅन्डविच’ नावाने ओळखल्या जाणार्‍या भागाचे नोबल चीफ जॉन मॉनटॅगू ह्यांना तासनतास पत्ते खेळायची आवड होती. खेळ सुरू असताना जेवणासाठी उठावं लागू नये म्हणून त्यांनी ब्रेडमध्ये मीट घालून खायची सुरुवात केली आणि सॅन्डविच जन्माला आले. आज आपण अनेक देशात फिरतो तेव्हा अनायसे अनेक प्रकारच्या ब्रेड्सचा आनंद घेतो. काही ठिकाणी तर मुद्दाम ‘फूड टूर्स’ घेऊन हा ब्रेड कसा तयार होतो ते ही बघता येते. स्लाईस्ड ब्रेड तर आपण सगळीकडेच खातो पण पुढच्या ट्रिपवर तिथले लोकल ब्रेड टेस्ट करून पहा. पोलंडमधील गोल रिंगसाऱखा दिसणारा ‘बेगल’ आज अमेरिकेत व कॅनडातदेखील प्रसिद्ध आहे. ‘न्यूयॉर्क बेगल’तर न्यूयॉर्कचे एक आयकॉन बनले आहे. बेगलला कापून क्रीम चीस् आणि हवे असल्यास स्मोक्ड सॅलमन फिश त्यामध्ये घालून खाणे, ही एक डेलिकसी समजली जाते. त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय न्यूयॉर्कची ट्रिप पूर्ण होणार नाही. इंग्लंडमध्ये तर सर्व प्रकारचे ब्रेड आहेत, पण आफ्टरनून टी बरोबर स्कोनस् क्लॉटेड क्रीम अ‍ॅन्ड जॅम हे कॉम्बिनेशन अविस्मरणीय ठरतं. साउथ आफ्रिकेत खासकरून डर्बन शहरात स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी ब्रेडचा मधला भाग स्कूप करून त्यात करी भरून ‘बनी चाऊ’ ही अतिशय टेस्टी डिश तयार केली. काही ब्रेड नुसतेच खायला छान लागतात याची समज मला इटलीत मिळाली. मात्र ब्रेड नुकताच बेक केलेला असला तर बेकिंगच्या अरोमासकट ओरेगानोसारख्या इटालियन हर्बस्मिश्रीत फोकाचा ब्रेडला ऑलिव्ह ऑईल चवीसाठी लावून खर्‍या इटालियन जेवणाचा स्वाद मिळतो. ग्रीस, टर्की, लेबनन व इतर मेडिटरेनीयन देशांमध्ये ‘पिटा ब्रेड’ सॅन्डविचेस् फारच लोकप्रिय आहेत. आतून पोकळ असलेल्या ‘पिटा ब्रेड’मध्ये अनेक फिलिंग्स घालून पिटा ब्रेड सॅन्डविचेस् बनविले जातात. चायनीज् जेवणाबरोबर मानताऊ बन्स हे स्टीम्ड कींवा फ्राईड दोन्हीही पद्धतीने खाण्यास उत्तम लागतात. सिंगापूरमध्ये चिली क्रॅबबरोबर मानताऊ बन नसेल तर त्या चिली क्रॅबमध्ये मजा ती काय! तसेच श्रीलंकेचे अप्पम, भारताचा नान, भटूरे, पुर्‍या, चपात्या, रोटी, थेपले, थालीपीठ इत्यादी ब्रेडच्या प्रकाराबद्दल तर सांगायलाच नको. आमच्या काही परदेशी मित्रांना भारतीय खाद्यपदार्थांची ओळख करून देण्यासाठी आता आम्ही निघालोय दुर्मिळ होत जाणार्‍या इराणी रेस्टॉरंटमध्ये. इट्स टाईम टू ब्रेक ब्रेड ओव्हर बन मस्का नाऊ!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*