We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

ऑल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन्स

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
May 11, 2026
May 11, 2026

Quick Summary

पर्यटक आता फक्त बकेट लिस्ट पूर्ण करण्यापेक्षा अर्थपूर्ण अनुभव शोधत आहेत, म्हणून ऑल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन्सची कल्पना वाढतेय.

नव्या वाटेने प्रवास करताना थोडं थांबून आजूबाजूचा अनुभव साठवा, कारण निसर्गाचे क्षण मनावर दीर्घकाळ राहतात.

आडवळणाच्या ठिकाणी गर्दी कमी असते आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरांशी तुमचे नाते घट्ट होते.

बालीसारखा ट्रॉपिकल अनुभव हवा असेल तर श्रीलंका एक उत्तम पर्याय आहे, कारण तिथेही संथ लय आणि हिरवाईचा माहोल मिळतो.

एला आणि हापुताले येथे सूर्योदय पाहा, जिथे ढग, चहाचे मळे आणि सोनेरी प्रकाश एकत्र येऊन दृश्य मन मोहून टाकते.

अपरिचित ठिकाणी गेल्यावर तिथली जादू तुम्हाला खेचून घेते, त्यामुळे गर्दी टाळून ताजातवाना अनुभव घ्या.

Published in Maharashtra Times on 10th May, 2026

...गडद निळ्यापासून तेजोमय हिरव्या रंगाचे वेगवेगळे विभ्रम दाखवणारे पाण्याचे विस्तीर्ण प्रवाह दिसतात. इथे भटकंती करताना आपण वारंवार थबकतो. हे थबकणं म्हणजे इथल्या निसर्गसौंदर्याला दिलेली एक दिलखुलास दाद असते...

सुट्ट्यांचं प्लॅनिंग करण्याचा आपला एक ठराविक किंवा सोयीचा असा पॅटर्न असतो. म्हणजे ट्रॉपिकल धम्माल हवी असेल तर बाली, आल्प्सच्या पर्वतरांगांचे वैभव पाहायचे तर स्वित्झर्लंड, रखरखीत पण श्रीमंती वाळवंटी थाटासाठी दुबई, नॉर्दर्न लाईट्स अर्थात ध्रुवीय प्रकाशाची प्रभा अनुभवण्यासाठी फिनलंड... असे हे पॅटर्न साधारणपणे ठरलेले आहेत.

या ठिकाणांनी त्यांची ही खास ओळख निर्सगाच्या चमत्कारासोबतच, वर्षानुवर्षांच्या अनुभवातून कमावलेली आहे. ती ठिकाणं वैशिष्ट्यपूर्ण, प्रेरणादायी तर आहेतच, शिवाय तसा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही पर्यटकांच्या मनात सर्वात पहिल्यांदा येणारीच ही नावं आहेत. पण गेल्या काही काळापासून पर्यटनाचं स्वरुप बदलायला लागलंय. एखाद्या प्रवासातून मला काय मिळालं, याकडे लोक आता जास्त लक्ष देताहेत. केवळ बकेट लिस्टमधली ठिकाणं पूर्ण करण्यापलीकडे आता पर्यटकांची दृष्टी गेलेली आहे. या पार्श्वभूमीवर, ‌‘ऑल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन्स‌’ ही संकल्पना महत्त्वाची ठरू लागली आहे. ऑल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन्स म्हणजे ‌‘चला जाऊया वेगळ्या वाटेने‌’ या दृष्टीकोनातून केलेला प्रवास. आपल्या पर्यटनाचं प्लॅनिंग करताना आपण थोडं थांबून विचार करू लागतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आता एखादा नवीन देश एक्सप्लोअर करण्याची धावपळ करण्यापेक्षा, आपल्या भावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया.

हिरव्यागार पर्वतशिखरांच्या मागून डोकावणारे सूर्यबिंब, तारकांनी तुंडुंब भरलेल्या आकाशाखालची वाळवंटातील एखादी शांत रात्र, पायाखाली चुरणाऱ्या बर्फाचा तो मन सुखावणारा आवाज आणि वर आकाशात सुरू असलेल्या ध्रुवीय प्रकाशाचा देखणा नृत्यखेळ...  क्षणभर थांबून आसपासचा अनुभव साठवून घेण्यास भाग पाडणारे आणि आपण सर्वार्थाने किती छोटेसे आहोत याचं भान देणारे हे इतिहासाचे अवशेष. अनुभवाचे असे कितीतरी पदर, पर्यटन आपल्या गाठीशी बांधते. असा अनुभव देणाऱ्या जागा जगभरात ठायीठायी आहेत. कधीकधी त्यासाठी वाट थोडी वाकडी करावी लागते इतकंच. पण एकदा का आपण तिथे पोहोचलो की तिथली जादू आपल्याला खेचून घेते. शिवाय आडवळणावर असल्याने तिथे गर्दीही कमी असते. तिथल्या सांस्कृतिक परंपरांशी आपले घट्ट बंध तयार होतात आणि एकदम खास, केवळ आपला असा, ताजातवाना करणारा अनुभव आपल्यापाशी जमा होतो.

ही अशी ठिकाणं सोशल मिडियाच्या फीडमध्ये मुबलक प्रमाणात दिसणार नाहीत, पण त्यांचा आपल्या मनावर उमटलेला ठसा हा प्रवास संपल्यावरही बराच काळ आपल्यासोबत राहतो. म्हणूनच आज आपण जगभरातील अशाच स्मार्ट, आडवळणाच्या पण खास ठिकाणांचा शोध घेणार आहोत. या ठिकाणांना स्वत:ची वेगळी ओळख आहे. तिथलं निसर्गसौंदर्य, तिथला अनुभव, तिथल्या भावना सारख्या असल्या तरी त्या त्या ठिकाणाची एक खास कहाणी आहे. या अशा ठिकाणी आपण का जावं? तर पर्यटन म्हणजे सगळे जातील त्यांच्या पाठोपाठ धावत सुटणं नसतं. खरं तर आपल्याला भावतील, आपल्या मनावर ठसतील असे अनुभव देणारे क्षण गोळा करणं म्हणजे पर्यटन. चला तर मग, आपणही या वेगळ्या वाटेवरील प्रवासाला निघूया.

सूर्योदयाची कॅमेऱ्यापलीकडची जादू! : बालीप्रमाणेच ट्रॉपिकल वातावरणाची अनुभूती देणारी जगात मोजकीच ठिकाणं आहेत. हिरवागार निर्सग, धुक्यातील रम्य पहाट, मंदिरांनी भारलेलं आध्यात्मिक वातावरण, समुद्रकिनाऱ्यावर अनुभवलेला सूर्यास्त आणि मोहात पाडणारी जगण्याची अतिशय संथ लय... असा बालीचा अनुभव असतो. म्हणूनच बहुतेक पर्यटकांच्या लेखी बाली हे केवळ पर्यटनस्थळ नसून ती मनाची एक सुखकारक अवस्था असते.

अशाच अनुभवाच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक बेट आहे. अर्थात, तिथला अनुभव खास तिथल्या मातीतला आहे. त्याचं नाव आहे श्रीलंका. पहिल्या दर्शनात ही तुलना अस्थानी वाटेलही, पण जसजसा तो देश आपल्यात भिनू लागतो, काही दिवस आपण तिथे घालवतो... तेव्हा तिथलं ते साम्य आपल्यासमोर हलकेच उलगडतं. आणि जेव्हा केव्हा तसा अनुभव आपण घेतो, तेव्हा आपल्यातील पर्यटक स्तब्ध होतो, गुंग होतो...

बालीतला छानसा सूर्योदयाचा नजारा डोळ्यासमोर आणा. कसं दृश्य असतं? पायऱ्यापायऱ्यांच्या भातशेतीवर, दाट झाडीने भरलेल्या दऱ्याखोऱ्यांवर, सकाळचा कोवळा प्रकाश अंथरलेला असतो. तर श्रीलंकेसारख्या पर्वतमय देशात, एला आणि हापुताले यासारख्या ठिकाणी दिवसाची सुरूवात होते ती हिरव्यागार डोंगररांगा, त्यावरून विहार करणारे ढग, दूरवर पसरलेले चहाचे मळे आणि त्या सगळ्यावर पसरलेला सोनेरी प्रकाश अशा देखण्या दृश्याने. आसपासचं जग हळूहळू जागं होत असताना, या अशा ठिकाणी उभं राहून ते अनुभवणं हे कोणत्याही आध्यात्मिक अनुभूतीपेक्षा कमी नसतं.

तसाच आणखी एक अनुभव आहे जंगलांशी निगडित. बालीतील प्रसिद्ध झुल्यांवर बसल्यावर आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे तरंगत असल्याचा भास होतो तर श्रीलंकेत पूर्णपणे निसर्गात रममाण झाल्याची भावना आपोआप मनात निर्माण होते. जंगलातील भ्रमंती, नाईन आर्चेस ब्रीजसारखे रेल्वेचे जुने पूल, दाट हिरवाईच्या कुशीत हरवलेले लॉजेस यांच्यामुळे आपण निर्सगाशी तादात्म्य पावतो.

मिरिसा, उनावटूना आणि तंगल्ले इथे समुद्रकिनाऱ्यालगत वावरताना बालीसारखे निवांत वातावरण अनुभवायला मिळते. अर्थात इथले समुद्रकिनारे केवळ बीच रिसॉर्टस्‌‍पुरते मर्यादित नाहीत. तिथे मासेमारीसाठी सज्ज असलेल्या बोटी, गावातील जीवनमान यांची सोबत लाभते.

पुरातन वारसा आणि वन्यजीवन यांचा अनोखा संगम हे श्रीलंकेला वेगळेपणा देणारे खास आकर्षण आहे. सिगिरिया, अनुराधापुरा आणि पोलोन्नारुवा ही प्राचीन ठिकाणं अप्रतिम आहेत. याला किंवा उदावलावे राष्ट्रीय उद्यानात हत्ती आणि बिबट्या एकत्र नांदतात. त्यांना तसं एकत्र पाहणं हा मोठा रोचक अनुभव असतो. या अशा अनुभवांचे एकेक पदर आपल्या पर्यटनाला सखोल अर्थ मिळवून देतात. केवळ भारावून जाण्यापेक्षा हा आनंद कितीतरी पट अधिक असतो. बालीची जागा घेण्याचा आटापिटा श्रीलंकेत नाही. श्रीलंका हा देश आपल्याला, निसर्ग आणि संस्कृती यांना सांधणारा अधिक संतुलित अनुभव देतो.

विस्तीर्ण आकाशच पर्यटनस्थळ बनतं तेव्हा... : उत्तरेकडे आपल्याला खेचून घेणारी काहीतरी चुंबकीय जादू आहे. ही ओढ प्रसिद्ध ठिकाणं किंवा शहरं यांच्याविषयीची नसते, तर खुद्द आकाशच आपल्याला आमंत्रण देत असतं. बर्फाच्छादित जंगलं, नजर जाईल तोवर परसलेली बर्फाळ जमीन यांच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा तो अद्भुत, जिवंत नजारा अनुभवण्यासाठी उत्कंठा लागून राहिलेले आपण... असा एकंदर माहौल असतो. हे असं दृश्य स्वप्नात आलं की बहुतेकांना आठवतं ते फिनलंड. काचेसारखे इग्लू, आलिशान हिवाळी लॉजेस, पोस्टकार्डवरच्या चित्रांसारखं देखणं आर्क्टिक सौंदर्य, सोबत ध्रुवीय प्रकाशखेळाचा अनुभव... यासाठी फिनलंडलाच सर्वाधिक पसंती असते, पण गंमत म्हणजे हा ध्रुवीय प्रकाश म्हणजे ऑरोरा बोरेलिस केवळ त्या देशापुरताच मर्यादित नाहीये.

आर्क्टिक सर्कलच्या एकदम उत्तरेला म्हणजेच थेट रशियाच्या उत्तरेकडील टोकावर वसलंय मुरमन्स्क. याचा उल्लेख अनेकदा ‌‘अफोर्डेबल आर्क्टिक‌’ असा केला जातो. पर्यटनाच्या चकाचक ब्रोशर्समध्ये या स्थानाचा उल्लेख सहजी सापडतही नाही, पण वातावरण अनुकूल असतं तेव्हा इथलं आकाशही, त्याचं तेवढंच देखणं आणि नेत्रदीपक रूपडं दाखवतं. मुरमन्स्कमध्येही ध्रुवीय प्रकाशाचा अद्भुत खेळ अनुभवता येतो. रात्री आकाशात पसरलेले हिरव्या रंगाचे पट्टे, बर्फाळ जमिनीवर पडून चमकणारी त्याची प्रतिबिंबं हा अनुभव अतिशय नवलाईचा असतो. गर्दी नसल्याने तिथे अधिक शांतता जाणवते. शिवाय खिशालाही ते परवडतं. इथे काचेच्या इग्लूंऐवजी पर्यटक आरामदायी आणि किफायतशीर लॉजेस आणि हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. इथली श्रीमंती ही त्याच्या स्थानात, मांडणीत नसून ती प्रत्यक्ष अनुभवात आहे. कडाक्याच्या थंडीत, तोंडातून वाफा निघत असताना वर आकाश हळूहळू अद्भुत अशा अवस्थेत बदलताना पाहणं अविस्मरणीय ठरतं. दिवसा मुरमन्स्कचं रुप वेगळंच असतं. इथली स्नो मोबाईल सफर आपल्याला विस्तीर्ण टुंड्रा प्रदेश, गोठलेली सरोवरं आणि सुदूर उत्तरेकडील अस्सल नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देते. पर्यटकांसाठी इथे कोणताही देखावा नाही. फक्त प्रकाशाचा खेळ, आणि तोही निसर्गाच्या नियमांनुसार.

संस्मरणीय पर्वतरांगा खुणावतात तेव्हा... : बर्फाच्छादित शिखरं, निर्मळ सरोवरं, रेल्वेचा निसर्गरम्य प्रवास आणि अशक्य वाटेल अशी आल्प्समधील हवा. अशा या पर्वतीय प्रवासाच्या अनुभवासाठी स्वित्झर्लंडला फार पूर्वीपासून आदर्श पर्यटन स्थळ मानलं जातं. इथलं निसर्गसौंदर्य नेमकं, एकदम आखीवरेखीव आणि डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतकं रमणीय आहे. माझ्यासारख्या असंख्य पर्यटकांसाठी आल्प्स हा निसर्गाचा सगळ्यात देखणा, आखीवरेखीव असा आविष्कार आहे.

असाच एक पर्वतीय प्रांत आहे, जिथला निसर्ग आपल्याला केवळ भुरळ घालत नाही तर तो आपल्याशी बोलतो. हा प्रांत म्हणजे युरोप आणि आशियाच्या मधोमध असलेल्या जॉर्जियामधील कॉकेशस माऊंटन रेंजेस. तिथे खोल व्हॅलीजलगतची उंच शिखरं अचानक वर येतात. तिथेच प्राचीन दगडी मॉनेस्ट्रीज्‌‍ कड्याकपारींना एकदम चिकटलेल्या आहेत. इथली काझबेगीसारखी गावं, स्विस आल्प्सला टक्कर देणारा नजारा आपल्यासमोर मांडतात. त्यातही एक लक्षणीय फरक म्हणजे इथली शांतता आणि नितळ निसर्गसौंदर्य. इथल्या रस्त्यांना हळूवार वळणांची साथ आहे. इथल्या जमिनीत इतिहास आणि संस्कृती सहजतेने गुंफलेली आहे, हेच तर जॉर्जियाचं वेगळेपण आहे. जॉर्जियाला वाईनचे उगमस्थान मानतात. वाईननिर्मितीची परंपरा सुमारे 8,000 वर्षांहून जुनी आहे. इथल्या अतिदुर्गम भागातही मोठ्या आपुलकीने आदरातिथ्य केलं जातं. भोजनाचा आग्रह होतो. मनसोक्त गप्पा होतात. त्यावेळी मानवी नातेसंबंधांना या देखण्या पर्वतांची लोभस पार्श्वभूमी लाभलेली असते.

जिथे समुद्राची दहशत वाटत नाही...:  इटलीची नजाकत आगळीवेगळी आहे. तळ्यांकाठचे उत्फुल्ल वातावरण, सूर्यप्रकाशाने न्हाहून निघालेले चौक, अंचबित करणारे सागरकिनारे, मनोहारी पर्वत आणि त्यांच्या सोबतीने पावलोपावली उलगडणारे इतिहासाचे पापुद्रे असा या शहराचा थाट आहे. मेडिटेरेनियन सी च्या आसपासच्या जीवनशैलीचे सगळे पैलू इटलीमध्ये टिपता येतात. अशी देणगी फारच कमी ठिकाणांना असते. पण तसाही एक देश आहे. एड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा लहानखुरा देश म्हणजे मॉन्टेनेग्रो. इथेही मेडिटेरेनियन सी च्या जीवनशैलीची बहुतेक वैशिष्ट्ये सापडतात. इथलं निळंशार आणि हिरवं पाणी उंच पर्वतांच्या पायथ्यांना स्पर्श करतं. इथे थेट भूमीतूनच अवतरल्यासारख्या वाटणाऱ्या मध्ययुगीन दगडी वास्तू आहेत. फ्योर्डशी ज्याची हमखास तुलना केली जाते ते बे ऑफ कोटर इथेच आहे. उंच सुळक्यांनी वेढलेली ही खाडी हळूवारपणे आतल्या बाजूला वळते. तिच्या आसपास वसलेलं जुनं शहर अलगदपणे त्या खाडीवरच तरंगत असावं असं चित्रमय रुप तिथे पाहता येतं. कोटर किंवा पेरास्टमधून फेरफटका मारताना काहीतरी अद्भुत पाहिल्यासारखं वाटतं. त्याचं सौंदर्य आपल्याला भावतं, ते आपल्याला दडपून टाकत नाही. तिथे आहेत ते अरुंद दगडी रस्ते, काठावर विसावलेली जुन्या धाटणीची दगडी घरं, छोटेसे कॅफेज्‌‍ आणि सतत सोबत करणारी समुद्राची गाज. समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यांवरून जाता-येताना मध्येच गडप होणारे किनारे, शांत निसर्गरम्य जागा आणि प्रकाशानुसार गडद निळ्यापासून तेजोमय हिरव्या रंगाचे वेगवेगळे विभ्रम दाखवणारे पाण्याचे विस्तीर्ण प्रवाह दिसतात. इथे भटकंती करताना आपण वारंवार थबकतो. हे थबकणं म्हणजे इथल्या निसर्गसौंदर्याला दिलेली एक दिलखुलास दाद असते.

इथे सूर्योदयासोबत इतिहासही अवतरतो... : तुर्कस्तानमधील कपाडोशियासारखी कल्पनेच्याही पलीकडे असणारी मोजकीच ठिकाणं असतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सतत पाहत राहावं अशा सुंदर भूप्रदेशावरून तरंगत जाणारे हॉट एअर बलून, परिकथेत शोभावेत असे चिमण्यांच्या आकाराचे खांब आणि त्याचवेळी हळूहळू जागं होत असलेलं शहर हा अवर्णनीय नजारा पाहताना आपण नि:शब्द होतो. इथे आपल्याला सूर्योदयाचा विलक्षण अनुभव घेता येतो.

आणखी एक असं ठिकाण आहे जिथल्या सूर्योदयाची प्रभा खास आहे. हे ठिकाण आहे इजिप्तमधलं. तिथला आसमंत केवळ सूर्याच्या प्रकाशानेच नव्हे तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या इतिहासाच्या खुणांनीही भरलेला आहे. इजिप्तच्या दक्षिणेकडील लक्सर शहरावरून हॉट एअर बलून उंच उडतात. त्या बलूनमध्ये असलेल्या पर्यटकांना प्राचीन प्रार्थनास्थळे, नागमोडी वाहणारी नाईल नदी आणि काळाच्या ओघात जराही न बदलेली सोनेरी वाळवंटी मैदाने असा खास प्रदेश नजरेस पडतो.

‌‘व्हॅली ऑफ किंग्ज‌’ आणि ‌‘हत्शेप्सुतचे मंदिर‌’ यावरून तरंगत जाण्याचा अनुभव आणि कपाडोशियातील अनुभव यात खूप फरक आहे. इथली ‌‘बलून राईड‌’ रमणीय दृश्य दाखवत नाही. या राईडमध्ये आधुनिक जग अस्तित्त्वात येण्याच्या खूप आधी दगडात कोरलेली माणसाची महत्त्वाकांक्षा, श्रद्धा आणि कलाकुसर पाहता येते. त्यातून आपली इतिहासाविषयीची दृष्टी व्यापक व्हायला मदत होते. इजिप्तच्या स्वभावात एक प्रकारचा अस्सल रांगडेपणा आहे. इथे गडद रंगांविषयी आस्था आहे. त्याला भारदस्त इतिहासाची साथ आहे. त्याचसोबत इथली शांतताही गूढ आहे. इथलं वाळवंट आपल्याला कवेत घेतं आणि आपण किती छोटे आहोत, हा सगळा पसारा किती मोठा आणि अवाढव्य आहे, याची पुन्हा पुन्हा जाणीव होते.

आत्तापर्यंत तुम्ही जे काही वाचलंत, ते मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून मांडलेलं आहे. पर्यटनासाठी ठिकाणांची निवड करण्याची माझी पद्धत गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदलली आहे. लोकप्रिय, गर्दी असलेल्या ठिकाणांविषयीची माझ्या मनातली ओढ कमी झाली आहे. त्याऐवजी एखादं ठिकाण मला कसं भावेल, याचा विचार मी आता प्रामुख्याने करू लागलो आहे. त्यामुळेच आता मी ‌‘कुठे जायचं?‌’ हा प्रश्न स्वत:ला विचारत नाही. त्याऐवजी, ‌‘आता मला नेमका कशा स्वरुपाचा अनुभव घ्यायचा आहे?‌’ असा प्रश्न विचारतो. त्यातून कधीकधी मी अगदीच नॅचरल ठिकाणाची निवड करतो, तर कधीकधी ही उत्कंठा मला एखाद्या अनपेक्षित ठिकाणी घेऊन जाते.

म्हणजेच ‌‘ऑल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन्स‌’ ही कल्पना नेहमीच्या प्रचलित, लोकप्रिय ठिकाणांचं उणेपण दाखवण्यासाठी नाहीये तर जग खूप बदलतंय, वेगवेगळ्या स्तरांवर बदल होताहेत याची जाणीव करून घेण्यापुरतीच ही कल्पना आहे. आपल्याला ज्या ठिकाणांमध्ये आपली भावनिक गुंतवणूक आहे असं आजवर वाटत होतं, तशी आणखीही ठिकाणं जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत आणि हमरस्ता सोडून आपण थोडं आडवाटेने जातो तेव्हा ती भावनिक गुंतवणूक आपल्या मार्गातील अडचण बनत नाही एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. पर्यटनाकडे पाहण्याचा माझा हा दृष्टिकोन तुम्हालाही पटला तर या लेखाचं उद्दिष्ट साध्य झालं, असं मला वाटेल. किंवा हे वाचून तुमच्या मनात एखादा वेगळा विचार, वेगळं मत किंवा ‌‘अमुक एका ठिकाणाबद्दल काय म्हणावं?‌’ अशी शंका निर्माण झाली तर अधिक उत्तम. पुन्हा भेटूया पुढच्या लेखात, तोवर सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
12 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
12 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
12 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!