Marathi

जन्नत-ए-कश्मीर।

Reading Time: 6 minutes

आम्ही काय किंवा आमचे पर्यटक किंवा भारतीय नागरिक, सर्वांनीच काश्मीर कधीही आणि कितीही अशांत झालं तरी काश्मीरला जाणं सोडलं नाही. एकंदरीतच काश्मीरला त्याच्या सगळ्या परिस्थितीजन्य गुणदोषांसह पर्यटकांनी आपलं म्हटलं होतं. जे झालं ते झालं. काय झालं नाही? काय केलं नाही? कुणी केलं नाही? ह्या आरोप प्रत्यारोपात न पडता आपण पुढे काय करू शकतोय ते आता जरूरीचं आहे.

आपल्या देशाला तीन-तीन नावं का आहेत? हिंदुस्थान, भारत, इंडिया. तुम्हा आम्हा कुणालाही कधीतरी पडलेला हा प्रश्‍न. एखाद्या प्रश्‍नोत्तराच्या खेळातही आपण हा प्रश्‍न विचारलाय. मार्केटिंग स्ट्रॅटेजी-ब्रँड पेनेट्रेशनमध्ये, स्ट्राँग बोल्ड नेम हे कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वीसुद्धा होतं आणि आजही तेवढंच महत्त्वाचं आहे. किंबहुना आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात ते जास्त महत्त्वाचं आहे. कुठच्याही वस्तूला-संस्थेला एक नाव असावं म्हणजे गोंधळ उडत नाही. एकदा ते नाव स्ट्राँग झालं की मग त्याच्या वेगळ्या छोट्या आवृत्त्या सुरू करायला हरकत नाही. आम्हाला ब्रम्हदेशाची सहल करायची होती. ज्यांची बर्‍यापैकी भ्रमंती झालीय अशी मंडळी या सहलीला येतात. या देशाचं सध्याचं नाव आहे म्यानमार पण जर हे कुणाला कळलं नाही तर? म्हणून जेव्हा ह्या सहलीची जाहिरात करायची ठरवली तेव्हा आम्ही त्याचं नाव म्यानमार लिहून कंसात ब्रम्हदेश आणि बर्मा ही दोन्ही नावं लिहिली. गोंधळ होतो तो असा किंवा ते कळण्यासाठी आणखी एक्स्प्लनेशन द्यावं लागतं ते असं. अनेक देशांची अशी दोन किंवा तीन नावं आहेत. निप्पॉन हे जपानचं मूळ नाव. नेदरलँडला ओळखलं जायचं हॉलंड म्हणून, दिवेही हे राज्य म्हणजे मालदीव, पर्शिया म्हणजे इराण, डॉइशलँड झालं जर्मनी, तर ऑस्ट्रेलियाला न्यू हॉलंड म्हटलं जायचं. ह्या देशांनी नंतर घेतलेली नावं मात्र जास्त चांगल्या तर्‍हेने जगाच्या मनात रुजवलं, आणि हळूहळू आपण त्यांचं पूर्वीचं नाव विसरलो. आपल्या देशालाही फाळणीपूर्वी हिंदुस्थान म्हटलं जायचं, फाळणीनंतर ते भारत झालं. खरंतर त्यावेळी हिंदुस्थान- पाकिस्तान अशी दोन नावं दोन देशांची असं ठरलं होतं पण हिंदुस्थान हा शब्द सर्वधर्म समभावाच्या आड येईल या कारणाने आपण स्थानिक नाव घेतलं भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते इंडिया झालं. खरंतर हिंदुस्थान हे हिंदुंचं स्थान असा मूळ अर्थ नाहीच आहे. हा पर्शियन शब्द आहे, आणि तो आला सिंधू घाटीवरून. सिंधू-हिंदू, सिंध- हिंद, हिंदू-कुश वरून तो आधी उत्तरेकडच्या भागासाठी मुघलांनी वापरला. अफगाणिस्तान, बलुचिस्तान, किर्गिस्तान, तुर्कस्तानप्रमाणे हिंदुस्तान. जसं मुघलांचं साम्राज्य दक्षिणेपर्यंत वाढत गेलं तसं सगळ्या विभागाचं एक नाव हिंदुस्थान बनत गेलं. हिंदुस्थान, भारत किंवा इंडिया ही तीनही नावं छान आहेत पण ह्यातलं एकच नाव शक्तिमान बनलं पाहिजे. एक देश-एक संविधान-एक ध्वज-एक चुनाव- एक कानून ह्या दिशेने छानसा प्रवास सुरू आहेच. त्यात एक नाव-एक घोषवाक्य हे ही होऊन जाऊ दे, म्हणजे देश आता मजबूत व्हायला चाललाच आहे त्याला आणखी बळकटी येईल. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काश्मीर. माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि संसदेने जे काही घटनात्मक बदल जम्मू-काश्मीर आणि लेह लडाखसाठी केले त्यासाठी जवळजवळ संपूर्ण भारतानेच त्यांचं अभिनंदन केलंय पण आम्ही पर्यटन क्षेत्रातली मंडळी त्यांचे ऋणी आहोत. अ बिग थँक्यू! प्रॉब्लेम सततचा असेल, सुटत नसेल तर सोल्युशन बदलायला हवं. आपल्या सरकारने सोल्युशन बदललंय, त्यांना मन:पूर्वक सदिच्छा- शुभेच्छा-दुवाएँ देऊया. सव्वाशे करोडहून अधिक लोकांच्या सदिच्छांनी जे काही आपल्या काश्मीरसाठी करायला घेतलंय ते होऊन राहिलंच. तर मुघलांनी आपल्या भारताला दिलेलं नाव हिंदुस्तान आपण विसरलो, किंवा ते सारे जहाँ से अच्छा हिदोस्तां हमारा। हम हिंदुस्तानी। सारख्या गाण्यातून समोर येत राहीलं पण ते जिवंत ठेवलं ते काश्मीरी लोकांनी. शाळेत असल्यापासून म्हणजे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष माझं काश्मीरशी नातं. अशाच एका सुरुवातीच्या भेटीत एकदा टॅक्सीने, दल लेककडून लाल चौकात चालले होते. खरे काश्मीरी लोकं खूप आतिथ्यशील, अदबशीर, नम्र आणि बोलके. त्यांचं उर्दूमिश्रित आर्जवी हिंदी ऐकत रहावसं वाटायचं. त्यामुळे काश्मीरी लोकांशी गप्पा मारायला आवडायचं. त्या गप्पांमध्ये कधी काश्मीरी लोकांच्या चालीरिती, रुढी, परंपरा समजायच्या तर कधी सध्या काय चालू आहे कश्मीर घाटीमध्ये ते कळायचं. अशाच गप्पा त्या टॅक्सीवाल्याशी चालू होत्या. त्याला विचारलं की, आपल्या ह्या काश्मीरमध्ये जास्तीत जास्त लोकं कुठून येतात? कोणत्या देशातून येतात? तेव्हा बर्‍यापैकी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक काश्मीरमध्ये नजरेस पडायचे. त्याने तात्काळ उत्तर दिलं, यहाँ जादा टुरिस्ट हिंदुस्तानसे आते है। माझं वय लहान होतं, अनुभव गाठीशी नव्हता, घटनेने दिलेले स्वतंत्र अधिकार ह्याची खोलवर माहीती नव्हती त्यामुळे त्याचं उत्तर खटकलं. मी त्यांना म्हटलं, लेकीन आप भी तो हिंदुस्तानी हो, मै दुसरे देशों की बात कर रही हूँ। तर म्हणाला, नहीं! ना हम हिंदुस्तानी है, ना पाकिस्तानी। हम दोनो से अलग है। हम कश्मीरी है। त्याच्या बोलण्यातला थोडासा कडवटपणा मला जाणवला आणि मी त्याबाबतीतल्या माझ्या चौकशा थांबवल्या. पण हे लोकं तेव्हाही आणि आजही आपल्या भारताचा उल्लेख हिन्दोस्तां म्हणून करतात. हिंदुस्तान हा शब्द त्यांनी आजतागायत जिवंत ठेवलाय.

चाळीस वर्ष काश्मीरला सतत जाणं येणं सुरू आहे. मध्ये कधी-कधी खंड पडायचा पण अगदी मागच्या पंधरवड्यापर्यंत काश्मीरमध्ये आमच्या सहली सुरू होत्या. सुधीरही पंधरा दिवसांपूर्वी कारगिल-अमरनाथ-श्रीनगरची वारी करून आले. आम्ही काय किंवा आमचे पर्यटक किंवा भारतीय नागरिक, सर्वांनीच काश्मीर कधीही आणि कितीही अशांत झालं तरी काश्मीरला जाणं सोडलं नाही. घरात तंटे-बखेडे होतात, अशांतता निर्माण होते, काही काळानंतर सर्व काही शांत होतं आणि आपण सगळे जवळ येतो तशीच भावना सर्वांची काश्मीरप्रती होती. पुलवामा अ‍ॅटकनंतर सहली सुरू करायच्या की नाही हा प्रश्‍न होता. पण पर्यटक आमच्यापेक्षा धाडसी म्हणायचे आणि तसेच आमचे टूर मॅनेजर्सही. दोघांचीही सततची मागणी असायची काश्मीर सहली सुरू करायची. आम्हीही त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून सहली सुरू ठेवायचो. गेल्या एप्रिलपासून सतत सहली सुरू होत्या. काश्मीर सहलींच्या बाबतीत पर्यटकही धीराने घ्यायचे. एकतर बुकिंग करतानाच त्यांना माहीत असायचं की कोणतीही अडचण कधीही उभी राहू शकते. कधी अचानक एखादी बातमी यायची आणि आम्हाला काश्मीरच्या नियोजित सहली त्यावेळी रद्द करून पुढे ढकलाव्या लागायच्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव, पण त्याबाबतीत पर्यटक परिस्थितीला समजून घेऊन सुट्टी घेतलेली असेल तर एखाद दुसरी सहल करायचे किंवा काहीजण म्हणायचे, जेव्हा परत काश्मीर सुरू होईल तेव्हा आम्ही जाऊ. पर्यटकांच्या या उत्साहाला दाद द्यावीशी वाटते. कधी-कधी सहलीवरही अडचणी यायच्या. आत्ता मागच्या महिन्यातल्या एक दोन सहलींना तर पहलगाम श्रीनगर मार्गावर आर्मी कॅम्पमध्ये रात्र काढावी लागली. आम्ही इथे काळजीत होतो तेव्हा आमचे टूर मॅनेजर्स आम्हाला सांगत होते, डोन्ट वरी, जवानांच्या सोबत रात्र काढायला मिळतेय, ते कसे इथे राहतात? काय खातात? किती खडतर आयुष्य जगताहेत? ते बघायला मिळतंय, नाहीतर ही संधी कधी मिळणार होती. पर्यटकही एक आगळा अनुभव म्हणून ह्याकडे बघताहेत. जय जवान। एकंदरीतच काश्मीरला त्याच्या  सगळ्या परिस्थितीजन्य गुणदोषांसह पर्यटकांनी आपलं म्हटलं होतं. जिथे जीवालाही कदाचित खतरा असू शकतो अशा ठिकाणी काश्मीरमध्ये जायला पर्यटक इतका अधीर का असतो, ह्याचं कारण आहे काश्मीरचं सौंदर्य. बादशहा अलाउद्दीन खिलजीच्या दरबारातील कवी अमिर ख़ुसरोने म्हटलंय नं, गर फिरदौस बर रुये ज़मी अस्त, हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त म्हणजे, ह्या धरतीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे आणि इथेच आहे. काश्मीरमध्ये जेव्हा पर्यटन प्रचंड प्रमाणात सुरू असायचं म्हणजे साधारण तीस वर्षांपूर्वीचा काळ, तेव्हा फक्त काश्मीरच्याच टूर्स असायच्या. जेव्हा काश्मीर अधूनमधून अशांत व्हायला लागलं तेव्हा आम्ही खरंतर पोटापाण्यासाठी इतर राज्यांच्या सहली सुरू केल्या आणि तिथे टूरिझम वाढायला लागलं. कुणी काहीही म्हणो काश्मीरची अशांतता हे दुसर्‍या राज्यांच्या पर्यटनवृद्धीचं कारण. अर्थात तेव्हा पर्यटक कमी होते पण आता कोट्यावधी भारतीयांना पर्यटनाची एवढी सवय लागलीय की आपल्या सुजलाम सुफलाम भारतातली विविधतेने नटलेली सर्व राज्यही अपूरी पडणार आहेत पर्यटनासाठी. आता अर्थातच काही काळ काश्मीर पर्यटनासाठी बंद राहील. काश्मीरच्या, काश्मीरी लोकांच्या उज्वल भवितव्यासाठी पर्यटनसंस्था आणि पर्यटक हा तात्पुरता विरह सहन करतील. पण हे भारताचं नंदनवन लवकरच नव्या दिमाखात-आणखी चांगल्या स्वरूपात आपल्या समोर येईल ही खात्री बाळगूया.

काश्मीरला भारताचं नंदनवन म्हणतात किंवा भारताचं स्वित्झर्लंड. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा प्रश्‍न केला, काश्मीरला भारताचं स्वित्झर्लंड म्हणतात त्याऐवजी स्वित्झर्लंडला युरोपचं काश्मीर का म्हणत नाहीत? अर्थात ज्यावेळी हा प्रश्‍न केला त्यावेळी मी स्वित्झर्लंड पाहीलं नव्हतं. जेव्हा पुढे मी स्वित्झर्लंड पाहीलं तेव्हा स्वित्झर्लंडच्या निसर्गसौंदर्याने वेडी झाले. पण जसा जास्त विचार करायला लागले तसं लक्षात आलं की स्वित्झर्लंडला काय किंवा भारतातल्या काश्मीरला काय निर्सगाने भरभरून दिलंय. तिथेही लेक्स आहेत, इथेही आहेत. तिथेही बर्फाच्छादित पहाड आहेत, इथेही आहेत, तिथेही नद्या आहेत, इथेही आहेत. हवा तशीच आहे, नैसर्गिक समानता आहे पण मानवनिर्मित सुखसुविधा आणि शांतता ह्यांची कमी आहे. निसर्गाने सर्व काही दिलंय किंबहुना स्वित्झर्लंडपेक्षाही जास्त. आपण मात्र आपल्या कर्तृत्वात कमी पडलोय. जे झालं ते झालं. काय झालं नाही? काय केलं नाही? कुणी केलं नाही? ह्या आरोप प्रत्यारोपात न पडता आपण पुढे काय करू शकतोय ते जरूरीचं आहे. आपल्या भक्कम सरकारने त्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलून सुरुवात केली आहे त्यांच्या पाठीशी सदिच्छेने आणि सकारात्मक मनाने राहूया. कारण इट्स हाय टाईम नाऊ! आम्ही काश्मीरमध्ये पर्यटकांना जेव्हा माहीती सांगायचो, तेव्हा म्हणायचो, काश्मीरमध्ये दोनच वर्ग आहेत, गरीब आणि श्रीमंत, इथे मध्यमवर्ग नाही.काश्मीर अशांत होत गेलं, श्रीमंत लोकं अधिक श्रीमंत होत गेली, गरीब आणखी गरीब होत गेले, दारिद्रयाचे दशावतार म्हणजे काय हे आत्ता जर तुम्ही काश्मीरला गेला असाल तर तुमच्यामागे लागणार्‍या घोडेवाले- खेचरवाल्यांवरून तुम्हाला कळलं असेल. काश्मीरमधल्या गरीब श्रीमंतांमधली ही दरी मिटविण्याची वेळ आलीय. कुणाला कधीही कुणाची हाजी-हाजी करायला लागू नये. खरंतर त्या घोडेवाल्यांना व्यवस्थित ऑर्गनाईज केलं तर अशी दयनीय विनवणी करण्याची गरजच पडणार नाही. पर्यटकांना स्नो पॉईंटवर जायला घोड्यांची गरज असते आणि ती सुविधा घोडेवाले पुरवतात. लेन-देनचा मामला. सगळ्याच ठिकाणी आपल्याला अशी एकमेकांची गरज असते. तिथे ऊँच-नीच, जी हुजूर! मामला कशाला पाहिजे? अर्थात हे काश्मीरमध्येच नाही तर संपूर्ण भारतातच झालं पाहिजे. असो. स्वित्झर्लंडला युरोपचं काश्मीर म्हटलं पाहिजे जगानेही, ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपल्या सरकारला लक्ष लक्ष सदिच्छा आणि शुभेच्छा!

काश्मीरपासून लेह लडाखला वेगळं केलं ही अनेक दृष्टीने चांगली गोष्ट झालीय पण पर्यटनक्षेत्राच्या दृष्टीने तर चार चाँद लागले म्हणायला हरकत नाही. जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमध्ये त्याच्या निसर्गसौंदर्यात, लोकांत, रुढी-परंपरात, धर्मात, विचारांत, भाषेत आणि भुगोलात जमीन आसमानाचा फरक. त्यांना वेगळं केल्यावर आत्ता प्रश्‍न पडतोय की, त्यांना एकत्र का ठेवलं होतं बरं? तसं बघायला गेलं तर जम्मू काश्मीरमधल्या अशांततेचा परिणाम हा लेह लडाखच्या विकासात अडथळा आणत गेला आणि त्यामुळे लेह लडाख किती मागासलेलं राहीलं हे आपण पर्यटकांनी तिथे गेल्यावर पावलोपावली पाहिलंय. आता लेह लडाख डायरेक्ट केंद्राच्या अखत्यारित आल्यावर तिथेही त्या पर्यटनसदृश प्रदेशात चांगले बदल होतील, तसंच देशाची मुख्य सरहद तिथे असल्याने त्या दृष्टीनेही हा बदल अतिशय महत्वाचा आणि हवाहवासा. दोन विभाग किती वेगळे होते ह्याचं एक ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा सरकारने दहा दिवसांपूर्वी श्रीनगर-काश्मीरमधल्या पर्यटकांना आणि अमरनाथ यात्रेकरूंना काश्मीरमधून लागलीच निघून जा असा इशारा दिला तेव्हा लेह लडाखच्या टूरिझमने फेसबूक ट्वीटरवर लिहिलं, तुमची यात्रा किंवा हॉलिडे प्लॅन अर्ध्यावर सोडू नका, लेहला या, इथे सर्व काही सुरक्षित आहे आणि तुम्ही इथे आल्यावर खूश व्हाल. यात्रा अपूर्ण राहीली किंवा काश्मीर पहायला मिळणार नाही ह्या जाणीवेनं हिरमुसलेल्या पर्यटकांना- यात्रेकरूंना त्या आपत्तीतही लेह लडाखच्या टूरिझमने दिलासा दिला आणि कश्मीर घाटीत अस्थिरता असूनही लेह लडाख मात्र शांत आहे हे दाखवून दिलं.

एकंदरीतच जे झालं ते फार चांगलं झालं. जरी मी एक सर्वसामान्य नागरिक असले, एक छोटी पर्यटन व्यावसायिक असले तरी देशाची एकसंधता अबाधित राहण्यासाठी सरकारने जे धाडसी व खंबीर पाऊल उचललंय त्याचं मन:पूर्वक अभिनंदन करते. मला खात्री आहे आपणही सर्वजण मनोमन हे अभिनंदन करीत असणार. चला, सर्वजण मिळून आपला देश सर्वार्थाने सुजलाम सुफलाम बनवूया. आत्ता आठवले ते आपला पहिला अंतराळवीर राकेश शर्माने उच्चारलेले शब्द जेव्हा त्याला इंदिराजींनी विचारलं, कैसा लग रहा है हमारा देश वहाँ से?, त्याने म्हटलं सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा।

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*