त्या तिथे पलिकडे… स्वर्ग तो, तिथे मनास सापडे!

0 comments
Reading Time: 9 minutes

ही रूम मी सर्वप्रथम बघितली तेव्हा ती जगावेगळी तर वाटलीच पण माझ्या मनात एक शंका आली की, जसे आपल्याला बाहेरचे सर्व काही दिसत आहे, तसे ह्या रूममध्ये राहिल्यावर बाहेरच्यांनासुद्धा रूममधील सर्व काही दिसत असेल नाही का! पण त्याक्षणीच मनात आले, अरे आपण तर एखाद्या काचेच्या स्नो ग्लोबमधल्या खेळण्यासारखेच त्या ग्लास बबलमध्ये दिसत असू, मग काय मलाच माझी गंमत वाटली.

काचेच्या घरात राहणार्‍या लोकांनी दुसर्‍यांवर दगड फेकू नये, हा वाक्प्रचार शाळेत असताना आपण शिकलो होतो. मला लहानपणी नेहमीच गंमत वाटायची की, खरंच कुणी काचेच्या घरी राहतात का? पण पर्यटनक्षेत्रात आल्यानंतर जगाशी इतका जवळून संबंध आला की, लहानपणी जे अशक्य वाटत होते ते आता शक्य तर आहेच, किंबहूना सध्याचे सर्वात ट्रेंडिंग आणि कूल हॉटेल्स हे ह्या हटके काचेच्या घराच्या प्रकारात मोडतात हे आवर्जुन इथे नमूद करावेसे वाटते. पर्यटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे अनुभव शोधणे हे आमच्या रक्तातच आणि खास त्यासाठीच आजच्या लेखाचा हा प्रपंच. गेल्या काही वर्षात लक्झरी कॅम्पिंग करीत लक्झरी टेन्टमध्ये वास्तव्य करणे प्रसिद्ध झाले. या पद्धतीला ग्लॅम्पिंग हे नाव देण्यात आले. ग्लॅम्पिंगचा अनुभव इतका लोकप्रिय झाला की आता त्याच्या पुढची स्टेप आहे बबल रूम ट्रेन्ड. सध्या जगभर लोकप्रिय होणारा बबल रूम ट्रेन्ड भारतीय पर्यटकांनासुद्धा तितकाच आवडेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. निसर्गाशी एकरूप होऊन सभोवतीचे दृश्य सर्व बाजूंनी आरामात मनसोक्त बघण्यासाठी या ग्लास बबलचा शोध लागला असावा. संपूर्णपणे काचेने बनविलेल्या ह्या ग्लास बबलमध्ये एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल रूमसारखीच किंवा त्यापेक्षा जास्त लक्झरी अनुभवायला मिळते. कल्पना करा आपण आपल्या किंग साईज बेडवर आराम करतोय, बाहेर ऊन असो का पाऊस, आपल्या काचेच्या रूममध्ये हवे तसे एअर कंडिशनिंग सुरू आहे, आपल्या रूमला भिंती नसून सभोवती गोलाकार ग्लास असल्याने जिथे बघावे तिथे बाहेरचे दृश्य आपल्याला आरामात दिसतेय, आणि रात्र होताच असंख्य तारे आकाशात चमकताना दिसत आहेत. अशी जर आपली रूम असेल तर ती सोडून बाहेर पडणे अशक्यच! ही रूम मी सर्वप्रथम बघितली तेव्हा ती जगावेगळी तर वाटलीच पण माझ्या मनात एक शंका आली की, जसे आपल्याला बाहेरचे सर्व काही दिसत आहे, तसे ह्या रूममध्ये राहिल्यावर बाहेरच्यांनासुद्धा रूममधील सर्व काही दिसत असेल. एखाद्या काचेच्या स्नो ग्लोबमधल्या खेळण्यासारखेच आपण त्या ग्लास बबलमध्ये दिसत असू नाही का! पण काळजी करण्याचे कारणच नाही कारण ह्या रूम्स हॉटेलच्या सर्वात कमी रहदारीच्या ठिकाणी इतरांच्या नजरेपासून लांब, अगदी दृष्टीआड बांधलेल्या आहेत. काही हॉटेल्समध्ये बेडभोवती पडदा आहे तर काहीना ग्लास बबल आतून झाकण्याची सोय आहे. काही ठिकाणी तर एखाद्या व्हिलामध्ये ही रूम इतर रूमबरोबर जोडलेली असते. जगभरात हे स्काय बबल्स् बीचेसवर, जंगलात किंवा आर्क्टिक सर्कलच्या पलिकडे नॉर्दन लाईट्स बघण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या आहेत. फिनोलु मालदिव्हस्मध्ये हे बीच बबल इथल्या बीचेसवर बांधलेले आहे. मालदिव्हस्मध्ये लक्झरी रूम्सनी उच्चांकच गाठला आहे. त्यांचे स्काय हाऊस विथ बबल ह्याचे हल्लीच उद्घाटन झाले.

बीचजवळ नारळाच्या झाडांमध्ये उंचावर बांधलेले हे स्काय हाऊस म्हणजे जगावेगळे राहण्याची अनोखी संधी. इथल्या बेडरूम आणि लिव्हिंग रूम बरोबर तुमच्यासाठी आहे एक प्रायव्हेट इन्फिनिटी स्विमिंग पूल आणि एक स्काय बबल. या बबलमध्ये दोन लोकं अगदी आरामात राहू शकतात. या बबलची खासियत आहे इथला रोटेटिंग गोलाकार बेड-म्हणजे बेडवर बसल्यानंतर गोल फिरणारा हा बेड आपल्याला संपूर्ण स्थलदर्शन घडवणार. त्याचबरोबर या बबलमध्ये आपल्यासाठी आहे एक टेलीस्कोप आणि बँग अ‍ॅन्ड ओलुफसेनचे प्रीमियम साऊन्ड सिस्टम. आता सर्वात कठीण प्रश्‍न असा आहे की, इन्फिनिटी पूल मध्येच फ्लोटिंग ब्रेकफास्ट करावा की स्काय बबलमध्ये बसून तारे मोजावेत? आईसलॅन्डमध्ये तर अशा बबल हॉटेलचे नावंच आहे, द 5 मिलियन स्टार हॉटेल. आईसलॅन्ड हे जगाच्या नकाशावर इतक्या उत्तरेकडे आहे की इथून हिवाळ्यात अरोरा बोरीयालीस म्हणजेच आकाशात दिसणारे हिरवे नॉर्दन लाईट्स बघण्याची संधी खूप जास्त आहे. आईसलॅन्डची राजधानी रेकयाविकपासून एका तासावर हे हॉटेल बांधलेले आहे. शहरापासून लांब असल्याने इथे लाईटचे प्रदूषण नाही आणि त्यामुळेच काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर आपण असंख्य तारे बघण्याचा आनंद घेऊ शकतो. सभोवती पांढराशुभ्र बर्फ आणि लक असेल तर अदभुत हिरवे नॉर्दन लाईट्स हे आपण अगदी कर्म्फटेबल होऊन पाहू शकतो. द 5 मिलियन स्टार हॉटेलची खासियत आहे की याचे लोकेशन हे टॉप सीक्रेट आहे. जोपर्यंत बुकिंग होत नाही तोपर्यंत पर्यटकांना याचा पत्ता दिला जात नाही. इथल्या ग्लास बबल्समध्ये केवळ बेडरूम आहे आणि बाथरूम, किचन व डायनिंगची सोय जवळच इतर रूममध्ये केली जाते. केवळ पाच बबल रूम्सच्या या हॉटेलमध्ये राहणे खरोखरच जगातले एक हिडन ट्रेझर म्हणता येईल.

मेक्सिकोमध्ये हे ग्लास बबल्स एका विनीयार्डस्मध्ये बांधलेले आहेत. इथे जवळ-जवळ ८०हून अधिक वाईन बनविणार्‍या विनीयार्डस्मध्ये द्राक्षाची लागवड बघता येते. तर जॉर्डनमधल्या वादी रम इथे आपण वाळवंटात ग्लास बबलमध्ये राहू शकतो. आपल्या रूममध्येच प्रायव्हेट बाथरूम असल्याने आपण आपल्या ग्लास रूममधून इथल्या वाळूचे व सॅन्डस्टोन पर्वतरांगांचे दिवसभरातले बदलते रंग बघत दिवसाची रात्र करू शकतो. या ग्लास बबल रूम्समध्ये राहण्यासाठी एका रात्रीचे भाडे साधारण अडीचशे ते तीनशे डॉलरपासून सुरु होते आणि नाईटपर्यंत हजार डॉलरवरसुद्धा पोहोचते. पण त्या प्राईसलेस व्ह्यू बघण्यासाठी किंमतसुद्धा स्पेशलच असणार नाही का!

आपल्या हॉलिडेवर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याच्या आपल्या तीव्र इच्छेपायी गेल्या काही वर्षात एकसे एक हॉटेल्स उपलब्ध झाली आहेत. यातले एक माझे सर्वात फेव्हरेट म्हणजे स्वीडनचे ट्री हॉटेल. आपल्या रूम्सच्या खिडकीतून दिसणार्‍या झाडा-झुडपांवर केवळ संतुष्ट न होता एखाद्या पक्ष्यासारखेच झाडावर घरटे बांधून राहता आले तर क्या बात! पण हे आता स्वप्न नव्हे तर खरंच शक्य आहे. स्वीडनमधील ट्री हॉटेलच्या बर्ड्स नेस्ट रूममध्ये असाच अनुभव आपण घेऊ शकतो. जमिनीपासून कित्येक फूटांच्या उंचीवर पाईन ट्रीस्च्या सान्निध्यात निसर्गसौंदर्याच्या मधोमध आपण राहू शकतो. इथल्या ट्री हॉटेलची प्रत्येक रूम वेगळी आहे. बर्ड्स नेस्ट ही रूम नावाप्रमाणे बाहेरून पक्षाच्या घरट्यासारखीच दिसते. तर आतून आपल्यासाठी सर्व मॉर्डन सोयींनी सजविलेली आहे. इथल्या इतर काही रूम्समध्ये अगदी परग्रहावरून उतरल्याप्रमाणे यु.एफ.ओ च्या स्पेसशिपच्या आकाराची रूम आहे. अगदी मॉर्डन आर्किटेक्चरनं बनविलेली केबिन रूम आहे, मोठ्या फॅमिलीसाठी ब्लू कोन रूम आहे आणि दोन बेडरूम्सची द सेवन्थ रूमसुद्धा बांधलेली दिसते. या रूमची खासियत आहे, दोन बेडरूम्सच्या मधोमध बांधलेले नेट. या नेटवर आपण आकाशाकडे बघत बाहेर झोपण्याचा आनंद घेऊ शकतो, आणि पोटावर झोपत जमिनीवर तरंगण्याचा आनंदसुद्दा घेऊ शकतो. कदाचित म्हणूनच या रूमचे वर्णन करताना याला धरती आणि स्वर्गाची सीमारेषा म्हटले जाते. इथेच आणखीन दोन रूम्स आहेत, त्यातील एक रूम द ड्रॅगनफ्लाय ही नाकतोड्याच्या आकारासारखी बनविलेली आहे, तर द मिररक्युब ही रूम एका चौकोनी क्युब आरशासारखी दिसते. या रूमला संपूर्ण आरसे लावल्याने इथे जातानाच त्या आरशांमध्ये पाईन ट्रीस्चे प्रतिबिंब दिसल्यानं निसर्गात राहण्याचा अनुभव अधिकच खास वाटतो. या रूम्सपर्यंत पोहोचायला काही इलेक्ट्रिक शिड्या आहेत, काही रूम्सना ब्रिजेस बांधलेले आहेत तर काहींना स्टेप्स आहेत. सप्टेंबर ते मार्चच्या दरम्यान स्वीडनमधून देखील नॉर्दन लाइट्स बघता येतात जेव्हा हे हॉटेल फारच डीमांडमध्ये असते. इथे हिवाळ्यात केवळ नॉदर्र्न लाइट्स नव्हे तर अनेक विंटर एकरितिरिसचा लाभ आपण घेऊ शकतो. स्नोफॉल सुरू झाला की इथे एखाद्या परिकथेत आपण फिरतोय असे वातावरण तयार होते. मग झाडांवर, रस्त्यांवर, घरांवर पडलेला पांढरा शुभ्र बर्फ, गोठलेले लेक्स, त्यावर एखाद्या टेन्टमध्ये कॅन्डल लाईट डिनर, आईस फिशिंग, स्नो मोबाईल स्कूटर राईड्स, चक्क बर्फावर योगा, बर्फाच्या पाण्यात आंघोळ, बर्फात सायकल चालविण्यापासून ते आपल्या रूममध्ये बसून निसर्गाची मजा लुटण्यापर्यंत सर्व काही शक्य आहे. झाडांवर हॉटेल रूममध्ये राहण्यासाठी परदेशीच जायला पाहिजे असे काही नाही. अगदी आपल्या केरळमध्येही ट्री हाऊसमध्ये राहण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. वैथिरी ट्री हाऊसमध्ये एकदातरी रहायलाच हवे. इथे पक्ष्यांचा किलबिलाटच तुमचा नैसर्गिक अर्लाम ठरेल. पण जमीनीपासून साठ फूटांवर असताना अर्लामची काय गरज आहे. केरळच्या वायनाड भागात आता असे अजून काही ट्री हाऊसेस दिसू लागले आहेत.

जर आकाशात उंच राहण्याची इच्छा पूर्ण होत असेल तर समुद्राच्या खाली राहण्यापासून कोण बरं आपल्याला दूर ठेवेल! अंडरवॉटर जगाची ओळख करण्यासाठी आपण सबमरीन, स्नॉर्केलिंग, स्कुबा डायव्हिंगसुद्धा केले असेल पण समुद्राखाली आपण कधी वास्तव्य केले आहे का? फिजी बेटांच्या समूहात पोसाईडन या रीसॉर्टवर हे शक्य आहे. समुद्राच्या चाळीस फूटांखाली या फाईव्ह स्टार लक्झरी हॉटेलमध्ये आपण ग्लास केबिनमध्ये राहून इथल्या कोरल रीफ व तिथे राहणार्‍या माशांचा नजारा बघू शकता. इतकेच काय तर या रीसॉर्टच्या चॅपलमध्ये आपण लग्नसुद्धा करू शकता. अंडरवॉटर राहण्याचा रोमांचक अनुभव हा केवळ नैसर्गिक.  असा अनुभव फक्त समुद्रातच नव्हे, तर दुबईच्या द पाम या मॅनमेड लगूनमध्येे जगप्रसिद्ध अटलँटिस हॉटेलमध्ये राहूनही घेता येतो. इथल्या एम्बॅसेडर लगूनच्या 65,000 हून अधिक मरीन प्राण्यांच्याबरोबर आपण माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघत लक्झरी रूमचा अनुभव घेऊ शकतो. पण सगळ्यात हटके अंडरवॉटर हॉटेल मला आवडले ते टांझानियाचे मानता रीसॉर्ट. टांझानियाच्या पेम्बा आयलंडवरच्या या द मानता रीसॉर्टमध्ये आहे , एक फ्लोटिंग रूम. या तरंगत्या लक्झरी रूमचे तीन लेवल आहेत. मेन लेवलवर आउटडोअर डेक आणि आपली बेडरूम, त्यावर शिडी चढून आपण सनडेकवरुन दिवसा सनबाथिंग आणि रात्री खुल्या आकाशाखाली तरंगण्याचा अनुभव घेऊ शकतो आणि खरी मजा आहे ती या तंरगणार्‍या हॉटेलची समुद्राखालची रूम. रात्री या काचेच्या रूमबाहेर स्पॉटलाईट्स लावले जातात आणि अवतीभोवती पोहणारे मानता रेस, स्क्विड्स, ऑक्टोपस, स्पॅनिश डान्सर्स आणि इतर फिश आकर्षित होतात. मग काय, या रुममध्ये बसून समुद्राच्या कमाल जीवनाचा आनंद घ्या किंवा हवे तेव्हा पाण्यात उडी मारून हेच जीवन अधिक जवळून बघा. इंडस्ट्रियलायझेशन आणि आधुनिकीकरणाबरोबर आपण जेवढे काँक्रीट जंगल वाढवू तेवढीच आपली निसर्गाची ओढसुद्धा वाढत जाईल, मग अशा अनोख्या हॉटेल्समध्ये राहून आपण आपल्या हॉलिडेवर निसर्गाच्या कुशित राहण्याचा आनंद का बरं मिस करावा!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*