सगळं काही शक्य आहे

0 comments
Reading Time: 8 minutes

एक मात्र त्या पेपरने दाखवून दिलं की, एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. आपण खरे असू, माणसांच्या-संघटनेच्या शक्तीवर आपला विश्वास असेल, कामावर-प्रयत्नांवर आपली निष्ठा असेल, उतणार नाही-मातणार नाही- खचणार नाही अशी उमेदी मानसिकता आपल्या संपूर्ण समूहाची असेल, नीतिमूल्य- नैतिकता ह्यांच्या कक्षा आपल्याला माहिती असतील तर आपण काहीही नसताना कुणीतरी असण्याचं भविष्य लिहू शकतो, ते प्रत्यक्षात आणू शकतो.

पाच वर्ष झाली आता मागे वळून पाहूया, अवलोकन करूया, काय करायला निघालो होतो, काय झालं, काय नाही झालं ह्याचा परामर्श घेऊया. त्यावेळची मानसिक स्थिती, काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द, हातापायातलं आणि मनातलं बळ तेवढंच आहे की वाढलंय-कमी झालंय हे तपासूया. मुख्य म्हणजे जे करायचं होतं ते बर्‍याच प्रमाणात मिळालं आता शांत बसूया अशातर्‍हेची आत्मसंतुष्टता आपल्यात शिरकावकर्ती झालीय का? हे आपणच स्वतःशी कठोर होऊन जोखून बघूया ह्या उद्देशाने आम्ही मिटिंगला सुरुवात केली. एक ठरवलं होतं की काही ठिकाणी आपल्याला खूप चांगले रीझल्टस् दिसतील तर काही ठिकाणी आपण सपशेल फेल गेलोय हेही दिसेल, पण यशाचाच उदो-उदो करायचा आणि अपयशांकडे ढुंकूनही बघायचं नाही किंवा शिताफिने तिथे बघायचं टाळायचं हे होऊ द्यायचं नाही. आपणच आपले छडीवाले मास्तर बनायचं. जे झालंय ते बदलता येणार नाही अगदी ब्रह्मदेव आला तरी, पण त्यातून बरंच काही शिकू शकतो. काही गोष्टींना गती प्राप्त झाली असेल, काहींनी चालायला सुरुवात केली असेल, काही आपल्या जागेवरून ढिम्म हलल्या नसतील, काहींचं नुसतं बीजारोपण झालं असेल पण पाच वर्ष झाली तरी त्यांनी जन्मच घेतला नसेल अशा अनेक बर्‍या-वाईट गोष्टी आपल्याला वास्तविकतेचं दर्शन घडवतील. खिलाडू वृत्तीने आपल्याला तेे स्विकारायचंय आणि नव्याने येत्या पाच वर्षांची गणितं मांडायचीयेत. खुल्या दिलाने-ओपन माईंडने अगदी तटस्थपणे आपण आपल्या पाच वर्षांच्या इतिहासाकडे बघायचंय. एक बरं आहे की यशाचं श्रेय घ्यायची आणि अपयशाचं खापर दुसर्‍यावर फोडायची संस्कृती रुजली नाही. जे केलं ते आपण सर्वांनी मिळून केलं, यश आपलं सर्वांचं आहे पण त्याने मातून जाऊया नको आणि अपयशही आपल्या सर्वांचं आहे त्याने खच्ची न होता पुन्हा एकदा नव्याने एकमेकांची उमेद वाढवित त्या गोष्टी जर आपल्याला पुढे न्यायच्या असतील तर प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, आपली पद्धत बदलूया, आधीची पद्धत कदाचित चुकीची असेल त्याचाही उहापोह करूया, आपणच आपले डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट बनूया हे सगळं सर्वांनी मिळून ठरवूनच मिटिंगला सुरुवात केल्याने प्रत्येक जण आपलं परखड मत मांडत होते, आणि आम्ही वयाने, अनुभवाने मोठे सर्वजण कोणतीही गोष्ट पर्सनली न घेता पुढे कायचा विचार करीत होतो.

आनंदाची गोष्ट अशी होती की पाच वर्षांपूर्वी आम्ही एक साधा पेपर बनवला होता ज्यात दरवर्षी आपली प्रगती कशी होईल ह्याचे नंबर्स लिहिले होते. किती पर्यटक, किती टर्नओव्हर, कोणते सेक्टर्स, किती मॅनपावर… अशा अनेक गोष्टी होत्या. अगदी शून्य असताना तो पेपर बनवणं हे धाडस होतं, त्यावेळी कुणीही त्याला दिवास्वप्न म्हटलं असतं असा तो अवाजवी म्हणता येण्यासारखा पेपर होता, पण जेव्हा बनवला तेव्हा कुणालाच तो तसा वाटला नाही कारण त्यापाठी होता प्रत्येकाचा स्वतः वरचा विश्वास, जिद्द, दृढनिश्‍चय, प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर यश खेचून आणता येतं ही उमेद. पाच वर्षांचा काळ कसा गेला कळलंच नाही, वेळच नव्हता. आज तो पेपर जेव्हा सर्वांच्या समोर आला तेव्हा लक्षात आलं की जे त्यावर लिहिलं होतं, अंधारात भविष्यावर जो तीर मारला होता तो त्या पाच वर्षांच्या शॉर्ट टर्म ध्येयावर अचूक लागला होता. ते सगळं तसंच्या तसं घडलं होतं, कुठे कुठे तर ओव्हर अचिव्हमेंट होती. प्रत्येकाने स्वतःला आणि सर्वांनाच शाबासकी देण्यासारखी स्थिती होती. थोडा वेळ त्या शाबासकीपूर्ण वातावरणात रहायला हरकत नव्हती. कारण थोड्या वेळाने आम्ही त्या मिटिंगच्या पुढच्या पायरीवर चढणार होतो आणि ती होती, तसं बघायला गेलं तर आपण ओव्हर अचिव्ह केलं पण ह्यापेक्षा अधिक करू शकलो असतो का? प्रत्येक व्यवसायाला आणि व्यावसायिकाला हा प्रश्‍न पडलाच पाहिजे. जे मिळवलं त्यात आनंद मानणं रास्त आहे आणि तो व्हायलाच हवा. पण त्यात जर समाधानी झालो तर वाढ खुंटलीच समजायची. आय अ‍ॅम हॅप्पी बट नेव्हर सॅटिस्फाईड ही मानसिकता असते खर्‍या व्यावसायिकाची, नसेल तर ती अंगी बाणवायला हवी आजच्या जागतिक स्पर्धेच्या वातावरणात. हो बघानं, एकतर आपण खूप मोठं बनायला पाहिजे किंवा जर आपण छोटे असू तर आपल्यासारख्या अनेक छोट्या-छोट्या एकमेकांना साथ देणार्‍या उद्योगांच्या क्लस्टरमध्ये राहून सामूहिक संघटित शक्तीचा भाग बनलं पहिजे. एक मात्र त्या पेपरने दाखवून दिलं की, एव्हरीथिंग इज पॉसिबल, सर्व काही शक्य आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. आपण खरे असू, आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण सतत चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा केला असेल, माणसांच्या-संघटनेच्या शक्तीवर आपला विश्वास असेल, कामावर-प्रयत्नांवर आपली निष्ठा असेल, उतणार नाही-मातणार नाही-खचणार नाही अशी उमेदी मानसिकता आपल्या संपूर्ण समूहाची असेल, नीतिमूल्य-नैतिकता ह्यांच्या कक्षा आपल्याला माहिती असतील तर आपण काहीही नसताना कुणीतरी असण्याचं भविष्य लिहू शकतो, ते प्रत्यक्षात आणू शकतो.

पाच वर्षांनी आम्ही ते कुणीतरी झालोय ह्यात वाद नाही. आनंद आहे. पण हे कुणीतरी असणं भयंकर धोकादायक पुढच्या वाटचालीसाठी. ज्यावेळी आपण सुरुवात केली त्यावेळी आपण आपला हेतू निश्‍चित केलेला असला तरी जे काही यश आपल्याला प्राप्त करायचं असतं ते थोडं लो प्रोफाईल किंवा तोलून मापून ठरवतो कारण आपली क्षमता-पात्रता- सभोवताल ह्याविषयी आपण साशंक असतो. थोडी भितीसुद्धा मनात असते. मात्र जोश एकदम हाय असतो, जो सर्वात महत्त्वाचा असतो आणि त्याद्वारे आपण साध्य करतो जे करायचं असतं ते, आम्हीही ते केलं. पण जेव्हा अ‍ॅनालिसिस करायला बसलो, अधिक काही करू शकलो असतो का ह्यासाठी, तेव्हा कोणकोणत्या गोष्टी बरोबर होत्या ह्यापेक्षा आपल्या किती गोष्टी चुकल्या किंवा कितीतरी गोष्टी अशा पद्धतीने नव्हे तर अशा करायला हव्या होत्या ह्याचीच लिस्ट वाढत गेली. म्हणजेच ठरवलेलं यश पदरी पडलं पण जर ह्या अनेक गोष्टी बरोबर करीत गेलो असतो, आणखी थोडं विचारमंथन आणि आगळी आचारप्रणाली वापरली असती तर जे केलं त्यापेक्षा पंचवीस ते तीस टक्के जास्त यश पदरी पडलं असतं, हे लक्षात आलं. थोडक्यात आपली क्षमता अधिक आहे ह्याची जाणीव ह्या अ‍ॅनालिसिसने झाली, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बर्‍याच ठिकाणी आम्ही कॉम्प्लेसंट झालो होतो. ह्याला मॅनेजमेंट थिअरीमध्ये अशी आत्मसंतुष्टता दाखविणारं खूप चांगलं वाक्य आहे किंवा फ्रेझ आहे ती म्हणजे, वुई हॅव अराईव्हड! एकदा का आपल्याला जे करायचं होतं ते झालं असे आपल्या मनाला वाटायला लागलं की पुढची वाटचाल द्रुतगतीवरून धीम्यागतीवर यायला सुरुवात होते, तसंच काहीसं आमचं झालेलं दिसलं . कोणताही आडपडदा न ठेवता आम्ही ह्या सगळ्याची चर्चा केली. आपण कुठे चुकलो? आपण कुठे आत्मविश्वासाचा अतिरेक केला? (अर्थात ओव्हरकॉन्फिडन्समध्ये माझा अव्वल नंबर त्यामुळे त्या सगळ्या चुकांचं श्रेय पूर्ण मला जातं) कुठे एखादी गोष्ट करताना पूर्ण प्रोजेक्ट आमच्या नेहमीच्या 6W2H थिअरी वापरल्याशिवाय पुढे नेला? कुठे फक्त रोझी पिक्चर बघितलं आणि क्रिटिकल गोष्टींचा विचारच केला नाही? कुठे आपण भविष्यावर नजर ठेवायला कमी पडलो? कुठे आपल्या हातून वर्तमानकाळ सुटून गेला? कुठे आपण आपल्या भूतकाळातून न शिकता पुन्हा त्याच चुका केल्या? हे सगळं चर्चेत पुढे आणीत गेलो. पहिलं सेशन संपलं तेव्हा मन दमलं होतं आणि डोकं गरगरायला लागलं होतं. लंचनंतर आम्ही आमच्या मिटिंगच्या तिसर्‍या आणि अंतिम भागाची सुरुवात करणार होतो.

एक एप्रिल दोन हजार तेरा ते एक एप्रिल दोन हजार अठरा ही पहिली पाच वर्ष दे दणादण आम्ही पर्यटन व्यवसायातील प्रगतीचा, शहरांचा, राज्यांचा, देशांचा आणि खंडांचा प्रवास करीत होतो. अठरा-एकोणीस म्हणजे आत्ता येणार्‍या एकतीस मार्चपर्यंतचं एक वर्ष आम्ही डायजेशन पीरियेडमध्ये घातलं, कॉम्प्लेसन्सीतही घातलं, हो सीरियसली, एकदा काय छान छान वाटून घ्यायचंय ते घेऊया कारण ह्याच महिन्यात आपण एकतर केलेलं सगळं शून्य समजून त्या शून्यातून आणखी मोठी झेप घ्यायचीय किंवा जिथपर्यंत आलोय तेथून पुढे नेक्स्ट लेव्हलला जायचंय. अ‍ॅक्च्युअली वुई हॅव अराईव्हड हे असं आपल्यासाठी कधीच नसणार आहे ते क्षितिजासारखं आहे. दर पाच वर्षांनी ते आणखी पुढे जाणार आहे. आपल्याला ठरवायचंय की ह्या पाच वर्षात आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय. चला सुरुवात करूया म्हणत आम्ही पुढच्या पाच वर्षांचा पेपर लिहायला घेतला.

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*