Marathi

इस साल पक्का!

Reading Time: 5 minutes

वर्षाची अखेर हा पीक सीझन असतो जिमनॅशियम्स, योगा इन्स्टिट्युटस्, हॉबी क्लासेस, न्युट्रिशनिस्ट, लाईफस्टाईल कोचेस, शूज कंपनीज्, जीम सूट्स, ट्रॅक सूट्स,स्विम सूट्स सायकल शॉप्स इत्यादी सगळ्यांचा आणि हे फक्त आपल्या भारतातच नाही तर जगात सर्वत्र. आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक वर्ष सातत्याने मी ही अनेक जिमनॅशियम्सना डोनेशन्स दिली आहेत. हो! डोनेशन्सच म्हणायचं त्याला, कारण पैसे द्यायचे आणि विसरून जायचं. यावर्षी मात्र माझा इरादा पक्का आहे…

नवीन वर्ष सुरू होऊन सहा दिवस झालेसुद्धा. खरंतर गेलं संपूर्ण वर्ष इतकं फास्ट गेलं की नवीन वर्षात काय काय करायचं ह्याचा विचार करायलाच वेळ मिळाला नाही. या वर्षीची रीझॉल्युशन्स करण्याची मजाच मी हरवून बसले. माझी रीझॉल्युशन्स न झाल्यामुळे अ‍ॅक्च्युअली अनेकांचं नुकसान झालं असणार. आणि माझ्यासारखे अनेक असतील तर त्यांना व्यावसायिक फटका बसला असणार, नवीन वर्ष येणार म्हणून माझ्या मनात थुई-थुई कारंजी उडायला सुरुवात होते साधारणपणे नोव्हेंबरच्या अखेरीस. किती म्हणून गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात त्या सगळ्याच्या सगळ्या येत्या नवीन वर्षात मला पूर्ण करायच्या असतात, आणि त्या मी करणारच असते. देवाने मला प्रचंड आशावादी बनवलंय. पण कोणत्या गोष्टी करायच्यात त्या कुठेतरी लिहायला पाहिजेत, त्यासाठी माझी डायरीची शोधाशोध सुरू होते. आता एवढी सगळी कामं करायची त्याची सुरुवात-शेवट हे सगळं नोंदवायचं तर डायरी तेवढीच छान असायला हवी नाही का? म्हणजे वीणा वर्ल्डची डायरी असते पण ती रोजच्या ऑफिसच्या कामासाठी. हे जे काही मी नवीन वर्षात करणार असते ते भन्नाट किंवा आऊटस्टॅडिंग असतं त्यामुळे डायरीही तशीच लागते. जिथे डायरीज मिळतात अशी इथली जवळपासची सगळी दुकानं पालथी घातली जातात तरी मनासारखी डायरी मिळत नाही. तेवढ्यात जर एखादी परदेशवारी असेल तर तिथेही डायरीचा शोध घेतला जातो. बर्‍याच ठिकाणी डायर्‍यांमध्ये त्यांच्या लोकल भाषेत काही लिहिलेलं असतं. माझ्या ‘मेरा भारत महान’ मन:स्थितीला ते पटत नाही आणि संपूर्ण वर्षाची मांडणी मी ज्या डायरीत करणार असते ती परदेशातून का घेऊ? ‘बी इंडियन बाय इंडियन’ वरचं माझं देशप्रेम उचंबळून येतं आणि मी पुन्हा एकदा माझी महत्त्वाची डायरी घेण्यासाठी जवळपासची बुक स्टोअर्स नव्या दृष्टीने पालथी घालते आणि मला हवी तशी डायरी मिळते. डायरी आणल्यानंतर तिच्या नव्याकोर्‍या पानांचा सुगंध घेणं, त्यामध्ये चांगला बुकमार्क ठेवणं, ती डायरी लिहिण्यासाठी नेमकं कोणतं पेन वापरायचं? कोणत्या रंगाची शाई वापरायची? हे सगळं ठरलं की ते वेगळं पेन त्या डायरीवर ठेवायचं. ह्या पेनाला कोणी हात लावायचा नाही, हलवायचं नाही अशी सक्त ताकीद घरातल्यांना दिल्यावर ती डायरी आणि ते पेन माझ्या टेबलावर विराजमान होतं. दिवसातनं एकदातरी ती डायरी प्रेमाने गोंजारली जाते कारण माझं भविष्य असतं नं त्यात.

त्यानंतर मी बीझी होते बाकीच्या गोष्टी एकत्र करण्यात. माझ्या डॉक्टर सरीता डावरे किंवा डॉक्टर जगन्नाथ दिक्षित किंवा डॉक्टर ऋजुता दिवेकर सर्वांनी रोज एक तास व्यायाम कंपल्सरी करायला सांगितलाय. खुल्या हवेत चालणं किंवा सायक्लिंग करणं किंवा जीने चढणं किंवा पोहणं ह्यातलं मी नेमकं काय करू ह्यावर डायनिंग टेबलवर चर्चा होते. ‘वीणा माझ्यासोबत एमसीए ला येत जा, आम्ही बॅडमिंटन खेळतो तोपर्यर्ंत तू वॉक घे’ सुधीरचा सल्ला. पण अहोंचं ऐकणार कोण? मला लहानपणी सायक्लिंग खूप आवडायचं. आपण एक सायकल आणूया का? हल्ली छान सायकली आल्यात आणि आपल्याकडे सकाळी आणि रात्री रस्ते मोकळे असतात, सायक्लिंग हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे, माझं पोटपण कमी होईल. ‘मम नो सायक्लिंग अ‍ॅट ऑल! कुठे पडलीस बिडलीस तर काय? आणि सकाळी आणि संध्याकाळी स्पीड रेसर्स किती वेगात गाड्या चालवतात हे ऐकू येतं नं आपल्याला. सायकल आणायची नाही’. नीलचा सज्जड दम. मग मी असं करते आपल्या बिल्डिंगचे जीने चांगले आहेत, मोठे आहेत, स्वच्छ असतात त्यावर रोज वर-खाली करते. हार्टला हे चांगलं असं म्हणतात. ‘मम पण त्या जीन्यावर कुणीच नसतं, इट्स नॉट गूड फॉर युवर सेफ्टी आणि मध्येच दम लागून पडलीस तर, आम्हाला कसं कळणार?’ राजने ‘नॉट अ गूड आयडिया’ करीत आपलं मत नोंदवलं. मग पर्याय उरला स्विमिंगचा. स्विमिंग कसं वाटतं? इट इज द बेस्ट एक्सरसाईज म्हणतात, अष्टांगाला व्यायाम होतो. आणि मला स्विमिंग येतं, तसंही बिल्डिंगच्या पूलमध्ये फारसं कुणी नसतं, इट्स लाईक प्रायव्हेट पूल, सुधीर तू येशील का माझ्याबरोबर? माताजी आमचं हे कॉनव्हर्सेशन ऐकत असतात, त्या अचानक तोंड उघडतात आणि टोमण्याने सुरुवात करतात, ‘म्हणजे मला तसं काही कळत नाही पण मी त्यादिवशी टीव्हीवर ऐकलं की सतत एकच व्यायाम करू नये. त्याचा शरीरावर परिणाम होत नाही, व्यायाम अधुनमधून बदलत रहावा’. अरे वा! आजीबाईनी चांगला सल्ला दिला होता. रोज एकच व्यायाम करून कंटाळा येईल तसाही तेव्हा सायक्लिंग सोडून, म्हणजे मी कधीतरी सायकल घेणार नीलला पटवून, इच्छा अपूरी राहायला नको आणि सायकलवाल्यांची इकॉनॉमी सुधारण्यास फुल ना फुलाची पाकळी असं योगदान द्यायलाच हवं नं. सो स्विमिंग आणि वॉक ह्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर पुढचं काम असतं ते शॉपिंगचं. ऑनलाईन शॉपिंगवर बर्‍याच ऑफर्स असतात हे ऐकून मी एक अख्खा दिवस घालवते आणि काही स्विमिंग कॉश्‍च्युम्स आणि जॉगिंग ट्रॅक सुट्स सिलेक्ट करून ठेवते आणि सुनिलाला दाखवते. ‘वीणा मागे मी ऑनलाईन मागवले हे कपडे पण बरोबर नाही निघाले, तू स्टोअरमध्ये जाऊन ट्राय करूनच घे, दॅट्स बेटर’ झालं माझा एवढा ऑनलाईन सर्फिंगचा वेळ वाया गेला म्हणायचा. मग उरल्यासुरल्या रविवारी सुरू होतं मॉलमध्ये भटकणं, नाइकी, पुमा, अदिदास, स्पीडो, डाईव्ह ह्यातला नेमका कोणता ब्रँड चांगला ह्यावर ही अनेक मतांतरं. तेव्हा ‘ऐकावं जनाचं करावं मनाचं’ हे शहाणपण आठवून मी शूज, सॉक्स, ट्रॅक सूट्स, स्विमिंग कॉश्‍च्युम ह्या सर्वांची खरेदी करते, त्यातही मी एक सेट ह्या कंपनीचा, दुसरा दुसर्‍या कंपनीचा, तिसरा तिसर्‍या कंपनीचा असे तीन सेट आणते. एक प्रवासाच्या बॅगेत आणि दोन इथे घरी असताना. तीन कंपन्यांना बिझनेस देण्याचं भाग्य मला लाभतं, प्रत्येकाचा बिझनेस सुरू राहिला पाहिजे. तर अशा तर्‍हेने व्यायाम ह्या न्यू इयर रीझॉल्युशनची तयारी होते.

आता त्या पुढचा माझा हल्ला असतो तो माझ्या सर्व सवयींवर. अनेक सवयी मला लावून घ्यायच्या असतात आणि त्याला न्यू ईयरचा पहिलावहिला नवा कोरा दिवस ह्यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता असणार? रोज डायरी लिहायची सवय मला लावून घ्यायची असते. रोजचा व्यायाम तर मस्टच. सकाळी पाचला उठणे, रात्री दहाच्या आत झोपणे, बाहेरचं अरबट चरबट न खाता घरचं न्युट्रिशियस फूड खाणे. काय खायचं, कधी खायचं त्याची लिस्ट करणे. कार्बोहायड्रेट्स- प्रोटीन्स- फायबर ह्यातला फरक समजणे, किती कॅलरीज दिवसात गेल्या पाहिजेत त्याचा अभ्यास करणे. घर आणि ऑफिसमधलं डेस्क साफ ठेवणे, वेळेत ऑफिसला जाणे, वेळेत ऑफिसमधून निघणे. कामं वेळच्यावेळी करणे, चालढकल करायची सवय तोडणे, न रागावणे, कामं डेलिगेट करणे, सुधीरशी वादविवाद न करणे, दुसर्‍यांचं ऐकणे, स्वत:ला शहाणं न समजणे, दुसर्‍यांनाही कळतं हे मान्य करणे, मेडीटेशन करणे, श्‍वसनाचे व्यायाम करणे, योगाभ्यास रोज किमान पंधरा मिनीटं तरी करणे , म्युझिक ऐकणे, रोज आठ तास झोपणे, देवाला नमस्कार करून घराबाहेर पडणे, कमी बोलणे, आठवड्यातून एखादं नाटक वा सिनेमा बघणे. अधुनमधून आईबाबांना भेटणे, अगदीच बावळटासारखं न राहणे, थोडीफार फॅशनही करणे, वर्षातून एकदा फिजिकल चेकअप करणे. मेंटल चेक-अप करायची गरज वाटत नाही कारण तसा बॉर्न जादा शहाण्यांमध्ये माझा वरचा नंबर आहे आणि तशी मला खात्री आहे. डान्स शिकणे-कुणीतरी म्हटलंय की एकतरी हॉबी असलीच पाहिजे, महिन्याला एक पुस्तक वाचणे…

अ‍ॅक्च्युअली हे सगळं मी गेल्यावर्षी लिहायला घेतलं एकतीस डिसेंबरच्या रात्री, त्यातच दोन वाजले रात्रीचे, चार फुलस्केप भरले. दुसर्‍या दिवशी म्हणजे नूतन वर्षाच्या पहिल्या सोमवारी उठायलाच दहा वाजले, आठ तासांची झोप महत्त्वाची. ते एकच काम पहिल्या दिवशी जमलं आणि दरवर्षीप्रमाणे गेलं संपूर्ण वर्ष संपलं तरी माझी लिस्ट काही पुरी झाली नाही. जे कपडे आणले होते त्यातले काही अजून कपाटातच पडलेत टॅगसह.

अर्थात अगदीच काही जमलं नाही असं नाही. आठ तास झोप घ्यायची ठरवली ती सात तासांवर आली. कधी वॉक तर कधी स्विमिंग सुरू राहिलं, वजनही कमी झालं. खाण्याच्या बाबतीत थोडी जागरूकता आली. जेवणातलं ऑईल कमी झालं, अधे-मध्ये खायची सवय जवळजवळ गेली. झोपेची आणि उठायची वेळ बर्‍यापैकी पाळली जाऊ लागली. ‘लवकर नीजे, लवकर उठे त्यास ज्ञान आरोग्य संपत्ती मिळे’ असं आमच्या गावच्या मराठी शाळेतल्या भिंतीवर लिहिलं होतं ते पन्नाशीनंतर आचरणात आलं हे ही नसे थोडके. आता नवीन काही करण्यासाठी मी नवीन वर्षाची, नव्या महिन्याची, सोमवारची किंवा एक तारखेची वाट बघत बसत नाही. शुभस्य शीघ्रमची सवय लागतेय.

गेल्या वर्षी ठरविलेल्या अर्ध्या गोष्टी झाल्या नाहीत. ज्या झाल्या नाहीत त्या ह्या वर्षात करणार, आणि समजा ह्याही वर्षात झाल्या नाहीत त्यातल्या काही तरी आय अ‍ॅम ओके, लाईफ इज ऑल्सो अबाऊट इम्प्र्फेक्शन! नो बडी इज परफेक्ट. मी प्रयत्न करायचे थांबवणार नाही हे निश्‍चित. आधी म्हटलं तसं आशावाद प्रचंड आहे. ‘इस साल पक्का’ हा निर्णय मी घेतलाय. जरी ह्या नवीन वर्षाच्या सहा दिवसांत काही झालं नाही तरी मी ते करायचंच हे ठरवलंय. आणि ठरवलं की अर्ध काम झालं असं म्हणतात. विश मी गूडलक आणि माझ्यासारखे जे आहेत त्यांना माझ्याकडून गूडलक!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*