Our contact numbers are currently down. Please reach us at travel@veenaworld.com or 8879973807 or 9152004513. We apologize for the inconvenience

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

केल्याने देशाटन...

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 21 July, 2024

गेला दीड महिना आम्ही आणि आमच्या पर्यटकांनीही आरामच केला म्हणायचा. एकदम सुशेगाद. अर्थात हेच दीड महिने असतात थोडं शांत निवांत व्हायचे. आता पुन्हा सुरू होईल पर्यटकांची आणि आमचीही धावपळ. वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पर्यटन सुरू असलं तरी दिवाळी ख्रिसमस हे समर व्हेकेशननंतरचे बिझी बिझी महिने. त्याचं बुकिंग आत्ता सुरू झालंय आणि त्यामुळेच माझं नेहमीचं मुक्तचिंतन मी थोडंसं बुकिंग ह्या विषयाकडे वळवलंय.

काहीजणं पहिल्यांदाच पर्यटनाला निघालेली असतात तर काही एकदम सीझन्ड ट्रॅव्हलर्स असतात. काही वर्षाला एकदा प्रवासाला निघतात तर काही दोन वा तीन वर्षांतून एकदा. कोविडनंतर पर्यटकांच्या पर्यटनामध्ये काही बदल झालेले जाणवतात ते म्हणजे पर्यटक वर्षाला दोन दोन तीन तीन टूर्स करताहेत. काही पर्यटक तर एकाचवेळी तीन चार टूर्स बूक करतात. मी आणि सुधीरही कोविडनंतर जरा जास्त पर्यटन करू लागलोय. ‌‘कल किसने देखा है? आजचा दिवस आनंदात घालवूया‌‘ ही मानसिकता ह्यामागचं एक कारण असावं असं वाटतं. दुसरं कारण म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीच्या जगात, स्पर्धेच्या युगात माणसं कामाच्या दबडग्यात एकमेकांना भेटेनाशी झाली आहेत. टूरवर गेलं म्हणजे सगळे किमान एका जागी तर असतो. बॉलिवूडमधल्या एकाने सांगितलेला किस्सा आठवला. ‌‘आम्ही शुटिंग बाहेरच्या देशांमध्ये करतो कारण तिथे सगळे जण एकाच ठिकाणी असतात, बाहेरचा देश असल्याने सगळे शिस्तीत असतात, वेळेवर येतात, नो टँट्रम्स‌‘. छोट्या मोठ्या कुटुंबांचही तसंच. इथे एकमेकांना प्रत्यक्ष भेटायची मारामार, तिथे सगळे एकत्र. टूर असेल तर शेड्युल असतं, नसेल तरीही गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असतात. आपण एकमेकांचे एकमेकांसाठी किमान सात आठ दिवस असलो की तेवढी ती मिळकत पुरते वर्षभरासाठी. हल्ली बऱ्याचदा मुलं युके युएसए वरून येतात जपानला आणि आईबाबा इथून जातात जपानला, एक मस्त फॅमिली गेटटुगेदर होऊन जातं त्या जपानच्या टूरवर किंवा कस्टमाईज्ड हॉलिडेमध्ये. म्हणजे जपानसारखं कोणतंही अधलमधलं ठिकाण ठरवलं जातं आणि फॅमिली गेटटुगेदर तसंच एखादा नवीन देश बघून होतो. एकटे एकटे फिरणारे पर्यटकही खूप मोठ्या संख्येने पर्यटन करताहेत. ते कधी पाठीवर हॅवरसॅक बांधून सोलो ट्रॅव्हलचा आनंद अनुभवतात तर काहीजण सिनियर्स स्पेशल वा वुमन्स स्पेशलला जॉइन होतात. ह्या दोन स्पेशालिटी टूर्सवर तुम्ही एकटे असलात तरी तुम्हाला सेम जेंडर पार्टनर द्यायची गॅरंटी वीणा वर्ल्डची असल्याने ‌‘सिंगल सप्लिमेंट‌‘ साठी जादा भरावे लागणारे पैसे वाचतात. अर्थात अनेक पर्यटक आजकाल स्वत:साठी सेपरेट रूम मागतात आणि एक्स्ट्रा पैसेही भरतात. त्यांना स्वत:ची प्रायव्हसी किंवा स्वत:ची संगत जास्त प्यारी असते. आणि का नाही. मलाही स्वत:ला माझी प्रायव्हसी आवडते. ‌‘इफ यू कॅन, एन्जॉय, लाड करा स्वत:चे, लेट्स लव्ह अवरसेलव्हज्‌‍‌‘.

‌‘आम्ही आता पर्यटनाला सुरूवात करतोय, नेमकं कसं प्लॅनिंग करू?‌‘ पहिल्यांदा कुठे जाऊ?' असे प्रश्न आमच्या प्रत्येक सेल्स ऑफिसमध्ये विचारले जातात. आणि त्यासाठीच हे लिखाण. आधी आपण भारतातल्या पर्यटनाकडे आपला मोहरा वळवूया. 'आपला विविधरंगी बहुढंगी भारत आधी बघून घेऊया आणि मग परदेशाचा विचार करूया‌‘ असं एक समीकरण पुर्वी होतं. आता ते रद्दबातल झालंय. जमाना बदललाय, विचार बदललेयत, जग जवळ आलंय, प्रत्येक भारतीय आता ग्लोबल नागरिक झालाय त्यामुळे आपल्या भारताची जशी आपल्याला ओळख झाली पाहिजे तेवढंच जगही आपल्याला कळलं पाहिजे. मग आपल्या सवडीनुसार, आवडीनुसार आणि बजेटप्रमाणे पर्यटक एका वर्षी भारतातली सहल तर दुसऱ्या वर्षी परदेशातली सहल असं वेळापत्रक आखतात. काहीजण वर्षाच्या तीन महत्वाच्या सुट्ट्यांमध्ये तीन वेगवेगळ्या टूर्स करतात. एक भारतातली, एक शेजारच्या जवळच्या देशाची आणि एक दूर देशीची. म्हणजे बघानं, मे महिन्यात युरोप, दिवाळीत केरळ आणि ख्रिसमसमध्ये दुबई अबुधाबी. सगळ्यांच्याच बाबतीत वर्षाला तीन तीन टूर्स शक्य होणार नाहीत पण किमान एका टूरसाठी सेव्हिंग करणं हे अगदी `मस्ट' करून टाकायचं आपल्यासाठी. हे मी पर्यटनसंस्था चालवतेय म्हणून नाही सांगत, पण गेल्या चाळीस वर्षात मी स्वत:मध्ये आणि अनेकांमध्ये पर्यटनामुळे झालेले आमूलाग्र बदल पाहिले आहेत. पर्यटनाचे अनेक फायदे आहेत. मी तर ‌‘पर्यटन म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची शाळा' असंच म्हणते. कवी मोरोपंतांनी म्हटलंय नं, `केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार'. खरं आहे ते. आजकाल आपल्या सेव्हिंग्जमध्ये `पर्यटन' ह्या गोष्टीने जागा बनवलीय. 'अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सेव्हिंग्ज आणि पर्यटन' असं समीकरण बनलंय. आपल्या आयुष्यातल्या पहिल्या पाच महत्वाच्या गोष्टींनंतर पर्यटनाचा नंबर लागलाय हेही नसे थोडके. सो तीन नाही पण दोन टूर्स वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये ठेवाव्या. त्याप्रमाणे सुट्टीचं प्लानिंग करावं आणि पैशाचंही. आणि दोन जमल्या नाहीत वेळेमुळे किंवा बजेटमुळे तर एकतरी टूर करायचीच. घराबाहेर- व्यवसायाबाहेर-ऑफिसबाहेर पडायचंच. नेहमीचा माहौल एकदम नजरेआड करायचा. नवीन काही बघायचं, त्यातून शिकायचं, तिथे मिरवायचं, तुमचा मूड कसा मस्त बदलेल बघा. रीज्युविनेशनचा खरा अर्थ आपल्याला उमजतो तो पर्यटनामुळेच. घराचा उंबरठाही म्हणत असतो, `कभी तो निकल पडो यार!‌’

प्लॅनिंग कसं करावं ह्याकडे पुन्हा एकदा येऊया. आपण आधी आपल्याला स्वतःला जज करावं. आपण एखादा`ट्रॅव्हल गोल‌’ घेणार आहोत की जेव्हा सर्व दृष्टीने शक्य होईल तेव्हा फिरणार आहोत? हे जाणणं महत्वाचं. आयुष्यात जर समजा दहा भारतातल्या आणि दहा परदेशातल्या टूर्स करायच्या असतील तर त्यात  महत्वाच्या स्थळांमध्ये किंवा टूर्समध्ये समावेश करावा लागेल तो आपल्या बहुढंगी भारतातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव देणाऱ्या, काश्मीर, लेह लडाख, मनाली, सिक्किम, आसाम, अरुणाचल, अंदमान, तामिळनाडू, केरळ आणि राजस्थान. परदेशातल्या दहा सहलींची सुरूवात साउथ ईस्ट एशियाने करावी. थायलंड, व्हिएतनाम, जपान, बाली, युरोप, ऑस्ट्रेलिया, युएसए, आफ्रिका, आणि मध्ये कुठेतरी भूतान आणि नेपाळ. हे दहा देश आपल्याला निश्चित जगभ्रमंतीचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान देतील. एकदा का हे देश करायचे ठरलं की नेमके कधी करायचे ते ठरवायचं. म्हणजे मुलं जाणती झाली, त्यांच्या इतिहास भूगोलात आर्कीटेक्चर, आर्कियॉलॉजी, वैगेरे संबंध यायला लागले की त्यांना युरोप, अमेरिकेला न्यायचं. जे जे कठीण किंवा खूप चालायला लागतात असे देश वयाच्या साठीपूर्वी किंवा पासष्ठीपूर्वी केलेले बरे. हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा प्लॅनिंग व्यवस्थित होईल. त्यामध्ये एक दोन वर्ष इथे तिथे होतीलही, नेव्हर माईंड, प्लॅनिंग करणं महत्वाचं. माझा आयुष्यभराचा अनुभव आहे. मनापासून केलेल्या इच्छा आणि त्याला दिलेली प्रयत्नांची जोड ह्यामुळे गोष्टी घडतात आपल्याला हव्या तशा. काळाप्रमाणे वयाप्रमाणे आपल्या आवडीनिवडी बदलतात. म्हणजे कधी आपण एका झटक्यात दहा बारा देश बघतो तर कधी आपल्याला एकावेळी एक देश असं पर्यटन करायला आवडतं. ह्याबाबतीत माझा एक सल्ला असा असेल की जर युरोपला जायचं असेल तर आधी मिनिमम दहा ते पंधरा दिवसांची मल्टीकंट्री म्हणजे 8 ते 10 देशांची टूर करावी. एकतर युरोप कसा आहे त्याची कल्पना येते आणि दुसरं म्हणजे आपल्याला युरोपमधलं नेमकं काय आवडलं ते कळतं. पुढे आपण आवडलेल्या देशांची एक्सक्लुसिव्ह टूर करू शकतो. आपल्या प्रत्येक राज्यात आणि जगातल्या प्रत्येक देशात एवढं काही बघण्यासारखं आहे की एका भेटीत ते सगळं बघणं केवळ अशक्य. म्हणजे बघानं केरळच्या एका छोट्याशा राज्याचा विचार केला तर आमच्याकडे सहा, आठ, दहा, पंधरा दिवसांच्या चार प्रकारच्या टूर्स आहेत, केरळसाठी असलेली कस्टमाईज्ड हॉलिडे पॅकेजेस किंवा सिनियर्स स्पेशल, वुमन्स स्पेशलच्या टूर्स वेगळ्याच. जगातला ग्रीस हा छोटा देश घेतला तर त्यासाठीही वीणा वर्ल्डकडे हायलाइट्स ऑफ ग्रीस, बेस्ट ऑफ ग्रीस आणि ऑल ऑफ ग्रीस अशा तीन प्रकारच्या एक्सक्लुसिव्ह टूर्स आहेत, आणि टर्की बरोबर किंवा इजिप्त सोबत कॉम्बिनेशनमध्येही टूर्स आहेत. सो एक राज्य वा एक देश किती ऑप्शन्स आपल्याला देतो बघा.

आम्हाला कल्पना आहे की, माणसं एका कुटुंबात  रहात असली तरी त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. कुणाला माऊंटन्स आवडतील तर कुणाला बीचेस, कुणाला हिमालयात उंचावर शांत निवांत रहायला आवडेल तर कुणाला लंडन, न्यूयॉर्क, टोकियो मधली गजबज आवडेल. कुणी एकावेळी आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त बाहेर पडणार नाहीत तर कुणी वीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांच्या टूर्स करतील. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि एक पर्यटनसंस्था म्हणून आम्हाला वेगवेगळे ऑप्शन तयार ठेवले पाहिजेत त्यांच्यासाठी जे आम्ही सतत करीत असतो आणि म्हणूनच म्हणतो, `वीणा वर्ल्ड-प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी‌’.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

पृथ्वीच्या पाठीवरचे काही भाग निसर्गसंपदेने इतके समृध्द असतात की विचारू नका. जगाच्या दक्षिण गोलार्धात पहुडलेला साउथ अमेरिका हा खंड याचं उत्तम उदाहरण आहे. जगातला सर्वात उंचावरून कोसळणारा ‌‘एंजल फॉल्स‌’ या खंडात आहे, तशीच आकारमानाच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेली ‌‘ॲमेझॉन नदी‌’ ही सुद्धा याच खंडात आहे. जगातलं सर्वात कोरडं वाळवंट ‌‘अटाकामा‌’ जसं या खंडात आहे त्याचप्रमाणे जगातलं सर्वात मोठं रेन फॉरेस्ट ‌‘ॲमेझॉन रेन फॉरेस्ट‌’ ही याच खंडात आहे. जगातलं एक अनुपम निसर्गशिल्प - इग्वासू वॉटर फॉलसुद्धा या खंडात आहे. जगातला सर्वात प्रसिध्द धबधबा म्हटल्यावर अनेकांना अर्थातच ‌‘नायगरा फॉल्स‌’ आठवतो, पण दक्षिण अमेरिकेतल्या या इग्वासू फॉल्सच दर्शन घेतल्यावर यु.एस.ची फर्स्ट लेडी एलेनॉर रुझवेल्ट आपसूक म्हणाली होती, ‌‘पुअर नायगरा‌’. नायगराही बिच्चारा ठरेल असा इग्वासू फॉल्स अर्जेंटिना आणि ब्राझिल या देशांच्या हद्दीत विभागला गेला आहे. तसा हा एकच धबधबा नाही, इथे पाण्याच्या तब्बल 275 धारा ओसंडून कोसळतात. त्यामुळे अनेक वाद्यांनी मिळून एक सिंफनी वाजवावी तसा अनेक जलधारांचा जलघोष इथे भरून राहिलेला असतो. इग्वासू नदीच्या प्रवाहात तयार झालेल्या या धबधब्याबद्दल एक स्थानिक लोककथाही आहे. स्थानिक जमातीमधील सौंदर्यवती नैपी हिच्या सौंदर्याची भुरळ प्रत्यक्ष देवालाही पडली, मात्र नैपीचे त्यांच्या जमातीतील तारोबा या योध्यावर प्रेम होत, या दोघांनी पळून जायचं ठरवलं. त्यांना होडीत बसून नदीतून जाताना पाहून संतापलेल्या देवाने नदीचा प्रवाहच तोडला आणि त्यांची होडी उलटवली. देवाच्या ह्या कोपातून नदीचा प्रवाह भंगला आणि इग्वासू धबधबा तयार झाला अशी इथल्या स्थानिकांची समजूत आहे. ब्राझिलमधील टुपी या स्थानिक जमातीच्या भाषेतील शब्दांनी ‌‘इग्वासू‌’ हे नाव बनले आहे आणि ह्याचा अर्थ होतो ‌‘बिग वॉटर‌’. इग्वासूमधल्या जलधारा सरासरी 210 फुटांवरून कोसळतात. काही मोठ्या धारा 269 फुटांवरूनही कोसळतात. या धबधब्याच्या धारेपैकी जवळपास अर्धी धार कोसळते ती ‌‘डेव्हिल्स थ्रोट‌’ नावाने प्रसिध्द असलेल्या घळईमध्ये. हे करालमुख अडीचशे ते तीनशे फूट रुंद आहे आणि 230 ते 260 फूट खोल आहे. ही घळई या धबधब्याला दोन देशात विभागण्याचं काम करते. उजव्या काठावरचा भाग ब्राझिलमध्ये येतो तर डाव्या बाजूचा भाग अर्जेंटिनामध्ये येतो. ब्राझिलकडच्या बाजूला ‌‘फोझ दो इग्वासू‌’ हे गाव आहे तर अर्जेंटिनाच्या बाजूला ‌‘प्युएर्तो इग्वासू‌’ हे गाव आहे. या धबधब्याचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत करण्यात आला आहे. असा हा डोळ्यांचे पारणं फेडणारा इग्वासू फॉल्स दोन्ही देशांमधून पहायला वीणा वर्ल्डची साऊथ अमेरिका टूर अवश्य करावी.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

रीफ्रेशिंग रीचार्ज

पर्यटन तुम्हाला रुटीनमधून बाहेर काढतं. पर्यटन तुमच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतं. पर्यटनामुळे तुम्ही नवीन प्रदेश बघता, नवीन पदार्थ खाता, वेगळ्य़ा संस्कृतीची झलक बघता आणि त्यामुळेच आम्हाला पर्यटन म्हणजे एक रीफ्रेशिंग रिचार्ज वाटतो. आम्हाला दोघांनाही प्रवासाची, पर्यटनाची मनापासून आवड आहे त्यामुळे आम्ही वर्षातून किमान दोन टूर्स तरी करतोच. पुणेकर म्हटल्यावर आम्ही चोखंदळ असणारच, साहजिकच कुठे सहलीला जायचं, याबरोबरच कोणाबरोबर सहलीला जायचं याला आम्ही महत्व देतो. 2014 मध्ये आम्ही पहिल्यांदा वीणा वर्ल्डबरोबर हिमाचल सहलीचा अनुभव घेतला आणि तेव्हा आमची वीणा वर्ल्डबरोबर नाळ जुळली ती कायमची. आत्तापर्यंत वीणा वर्ल्डबरोबर सुमारे अकरा सहली केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही 17 देश बघितले. या सगळ्या देशांमधली स्कँडेनेव्हियाची सहल आम्ही कधीच विसरू शकत नाही. युरोपच्या उत्तरेकडचा हा सगळा भाग अप्रतिम निसर्गाने नटलेला आहे. त्यातही नॉर्वेमधील ‌‘बर्गेन‌’ शहराचा अद्वितीय नजारा आजही जसाचा तसा आमच्या नजरेसमोर आहे. `द फियोर्ड कॅपिटल‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्गेनमधून आम्ही जी क्रुझ सफर केली ती सुध्दा आठवणीत कायमची कोरली गेली आहे. आमची पर्यटनाची एक पध्दत आहे, आम्ही एकदा एका खंडातले देश बघायला सुरुवात केली की मग लागोपाठ त्याच खंडातील सहली करतो. युरोप बघताना आम्ही याच प्रकारे वेस्टर्न युरोप, इस्टर्न युरोप, सेंट्रल युरोप आणि स्कँडेनेव्हिया बघितला. भारतातल्या आवडत्या पर्यटनस्थळांबद्दल सांगायचं तर आम्ही ‌‘राजस्थान‌’ ला पहिला नंबर देऊ. ‌‘पधारो म्हारे देस‌’ म्हणून आर्जवी आमंत्रण देणारं हे राज्य जसं राजेशाही आहे तसंच त्याला अनोख्या निसर्गाचं वरदानही लाभलेलं आहे. तिथले आलिशान पॅलेसेस, भव्य किल्ले यांनी आम्ही प्रभावित झालो. खरंतर पर्यटनस्थळांमध्ये असे नंबर लावणं आम्हाला मंजूर नाही. प्रत्येक पर्यटनस्थळाचं एक खास वैशिष्ट्य असतं, खासियत असते आणि त्याची दुसऱ्याशी तुलना नाही होऊ शकत. आजपर्यंत वीणा वर्ल्ड सोबत केलेल्या सगळ्याच टूर्सवरचे टूर मॅनेजर अतिशय आपुलकीने वागणारे, मदतीला तत्पर आणि जाणकार होते पण त्यातही ‌‘सिध्देश वेदपाठक‌’ आमच्या जास्त लक्षात राहिला तो त्याच्या चिअरफुल स्वभावामुळे.

श्री. सुधीर आणि सौ. स्वाती कुलकर्णी, पुणे


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

साउथ ईस्ट आशियाच्या एका कोपऱ्यात असलेला पण गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांच्या हॉट लिस्टवर आलेला देश म्हणजे ‌‘व्हिएतनाम‌’. भीषण युध्दाचा इतिहास लाभलेला हा देश पर्यटकांना भुरळ घालतो तो तिथल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यामुळे आणि चटकदार खाद्यपदार्थांमुळे. व्हिएतनामच्या पारंपरिक जेवणामध्ये खारट, आंबट, गोड, कडू, तिखट अशा पाचही चवींचा समावेश असतो. लो शुगर आणि ग्लुटेन फ्री असल्यामुळे या पारंपरिक पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ‌‘गाय कून‌’ अर्थात व्हिएतनामीज स्प्रिंग रोल. यालाच ‌‘सलाड रोल‌’ किंवा ‌‘राइस पेपर रोल‌’ असंही म्हणतात. स्प्रिंग रोल हा पदार्थ जरी चायनामधून जगभरात पोहोचलेला असला तरी ‌‘गाय कून‌’ मात्र अस्सल व्हिएतनामी पदार्थ आहे, कारण त्यात वापरले जाणारे ‌‘राइस पेपर रॅपर्स‌’ हे व्हिएतनाममध्ये उगम पावलेले आहेत. व्हिएतनाममध्ये बनणाऱ्या अन्य स्प्रिंग रोल्सप्रमाणे ‌‘गाय कून‌’ तळलेले नसतात तर जरा थंड करूनच सर्व्ह केले जातात. हे रोल करण्यासाठी राइस पेपर म्हणजे आपल्याकडच्या तांदळाच्या पापड्यांचा अगदी तलम अवतार वापरला जातो. हा राइस पेपर अंथरून त्यामध्ये ताज्या भाज्यांचे सारण भरले जाते. काही वेळा त्यात श्रिम्प्स किंवा पोर्कही भरले जाते. त्यानंतर रोल वळले जातात आणि सर्व्ह केले जातात. या रोल्सबरोबर होइसिन सॉस, पीनट सॉस, नूक चाम (फिश सॉसचा प्रकार) असे सॉस घेतले जातात. व्हिएतनामच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये हे रोल्स वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जातात आणि त्यांची नावेही बदलतात. बाहेरच्या देशांमध्ये गाय कून हे व्हिएतनामी फ्रेश रोल म्हणून ओळखले जातात. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‌‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ‌’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast


गोरोन्गोरो क्रेटर - टांझानिया

Here are the Best Places to See in Tanzania

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत

आफ्रिका खंडाच्या पूर्व कोपऱ्यात इंडियन ओशनच्या किनाऱ्यावर वसलेला, आपल्या वैविध्यपूर्ण वन्यजीवांसाठी जगप्रसिध्द असलेला देश म्हणजे ‌‘टांझानिया‌’. इतिहासकाळातील ‌‘टांग्यानिका‌’ आणि ‌‘झांजिबार‌’ हे दोन स्वतंत्र भाग एकत्र येऊन हा देश तयार झाला आणि म्हणून याचं नाव पडलं ‌‘टांझानिय’.  ‌‘माउंट किलोमांजरो‌’ हा आफ्रिकेतील सर्वोच्च पर्वतही याच देशात आहे. वन्यजीवांसाठी प्रसिध्द असलेल्या टांझानियाची खासियत म्हणजे ‌‘गोरोन्गोरो क्रेटर‌’. हे आहे जगातलं सर्वात मोठे ज्वालामुखीचं विवर जे इन्ॲक्टिव्ह आणि पूर्ण रिकामं आहे. त्यामुळेच या ज्वालामुखीच्या विवरात टांझानियातील वन्यजीव सुखाने नांदताना पहायला मिळतात. जगातलं आठवं आश्चर्य म्हणून प्रसिध्द असलेल्या गोरोन्गोरो क्रेटरमध्ये तुम्ही झकासपैकी जंगल हॉलिडे घेऊ शकता. य़ा भागातल्या मसाई गुराख्यांनी गाई-गुरांच्या गळ्यातल्या घंटाचा जो आवाज होतो त्यावरून या विवराला ‌‘गोरों गोरो ‌’ असं नाव दिलं.

आफ्रिकेतले बिग फाइव्ह - हत्ती, गेंडा, सिंह, वाइल्ड बफेलो आणि बिबट्या हे सगळे या क्रेटरमध्ये आहेत. प्रायव्हेट गेम ड्राइव्हद्वारे तुम्ही या विवराच्या तळाशी फेरफटका मारून हे प्राणी सहज पाहू शकता. या विशाल क्रेटरच्या काठावर अनेक लक्झरी लॉजेस आहेत. या आलिशान लॉजेस्‌‍मध्ये रहाताना तिथल्या प्रायव्हेट डेकवरून तुम्ही भोवतालच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता तसंच प्लंज पूल्सची मजा लुटू शकता. या लॉजेसमधील वर्ल्ड-क्लास सुविधा, टेलरमेड सर्व्हिसेस, लजिज खाद्यपदार्थ, स्पा ट्रिटमेंट यामुळे तुमचा जंगलातला हॉलिडे एकदम आरामदायी होऊन जातो. इथल्या गोरोन्गोरो क्रेटर लॉजमध्ये मसाई लोकांच्या पारंपरिक पध्दतीने बांधलेली अतिशय सुंदर कॉटेजेस आणि त्यातल्या अत्याधुनिक सुविधा हे कॉम्बिनेशन अवश्य अनुभवायला हवं.

युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये समाविष्ट असलेल्या गोरोन्गोरो क्रेटरचं 3600 दर्शन घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे हॉट एअर बलून राइड. या राईडचा शेवट ब्रेकफास्ट विथ शॅम्पेनने होतो. क्रेटरच्या तळाशी प्रायव्हेट पिकनिक्स आयोजित केल्या जातात. अवतीभवतीच्या सुंदर परिसरात स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत तुम्ही तुमचा हॉलिडे मजेदार करू शकता.  गोरोन्गोरोच्या भेटीत थरारक  ‌‘गायडेड वॉकिंग सफारी‌’ करताना तुम्ही प्रशिक्षित आणि जाणकार गाइडबरोबर तीन-चार दिवस जंगलात पायी फिरता, तंबूत रहाता आणि जंगल अगदी जवळून बघता. क्रेटरमधील वन्यजीवांचे ‌‘नाइट लाइफ‌’ बघण्यासाठी इथे तुम्हाला नाइट सफारी करण्याची संधीही मिळते. या नाइट ड्राइव्हमध्ये तुम्हाला रात्रीचं जंगल अनुभवायला मिळतं. कल्चर आणि हेरिटेजमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला मसाइ व्हिलेजची भेट आणि तेथील आर्किओलॉजिकल साइट व्हिजिटस्‌‍ही करता येते. हेलिकॉप्टर टूरपासून ते क्रेटर रिम वॉक पर्यंत अनेक प्रकारे तुम्ही गोरोन्गोरोचा हॉलिडे रंगतदार करू शकता. आरुषापासून गोरोन्गोरो फक्त चार तासांच्या ड्राइव्हवर आहे. आरुषाहून लेक मन्याराच्या एअर स्ट्रीप पर्यंत विमानाने येऊन तिथून दीड तासात गोरोन्गोरोला पोहोचता येतं. एका पुरातन ज्वालामुखीच्या पोटात शिरून तिथल्या वन्यजीवांचा रोमांचक अनुभव घ्यायचा असेल तर टांझानियातील गोरोन्गोरो क्रेटरचा हॉलिडे नक्की ठरवा. बाकी सगळं मार्गदर्शन करायला वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌ टीम सज्ज आहेच.


काय बघावं? कसं बघावं?

आपले शेजारी देश!

विकेंडला कुठे जायचं म्हटलं की सर्वसाधारणपणे दोन तासांच्या आत कुठे पोहोचता येईल त्याचा विचार आपण करतो. तसाच विचार अनेक पर्यटक करतात परदेश प्रवास करायचा म्हटला म्हणजे. आणि मग दोन ते पाच तासांच्या विमानप्रवास करून कुठे पोहोचता येईल ते बघतात. बऱ्याचदा म्हणतात की, `शक्यतोवर डायरेक्ट फ्लाइट बघा बाबा‌’. दूरच्या देशांना हे शक्य नसतं, त्याला कारणं अनेक असतात. पण तरीही आपल्या जवळच्या देशांमध्ये बऱ्यापैकी डायरेक्ट फ्लाइट्सनी पोहोचता येतं. साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट एशिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदिव्ज्‌‍ सारख्या सार्क (Saarc) म्हणजे `साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कॉऑपरेशन‌’ वाले देश पाच तासांच्या आत आपल्याला त्यांच्या देशात डायरेक्ट विमानाने घेऊन जातात. आपला भारत जसा विविधतेने नटलेला आहे तसेच आपले शेजारी देशसुद्धा एकमेकांपासून संपूर्णपणे वेगवेगळे आहेत आणि त्याच विविधतेचा आनंद आपल्याला त्यांच्याकडे ओढून नेत असतो. आता बघानं नेपाळ आणि भूतान हिमालयातले सख्खे शेजारी पण दोन्ही देशांमध्ये एक पर्यटक म्हणून आपल्याला जो आनंद मिळातो तो किती वेगवेगळा. श्रीलंका आणि मालदिव्ज्‌‍ आपल्या दक्षिण दिशेला विराजमान असलेले इंडियन ओशन मधले देश, एकमेकांमध्ये कोणतंही साधर्म्य नसलेले. थायलंड व्हिएतनाम मलेशिया सिंगापूर हाँगकाँग आपल्या साऊथ ईस्टला असलेले देश पण पूर्णपणे वेगवेगळा पर्यटनानंद देणारे देश. आपल्या पश्चिमेला असलेलं दुबई, अबुधाबी, ओमान, सौदी, कतह्ार हे देश आत्ता टूरिझमवर पूर्ण फोकस करताहेत. तेलाचे साठे संपण्याआधी त्यांना आपल्या देशांना टूरिझममध्ये पुढे आणायचंय. ते कधी आपल्याला एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बागडताना दिसतील तर कधी टूरिझम ॲट्रेक्शन्सच्या निर्मितीबाबत कटथ्रोट कॉम्पिटिशन करताना. त्यामुळे प्रत्येकजण वेगळं, दुसऱ्यापेक्षा चांगलं काहीतरी निर्माण करतोय. त्याचा फायदा एक पर्यटक म्हणून आपल्याला निश्चितपणे मिळतो. आतातर ह्या डायरेक्ट फ्लाइटवाल्या देशांमध्ये मिडल ईस्ट आणि युरोपच्या बॉर्डरवर असलेल्या देशांचीही भर पडलीय. सो... चलो, बॅग भरो, निकल पडो! वीणा वर्ल्डसोबत!

July 20, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top