पिक्चर अभी बाकी है…

0 comments
Reading Time: 9 minutes

देशविदेशात अनेक ठिकाणी हिंदी सिनेमांचे छायाचित्रण केले जाते आणि आपल्याला नेत्रसुख प्राप्त होते. काही वेळा तर त्या जागेची जादू ही एखाद्या गाण्यातूनसुद्धा आपले मन जिंकते. तर काही वेळा आपण त्या डेस्टिनेशनला प्रत्यक्ष भेट देतो, तेव्हा मात्र ती जागा आपल्याला काही केल्या सापडतच नाही… असं का होतं?

इटलीमध्ये सगळीकडे फिरलो पण तो ब्रिज काही दिसला नाही. तोच तो ऐश्‍वर्या राय आणि सलमान खानच्या सिनेमामधला. तो बघण्याची फार इच्छा आहे पण एवढा एक आठवडा फिरलो तरीसुद्धा आमच्या स्थलदर्शनात ती जागा कशी काय समाविष्ट नव्हती हेच कळले नाही. पर्यटकांकडून असे बरेच वेळा ऐकायला मिळते. हम दिल दे चुके सनम या सिनेमाचा उत्तरार्ध कथेप्रमाणे  इटलीत घडतो.  पण प्रत्यक्षात या सिनेमाचे शूटिंग झाले ते युरोपमधल्याच हंगेरी देशाची राजधानी बुडापेस्टमध्ये. १९९९ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा बुडापेस्ट हे भारतीय पर्यटकांमध्ये तितकेसे लोकप्रिय नव्हते, मग सिनेमाचा शेवट होतो तो महत्त्वाचा सीन बुडापेस्टच्या आयकॉनिक स्झेचेनयी लँचिड अर्थात चेन ब्रिज वर शूट केलेला असला तरी सिनेमाचे पात्र इटलीतच आहेत असा आपला गैरसमज होणे तर सहजच शक्य आहे.

देशविदेशात अनेक ठिकाणी हिंदी सिनेमांचे छायाचित्रण केले जाते आणि आपल्याला नेत्रसुख प्राप्त होते. मॉरिशसचं निळंशार पाणी, तिथले वॉटर स्पोर्टस्, स्वित्झर्लंडमधल्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, लंडन – न्यूयॉर्कसारखी महानगरं अशा अनेक ठिकाणी बॉलीवूडने आपला ठसा उमटवला आहे. एखाद्या सुंदर ठिकाणी शूटिंग झालेले असले की सिनेमाघरात २-३ तास ती सुंदर दृश्य बघत आपला वेळसुद्धा आरामात निघून जातो. मग कधी-कधी कथेत फारसा दम नसला तरी मोठ्या पडद्यावर ती सुंदर दृश्य बघून मन प्रसन्न होते.

स्वित्झर्लंड आणि बॉलीवूडचं नातं किती घट्ट आहे हे आपल्या सर्वांनाच माहितीय. इतके घट्ट की आज तिथल्या इंटरलाकेन शहरात व्हिक्टोरिया युंगफ्राउ या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका स्वीट रूमचे नाव आहे द यश चोप्रा स्वीट आणि जवळच्याच गार्डनमध्ये यशजींचा पुतळासुद्दा उभारला आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडची भारतीय पर्यटकांमध्ये काहीच ओळख करून द्यायला नको. पण बॉलीवूड हे असंख्य भारतीय लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे ह्याची समज आज जगभरातल्या अनेक डेस्टिनेशन्सना झाली आहे आणि फिल्म प्रोड्युसर्सने आपल्या देशाकडे बॉलीवूडची वाट वळवावी यायाठी ते बराच प्रयत्नसुद्धा करतायत. कधी-कधी हा प्रयत्न त्या जागेला भरपूर टूरिस्ट मिळवून देतो तर कधी-कधी पडद्यावर सुंदर दिसूनही ती जागा टूरिस्टपासून वंचित राहते. स्वित्झर्लंड, इटली बॉर्डरवरच्या स्वित्झर्लंडचा टिचिनो भाग हा असाच आपल्या नजरेतून सुटलेला . स्वित्झर्लंडचे परफेक्शन आणि इटलीची आत्मियता असे परफेक्ट कॉम्बिनेशन टिचिनोमध्ये बघायला मिळते. मीडीवल कॅसल्स, सुंदर लेक्स, त्याकाठी बांधलेले सुंदर वॉटरफ्रन्ट प्रोमेनाड्स व उत्तम इटालियन फूडसाठी टिचिनो प्रसिद्द आहे. पण बॉलीवूडच्या एका ब्लॉकबस्टर फिल्ममध्ये भाग घेऊनसुद्दा टिचिनो हे बर्‍याच भारतीय पर्यटकांना माहित नव्हते. धूम ३ ही आमिर खानसारख्या उच्च दर्जाच्या नटाची फिल्म असूनसुद्दा टिचिनोची आपली ओळख कशी बरं झाली नाही, याचं कोडं बर्‍याच जणांना पडलं असेल. या सिनेमाच्या शेवटी आमिर खान एका भव्य डॅमवरून बंजी जम्प करीत पाण्यात पडतो,तो डॅम आहे टिचिनोमधला कॉन्ट्रा डॅम किंवा वरझास्का डॅम. हा आर्च शेप्ड (अर्धवर्तुळाकार) डॅम जगभरात बंजी जंपसाठी प्रसिद्ध आहे.  कारण इथे लोकप्रिय जेम्स बॉन्ड सीरीजमधल्या गोल्डन आय या सिनेमाचे शूटिंग झाले होते, ज्यात सिनेमाच्या महत्त्वाच्या ओपनिंग सीनसाठी इथे मध्येच बंजी जंप करतानाचा शॉट आहे आणि म्हणूनच आजसुद्धा पर्यटक इथे गोल्डन आय जंप करण्यासाठी भेट देतात. धूम ३ मध्ये मात्र हा डॅम अमेरिकेत असल्याचा आपल्याला भास होतो, कारण धूम ३ ची कथा ही अमेरिकेच्या शिकागो शहरात घडताना दाखवलेली आहे. आता शिकागो शहरात पोहोचल्यानंतर किती ही शोधले तरी बंजी जंप करण्यासाठी हा डॅम काही सापडायचा नाही. तसे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधल्या बर्‍याच लोकांच्या हे लक्षात आले कारण आणखी काही सीन्समध्ये शिकागोचा उल्लेख होतो पण मागे स्वित्झर्लंडच्या पिवळ्या बसेस दिसतात. असो. फार निरीक्षण केले तर सिनेमाची मजा आपण घालवू नाही का! पण जेव्हा ट्र्रॅव्हल हा आपला उद्योग असतो तेव्हा नकळत कुठलाही सिनेमा असला तरी तो कुठे शूट केला आहे हे ओळखण्याचे एक प्रकारचे वेडच लागते. रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोण यांचा बचना ए हसिनोंहा चित्रपटसुद्दा जगातल्या अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, इटलीतले काप्री, नेपल्स ही ठिकाणे तर लगेच ओळखता आली पण खुदा जाने के फिदा हूं या गाण्यात काही केल्या दीपिका किंवा रणबीरकडे लक्ष जाइना कारण त्यांच्या मागे दिसणारी त्रिकोणी टोकाची सर्व घरे लक्ष वेधून घेत होती. त्या गाण्यातली ती पांढर्‍या-शुभ्र घरांवरची दगडांची छप्परं फारच आकर्षक दिसत होती. हे इटली आहे ते लॅन्डस्केपवरून कळले पण इटलीत नक्की कुठली जागा आहे ही, हे मात्र कळता कळत नव्हतेे. इटालियन टूरिझमकडून कळले की ही जागा आहे इटलीच्या दक्षिणेकडे स्थित असलेली पुगलिया. पुगलिया भागाची राजधानी आहे बारी आणि बारीमधल्या अलबरोबेलो या भागात ही टली घरे इथल्या शेतकर्‍यांनी धान्य साठवण्यासाठी व आसरा घेण्यासाठी बांधलेली होती. या सिनेमानंतर एड्रियाटिक समुद्राच्या काठावर वसलेले बारी आणि त्याचबरोबर पुगलिया प्रांतातील लेचे, इथले थर्मल बाथ्ज्, कॅसतेलाना केव्हस्मध्ये जमिनीखाली गुफांमध्ये घडणार्‍या डान्स शोसारख्या अनेक नवलाईंनी भरलेला इटलीचा पुगलिया हा भाग भारताच्या पर्यटकांमध्ये हळूहळू प्रसिद्द होऊ लागला.

जर कुठल्या एका सिनेमाने त्या देशाच्या पर्यटनाचा नक्षाच बदलला असेल तर तो म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबाराया सिनेमाने. कधी-कधी एखाद्या जागेबद्दल आपले बरेच गैरसमज असतात.  तिथे फक्त चर्चेसच आहेत, फार काही करण्यासारखे नाही, आपल्याला कंटाळा येईल असे सारखे वाटत असते. स्पेनबद्दल असाच काहीसा समज पर्यटकांच्या मनात होता. पण जिंदगी ना मिलेगी दोबारानंतर, त्या चित्रपटाच्या नावानेसुद्दा अनेक हॉलिडे पॅकेजेस् प्रसिद्ध झाले. आपण नुकत्याच साजरा केलेल्या होळीप्रमाणेच तिथले ला टोमाटिना फेस्टिव्हल, स्काय डायविंग, स्पेनच्या मोहक समुद्रकिनार्‍यावरील कॉस्टा ब्रावा म्हणजेच द वाइल्ड कोस्टमध्ये स्कुबा डायविंग, सेलिंग इ. स्पोर्ट आणि एकंदरीतच स्पेनचे एक्सायटिंग वातावरण व फ्रेंडली मूड हा या सिनेमातून अतिशय छान बघायला मिळाला आणि स्पेनला पर्यटकांनी अखेर मनापासून स्विकारले.

काही वेळा तर त्या जागेची जादू ही एखाद्या गाण्यातूनसुद्धा आपले मन जिंकते. त्यात आपल्या बॉलीवूड सिनेमांमध्ये स्वप्नरंजन करीत गाण्यात हरवून जायची परंपरा असल्याने, जरी कथा मुंबईत घडत असली तरी डोळे मिटून पटकन अगदी आईसलँडला पोहोचणेसुद्दा कठीण नसते.  काजोल आणि शाहरूख खानच्या दिलवाले या चित्रपटातले गेरूआ हे गाणे इतक्या सुंदर प्रकारे चित्रित केले आहे की नायक – नायिकांसारखे आपणही त्या जागेच्या नैसर्गिक सौंदर्याने भारावून जातो आणि सिनेमा एखाद वेळेला विसरून जाऊ पण अगदी फिल्मी स्टाईलमध्ये गाणे ऐकताना डोळे बंद केले की आईसलँडच्या वॉटरफॉल्स, आईसबर्गस, ब्लॅक सॅन्ड बीचेस्च्या अनोख्या जगात हरवून जातो. आज आईसलँड हा प्रत्येक पर्यटकांच्या बकेट लिस्टवरचा अविभाज्य भाग बनतोय आणि एकदा तरी आईसलँडला भेट देऊया ही इच्छा पर्यटक व्यक्त करतात. जास्तीत-जास्त भारतीय पर्यटक आपल्या देशात पाठवण्यामागे बॉलीवूडचा मोठा वाटा आहे ह्याची जाणीव ठेवत आईसलँडच्या ट्रॅव्हल ऑफिस कर्मचार्‍यांनी अनोख्या पद्धतीने धन्यवाद मानले. त्यांनी बॉलीवूडच्याच एका गाण्यावर डान्स करून त्याचा व्हिडीओ जगभर प्रसिद्द केला होता. आपल्या गाण्यावर नाचणार्‍या विदेेशी कर्मचार्‍यांना बघून अभिमान आणि कौतूक दोन्हीही वाटणे साहजिक होते.

आता तर अनेक हॉलीवूड सिनेमांच्या टीम भारतात येऊन अनेक ठिकाणी शूटिंग करताना सुद्दा दिसतात. कधी-कधी भारत हा त्या कथेतला भाग असतो तर कधी आपले पॅलेस, फोर्ट आणि शहरं ही त्या फिल्ममधल्या सीनसाठी उत्तम बॅकड्रॉप ठरतात. स्लमडॉग मिलियनेर हा चित्रपट जगभर गाजला पण त्यात कथेनुसार मुंबईच्या झोपडपांवरच अधिक भर होता. पण भारताबद्दल प्रेम व कुतूहल निर्माण करणारेही अनेक हॉलीवूड चित्रपट आहेत. यात जगातली सर्वात सुंदर अभिनेत्री समजल्या जाणार्‍या जुलिया रॉबर्ट्सचा इट प्रे लव्ह हा चित्रपट भारताच्या अध्यात्मिक ज्ञानाला सलाम देणारा ठरतो. जर प्रार्थना, तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त करायचे असेल तर भारताखेरीज उत्तम स्थान नाही हे दाखवणार्‍या या चित्रपटाचे शूटिंग दिल्ली व पतौडी या ठिकाणी झाले. तसेच, ऍपल या जगविख्यात कंपनीचे फाऊंडर स्टीव जॉब्स यांच्या भारत प्रेमाला लक्षात घेऊन जॉब्स या स्टीव जॉब्सच्या आत्मचरित्रावर आधारित सिनेमामध्ये दिल्ली आणि वृंदावन दिसून येते. जसे बॉलीवूडमुळे भारतीय पर्यटकांचे जगाशी नाते जोडून येते तसेच बॉलीवूड सिनेमांमुळे जगभरातून पर्यटक भारताकडेसुद्दा आकर्षित होतात. क्रिस्टोफर नोलानचा सर्वात प्रसिद्ध बॅटमॅन मूवी द डार्क नाइट राईसेसमधला बॅटमन जेलमधून पळून जाण्याचा महत्त्वाचा सीन हा जोधपूरच्या मेहरानगढ फोर्टच्या पार्श्वभूमीवर बनविला होता. तसेच ब्रिटन व भारताच्या नात्यातला गोडवा दर्शविणार्‍या द बेस्ट एक्झॉटिक मॅरिगोल्ड हॉटेलया सिनेमामधल्या डेम जुडी डेन्च व देव पटेल सारख्या कलाकारांनी जयपूर व उदयपुरमध्ये शूटिंग केल्याने भारताला भेट देणार्‍या विदेशी पर्यटकांमध्ये आधीच प्रसिद्द असलेल्या राजस्थानला अजून लोकप्रियता मिळवून देण्यात हातभार लागला. उदयपुर हे तर जेम्स बॉन्डच्या तेराव्या सिनेमात म्हणजे ऑक्टोपुसीमध्ये सुद्दा बघायला मिळते. जेम्स बॉन्ड सारखीच हल्लीची अ‍ॅडव्हेंचर सीरीज म्हणजे मिशन इम्पॉसिबल. या सिनेमाच्या सीरीजमधल्या घोस्ट प्रोटोकॉल या सिनेमात मुंबई, बँगलोरसारख्या ठिकाणी शूटिंग केलेले पहायला मिळतेच पण अनिल कपूर या बॉलीवूडच्या अभिनेत्याला चांगला रोलसुद्दा मिळाला ही अभिमानाची गोष्ट.

बॉलीवूड असो का हॉलीवूड, मनोरंजनाबरोबरच जगातली सर्वात सुंदर ठिकाणे आपल्याला बघायला मिळत राहिली की आपले काम झाले. मग युरोप फिरताना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातील ट्रेन सुटण्याच्या सीनवर आपणसुद्धा शाहरुख व काजोलसारखी पोझ देऊन फोटो काढला की झालोच आपल्या कुटुंबाचे नायक. रुपेरी पडद्यावर बघितलेल्या ठिकाणांना स्वतः भेट देणे आणि तसेच अनोखे अनुभव घेणे आज सहज शक्य आहे. तेव्हा पिक्चर अभी बाकी है। चलो, बॅग भरो, निकल पडो!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*