खरंतर खूप सोप्पं आहे ते…

0 comments
Reading Time: 7 minutes

जगातली गुंतागूंत वाढत चाललीय. सुखसोयी पायाशी हात जोडून उभ्या आहेत आणि सुखशांतीसाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागताहेत. जगातल्या घडामोडींवर आपला ताबा नाही पण आपल्या वैयक्तिक जगावर आणि ते जग चालविणार्‍या आपल्या मनावर बरंच काही अवलंबून आहे. आपल्या आणि आपल्या परिघामधल्या मनामनांमधले गोंधळ कमी करून आयुष्य सहज सोप्पं करता आलं पाहिजे.

पर्यटनक्षेत्राचा विचार केला तर वीणा वर्ल्डने आज बर्‍यापैकी स्थान प्रस्थापित केलंय आणि बस्तान बसवलंय असं म्हणायला हरकत नाही, पण जेव्हा इतर व्यवसायांचा आणि संस्थांचा विचार येतो तेव्हा वीणा वर्ल्ड अतिसुक्ष्म आहे ह्याची जाणीव होते. आपण अजुनही खूप लहान आहोत हे वीणावर्ल्डमधल्या प्रत्येकाला समजणं फार महत्वाचं आहे ज्याने पाय सतत जमिनीवर राहतात आणि डोकं धडावर. संस्था वाढतेय ह्यात वाद नाही आणि कोणताही व्यवसाय हा सतत वाढत राहिला पाहिजे, मोठा झालाच पाहिजे. अंतिम ध्येय-लक्ष्य हे नेहमी क्षितीजापल्याडच दिसायला हवं, ते आवाक्यात आलं की वेग मंदावतो त्यामुळे अंतिम ध्येय कधीही अंतिम नसणं व ते पुढे पुढे जात राहणं ह्यात व्यवसायवृध्दी आहे. व्यवसायात अजिबात समाधानी नसणं आणि वैयक्तिक आयुष्यात-कुटुंबात-घरात असेल त्यात पूर्ण समाधानी असणं ही गुरूकिल्ली आहे. ह्यात गल्लत झाली की अडचणींचा समुद्र समोर उभा ठाकलाच. असो. पर्यटकांच्या पाठिंब्यामुळे, भारतातील-जगभरातील पार्टनर्सच्या सहकार्यामुळे आणि वीणा वर्ल्ड टीमच्या अथक परिश्रमामुळे वीणावर्ल्ड वाढतंय. संस्था वाढायला लागली की वैयक्तिक लक्ष कमी होतं ही भिती प्रत्येक व्यवसायाला आहे आणि त्यामुळे संस्थाही वाढवायची पण वैयक्तिक लक्ष कमी होऊ द्यायचं नाही, पर्सनल टच घालवायचा नाही ही तारेवरची कसरत असते आणि ती कसरत करायला आम्ही आनंदाने तयार आहोत.

प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देण्यासाठी, ‘पर्सनल टच’ प्रत्येक स्तरावर जागृत ठेवण्यासाठी वीणा वर्ल्डमधली प्रत्येक व्यक्ती-एकेक टीम मेबंर मनापासून आनंदाने कार्यरत असली पाहिजे. फक्त मॅनेजमेंट, फक्त मॅनेजर्स किंवा इन्चार्जेसचं असं एकट्या दुकट्याचं ते काम नाही. संपूर्ण संस्था जेव्हा त्या एका लक्ष्यापाठी पेटून उठेल तेव्हाच ते गाठता  येतं. सध्या अकराशेची ऑफिस व टूर मॅनेजर्स टीम आणि दोनशे प्रीफर्ड सेल्स पार्टनर्रची आठशे नऊशे जणांची टीम धरली तर आम्ही दोन हजार जण पर्यटकांच्या दिमतीला आहोत. एखाद्याकडून झालेली चूक संपूर्ण संस्थेला इजा पोहोचवू शकते त्यामुळे प्रत्येक माणसाला प्रत्यक्ष भेटणं ह्या व्हर्च्युअल एजमध्ये महत्वाचं झालंय. किमान दोन वर्षातून एकदा प्रिफर्ड सेल्स पार्टनर्सना भेटणं, वर्षांतून एकदा जगभरातील असोसिएट सप्लायर्सना भेटणं, सहा महिन्यातून एकदा प्रत्येक डिपार्टमेंटच्या टीमला भेटणं, तीन महिन्यातून एकदा मॅनेजर्स आणि इनचार्जेसना भेटणं, महिन्यातून एकदा स्ट्रॅटेजी बाऊंड डिपार्टमेंट्सना भेटणं आणि दिवसातून एकदा एखाद्या महत्वाच्या प्रॉब्लेम-प्रोसेस-स्ट्रॅटेजी-इनोव्हेशन-अपग्रेडेशनवर समोरासमोर बसून चर्चा करणं हे आम्ही आमचं कार्यचक्र बनवलंय. संवादाने आणि चर्चेने एखादी अडचण सोडविण्यात खूप काही हाती लागतं. माणसं कळतात, त्यांच्यातली कौशल्य नजरेस येतात. त्यांना आणखी चांगली संधी देता येण्यासारखी असेल तर ती देता येते. जसजशी संस्थेची घडी बसत गेली गेल्या पाच वर्षात तसतशी आम्ही प्रत्येकजण स्वत:ला आणि सर्वांनाच बदलत्या जगाच्या बदलत्या वातावरणाप्रमाणे अ‍ॅडजस्ट करीत गेलो. तसं बघायला गेलं तर रोजच जुन्या पध्दतींमधल्या चांगल्या गोष्टी, नव्या मधल्या चांगल्या गोष्टी घेत त्याचा समन्वय साधत एकमेकांना घडविण्याचा प्रयत्न करतोय.

देशविदेशातला अखंड प्रवास सुरू असताना आपल्या संस्थेतल्या लहानातल्या लहान व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे आणि वेळ पडली तर त्या व्यक्तीला आपल्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तसेच छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर आपली नजर असली पाहिजे, एवढी ओपन-अलर्ट-फ्लॅट ऑर्गनायझेशन करण्यावर आम्ही भर दिलाय. आणि महत्वाचं म्हणजे आपली नजर सर्वत्र असली किंवा लहानातल्या लहान माणसापर्यंत आपल्याला पोहोचता येत असलं तरी रोजच्या कामात आपली ढवळाढवळ नको, ज्यांना त्यांना-ज्याचं त्याचं काम संस्थेच्या कार्यपध्दीनुसार स्वतंत्रपणे करू देणं, त्यात त्यांची निर्णयक्षमता वाढवणं, कार्यपूर्तीचा आणि समाधान प्राप्तीचा आनंद त्यांना घेऊ देणं हे आपलं काम. आपण एकेकटे काहीच करू शकत नाही पण आपल्यासारखी ध्येय्याने प्रेरीत झालेले अनेकजण एकत्र आल्यावर तीस वर्षाचं काम तीन वर्षात करू शकतो ही वस्तूस्थिती आहे जी वीणा वर्ल्डने निर्माण केलीय आणि ती निश्‍चितपणे कोणत्याही नव्याने उद्योग सुरू करणार्‍या तरूणाईला प्रेरणादायी ठरू शकेल. कोणत्याही मॅनेजरला-लीडरला सर्वांच्यात राहूनही सर्वांतून अलिप्त राहता आलं पाहिजे. वाचन-विचार-चिंतन-मनन ह्या गोष्टींनी स्वत:ला समृद्ध करता आलं पाहिजे. कोणत्याही छोट्या मोठ्या टीमचं नेतृत्व करताना त्या मुखियाची वैचारिक-मानसिक-बौधिक क्षमता उजवी असणं फार गरजेचं आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आणि वर्षभराच्या ठरलेल्या मिटिंग्जमध्ये भेटल्यावर आम्ही ऐकमेकांना विचारांनी समृध्द करायचा प्रयत्न करतो. तुझे चांगले विचार, माझे चांगले विचार एकत्रितपणे मांडले तर विचारांचा खजिना दुप्पट झाला की.

मागच्या पंधरवड्यात अशीच एक मिटिंग सुरू होती, डिपार्टमेंट होतं एअर रीझर्वेशन्स. वीणा वर्ल्डमधलं हे मोठं डिपार्टमेंट, पन्नासएक जणांचं. देशविदेशातील सहलींना येणार्‍या पर्यटकांसाठी किमान दोन लाख तिकिटं हे प्रतिवर्षी काढत असतात. जगभरातील बर्‍याच एअरलाईन्सशी त्यांचा सबंध असतो. थोडक्यात महत्वाची जबाबदारी. कालपरत्वे कुणी सोडून जाणं, वाढत्या कामांमुळे नवीन मेंबर्सची भरती होणं हे घडत असतं. दर सहा महिन्यांनंतरच्या ह्या मिटिंगमध्ये नव्या जुन्या अशा सर्व टीमसोबत संवाद सुरू होता. नवीन मंडळी आधी कुठे जॉब केला? तिथल्या चांगल्या गोष्टी काय? इथे काय आवडलं? एखादी सुधारणा सुचवाविशी वाटते का?  ह्यावर आपली मतं मांडत होते. मयुरा पाटिल म्हणाली, ‘सकाळी उठल्यावर मला ऑफिसला यावंसं वाटतं म्हणजे मला वाटतं मी खूश आहे इथे.’ वा! एका वाक्यात तिने वर्क-लाईफ बॅलन्स एकदम सिम्प्लिफाय करून टाकला. जेव्हा एवढ्या सहजपणे आनंदी आयुष्याचं मर्म आपल्या एखाद्या टीममेंबरकडून येतं तेव्हा, ‘युरेका! यु सेड इट’ म्हणावसं वाटतं. प्रत्येक मिटिंगमध्ये माझी रीक्वेस्टच असते टीमला – स्वत:ला चेक करा, डोन्ट ड्रॅग युवरसेल्फ! आणि हे करण्याचा सोपा उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर ऑफिसला जायचा उत्साह वाटतो का? अरे वा! चला ऑफिसला जाऊ आणि कामाचा फडशा पाडू अशी धारणा असते का सकाळी सकाळी? ऑफिसमध्ये आल्यावर आनंदाने एकेक काम हातावेगळं करता येतं का? हा झाला आपल्या प्रोफेशनल लाईफचा भाग. दुसरा भाग आहे तो आपल्या वैयक्तिक आयुष्याचा. ऑफिसची कामं वेळेत संपली की घरी जायची ओढ किती आहे तेही चेक करा. जेवढा ऑफिसला यायचा उत्साह आहे तेवढाच ऑफिसमधून घरी जायचा आहे का? जर असेल तर तुमचं घर सेट आहे आणि पर्सनल लाईफ सॉर्टेड आहे. नसेल तर मात्र समथिंग इज राँग समव्हेअर, जे लवकरात लवकर ठाकठिक करायला हवं. आपण टीमच्या पर्सनल आयुष्यात डोकावू शकत नाही पण ऑर्गनायझेशन म्हणून जे करता येईल ते करायचा प्रयत्न करतो जेणेकरून प्रत्येकाच्या वैयक्तीक आयुष्यची घडी ते नीट बसवू शकतील. फ्लेक्सी ऑफिस इनटाईम, रविवारी सुट्टी, इमर्जन्सी वगळता संध्याकाळी साडेसात-आठनंतर अजिबात ऑफिसमध्ये थांबू नका. जास्त ऑर्गनाइज्ड व्हा आणि वेळेत काम पूर्ण करा, कामांचा व्याप असणार आहे पण त्याचा ताण येणार नाही अशी संस्कृती रुजवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यात बर्‍यापैकी यश येताना दिसतंय.

प्रत्येकाने स्वत:ला अशा तर्‍हेने चेक करण्यामध्ये सर्वांचाच फायदा असतो. संस्थेमधला उत्साह अशा आनंदी माणसांमुळे वाढतो, संस्था सकारात्मकतेकडे झुकायला लागते. निश्‍चितपणे संस्थेच्या यशस्वीतेची वाटचाल गतिमान बनते. वैयक्तिक फायदा म्हणजे उत्साह, आनंद आणि हे  सकारात्मकतेने केलेलं काम आनंद बनून जातं. कसलाही ताण वाटत नाही. प्रकृतीस्वास्थ्य उत्तम राहतं. आयुष्याला हसत खेळत सामोरं जायची मानसिकता वाढीस लागते. कधी कधी मला जाणवतं की एखाद्या व्यक्तीचा कामातला रस कमी झालाय तर मग रीक्रुट-रीव्ह्यु-रीलोकेट-रीलिझ ह्या तंत्रानुसार संबधित व्यक्तीशी संवाद साधून सल्लाही दिला जातो कारण निरुत्साह आणि नकारात्मकता ही संस्थेला जितकी घातक त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वैयक्तीक आयुष्याला धोकादायक. निगेटिव्हिटीकडे वळण्याआधी ट्रॅक बदला हा माझा आग्रह असतो. आयुष्य अनमोल बहुमोल आहे आणि ते वाचलं पाहिजे, सावरलं पाहिजे. म्हणूनतर या सहजसोप्या टेक्निकचा अट्टाहास.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*