We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

बाल्कन्स की बाल्टिक्स?

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
May 15, 2026
May 15, 2026

Quick Summary

डुब्रोव्हनिकच्या ओल्ड टाउनमध्ये संध्याकाळी दगडी चौकात निवांत बसून शहराचा सोनेरी प्रकाश अनुभवावा.

ओल्ड टाउनच्या तटबंदीवरून चालताना एका बाजूला एड्रियाटिक समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शतकानुशतकांचा इतिहास पाहावा.

फ्री लाईव्ह म्युझिक सुरू असताना बाल्कनीतून संगीत ऐकून खाली सीफूड आणि वाईनसह वातावरणात हरवून जावे.

लोक्रम बेटावरील शांत बीचेस आणि ओल्ड टाउनच्या भूलभुलैय्यासारख्या गल्ल्यांतील लपलेली कॅफे आणि अंगणं जरूर शोधा.

बाल्कन्स आणि बाल्टिक्समध्ये गोंधळ टाळण्यासाठी बाल्कन्स म्हणजे बाल्कन पर्वतरांगा आणि बाल्टिक्स म्हणजे बाल्टिक समुद्र लक्षात ठेवा.

क्रोएशियातील डाल्मेशियन किनारपट्टीसाठी रोड ट्रिप करा, विमानतळाजवळ थोडी प्रॅक्टिस करून रस्त्याच्या नियमांना पटकन जुळवा.

Published in Loksatta Lokrang, 17th May, 2026

..इतिहास, निसर्ग, संस्कृती आणि अविस्मरणीय अनुभवांनीभरलेली ही ठिकाणं मनात कायमची घर करून राहतात. काही प्रवास संपतात, तर काही मनात कायमचे सुरू राहतात...

डुब्रोव्हनिकच्या ओल्ड टाउनमधील एका छोट्याशा कॅफेमध्ये मी माझ्या मैत्रिणीसोबत निवांत बसले होते. समोरच्या दगडी चौकात संध्याकाळचा सोनेरी प्रकाश अलगद उतरला होता. तेवढ्यात माझं लक्ष एका उंच स्टिल्ट्सवर चालणाऱ्या महिलेवर गेलं. तिचा लालभडक, लहरता ड्रेस त्या अरुंद दगडी रस्त्यांमधून अतिशय देखणेपणे हलत होता. ती काही क्षण आमच्या नजरेसमोर राहिली आणि मग जुन्या शहराच्या प्रकाशात हळूहळू अदृश्य झाली. त्या क्षणी मला वाटलं, एखाद्या फॅन्टसी चित्रपटातील पात्रच जणू माझ्यासमोरून चालत गेलं. पण खरं सांगायचं तर, केवळ तीच नाही, संपूर्ण डुब्रोव्हनिकच एखाद्या कल्पनारम्य दुनियेतून बाहेर पडल्यासारखं वाटतं. रात्र पुढे सरकत होती आणि ओल्ड टाउनमधील संगमरवरी रस्ते धुण्याचं काम सुरू झालं होतं. दररोज रात्री शहर इतक्या काळजीपूर्वक स्वच्छ केलं जातं की दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा नव्यासारखं उजळून दिसतं. त्याच वेळी चौकाकडे तोंड असलेल्या एका बाल्कनीतून फ्री लाईव्ह म्युझिक सुरू झालं. हवेत संगीताचे सूर तरंगत होते, आणि खाली लोक सीफूडचा आस्वाद घेत, वाईनचे घोट घेत त्या वातावरणात हरवून गेले होते. त्या संध्याकाळी मला जाणवलं की काही शहरं केवळ पाहायची नसतात, ती जगायची असतात. बहुतेक लोक डुब्रोव्हनिकला गेम ऑफ थ्रोन्समधील “किंग्स लँडिंग” म्हणून ओळखतात. पण मालिकेची लोकप्रियता बाजूला ठेवली, तरी या शहराचं व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावी आहे की ते कोणत्याही काल्पनिक कथेला सहज मागे टाकेल. शहराच्या भक्कम तटबंदीवरून चालताना एका बाजूला चमचमणारा एड्रियाटिक समुद्र आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाचं वैभव दिसतं. शतकानुशतकं या भिंतींनी शहराचं संरक्षण केलं आहे. पण डुब्रोव्हनिक केवळ टीव्ही मालिकेपुरतं मर्यादित नाही. लोक्रम बेटावरील शांत बीचेस, मोरांचा मुक्त वावर आणि ओल्ड टाउनच्या भूलभुलैय्यासारख्या गल्ल््यांमध्ये लपलेली कॅफे आणि अंगणं हे या शहराचं खरं आकर्षण आहे.

आणि ही तर माझ्या बाल्कन प्रवासाची फक्त सुरुवात होती. त्या एका संध्याकाळीच मला जाणवलं होतं की हा प्रवास केवळ नवीन ठिकाणं पाहण्यापुरता मर्यादित राहणार नाही. या प्रवासादरम्यान मी आणि माझी मैत्रीण पुढच्या सुट्टीबद्दल बोलत होतो. मी सहज म्हटलं, “चल, यावेळी बाल्कन्सला जाऊया.” ती थोडी गोंधळली आणि म्हणाली, “म्हणजे तुला बाल्टिक्स म्हणायचंय का?” खरंच, या दोन्ही नावांचा उच्चार साधारण सारखा असल्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक म्हणजे बाल्कन्स हे नाव बाल्कन पर्वतरांगांवरून आलं आहे, तर बाल्टिक्स हे बाल्टिक समुद्रावरून. बाल्कन प्रदेशात क्रोएशिया, स्लोव्हेनिया, माँटेनेग्रो, बोस्निया आणि हर्झ्ोगोविना, सर्बिया, अल्बानिया आणि नॉर्थ मॅसिडोनिया यांसारखे देश येतात. बाल्टिक्समध्ये एस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुआनिया हे तीन देश येतात. कधीकाळी कमी परिचित असलेला बाल्कन प्रदेश आज युरोपमधील सर्वात मोहक भागांपैकी एक मानला जातो. पर्वतरांगा, स्वच्छ समुद्रकिनारे, इतिहास आणि संस्कृती यांचा अप्रतिम संगम असलेला हा भाग अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतो. या सगळ्यांमध्ये क्रोएशिया माझा खास आवडता ठरला. इथे प्रत्येक वळणावर इतिहास भेटतो, आणि प्रत्येक समुद्रकिनारा तुम्हाला थांबून तो क्षण जगायला भाग पाडतो.

क्रोएशियातील डाल्मेशियन किनारपट्टीचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर रोड ट्रिपला तोड नाही. आम्ही एक कार भाड्याने घेतली. लेफ्ट-हँड ड्राइव्ह कार चालवायची आणि रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवायची या कल्पनेने सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. त्यामुळे विमानतळाजवळ थोडी प्रॅक्टिसही केली. प्रत्येक सिग्नलला आम्ही एकमेकींना एकच गोष्ट आठवण करून द्यायचो  “स्टे राईट!” काही दिवसांतच हे सगळं अगदी सहज वाटू लागलं. या ड्राइव्हदरम्यान एका बाजूला अंतहीन निळाशार समुद्र, दुसऱ्या बाजूला दगडी खेडी, ऑलिव्हची झाडं आणि छोट्या बंदरांत डुलणाऱ्या बोटी दिसत होत्या. इथलं पाणी इतकं स्वच्छ की वाटेत सुंदर जागा दिसली की आम्ही कार थांबवून समुद्रात डुबकी मारायचो. कपड्यांच्या आत स्विमवेअर घालणं आमच्यासाठी नॉर्मल झालं होतं. माझ्यासाठी लक्झरीची खरी व्याख्या हीच होती. खरा आनंद अनेकदा अशा छोट्या, अनपेक्षित क्षणांत दडलेला असतो - अचानक सापडलेल्या समुद्रकिनाऱ्यात, वाटेत मिळालेल्या ताज्या जेलॅटोमध्ये किंवा सूर्यास्ताकडे पाहत शांत बसण्यात. स्प्लिटमध्ये रोमन सम्राट डायोक्लेशियनचा राजवाडा आजही शहराच्या मध्यभागी उभा आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास आणि आजचं उत्साही शहरी जीवन इतक्या सहजपणे एकत्र नांदताना पाहणं ही स्वतःमध्येच एक अनोखी गोष्ट आहे. प्राचीन वास्तूंच्या सान्निध्यात ट्रेंडी कॅफे, संगीत आणि आधुनिक जीवनशैली सहज मिसळून जाते. याच शहरातून अनेक प्रवासी क्रोएशियाच्या प्रसिद्ध यॉट वीकसाठी रवाना होतात. ह्वार बेट म्हणजे जणू उन्हाळ्याचं मूर्त रूप. आमची बोट बेटाजवळ पोहोचताच मला लगेच समजलं की सेलिब्रिटीज, यॉट मालक, बॅकपॅकर्स आणि हनिमूनर्स सगळे इथे का येतात. टरकॉइज आणि सॅफायर ब्लूच्या छटा इतक्या अप्रतिम आहेत की त्या खऱ्या आहेत की फोटोशॉप केलेल्या, असा प्रश्न पडावा. पण ह्वार केवळ ग्लॅमर आणि पार्टीपुरतं मर्यादित नाही. अरुंद दगडी रस्ते, व्हेनेशियन शैलीतील इमारती आणि मोहक कॅफे यामुळे हे बेट मन जिंकून घेतं.

ह्वारहून आम्ही बिशेवो बेटावरील प्रसिद्ध ब्लू केव्ह पाहायला गेलो. गुहेच्या तळाशी असलेल्या नैसर्गिक उघडीतून सूर्यकिरण आत येतात आणि संपूर्ण गुहा निऑन निळ्या प्रकाशाने उजळून निघते. तो अनुभव इतका जादुई होता की क्षणभर वाटलं, निसर्गाने स्वतःचा स्पेशल इफेक्ट्स स्टुडिओ उभारला आहे. यानंतर आम्ही व्हिस बेटावर पोहोचलो. ह्वारच्या झगमगाटाच्या तुलनेत व्हिस अधिक शांत, निवांत आणि अस्सल वाटतं. इथेच आम्ही स्टिनिवा बीचला भेट दिली. उंच कड्यांच्या मधोमध लपलेला हा बीच समुद्रातून पोहत जाऊनच गाठावा लागतो. त्या नितळ पाण्यात उडी मारून पोहत किनाऱ्यावर पोहोचणं म्हणजे जणू एखादं गुप्त स्वर्गस्थान शोधल्यासारखं वाटलं. उत्तरेकडे जात आम्ही झादारला पोहोचलो. इथलं “सी ऑर्गन” हे युरोपमधील सर्वात अनोख्या आकर्षणांपैकी एक आहे. समुद्राच्या लाटा पाइप्समधून वाहतात आणि सुरेल स्वर निर्माण होतात. समुद्र स्वतः संगीत सादर करत आहे, असा हा अनुभव. जवळच असलेलं “ग्रीटिंग टू द सन” सूर्यास्तानंतर रंगीबेरंगी प्रकाशांनी उजळून निघतं. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी पहिल्याच भेटीत मनात घर करते. हे शहर हळूहळू आपुलकीने जवळ येतं आणि नकळत आपलंसं होतं. सेंट मार्क्स चर्चचं रंगीबेरंगी छप्पर, जुन्या जगाचा मोहकपणा आणि निवांत वातावरण यामुळे शहर वेगळंच वाटतं. इथलं “म्युझियम ऑफ ब्रोकन रिलेशनशिप्स” तर अतिशय अनोखं आहे. प्रेमभंगानंतर मागे राहिलेल्या वस्तू आणि त्यामागच्या भावना पाहताना हसूही येतं आणि हुरहूरही वाटते.

क्रोएशियावर व्हेनेशियन प्रभाव स्पष्ट दिसतो. स्थापत्य, भाषा, खाद्यसंस्कृती आणि अर्थातच अप्रतिम जेलॅटो. कोर्चुला या मोहक बेटावर तर हा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवतो. दंतकथेनुसार मार्को पोलोचा जन्म याच ठिकाणी झाला होता. कोर्चुलाकडे जाताना आमच्या प्रवासात एक मजेदार प्रसंग घडला. जीपीएस बंद पडला आणि आम्ही समोरच्या गाड्यांच्या मागोमाग जात थेट कार फेरीमध्ये पोहोचलो. समोर रस्ता नव्हता, फक्त अथांग समुद्र. हा अनपेक्षित शॉर्टकटच संपूर्ण प्रवासातील सर्वात संस्मरणीय अनुभवांपैकी एक ठरला. आणि मग आम्ही पोहोचलो प्लिटविस लेक्स नॅशनल पार्कमध्ये. 16 सरोवरं, धबधबे आणि हिरव्यागार जंगलांनी बनलेली ही साखळी सतत बदलणाऱ्या टरकॉइज, हिरव्या आणि निळ्या रंगांनी मंत्रमुग्ध करून टाकते. हा नॅशनल पार्क म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत चित्रच. लाकडी पायवाटांवरून चालताना प्रत्येक वळणावर वेगळा रंग, वेगळा धबधबा आणि वेगळं दृश्य दिसत होतं. कितीही फोटो काढले तरी त्या जागेचं खरं सौंदर्य कॅमेऱ्यात पूर्णपणे बंदिस्त करता येणं अशक्यच आहे.

क्रोएशियाच्या उत्तरेला स्लोव्हेनिया आहे. आकाराने लहान असला तरी हा देश निसर्ग, सौंदर्य आणि जीवनमान या तिन्ही बाबतीत मोठा ठसा उमटवतो. ल्युब्लियाना ही त्याची मोहक राजधानी नदीकाठच्या कॅफे, ड्रॅगन ब्रिज आणि टेकडीवरील किल्ल््यामुळे परीकथेसारखी वाटते. आणि लेक ब्लेड? मध्यभागी छोटंसं चर्च, भोवती डोंगर आणि पाचूसारखं हिरवं पाणी. अशा दृश्यांसमोर काही क्षण शब्दच हरवून जातात. क्रोएशियाच्या दक्षिणेला माँटेनेग्रोमधील कोटर हे मध्ययुगीन शहर “सिटी ऑफ कॅट्स” म्हणून प्रसिद्ध आहे. जवळचं बुडवा मात्र वेगळ्याच रंगात दिसतं. लक्झरी यॉट्स, बीच क्लब्स आणि सीफूड रेस्टॉरंट्स यामुळे त्याला एक ग्लॅमरस ऊर्जा लाभली आहे. इथून बोस्निया आणि हर्झ्ोगोविनामधील मोस्टारला वन-डे ट्रिपही करता येते. स्टारी मोस्ट पुलावरून खाली नदीत उड्या मारणारे डायव्हर्स पाहणं हा अविस्मरणीय अनुभव आहे. पुलाभोवतीची ऊर्जा, स्थानिकांची उत्सुकता आणि निळसर हिरव्या नदीचं सौंदर्य यामुळे मोस्टार हे केवळ ऐतिहासिक शहर न राहता एक भावनिक अनुभव बनून जातं.

हा प्रवास संपला, पण माझा बाल्कन्सचा शोध अजूनही पूर्ण झालेला नाही. प्रत्येक शहराने, प्रत्येक किनाऱ्याने आणि प्रत्येक अनपेक्षित वळणाने या प्रदेशाबद्दलचं माझं प्रेम अधिकच वाढवलं. खरं तर फक्त बाल्कन्सच नव्हे, तर मला अजून बाल्टिक्सलाही भेट द्यायची आहे. युरोपमधील हे दोन्ही प्रदेश अजूनही अनेक प्रवाशांसाठी अनोळखी खजिन्यासारखे आहेत. इतिहास, निसर्ग, संस्कृती आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेली ही ठिकाणं मनात कायमची घर करून राहतात. काही प्रवास संपतात, तर काही मनात कायमचे सुरू राहतात. बाल्कन्स माझ्यासाठी अगदी तसाच ठरला. म्हणूनच, तुम्हीही युरोपमधील या सुंदर आणि कमी परिचित रत्नांचा शोध घ्यायचा विचार करत असाल, तर प्रश्न “बाल्कन्स की बाल्टिक्स?” असा नाही. खरा प्रश्न हा आहे  सर्वप्रथम तुम्ही कोणता प्रदेश अनुभवणार?

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
8 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
8 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
8 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!