Marathi

फाइन्ड युवर ट्रॅव्हल स्टोरी

Reading Time: 5 minutes

लांब गावाच्या गोष्टी एकून त्यांच्या शोधात एक्सप्लोरर्स निघायचे तर तिथे बघितलेल्या चमत्कारांच्या कथा ऐकून हे सर्व किती खरे आहे याचा शोध घेत इतर लोकही आपले देश सोडून त्या वर्णन केलेल्या खजिन्यांचा अविष्कार करण्यासाठी निघायचे. अशीच तर साम्राज्य उभी राहिली, नाही का? आणि आज सुद्धा परिस्थितीत फार काही बदल झालेला दिसत नाही, केवळ माध्यम बदलले आहे.

तुला एक छोटीशी गोष्ट सांगते. ऐकशील ना? त्या दिवसातली ती माझी शेवटची बिझनेस मीटींग होती. आपल्या ऐकण्यात काही चूक तर झाली नाही ना! ट्रॅव्हल कॉन्फरन्समधल्या मीटींग्समध्ये बहुदा आपल्या हॉटेलची, मॉन्युमेंट- स्थलदर्शनाची किंवा सर्विसेसची माहिती व एकमेकांच्या कंपनीजची ओळख करून देणे सुरू असताना ही मीटींग हटके वाटली आणि गोष्ट ऐकण्यासाठी एखाद्या लहान मुुलीसारखे कान टवकारून मी नीनाकडे पाहिले. नीना ही इन्काटेरा या लक्झरी हॉटेलची मॅनेजर. दक्षिण अमेरिका खंडातल्या पेरु या देशामधलं प्रसिद्ध स्थलदर्शन माचूपिचू! या माचूपिचू जवळच्या एका लक्झरी हॉटेलची ती मॅनेजर. ही गोष्ट आहे ती एँडीज पर्वतरांगांवर राहणार्‍या एका जोडप्याची. अगदी कथाकथनाच्या शैलीत नीनाने मला जणू एक विडीयो स्टोरीच दाखवायला सुरुवात केली. त्या जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम होते, ते एकमेकांशिवाय लांब राहूच शकत नव्हते. पण हजारो लव्ह स्टोरीज सारखेच या प्रेमी जोडप्याला सुद्धा एकमेंकानपासून लांब जावे लागले. आपल्या डोळ्यातले अश्रु आवरता येत नसल्याने ती युवती पाणी भरलेल्या डोळ्यांनी एँडीज पर्वतरांगांमध्ये निघून गेली. तिचा शोध घेत तिचा प्रियकर तिच्यामागे त्या पर्वतरांगांमध्ये कठिण प्रवासावर निघाला. मानवी रुपात काही ते भेटू शकले नाहीत. पण निसर्गाच्या चमत्काराने त्या युवतीचा जन्म एँडीज पर्वतरांगांवरच्या कॅन्टु फुलाच्या रुपात झाला. या फुलांमध्ये बरेच पाणी साठलेले दिसते, ते म्हणजे त्या युवतीचे अश्रु व ते पुसून टाकण्यासाठीच तिचा प्रियकर एका हम्मिंगबर्डच्या रुपात त्या फुलाचा मकरंद पिण्यासाठी परत परत येऊ लागला. हे फूल म्हणजे पेरु देशाचे नॅशनल फूल असून या झाडाला पेरुवियन मॅजिक ट्री म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच दुसर्‍या दंतकथेप्रमाणे पाऊस पडण्यासाठी कॅन्टु फुलाचे खूप मोठे योगदान असल्याने या फुलामध्ये बरेच नेक्टर किंवा पाणी मिळते असे समजले जाते. पावसाच्या गोष्टीपेक्षा मला ती प्रेमकथाच आवडली आणि आता जन्मभर तरी मी कॅन्टु फुल किंवा पेरुमधले ते हॉटेल विसरू शकत नाही. आपल्या हॉटेलचीच काय तर आपल्या देशाची व देशातल्या वन्यजीवन व पशुपक्ष्यांची अशी ओळख करून द्यायची अनोखी पद्धत मला फारच आवडली आणि पुढच्या वेळी कधी पेरुला जाण्याचा योग आला तर या हॉटेलमध्ये राहून तिथे ट्रेकिंग करताना या कॅन्टु फुलाचा व हमिंगबर्डचा शोध नक्की घ्यायचा मी ठरवले. कदाचित यासाठीच दंतकथांची सुरुवात झाली असावी, नाही का! कोणत्याही जागेचे वैशिष्ट्य लक्षात राहण्यासाठी एक प्रेमकथा हे सर्वात प्रभावी माध्यम ठरते. तसे प्रवासाचे आणि कथांचे नाते जुने आहे. लांब गावाच्या गोष्टी ऐकून त्यांच्या शोधात एक्सप्लोरर्स निघायचे तर तिथे बघितलेल्या चमत्कारांच्या कथा ऐकून हे सर्व किती खरे आहे याचा शोध घेत इतर लोकही आपले देश सोडून त्या वर्णन केलेल्या खजिन्यांचा अविष्कार करण्यासाठी निघायचे. अशीच तर साम्राज्य उभी राहिली, नाही का? आणि आज सुद्धा परिस्थितीत फार काही बदल झालेला दिसत नाही, केवळ माध्यम बदलले आहे. आपण आपल्या हॉलिडेवर भेट दिलेल्या वेगवेगळ्या जांगांचे वर्णन आणि फोटोज फेसबुक व इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर जगाबरोबर शेअर करतोच ना? आणि खरं तर यावर कथाकथनासारखेच भरपूर अपलोड केलेल्या फोटोज्ना स्टोरीज म्हटले जाते. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टोरीज सांगण्याचा मोह मला देखील आवरला नाही. एखाद्या अनोख्या ठिकाणी भेट दिल्यावर त्या जागेचे सौंदर्य, वैशिष्ट्य आपल्या ट्रॅव्हल परिवाराबरोबर शेअर करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. त्यात एक चांगला फोटो हजार शब्दांचे काम करतो, तेव्हा आजच्या जगात सोशल मीडियावर का होईना स्टोरीज सांगत राहूया. वीणा वर्ल्डच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस्वर देखील आपल्याला अशा अनेक इंटरेस्टिंग स्टोरीज आणि माहीतीचा खजिना सापडेल. ह्यातून आपल्याला अनेक हॉलिडे इनस्पिरेशन्स तर मिळतीलच आणि सोबत स्वत:च्या इंटरेस्टिंग ट्रॅव्हल स्टोरीज लिहायला देखील नक्कीच मदत होईल.

गोष्टीवरून आठवले की जगातल्या अनेक कथांपैकी जगावर साम्राज्य करणार्‍या रोमन एम्पायरच्या राजधानी रोमच्या स्थापनेची गोष्ट देखील रोमांचक आहे. पौराणिक कथेनुसार प्राचीन रोमची स्थापना देवत्व लाभलेल्या दोन भावांनी केली. रोमुलस आणि रेमस या दोन जुळ्या भावांचे आजोबा न्युमिटरचा जेव्हा त्याच्ंया भावाने म्हणजेच अम्युलियसने वध केला. तेव्हा ह्या दोन भावांना नदीत टाकण्याचा आदेश दिला. रोमुलस आणि रेमस या दोन जुळ्या भावांचे संगोपन एका शी-वुुल्क म्हणजेच लांडगीणीने केले असून त्या बाळांना दुध पाजून मोठे केले. मात्र मोठे झाल्यावर या शहरावर राज्य कोण करणार यावरून वाद झाला आणि रोमुलसने रोमसचा वध केला आणि शहराला स्वत:च्या नावावरून रोम हे नाव दिले. ही गोष्ट आहे इसवी सन पूर्व आठव्या शतकातली. या कथेचे समर्थन करणारी कदाचित लेट रोमन रिपब्लिकच्या काही नाण्यांवर त्या लांडगीणीचे चित्र पाहता येते. रोमच्या कॅपिटोलीन हिल वरच्या पलात्सो दे कॉनसेरवातोरीमध्ये या दोन्ही भावंडांना दुध पाजतानाची एका लांडगीणीची ब्राँझची मूर्ती  सुद्धा बघायला मिळते.

बहुतेक दंतकथा या मानवी, नैसर्गिक आणि आध्यात्मिक जगामधील बंधनाच्या कथा असून मनुष्याच्या व देवदेवतांच्या मधले अंतर कमी करण्यासाठी बनविलेल्या असतात असे वाटते. अशीच कहाणी आहे न्यूझीलंड देशाची.

ब्रिटीश न्यूझीलंडला पोहोचण्याआधी न्यूझीलंडचे नागरिक होते पॉलिनेशियन लोकं. ह्या पॉलिनेशियन लोकांनी न्यूझीलंडला आपले घर बनविले व ही लोक माओरी लोकं म्हणून ओळखू जाऊ लागली. माओरी दंतकथा या मैखिक इतिहास जपण्याचा प्रयत्न करत माओरी कल्चर व जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाबद्दल बरेच काही सांगून जातात. न्यूझीलंडचे माओरी नाव आहे आओतेआरोव्हा- ज्याचा अर्थ होतो लँड ऑफ द लाँग व्हाईट क्लाऊड. या देशाच्या उत्तर बेटाच्या निर्मितीची कथा ही माऊई या दैवी शक्ती लाभलेल्या हुशार प्रतिभाशाली डेमीगॉडची कथा आहे. माऊर्ईने आपल्या पुर्वजांच्या जबड्याचा फिश हुक बनवून आपल्या भावंडांच्या बोटीत लपून बसून समुद्रात पोहोचताच मासेमारी केली आणि फिश हुकच्या सहाय्याने एक मोठ्ठा मासा बाहेर काढला. हा मासा म्हणजेच न्यूझीलंडचे नॉर्थ आयलंड. लगेचच त्या माशाचे तुकडे करण्यास माऊईच्या भावांनी सुरुवात केली आणि हे उत्तर बेटाचे पर्वत, तलाव, दर्‍या-खोर्‍या व किनार्‍याचे रुप घेत नॉर्थ आयलंड तयार झाले. न्यूझीलंडच्या निसर्गसौंदर्याला बघितले की हा सुंदर देश निर्माण करण्यासाठी कुठलीतरी दैवी शक्तीच कामाला लागली असेल याची मात्र खात्री पटते. नॉर्थ आयलंडला भेट दिली की अनेक ठिकाणी माओरी कल्चरची ही झलक बघण्याची संधी सुद्धा मिळते.

जगभरातल्या या दंत कथांमध्ये कायम देव, दानव, मनुष्य व निसर्ग या सर्व गोष्टींचे संमिश्रण तर असतेच, शिवाय त्या भागात आढळणार्‍या अनेक गोष्टींचा अर्थातच जास्त उल्लेख केला जातो. न्यूझीलंडपासून पृथ्वीच्या दुसर्‍या टोकाला म्हणजेच अफ्रिकेत ट्रिक्स आणि छोटी-मोठी जादू करणारी लोकं आणि प्राणी लोककथांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आफ्रिकन कथा या केवळ मनोरंजक नसून धडा शिकवितात, कधी कधी नैतिक मूल्ये शिकवितात आणि जंगलात आपला जीव वाचवण्याचे धडे सुद्धा देतात. वेस्ट आफ्रिकेत ट्रिक्स व जादू-टोना करणार्‍या एका आत्म्याबद्दल अनेक कथा आहेत. काही कथांमध्ये तो या जगाच्या व सर्वोच्च देवामधल्या संदेशवाहकाचे काम करताना आढळतो. कुठल्याही कार्याची सुरुवात व शेवट ही त्या आत्म्याचे पूजन केल्याशिवाय होऊ शकत नाही कारण देवांशी संवाद साधायला सर्वप्रथम देवदुताचा सल्ला घेणे आवश्यक समजले जाते. विक्टोरिया फॉल्सच्या झांबेझी नदीच्या न्यामी न्यामी या नदीच्या सर्पासारख्या आकाराच्या देवतेची दंतकथा ही झांबेझी व्हॅलीच्या टांगा वशांच्या आफ्रिकन लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. या नदीमध्ये राहणार्‍या या न्यामी न्यामी देवतेची सगळे पूजा तर करतातच पण ह्याच्या क्रोधापासून सगळेच घाबरतात. पौराणिक कथेनुसार हा देव सध्याच्या करिबा डॅममधल्या एका दगडाखाली वास्तव्य करत असे. करिबा डॅम बांधताना नदीला अनेक वेळा पूर आला तेव्हा न्यामी न्यामी देव आपल्या पत्नीपासून दूर झाल्याने क्रोधित झाला आहे म्हणूनच पूर येतो अशी समजूत होती. वेळोवेळी पूर, वादळ व जवळ- जवळ 80 लोकांचा मृत्यु झाल्यावर या दंतकथेला हसणार्‍या लोकांनी सुद्धा माघार घेतली. त्या डॅमजवळ आज सापासारख्या दिसणार्‍या या देवाचे शिल्प बघायला मिळते. काही कथा गम्मतशीर सुद्धा असतात, तेव्हा रात्रभर आपल्या अंड्याना ऊब देणार्‍या शहामृग पतीने जेव्हा आपल्या लग्नाबाहेर संबंध ठेवणार्‍या शहामृग पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी वाकून पहारा केला तेव्हापासून बिचार्‍याची मानच खेचली गेली व यामुळेच शहामृगाची मान उंच असते अशी गमतीशीर गोष्ट आफ्रिकेत ऐकायला मिळते.

स्कॉटलँडच्या लॉक नेस मॉन्स्टरची कथा, चायनाच्या मंकी किंगने आपले लोभ सोडून बुद्धाच्या वाटेला जाण्याची कथा असो किंवा पॅसिफिक ओशनमध्ये उठणार्‍या त्सुनामी व भुंकपाच्या बद्दल इंडियन अमेरिकन कथा असो, आपली जगभम्रंती करताना अशा अनेक कथा आपल्याला ऐकू येतात व त्याचे काही संदर्भही लागतात. भारतात सुद्धा रामायण महाभारताच्या अशा अनेक कथा आहेत. श्रीलंकेत तर रामायणातील ठिकाणे बघत आपण रामायणा ट्रेल्स अशी ट्रिप सुद्धा करू शकतो. हल्ली गोष्टी सांगणे किंवा कथाकथन कमी झाले असले तरी टीव्हीवर येणार्‍या लोकप्रिय मालिका किंवा काही चित्रपटांनी सुद्धा या स्थलदर्शनाच्या ठिकाणांना प्रसिद्ध केले आहे. गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेतील किंग्ज लॅडिंग बघण्यासाठी या मलिकचे फॅन्स क्रोएशियाकडे धाव घेतात तर अमेरिकेत अनेक ठिकाणी मूव्ही स्पेशल टूर्स घडवल्या जातात.

दंतकथा असोत, पुस्तकातील गोष्टी असोत किंवा टीव्हीवरील मालिका असोत, गोष्ट जेवढी रुचकर असेल तेवढी त्या ठिकाणी जाण्याची ओढ वाढते. तेव्हा साऊंड ऑफ म्युझिक या सिनेमातील प्रेक्षणीय स्थळं बघायला ऑस्ट्रियाकडच्या साल्झबर्गकडे निघेन असा विचार मी करतेय आणि हो तिथे पोहोचल्यावर माझ्या इस्ट्राग्रामवर ती स्टोरी अपलोड करायला हवीच, नाही का! इट्स टाईम टू ट्रॅव्हल, अ‍ॅन्ड फाइन्ड अवर ओन ट्रॅव्हल स्टोरी.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*