Marathi

घेणार्याने घेत जावे…

Reading Time: 4 minutes

एखादा कप किंवा काचेचं भांडं फुटलं की विखुरलेल्या सगळ्या काचा गोळा करून, पेपरमध्ये बांधून प्लास्टिकच्या पिशवीत घालून डस्टबिन जवळ ठेवायच्या, दुसर्‍या दिवशी सफाई करणार्‍या व्यक्तीला सांगून द्यायच्या, काचा त्यांच्या हाताला लागू नयेत म्हणून, ही पद्धत आपली. पण तिकडे असं भांडं फुटलं की त्याचे सुटे भाग गोळा करून त्याला सोनं मिश्रीत गोंदाने चिकटवून आणखी सुंदर बनवलं जात

‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे’.. काही काही कवितांच्या ओळी आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. सतत काहीतरी देत राहणे हा आपला धर्म आहे, आणि असायलाच हवा. गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट मानसिक संतुलन बिघडवते. अर्थात गरज किती आहे हे ही समजलं पाहिजे आपल्याला हा महत्त्वाचा भाग. गरजेपेक्षा जास्त खाण्याचा, पिण्याचा, शॉपिंगचा, वस्तू गोळा करण्याचा विपरीत परिणाम प्रथम अमेरिकेत जास्त प्रकाशझोतात आला, ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी’ने त्यांना पछाडलं. त्यातून कसं सुटायचं ह्यासाठी कन्सलटंटस्ची गरज भासायला लागली. ऑर्गनाईज्ड होम्स, ऑर्गनाईज्ड लाईफ, ऑर्गनाईज्ड हेल्थ ह्या गोष्टी चार्ट बस्टर्स झाल्या. ‘ऑर्गनाईज्ड वे ऑफ लाईफ इन ऑल सेन्स’ ह्याच्याखाली मोठी इंडस्ट्री निर्माण झाली. आणि त्या सर्वांनी मिळून ‘नो प्रॉब्लेम्स ऑफ प्लेंटी’ वाल्या एशियन कल्चरचाच आधार घेतला. हा आपल्या अभिमानाचा भाग. अर्थात ग्रेट अमेरिकन्सचं आणि त्यांच्या सवयींचं आंधळेपणाने अनुकरण करणार्‍या, तसंच मॉल-सेल संस्कृतीला बळी पडलेल्या आणि फास्टफूड संस्कृतीला प्रतिष्ठा दिलेल्या आपल्याला ह्या ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी’ने घेरायला घेतलंय हे मात्र नक्की. वेळीच जागं व्हायला पाहिजे किंवा आपल्याला त्याची जाणीव होतेय ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापेक्षा दुसर्‍याला ज्याची जास्त गरज आहे ती वस्तू दुसर्‍याला देणं ह्यात धर्म आहे. आपली गरज भागलीय पण दुसर्‍याला त्याची गरज असू शकते हे समजून ती वस्तू दुसर्‍याला देणं ह्यात कर्म आहे. दुसर्‍यांना प्रचंड गरज आहे आणि आपल्याकडे ती गोष्ट गरजेपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त असूनही आपण त्यांना ती न देणं ह्यात हव्यास आहे जो स्वत:चंच नाही, समाजाचंच नाही तर एकूणच वैश्‍विक संतुलन बिघडवायला कारणीभूत ठरतंय.

खरंतर प्रत्येकाने देणारं आणि घेणारंही असावं, आणि घेता घेता देणार्‍याप्रमाणे आपणही देणारं व्हावं. आपल्या प्रत्येकात घेणार्‍यापेक्षा देणारा जास्त असावा ही जगन्नियंत्याची इच्छा असावी पण बर्‍याचदा चित्र किंवा सरासरी टक्केवारी उलटी दिसते आणि समतोल ढासळतो. आपण प्रत्येकाने स्वत:ला जर काही ठराविक कालावधीनंतर तपासत राहिलं, ठीक करीत राहिलं तर स्वत:चा आणि कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा आणि देशाचा बॅलन्स साधण्यात आपलं अंशत: योगदान राहिल. जगाच्या कोलाहलात-येणार्‍या नॉट सो इझी भविष्यात शरीराचा मनाचा विचारांचा आचारांचा सवयींचा जीवनशैलीचा ताळमेळ राखणं ही फार महत्त्वाची गोष्ट असणार आहे.

‘मी नक्की कोण आहे? देणारी की घेणारी? की दोन्ही? की दोन्ही नाही?’ हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा दचकायला झालं. स्वत:चं परिक्षण करायला चांगले आहेत नं हे प्रश्‍न. माझ्या बाबतीत तर मला ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा मराठी बाणा समोर दिसायला लागला. ‘मी कुणाला काही देणार नाही आणि मी कुणाकडून काही घेणार नाही’ हा बाणा धोकादायकच वाटला मला. कारण ह्या ‘मोडेन पण वाकणार नाही’वर एका नाटकातलं वाक्य मला आठवलं, ‘मोडेन पण वाकणार नाही म्हणता म्हणता आपली बरीचशी माणसं मोडूनच गेली’. माझंही असंच झालं तर? नको नको आपण स्वत:ला एवढं कठीण तर्‍हेने तपासू नये. थोडं नमतं घ्यावं. प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतं तसं आपल्यातही असेलंच, आपणच आपला पेपर थोडा सोप्या तर्‍हेने तपासूया. दयाळू बुद्धीने हा पेपर तपासल्यावर मला थोडी वेगळी तर्‍हा नजरेसमोर आली आणि कवितेच्या ओळी मला वेगळ्याच दिसायला लागल्या. ‘घेणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने देत जावे, देता देता एक दिवस घेतलेल्याला अंगिकारावे।’.

आपल्या सभोवताली सतत काहीतरी घडामोडी होत असतात. त्यातल्या मोडामोडीपेक्षा घडण्यामध्येच मला जास्त इंटरेस्ट, मोडण्यामधूनही काही सांधण्याकडे जास्त कल. सध्याच्या चावून चोथा झालेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या मार्गदर्शक भाषेत ह्याला पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड असं म्हटलं जातं, मानसिक सकारात्मकता. शब्द घिसापिटा असला तरी सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्याला ज्याला ही सकारात्मकता जन्मजात देन म्हणून मिळालीय ते प्रचंड नशीबवान पण ज्यांनी ती आत्मसात केलीय त्यांचं खास अभिनंदन. कारण एकदा का ही सकारात्मकता अंगात भिनली की, ‘प्रॉब्लेम अपॉर्च्युनिटीमध्ये, फ्रस्ट्रेशन सॅटिस्फॅक्शनमध्ये, संकट आव्हानामध्ये, एक्सक्यूजेस सोल्युशनमध्ये, भय निर्भयतेत, अनिश्‍चितता आत्मविश्‍वासात, निराशा आशेमध्ये आणि अपयश यशामध्ये कधी बदललं जातं ते आपल्यालाही कळत नाही’. सकारात्मकता अंगी बाणविण्यासाठी आपली निरीक्षणशक्ती आणि आकलनशक्ती मजबूत असायला हवी कारण आपला आसमंत सतत आपल्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी प्रदर्शनास ठेवीत असतो, त्याच्या निरीक्षणातून चांगल्याचं आकलन होऊन ते आपल्या बुद्धिपटलावर-मानसिक संगणकावर नोंदविण्याची कला आपल्याला जमली पाहिजे.

माझ्या बाबतीत सुदैवाची गोष्ट अशी की कार्यक्षेत्र मिळालं ते पर्यटनाचं. देशविदेश पालथे घालण्याची सुवर्णसंधी. पर्यटक म्हणून आलेल्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या माणसांना भेटणं, असोसिएट म्हणून जोडल्या गेलेल्या अनेक देशांमधल्या आणि राज्यांमधल्या व्यावसायिकांना भेटणं, जिथे जातो तेथील विविध धर्माच्या स्थानिकांशी सुसंवाद साधणं, अनेक राज्यांची-देशांची लोककला-संस्कृती-परंपरा-रीतीरिवाज-भाषा-भोजन-भूगोल ह्याची जवळून ओळख होणं ह्या गोष्टी पायाशी चालून आल्या. आव्हानं आली, परिश्रम करावे लागले (अर्थात ते कुणाला चुकलेयत?) पण क्षेत्रच इतकं आवडीचं आणि हवंहवसं मिळालं की आयुष्यात काम कधी काम वाटलंच नाही. मनाची कपाटं कधी नको त्या विचारांच्या किंवा भूतकाळातील घटनांच्या जळमटाने भरलीच नाहीत. त्याचा फायदा असा झाला की जगाच्या पर्यटनातून जे जे काही चांगलं दृष्टीला पडायचं, ज्यातून काही शिकायला मिळायचं त्या सगळ्या गोष्टी मनाच्या रिकाम्या कपाटात कोरल्या जाऊ लागल्या. निरीक्षणाचा, त्यातून काहीतरी शिकण्याचा माझा हव्यास वाढू लागला. ‘घेणार्‍याने घेत जावे…’ च्या फंदात माझी मानसिक संगणकाची हार्ड डिस्क फुल्ल झाली. कुठचीही कपाटं ओसंडून वाहणं मग ती नकोशा गोष्टींनी असोत किंवा हव्याशा गोष्टींनी, ती स्थिती वाईटच. मग झाली लिखाणाला सुरुवात, माझी ही आठवणींनी-अनुभवांनी भरलेली कपाटं खाली करायची होती ती. म्हणजे लिखाणाला सुरुवात स्वार्थातून झाली म्हणायची. आणि मग पर्यटनासोबतच सुरू झाला लिखाणाचा प्रवास. तो संवाद बनला हे मला कळलं जेव्हा वीणा वर्ल्ड झालं तेव्हा. माझी ओळख शून्य झाली होती पण ह्या लेखनाच्या प्रवासाने एक आगळी ओळख दिली होती, ज्याद्वारे महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती सदिच्छा-शुभेच्छा आणि पर्यटनाच्या स्वरुपात पाठी उभी राहिली. आमची उमेद वाढवून गेली.

पर्यटनातून दरवेळी अनंत गोष्टी शिकायला मिळतात, त्यातल्या काही लिहिता-लिहिता आठवल्या. मनाच्या जडणघडणीसाठी कोणत्या देशाने सर्वात जास्त शिकवलं असेल तर ते जपानने. हा देशच वेगळा आहे. धर्माला महत्त्व देणारा पण त्याचं अवडंबर न माजविणारा, कुटुंबवत्सल, शांत, नम्र, शालीन, अदबशीर असा असूनही आर्थिक-व्यावसायिक बाबतीत आक्रमक धडाडी आणि जिद्दीच्या जोरावर जगाच्या पुढे राहणारा त्याचसोबत संयमाचा संदेश देणारा जपान प्रत्येक भेटीत वेगळा भासतो, पुन:भेटीचं आमंत्रण देतो. अत्याधुनिकता-तांत्रिकता ठायी ठायी दृष्टी पडताना ‘किन्सुगी’ सारखी अतिप्राचीन गोष्ट उराशी कवटाळताना ही माणसं दिसतात. एखादं भांडं फुटलं तर ते वाया जात नाही त्याचे भाग जोडून त्याला आणखी सुंदर केलं जातं. टाकाऊतून टिकाऊपेक्षाही पुढचं पाऊल. आयुष्याच्या तत्त्वज्ञानाशी ह्याचा किती गहिरा संबंध आहे नाही. एकाच वेळी पोलाईट आणि स्ट्राँग कशी काय राहू शकतात ही माणसं. कठीण आहे पण अशक्य नाही आणि हे त्यांनी दाखवून दिलंय. जपानच्या बाबतीत अशा अनंत गोष्टी आहेत ज्या आपण घेऊ शकतो.

प्रत्येक देश काहीतरी चांगलं शिकवत असतो. ते घेत राहिलं पाहिजे, देत राहिलं पाहिजे आणि अंगिकारताही आलं पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*