ईझी लेझी कॉस्ट सेव्हर युरोप

0 comments
Reading Time: 8 minutes

फॅशनच्या दुनियेत जुनी फॅशन नव्या रुपात येताना आपल्याला सतत दिसत असते. हॉलीवूड बॉलीवूड अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स आणि जगभर चालणार्‍या फॅशन शोजमध्ये कधी आपण एकदम हटके अशी इनोव्हेटिव्ह क्रीएटिव्हिटी बघतो तर कधी काही कलाकृतींवर व्हिक्टोरियन आर्यन इजिप्शियन मौर्यन अशा युगांमधल्या वेगवगेळ्या डिझाईन्सचा प्रभाव जाणवतो. आजचं नवं कोरं उद्या जुनं होत असतं आणि आधीचं जुनं परवा नव्या स्वरूपात आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं. प्रत्येक वेळी एक वर्तूळ पूर्ण होताना दिसतं. फक्त फॅशनमध्येच नाही तर आपल्या आयुष्यात पदोपदी आपल्याला अशी वर्तूळं पूर्ण होताना दिसतात. आमच्या पर्यटनक्षेत्रातही अशीच काहीशी स्थिती आम्हाला दिसतेय.

प्रवास ह्या गोष्टीची सुरुवात माणसाबरोबरच झाली. प्रथम अन्नासाठी दाही दिशांना भटकंती व्हायची. त्यानंतर शिकार आणि लूट ह्यासाठी वणवण सुरू झाली. वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध लावून त्यावर मालकी गाजवणं सुरू झालं आणि ब्रिटिशांनी जास्तीत जास्त जग शोधून त्यावर राज्य केलं. नव्या जागेचा शोध लावण्यासाठी होणार्‍या धाडसी प्रवासातून जगाला अनेक एक्सप्लोरर्स मिळाले. अमेरिकेला शोधून काढणारा इटालियन ख्रिस्तोफर कोलंबस आणि अमेरिगो व्हेस्पूची, भारताच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवणारा पोर्तुगिज वास्को द गामा, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला जगाच्या नकाशावर आणत पॅसिफिक महासागराला गवसणी घालणारा ब्रिटिश जेम्स कूक, अंटार्क्टिकावर स्वारी करणारा नॉर्वेजियन रोआल्ड अ‍ॅमंडसन, युरोपातून आशियाकडे कूच करीत ईस्ट इंडिया-चायनाचा नवा मार्ग शोधणारा व्हेनिशियन इटालियन मार्को पोलो, पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घालणारा पोर्तुगिज फेर्डिनांड मॅगलेेन, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील ऑर्मस्ट्राँग… अशा अनंत धाडसी व्यक्तींच्या शोधक वृत्तीमुळे जग माहीत झालं आणि ते जगाचे पहिले-वहिले पर्यटक ठरले. तसं बघायला गेलं तर ह्याच्याही आधी पर्यटनाचा आद्यप्रणेता किंवा पहिला पर्यटक कोण असेल तर तो आहे आपला गणपती बाप्पा . पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाने उंदराच्या पाठीवर बसून जगप्रदक्षिणा केली. आम्ही उगाच नाही प्रत्येक सहलीच्या सुरुवातीला ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया आणि उंदीर मामा की जय’ असा उद्घोष करतो. असो.

अन्नासाठी, शिकारीसाठी, लुटमारीसाठी होणार्‍या प्रवासानंतर आलं ते यात्रा पर्यटन. हिमालयाच्या उंचच उंच स्थळी वसलेल्या तीर्थस्थानांना भेट देण्यासाठी लोकं दुरदुरून यायला लागले. चौदाव्या-पंधराव्या शतकात युरोपमधील श्रीमंत रोमन लोकांनी आनंदासाठी निसर्गरम्य ठिकाणी जायला सुरुवात केली आणि आनंदी पर्यटन सुरू झालं. मार्कोपोलोने बाराव्या शतकात चोवीस वर्ष प्रवास केला त्याच्या शोधक पर्यटनासाठी, आपण मात्र चोवीस तास विमानात बसायच्या विचारानेही अस्वस्थ होतो. जमाना कसा बदलत गेला ते बघणंही एक खूप छान अनुभूती असते.

पूर्वीचं शिकारीसाठी भटकणं आत्ताचं जंगल टूरिझम झालं अर्थात शिकार वगळून. पूर्वीच्या दर्यावर्दी खलाशांनी केलेल्या सागर सफरी आता क्रुझ टूरिझममध्ये परावर्तित झाल्या. पूर्वीच्या शिडाच्या बोटीचा प्रवास आता अ‍ॅडव्हेंचर टूरिझम म्हणून नावारुपाला आला. काठीला सोनं बांधून काशीला जाणारी यात्रा आत्ता स्पिरिच्युअल टूरिझममध्ये मानाचं स्थान मिळवून गेलीय. वर्तूळ पूर्ण होतं ते असं. फक्त श्रीमंतांची मक्तेदारी असलेलं पर्यटन आता जगातल्या प्रत्येकासाठी खुलं झालं, अफोर्डेबल बनलं. आणि त्यामुळेच जगातल्या दोन नंबरच्या इंडस्ट्रीचं स्थान टूरिझम इंडस्ट्रीला मिळालं, मॅन्युफॅक्चरिंग पहिलं आणि आयटी इंडस्ट्री तिसरं. ह्यावरून आपल्याला पर्यटन ह्या क्षेत्राची व्याप्ती, महत्त्व आणि भविष्य ह्या गोष्टींची कल्पना येईल.

अनादीकालापासून अनंतकालापर्यंत पर्यटन सुरूच राहणार आहे, ते पूर्वी कधी थांबलं नाही, आत्ता ते सुरूच आहे आणि पुढेही कधी त्याला सॅच्युरेशन येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि म्हणूनच भविष्यकाळावर राज्य करणार्‍या ह्या इंडस्ट्रीचा एक अंश असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पर्यटन क्षेत्राशी माझा पस्तीस वर्षांचा परिचय. त्यात प्रवाशांची, पर्यटकांची अनेक स्थित्यंतरं पहायला मिळाली. आयटिनरी डिझायनिंग, प्लॅनिंग, मार्केटिंग, स्ट्रॅटेजी बिल्डिंग हे माझे आवडीचे विषय. रोज काहीतरी नवीन करायला मिळायच्या संधी उपलब्ध होत गेल्याने आयुष्य एकदम इंटरेस्टिंग बनून गेलं. त्याचाच परिपाक म्हणजे वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह टूर्स. प्रत्येक घर वेगळं आहे आणि घरातला प्रत्येकजण वेगळा आहे. घर एकसंध ठेवायचं असेल तर घरातल्या प्रत्येकाचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, त्याच्या आवडीनिवडी- मतं ह्यांचा सन्मान करता आला पाहिजे. हे प्रत्येक कुटुंब म्हणजे आमचे अन्नदाता, त्यामुळे आम्हीही त्यांच्या आवडी निवडींचा आदर करीत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारातलं पर्यटन सुरू केलं. महिलांसाठी वुमन्स स्पेशल, ज्येष्ठांसाठी सीनियर्स स्पेशल, नवविवाहीतांसाठी हनिमून स्पेशल, आजी आजोबा नातवंडांच्या मुलायम नात्यासाठी ग्रँड पॅरेंट्स स्पेशल, मध्यमवयीन जोडप्यांसाठी ज्युबिली स्पेशल, स्वतंत्रपणे आयुष्य झेलणार्‍यांसाठी सिंगल्स स्पेशल, फक्त छोटी सुट्टी मिळणार्‍यांसाठी शॉर्ट ट्रिप्स…… वेगवेगळ्या उपक्रमांनी भारतातलं पर्यटनविश्‍व समृद्ध करण्यात योगदान देता आलं ह्याचं खूप मोठं समाधान आहे. वर्षातले तीनशे पासष्ट दिवस पर्यटन सुरू राहिलं पाहिजे हे ठरवलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलंही. अर्थात सर्व संघटितांच्या विचार-कृती-परिश्रम ह्यामुळे हे शक्य होत गेलं, प्रत्येक गोष्टीला यश मिळत गेलं.

एकदा मी आणि सुधीर आम्ही युरोप सहलींची मुहूर्तमेढ रोवण्याआधी अभ्यास म्हणून लंडनच्या एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत स्कॉन्डिनेव्हियाला गेलो होतो. सहल छान होती, एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे दररोज अर्धा दिवस स्थलदर्शन असायचं आणि अर्धा दिवस मोकळा ठेवलेला असायचा. गाईड त्यावेळी ऑप्शनल टूर्स घ्यायला लावायची. त्यातलीच एक सहल आम्ही चारशे डॉलर्सना घेतली. आणि जाऊन बघितलं काय तर पूर्वी स्कॅन्डिनेव्हियन लोक कसं रहायचे? चुलीवर जेवण कसे करायचे? टांगलेल्या झोळीत लहानग्याला कसं झोपवायचे… वगैरे वगैरे. कपाळावर हात मारला, आणि आपसूक तोंडातून शब्द बाहेर पडले, ‘‘हात्तिच्या आमचं बालपण तर असंच गेलं, युरोपीयन्सना त्याचं अप्रुप. ह्यासाठी आपण एवढे पैसे मोजले?’’ बसमध्ये रोज ऑप्शनलसाठीच्या पैशाचीच चर्चा. सुधीरला तिथेच म्हटलं, ‘‘आपण जेव्हा युरोप सहली सुरू करू तेव्हा जे-जे काही बघण्यासारखं आहे ते सर्व आपल्या सहलीत समाविष्ट करूया. ऑप्शनल टूर्सचं झंझट आणि त्याची चर्चा ह्याला वाव देऊन सहलीवरचं वातावरण बिघडवायचं नाही’’. आणि आम्ही ते पाळलं. ‘एकदाच जाताय तर सर्व बघून घ्या’वाल्या अक्षरश: ‘कॅरी झिरो मनी’ अशा आमच्या सहली पर्यटकांना भावल्या आणि आज भारतात आणि जगभरात सर्वच ठिकाणी तुम्हाला मोठ्या संंख्येने वीणा वर्ल्डचे पर्यटक ह्या फुल्ली सर्व्हिस्ड टूर्सना आलेले दिसतील.

अगदी पहिल्या पहिल्या युरोप अमेरिकेच्या सहलींना भारतीय भोजन अनेक ठिकाणी मिळायचं नाही त्यामुळे ब्रेकफास्ट डिनरवरच पेटपूजा केली जायची. आपल्या भारतीय मनाला दुपारच्या भोजनाची सवय त्यामुळे शरीराला भूक लागो वा न लागो मनाला मात्र भूक लागायची आणि थोडंसं कासाविस व्हायला व्हायचं. त्यावेळी वाढत्या पर्यटक संख्येचा दाखला देऊन तेथील रेस्टॉरंट्सना विनंती करून आम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर सर्व सहलींवर सुरू केलं अगदी अंटार्क्टिकालासुद्धा. ह्याचा फायदा असा झाला की पर्यटकांनी आम्हाला अव्वल नंबरवर नेऊन ठेवलं, त्यांचं तन-मन-धन आम्ही व्यवस्थित जे ठेवलं होतं. सहलीत जास्तीत जास्त स्थलदर्शन देत असल्याने पैशाचा पूर्ण मोबदला देऊन ‘धन’ ह्या गोष्टीची काळजी घेतली गेली. ब्रेकफास्ट लंच डिनरने पोट भरलेलं असल्याने तन उल्हासित राहिलं. टूर मॅनेजरमुळे सहलीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडत राहिला आणि पर्यटकांचं मन शांत राहिलं. वीणा वर्ल्डच्या सहली म्हणजे ‘ऑल इनक्लुसिव्ह ऑलवेज’ हा शिक्का चांगल्या अर्थाने बसला आणि आजतागायत त्याबरहुकूम सहली सुरू आहेत.

दोन महिन्यांपूर्वी आमचा लाडका टूर मॅनेजर राहूल देसाईचा मेसेज व्हॉट्स अ‍ॅप वॉलवर झळकला. सहली अपग्रेड करण्यात, त्यात बदल करण्यात पर्यटकांच्या फीडबॅकचा जसा फायदा होतो तसाच तो आमच्या टूर मॅनेजर्सच्या सूचनांचाही होतो. त्याचं म्हणणं, ‘आपण लेझी टूर्स आणूया. आपल्या सहली सर्व समाविष्ट आहेत, अफोर्डेबल आहेत आणि पर्यटकांना त्या प्रचंड आवडताहेत हे सगळं खरं असलं तरी एक वर्ग असा आहे ज्याला एवढं सगळं बघायचं नाहीये, त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे, एक एक करीत त्यांना जग पालथं घालायाचंय, दुपारचं जेवण कट केलं तरी चालेल पण आपण एकदम रॉक बॉटम प्राईसमध्ये अशा लेझी टूर्स आणूया. ‘लेझी’ शब्द थोडा नकारात्मक आहे तरी तो आपण घेऊया’ राहूलचं म्हणणं बरोबर होतं. अधूनमधून पर्यटकांकडूनही खासकरून यंगस्टर्स कडून अशा सूचनाही येत होत्या. आम्हालाही वाटायला लागलं होतं की सर्वांसाठी सर्व काही करणार्‍या आपण ह्या रॉकबॉटम प्राईसवाल्या तरीही काहीही ऑप्शनल नसलेल्या ब्रेकफास्ट डिनरवाल्या सहली आणूया.

एकूणच इथेही एक वर्तूळ पूर्ण होताना दिसत होतं. पूर्वी फक्त ब्रेकफास्ट डिनरवाल्या सहलीत लंच नसणं हा वीकनेस असायचा. आता पर्यटकांचा छोटा समूह म्हणतोय ‘नो लंच प्लीज’ जमाना बदलतोय, आपल्यालाही बदलायला हवं! अ‍ॅज फास्ट अ‍ॅज पॉसिबल. तसंही डॉक्टर दिक्षित ह्यांच्या ‘फक्त दोन वेळा जेवा’ ह्या क्रांतीने सध्या अनेकांनी तीन मधल्या एका जेवणाला काट दिलीय. त्यांना कशाला तिसर्‍या जेवणाचा खर्च? असं म्हणत आम्ही ‘लंच नसणं’ ही ह्या कॉस्ट सेव्हर टूर्सची स्ट्रेंन्थ बनवली. राहूलने दिलेला ‘लेझी’शब्द त्यासोबत ‘ईझी’जोडून देखणा करून टाकला. आणि या आठवड्यात लाँच झाल्या वीणा वर्ल्ड स्टाईलमधल्या ‘ईझी लेझी कॉस्ट सेव्हर युरोप टूर्स’. त्यामुळे आता युरोप बघणं झालं आणखी सोप्प. चलो, बॅग भरो, निकल पडो!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*