We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

तू बन जा गली बनारस की... | Tu Ban Ja Gali Banaras Ki

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
September 22, 2026
September 22, 2026

Quick Summary

वाराणसीत थंडीच्या मौसमात मलाईयो जरूर चाखा, कारण दूध साखर आणि केशरापासून बनलेली ही मिठाई तोंडात विरघळते.

मलाईयोचा आस्वाद घेताना मंद आचेवर सतत ढवळणे आणि मिश्रण घट्ट न होऊ देणे हे महत्त्वाचं तंत्र लक्षात ठेवा.

वाराणसीच्या गजबजलेल्या गल्ल्यांत भटकंती करताना रस्त्याच्या कडेला कुल्हडांची आरास पाहत स्वादिष्ट थांबा घ्या.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे मंदिर गंगेच्या घाटांशी जोडले गेलं आहे, त्यामुळे बदललेलं वाराणसीचं रूप अनुभवायला जा.

दशाश्वमेध घाटावर गंगा आरती बोटीतून पाहा आणि आरती सुरू होताना पणती पाण्यात सोडून प्रार्थना करा.

सूर्योदयाच्या आधी गंगेत बोटीने फेरफटका मारल्यास गंगेच्या पार्श्वभूमीवरील जादुई वातावरणाचा आनंद मिळतो.

Published in Loksatta Lokrang on 10th May, 2026

...मंद आचेवर हे दूधाचं मिश्रण सतत ढवळत राहावं लागतं. ते घट्ट होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. केशरामुळे त्याला सुगंध येतो आणि सोनेरी...

अहाहा! त्याचा स्वाद अवर्णनीय होता. मऊशार, पांढऱ्याशुभ्र ढगासारखा पोत आणि केशरामुळे आलेलं तेज... कुल्हडमधून मी त्याचा आस्वाद घेतला आणि माझी ब्रह्मानंदी टाळी लागली. तो स्वाद क्षणात तोंडात विरघळला. त्याची चव माझ्या रंध्रारंध्रात जाणवली. क्या बात है! हवेत चांगलाच गारवा होता. आम्ही शहरात भटकंतीसाठी निघालो होतो आणि चौकात आलो तोवर सूर्य चमकायला लागला होता. रस्त्याच्या कडेला कुल्हडांची आरास होती. कढईत दूध रटरटत होतं. एके ठिकाणी थांबून आम्ही अखेर त्या स्वर्गीय पदार्थाचा आस्वाद घेतला. आमचा गाईड म्हणाला, याला मलाईयो म्हणतात. आम्ही वाराणसीत होतो. हे देवांचं शहर मानलं जातं, त्यामुळे हा त्यानांच आवडणारा पदार्थ असावा, असा विचार त्यावेळी माझ्या मनात चमकून गेला. वाराणसीच्या त्या गजबजलेल्या गल्ल््या, सतत उत्सवांच्या निमित्ताने भाविकांच्या गर्दीने फुललेले घाट, आणि यांच्या साथीने नांदणारा मलाईयो म्हणजे या शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीकच जणू! दूध, साखर आणि केशर यांच्यापासून बनवलेली ही मिठाई एकदम परिपूर्ण आहे. ती तोंडात अक्षरश: विरघळते. शिवाय तो हलकासा स्वाद नंतरही बराच काळ जिभेवर रेंगाळतो. थंडीच्या मौसमात मलाईयो मिळते. ही मिठाई बनवणं हे मोठं कसबी काम आहे. त्यासाठी तंत्र अवगत हवं आणि भरपूर संयमही हवा. मंद आचेवर हे दूधाचं मिश्रण सतत ढवळत राहावं लागतं. ते घट्ट होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. केशरामुळे त्याला सुगंध येतो आणि सोनेरी छटाही मिळते. त्यामुळे ही मिठाई एकदम प्रिमियम होऊन जाते. मलाईयो ही वाराणसीच्या पाककलेच्या वारशाची एक झलक आहे. शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाच्या जोडीला मलाईयोचा आस्वाद घेणं म्हणजे एकदम अद्भुत आनंद.

वाराणसीला जाण्याचा भाग्ययोग माझ्या आयुष्यात तीन वेळा आला आहे. वाराणसी म्हणजे पवित्र भूमी, मंदिरांची भूमी. हे प्रत्येक श्रद्धाळू व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. नुसतं इथे येऊन राहणाऱ्यालाही निर्वाण आणि मोक्ष प्राप्ती होते, अशी या स्थानाची महती आहे. वाराणसी, बनारस किंवा काशी या नावांनी ओळखलं जाणारं हे शहर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. ख्यातनाम इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांना वाराणसीचं पावित्र्य आणि त्या शहराबद्दलच्या कथा, आख्यायिका यांची जबरदस्त मोहिनी पडली होती. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय की, “वाराणसी शहर इतिहासापेक्षाही प्राचीन आहे. परंपरेपेक्षाही जुनं आहे, अगदी दंतकथांना सुद्धा मागे टाकणारं आहे. आणि प्रत्यक्षात ते या सगळ्यापेक्षा दुप्पट प्राचीन भासतं.” असं असलं तरी नव्याने बांधण्यात आलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरमुळे वाराणसीचं रुप बदलून गेलं आहे. या कॉरिडॉरमुळे शहराचा पूर्ण कायापालट झाला आहे. आता काशी विश्वनाथ मंदिर गंगेवरील घाटांशी जोडलं गेलं आहे. कॉरिडॉर तयार होण्यापूर्वी मी काशीला गेले होते. बदललेल्या काशीचं रूप पाहण्याची माझ्या मनात उत्सुकता होती. माझ्या दृष्टीने वाराणसी हे मुख्यतः आध्यात्मिक केंद्र आहे. पहिल्या भेटीत मी तिथल्या सुमारे 2000 पेक्षा जास्त मंदिरांमधली काही निवडक मुख्य मंदिरं पाहण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी काशी प्रसिद्ध आहेच, पण मला तिथे जाणवलं ते आध्यात्मिक वातावरण. त्या सगळ्या वातावरणात अध्यात्म भरून राहिलेलं आहे. त्याची आपल्याला अनुभूती येते. मी वाराणसीच्या प्रत्येक भेटीत ते अनुभवलंय. या सगळ्यावर कडी आहे ती सुप्रसिद्ध गंगा आरती! ही आरती म्हणजे जणू निसर्गाची प्रार्थनाच. तोही एक मोठा, भव्य दिव्य असा आध्यात्मिक सोहळा असतो. पापांपासून मुक्ती देणाऱ्या, आध्यात्मिक शुद्धीकरण करणाऱ्या गंगेची ही आरती म्हणजे एका अर्थाने नदीची केलेली पूजाच. दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या या गंगा आरतीची भव्यता बोटीतून पाहण्यासारखी असते. आरती सुरू होताना मी देखील एक पणती पाण्यात सोडली आणि सगळ्यांच्या क्षेमकुशलाची प्रार्थना केली. सगळे पुजारी अतिशय नेटकेपणाने आणि तल्लीनतेने गंगा आरतीत मग्न झाले होते. त्यांच्या मंत्रोच्चारणामुळे सगळं वातावरणच बदलून गेलं होतं. तेव्हा जे काही आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं त्याचं वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. माझ्या मनात ते कोरलं गेलंय, स्मृतीत साठवलं गेलंय. कधीही पुसली जाणार नाही अशी ती अद्वितीय अनुभूती होती.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मी पुन्हा घाटावर आले. काल संध्याकाळी मला गंगेतून मनसोक्त फेरफटका मारता आला नव्हता. मी थोड्याच वेळात बोटीवर आले आणि गंगेच्या पात्रात फिरायला निघाले. सूर्योदयाच्या आधीच आमचा प्रवास सुरू झाला. गंगेच्या पार्श्वभूमीवरील त्या जादुई सूर्योदयाचा आनंद घेण्याआधी मला आकाश आणि नदीच्या पाण्यावर गुलाबी, केशरी सूर्यकिरणांची सुंदर कलाकुसर तयार झालेली पाहता आली. सोबतीला होते नदीकाठी वस्तीला आलेले स्थलांतरित पक्षी. ‌‘वीणा वर्ल्ड‌’च्या टूरमध्ये आम्ही पर्यटकांना अशा प्रसन्न सकाळी अस्सी घाटावर ही शांतता आणि सौफ्लदर्य अनुभविण्यासाठी नेतो. वाराणसीतील इतर गोष्टींप्रमाणेच या अस्सी घाटाशी निगडितही एक पौराणिक कथा आहे. देवी दुर्गेने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध केल्यानंतर हातातील खड्ग एके ठिकाणी फेकून दिलं. तिथेच अस्सी नदीचा उगम झाला. त्या नदीवरचा हा घाट. ‌‘सुबह-ए-बनारस‌’ हा सुंदर कार्यक्रम या घाटावर होतो. तिथे गंगेची सकाळची आरती केली जाते.

अस्सी घाटाप्रमाणेच दशाश्वमेध हा वाराणसीतील मुख्य घाट. या घाटाची निर्मिती ब्रह्मदेवाने (रचयिता) शंकरासाठी (संहारक) केली. तेथे त्याने यज्ञ करून त्यात दहा अश्वांची आहुती दिली, अशी कथा सांगितली जाते. हा घाट आणि त्याचा परिसर अतिशय प्रेक्षणीय आहे. इथेच संध्याकाळची प्रसिद्ध गंगा आरती होते. आरतीच्या वेळी या घाटाचं विलोभनीय रुप पाहायला मिळतं. या घाटांप्रमाणेच, मणिकर्णिका घाट, बाजीराव पेशवा घाट हेही लोकप्रिय आणि उल्लेखनीय घाट आहेत. यापैकी अनेक घाटांची पुनर्बांधणी 18व्या शतकात मराठ्यांनी केलीये, हे विशेष! हे सर्व घाट पाहणं, त्यावर वावरणं म्हणजे वाराणसीतील मंदिरांत दर्शन घेण्यासारखंच आहे.

बनारस, काशी, वाराणसी अशा अनेक नावांनी या शहराला ओळखतात. या शहराविषयीच्या आकर्षणातून युगानुयुगे देशविदेशातील, दूरदूरच्या लोकांना इथे यावंसं वाटलं. आजही त्यात खंड पडलेला नाही. हे सतत आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. काशीला जाऊन येणं हा अनेकांच्या परंपरेचा, श्रद्धेचा भाग आहे. हिंदू धर्मातील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वामुळे वाराणसीला काशी असं म्हणतात. ‌‘काशी‌’ हे नाव ‌‘कास‌’ या संस्कृत शब्दावरून आलं आहे. ‌‘कास‌’चा अर्थ चमकणे किंवा प्रकाशमान होणे. या नावातून आध्यात्मिक उन्नती आणि ज्ञान यांचं अधिष्ठान या शहरात असल्याचं सूचित होतं. वाराणसी हे शिक्षणाचंही केंद्र आहे. त्यामुळे स्वाभाविकच माझ्या भेटीचं पुढचं ठिकाण बनारस हिंदू विद्यापीठ होतं. बीएचयू हे आशियातील सर्वात मोठं विद्यापीठ आहे. याच शहरात आयुर्वेदाचा उगम झाला अशी मान्यता आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्राचे गुरू महर्षी पतंजली हे याच पवित्र शहराशी निगडित होते. उत्कृष्ट दर्जाचं रेशीम, सोनं आणि चांदीच्या ब्रोकेडच्या व्यापारासाठीही वाराणसी ओळखलं जातं. त्यामुळे माझ्या भेटीतील पुढील टप्पा हा सुंदर बनारस ब्रोकेड आणि सिल्क साड्यांच्या खरेदीचा होता. तिथे मी विणकरांना भेटले. त्यांची कलाकुसर जाणून घेतली.

दुसऱ्या दिवशी मी सारनाथला गेले. वाराणसीपासून अवघ्या 10 किमी अंतरावर सारनाथ आहे. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी इथेच पहिला उपदेश केला होता. सारनाथ हे हिंदू नवजागरणाचे प्रतीक आहे. इथे ज्ञान, तत्त्वज्ञान, संस्कृती, भक्तीमार्ग, भारतीय कला आणि हस्तकला या सर्वांचा विकास झाला. त्यांचा प्रसार झाला. तसंच जैन धर्मीयांसाठीही वाराणसी हे एक तीर्थक्षेत्र आहे. त्यांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचं वाराणसी हे जन्मस्थान मानलं जातं. वाराणसीमध्ये वैष्णव आणि शैव पंथ एकत्र अस्तित्वात आहेत. हे या शहराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अशी सर्वस्पर्शी असलेली मोजकीच शहरं असतात. सगळ्यांनाच ते भाग्य लाभत नाही. वाराणसीला तर साक्षात ब्रह्मदेवाची कृपादृष्टी आणि शंकराचे सान्निध्य लाभले आहे. त्यामुळे हे शहर वेगळं ठरतं यात आश्चर्य नाही. काशी विश्वनाथ, कालभैरव, दुर्गा यांच्या मंदिरांबरोबरच इतर अनेक मंदिरांत मी दर्शनासाठी गेले. तिथले वातावरण मनात साठवून घेतले.

त्याशिवाय आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे वाराणसी ही खवय्यांचीही नगरी आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या प्रहरासाठी या शहरात खास पदार्थ आहेत. त्यात पुरी-भाजी, समोसे, कचोरी, चाट... असं बरंच काही समाविष्ट आहे. या स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेणं म्हणजे वाराणसीचा प्रवास सर्वार्थाने पूर्ण करणं. याची मजा हिवाळ्यात अधिक घेता येते, पण असं असलं तरीही मी जेव्हा जेव्हा वाराणसीला गेले आहे तेव्हा तेव्हा मला नवीन काही अनुभवायला मिळालंय. आणि माझ्या लक्षात आलंय की वाराणसीला भेट देण्यासाठी काळवेळेचं काही बंधन नाही.

माझ्या वाराणसीच्या त्या भेटीत सगळी फिरस्ती आटपून मी शेवटच्या दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर, हातात गरम वाफाळणाऱ्या कॉफीचा कप घेऊन बसले आणि माझ्या मनात विचार आला... वाराणसी हा एक समग्र अनुभव आहे. इथे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. आणि मला अचानक आठवलं ते गीतकार शकील आझमी यांनी अलीकडेच रचलेलं, वाराणसीची सगळी खासियत अचूक टिपणारं एक सुंदर हिंदी गाणं. गीतकाराने त्यात एका तरुणाच्या प्रेमाची वाराणसीशी तुलना केली आहे. तो म्हणतो,

‌‘‌‘तू बन जा गली बनारस की

मैं शाम तलक भटकू तुझमें

तेरी बातें चटपटी चाट सी हैं

तेरी आँखे गंगा घाट सी हैं

मैं घाट किनारे सो जाऊं

फिर सुबह सुबह जागू तुझमें

तू बन जा गली बनारस की

मैं शाम तलक भटकू तुझमें‌’‌’

हे गाणं वाराणसीमधील पर्यटकांसाठी गाईडचं काम करतं. मी तर वाराणसीला परत जाण्यास उत्सुक आहेच. तुम्ही कधी येताय?

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
8 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
8 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
8 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!