India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

जो होगा सो होगा... Lets Keep Calm!

13 mins. read
Veena Patil
Veena Patil
13 Mins Read
April 18, 2019
April 18, 2019

Quick Summary

पर्यटनात यायचं असेल तर मन खंबीर ठेवा आणि प्रत्येक अडथळ्यातून विजयी होण्याची वृत्ती ठेवा.

केरळसारख्या संकटानंतर सहली लवकर पुन्हा सुरू होतात, त्यामुळे पूर्वतयारी वेळेवर आणि लवचिक ठेवा.

काश्मिरसारख्या ठिकाणी नैसर्गिक किंवा राजकीय घटनांनंतरही बाऊन्स बॅक पटकन होतो, त्यामुळे अपडेट्सवर लक्ष ठेवा.

एअरलाईन्स आणि हॉटेल्ससोबतचे आधीचे बुकिंग आणि चांगले संबंध वाजवी किमतीत सहल देण्यास मदत करतात.

संकटात रीफंड आणि कॅन्सलेशनवर चर्चा होऊ शकते, म्हणून पर्याय आणि स्पष्ट संवाद आधीच तयार ठेवा.

पर्यटकांना पर्यायी सहल देऊन भविष्यातही खूश ठेवण्यावर लक्ष द्या, जरी मध्ये वातावरण गरम होऊ शकतं.

यू आर नॉट स्ट्राँग इनफ म्हणूनच तुझ्यासारख्या सर्वांसाठीच मी नेहमी वेगवेगळे फासे टाकत असतो. एकातून सहीसलामत बाहेर पडलात की दुसरा अडथळा घेऊन मी तुमच्यासमोर हसतहसत उभा असणार आहे. आयुष्य एक चॅलेंज आहे पण व्यवसाय ही प्रचंड मोठी अडथळ्यांची शर्यत असणार आहे. अधेमधे माघार घेता येणार नाही. प्रत्येक अडथळ्यातून विजयी होऊनच बाहेर यायचंय. दमायचं नाही, रडायचं नाही, तक्रार करायची नाही, उमेद हरवायची नाही. एव्हरी टाईम यू हॅव टू इमर्ज आऊट अ‍ॅज अ विनर! हे मान्य असेल तरच मी सतत पाठीशी आहे.

पर्यटन क्षेत्रात यायचं असेल तर मन खंबीर करा किंवा मनाने खंबीर असाल तरच पर्यटनक्षेत्रात या. आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळंच काही ही परिस्थिती इथे सतत असणार आहे. मात्र मेहनत केली तर देव सतत पाठीशी असणार हेही तितकंच खरं. केरळला महापूराने झोडपलं आणि पर्यटकांनी जवळ-जवळ वर्षभर केरळकडे ढुंकूनही बघितलं नाही. आत्ता एप्रिल-मे महिन्यात केरळच्या सहली हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गेल्यावर्षीसाठी त्याच्याही एक वर्ष आधी केलेली केरळसाठीची सर्व पूर्वतयारी कवडीमोल झाली. नऊ महिन्यांनी केरळ पूर्वपदावर आलं. त्यामुळे यावर्षी जास्त संख्येने पर्यटक केरळकडे येतील त्याची तयारी ठेवावी लागेल आम्हाला आणि केरळलाही.

रेझिलियन्स किंवा कोणत्याही संकटातून पटकन बाहेर पडण्याची मानसिकता जर कोणत्या पर्यटनस्थळात असेल तर ती मला काश्मिर, बँकॉक, बाली ह्यांच्यामध्ये दिसते. अतिरेकी कारवाया - पूर - भूकंप सारख्या गोष्टींनी ह्या पर्यटनस्थळांना कधी ना कधी ग्रासलंय पण त्यामुळे कधी ह्या पर्यटनस्थळंानी नांगी टाकली नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यातून लागलीच बाहेर येऊया आणि कामाला लागूया अशी वृत्ती. पर्यटकही त्यामुळे झालं-गेलं विसरून पटकन इथल्या पर्यटनाला जायला सुरुवात करतात. पस्तीस वर्षाच्या पर्यटनाच्या आयुष्यात मी अनुभवलंय की ह्या पर्यटनस्थळांचा पूर्वपदावर येण्याचा- टर्नअराऊंड टाईम एक महिन्यापेक्षा कमी आहे. आता बघा नं, फेब्रुवारीमध्ये काश्मिर सहलींना सुरुवात झाली. दे धम्माल करून पर्यटक आनंदाने घरी आले. तेवढ्यात अशा काही घटना घडल्या की दीड-दोन महिने काश्मिर ठप्पं झालं. आम्हालाही सहली पुढे ढकलाव्या लागल्या. पण आता पुन्हा काश्मिर सुरळीत झालं, पर्यटक आनंदात विहार करताहेत. गेल्या आठवड्यात सुधीरही स्वतः श्रीनगर, गुलमर्ग, पहलगामची सहल करून आले. तिथे असलेल्या वीणा वर्ल्डच्या पर्यटकांनाही भेटले. बाऊन्स बॅक इमिडिएटली! हे असं आपल्याला पर्यटनस्थळांकडूनही शिकता येतं.

अर्थात ह्याबाऊन्स बॅकमध्ये पडझड होतेच. अशातर्‍हेच्या कोणत्याही नैसर्गिक, राजकीय, अतिरेकी वा अकल्पित आपत्तीच्या वेळी एअरलाईन्स, हॉटेल इंडस्ट्री, ट्रॅव्हल कंपन्या आणि पर्यटक ह्या सर्वांनाच फटका बसतो. आम्ही कधी अ‍ॅडव्हान्स भरून किंवा कधी पूर्ण पैसे भरून एक-एक वर्ष आधी एअरलाईनकडे बुकिंग केलेलं असतं, एअरलाईनही इतक्या अ‍ॅडव्हान्समध्ये पैसे आल्याने चांगलं एअरफेअर किंवा हव्या तेवढ्या सीट्स आम्हाला देतं. त्यामुळेच आम्ही पर्यटकांना वाजवी किमतीत सहली देऊ शकतो. फेब्रुवारी- मार्चमध्ये जेव्हा दीड महिना काश्मिर सहली पुढे ढकलाव्या लागल्या तेव्हा असंच झालं. पर्यटकांनी आमच्याकडे आणि आम्ही एअरलाईनकडे रीफंड संबंधात तगादा लावला. एअरलाईनचं म्हणणं असं की, आमची फ्लाइट्स ऑपरेट होताहेत, तुमच्या सीट्स रिकाम्या जाताहेत, आम्ही रीफंड कसला देणार? पर्यटकांचं म्हणणं, तुम्ही आणि एअरलाईन बघून घ्या काय ते, पण आम्हाला आमचे पैसे परत करा. हॉटेलवाले म्हणाले, यहाँ तो सबकुछ ठीक है, टूरिस्ट घूम रहे हैं। आप भेजों पर्यटकोंको। प्रत्येकजण आपापल्या जागी अगदी बरोबर, पण पैसे दावणीला लागलेले आणि सर्वांचाच जीव टांगणीला. वीणा वर्ल्डच्या भारतातल्या सहलींसाठी गो एअरवेज आणि इंडिगो ह्या दोन एअरलाईन्सकडे साठ ते सत्तर टक्के बिझनेस एकवटलेला. एअर इंडिया, विस्तारा, जेट एअरवेज, स्पाइस जेट सुद्धा काही रूट्सवर सहकार्य करतात. एअरलाईन्सच्या इतक्या वर्षीच्या संबंधातूनच काश्मिरसाठी गो एअरवेजने जिथे शक्य झालं तिथे ते पैसे दुसर्‍या सेक्टरला वळवायला परवानगी दिली तर काही ठिकाणी मिनिमम कॅन्सलेशन लावलं. मोठा बिझनेस आणि चांगले संबंध ह्यामुळे सुवर्णमध्य साधता आला. हॉटेल्सनीही सहाय्य केलं आणि पर्यटकांना आम्ही पर्याय देऊ शकलो. अर्थात यामध्ये सर्व काही सुखासूखी घडलं असं नाही. कधी पर्यटकांची नाराजी आम्हाला स्विकारावी लागली तर कधी चर्चा थोड्या गरमागरम झाल्या, जे तसं अपेक्षित होतं. लक्ष्य मात्र एकच, सद्य परिस्थितीवर मात करून पर्यटकांना भविष्यात ह्याच सहलीवर किंवा त्यांनी घेतलेल्या पर्यायी सहलीवर खूश करणं, त्यामुळे मध्ये थोडं वातावरण गरम व्हायचं ते आम्ही स्विकारत होतो. पर्यटक पूर्णपणे आमच्यावर अवलंबून असतात त्यामुळे तो रोष असणं स्वाभाविक आहे. अर्थात अशावेळी सर्वांनीच थोडंसं सबुरीने घ्यावं म्हणजे त्रास कमी होतो. गोष्टी जर आपल्या सर्वांच्याच कंट्रोलच्या बाहेरच्या असतील तर शांतपणे विचार करून त्यावर तोडगा काढणं चांगलं.

परवा असाच एक किस्सा घडला. शिमला- मनाली म्हणजे वीणा वर्ल्डचा बालेकिल्ला. वर्षातले तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला वीणा वर्ल्डचे पर्यटक तिथे दिसतील. कधी एकावेळी दहा टूर्स सुरू असतात तर कधी पंचवीस. आत्ताही सीझन सुरू असल्याने वीणा वर्ल्डचे बरेच पर्यटक तिथे होते. सहलीही मस्त सुरू आहेत. बहुतेक सहली ह्या मुंबई ते मुंबई विमानाने असतात तशीच एक सहल होती. सहलीचा विमानप्रवास जेट एअरवेजने होता. गेले महिनाभर ह्या एअरलाईनचा जो थरारपट सुरू आहे तो आपण बघतोच आहोत. संपूर्ण पैसे भरून तिकीटं काढलेली. जातानाचं विमान गेलं, येतानाचं आदल्या दिवशी कॅन्सल झाल्याची बातमी आली आणि गोंधळ उडाला. त्यावेळी त्या तिकीटाच्या रीफंडमध्ये उपलब्ध पर्याय होता राजधानी एक्सप्रेसचा, ज्यात विनासायास परत येता आलं असतं, आम्ही तशी तयारीही केली. पण पर्यटकांमधल्या एका कोणीतरी लीड घेतला आणि धरणं धरलं की, आम्ही ट्रेनने जाणार नाही. वीणा वर्ल्डची जबाबदारी आहे, आम्हाला विमानानेच परत नेलं पाहिजे. त्या दिल्ली मुंबई विमान तिकीटाच्या पैशात (जे जेटकडे आहेत) दुसर्‍या विमानाचं तिकीट येणार नव्हतं. कारण जसं जेटने फ्लाइट कॅन्सल केलं, तसं आजुबाजूच्या विमानांच्या तिकीटांची किंमत वाढली. एवढी तिकीटं हवी असतील तर प्रत्येक तिकीटाची किंमत सहलीच्या अर्ध्या खर्चाएवढी झाली आणि दर तासाला ती वाढत होती. जिथे जेट एअरवेजने कोणतीही पर्यायी व्यवस्था दिली नव्हती तिथे वीणा वर्ल्ड तरी काय करणार? आणि आताच्या वातावरणात एवढी अनिश्‍चितता भरून राहिलीय की वीणा वर्ल्डलाच काय कुणालाच अशा आपत्तीच्या वेळी पैशाचं सोंग आणता येणार नाही. ही मंडळी अडून बसली, बस सोडू दिली नाही आणि आठ तास स्वतःला त्रास करून घेत एका जागी थांबली. तोपर्यंत राजधानीचा पर्यायही आम्हाला सोडावा लागला. शेवटी स्पष्ट शब्दात सांगावं लागलं की, चूक ना तुमची ना आमची, आजपर्यंतची आपली सहल उत्कृष्ट झाली, तुम्ही वीणा वर्ल्डचं काम पाहिलंय, आम्ही आमची जबाबदारी कधीही टाळली नाही, टाळणार नाही पण ही परिस्थिती आपल्यावर ओढवलीय. तुमचं सहकार्य मिळालं असतं तर उद्या आपण राजधानी एक्सप्रेसने मुंबईकडे निघालो असतो. तो ही अनुभव तुम्हाला आवडला असता. पण आता ह्या मोठ्या ग्रुपला कुठेही एकत्र रीझर्व्हेशन उपलब्ध नाही. प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर जिथे मिळेल तसं रीझर्व्हेशन करा. जेट एअरवेजकडून रीफंड आल्यावर तसाच्या तसा तुम्हाला पाठवला जाईल. टूर मॅनेजर्स तुमच्यासोबत शेवटपर्यंत असतील, पण आता असे रस्त्यात थांबू नका. शेवटी मंडळी गाडीत बसली. मला आतून खूप वाईट वाटत होतं, हे चित्र आपल्या सहलीवर कधीही दिसू नये ह्यासाठी तर सर्व धडपड आणि परिश्रम. पण कधी जर असा प्रसंग आला तर जे काही शेवटी स्पष्ट केलं ते आधीच सांगावं हा विचार केला. एकमेकांवर विश्वास ठेऊन परिस्थिती समजून घेऊन, डोकं शांत ठेऊन जास्त चांगल्या तर्‍हेने तोडगा काढता येतो हे आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनुभवतो.

ह्याच अनुषंगाने आणखी एक गोष्ट इथे मला पर्यटनक्षेत्राविषयी सांगाविशी वाटते. पूर्वी कॅरी झिरो मनी ऑन टूर ही टॅगलाईन मी अ‍ॅडर्व्हटाईजमध्ये वापरली होती. अर्थात वीणा वर्ल्ड झाल्यावर मी ती वापरली नाही. पण सध्याच्या नैसर्गिक, राजकीय वा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाना सामोरं जाताना मला त्या टॅगलाईनची आठवण आली आणि मी ती बदलली. कॅरी मनी ऑन टूरअशी. मला खात्री आहे आता तुम्ही म्हणाल, सर्वसमाविष्ट सहली अशी जाहिरात तुम्ही करता आणि आम्ही अनुभवलंय की सहलीवर सर्व महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट असतात आणि कुठेच एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत मग हे काय नवीन? पण त्याचं झालंय असं की, आता पर्यटक खूप मोठ्या संख्येने फिरायला लागलेत. आकाशात विमानांची गर्दी झालीय. एअरपोर्ट्सवर पार्किंग लॉट्स उपलब्ध नाहीत. भरीस भर म्हणून ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा एकूणच निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे असेल, अतिवृष्टी-धुकं-भूकंप-बंद-मोर्चे-जेट एअरवेजची सद्यस्थिती ह्यासारख्या गोष्टी एअरलाईन इंडस्ट्रीवर तसंच एकूणच पर्यटनावर जगात कुठे ना कुठे आघात करताहेत. गेला संपूर्ण आठवडा मोठ्या प्रमाणावर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्स कॅन्सल झाली आहेत. अशावेळी पूर्वी एअरलाईन्स हॉटेल स्टे किंवा मील कूपन्स किंवा काहीतरी व्यवस्था करायच्या. पण हल्ली प्राईस वॉरमुळे, एअरफेअर कमी किमतीत दिल्याने बहुतेक सर्वच एअरलाईन्सनी अशा सर्व्हिसेस देणं बंद केलंय. फक्त जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरच्या फ्लाइटला रीझर्व्हेशन द्यायची जबाबदारी त्यांनी घेतलीय. काही एअरलाईन्स तिथेही हात वर करतात. आता ज्यावेळी एअरलाईन कोणत्याही कारणास्तव अशी फ्लाइट्स रद्द करते त्यावेळी संपूर्ण सहल यशस्वीरित्या झाल्यावर वीणा वर्ल्डचा काय दोष. पण मग पर्यटकांचं म्हणणं असतं की, हे वीणा वर्ल्डने करायला पाहिजे. आम्हाला पर्यायी विमानप्रवास, कॉम्प्लिमेंटरी हॉटेल स्टे आणि जे काही लागेल ते द्यायला पाहिजे. फ्लाइट्स कॅन्सल झाल्यावर पर्यटकांना कॉम्प्लिमेंटरी स्टे देणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. मग ते वीणा वर्ल्डलाच नाही तर कोणत्याच पर्यटनसंस्थेला. बहुतेक सर्वच पर्यटनसंस्था खूप कमी मार्जिनने किंवा नो लॉस नो प्रॉफिटवर काम करताहेत. अशावेळी एखाद्याने कुणी कॉम्प्लिमेंटरी दिलं तरी ते फिजिबल सोल्युशन नाही. त्यामुळेच सतत पर्यटनसंस्था आणि एअरलाईन इंडस्ट्री तोट्यात काम करतेय किंवा सशक्तपणे वाढू शकत नाहीये. एअरलाईन इंडस्ट्रीची सद्यस्थिती हा त्याचाच परिपाक आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील एक जबाबदार लीडर म्हणून मी ह्या गोष्टीला वाचा फोडतेय की पर्यटकांनी अशा अपरिहार्य गोष्टींसाठी पैसे सोबत ठेवावेे. कारण ह्याद्वारे येणारा खर्च जो सहलीच्या किमतीचा भाग नसतो तो त्यांना करावा लागेल. असं फ्लाइट कॅन्सल होऊ नये किंवा कुठेही आणीबाणीसदृश परिस्थिती उद्भवू नये ह्यासाठी आपण प्रार्थना करू पण कुणाच्याही हातात नसलेल्या ह्या गोष्टी आहेत. हीच एअरलाईन का घेतली? हा मुद्दाही कामाचा नाही. या दोन महिन्यात गरुडा, ब्रसेल्स, एअर इटली ह्यांनी भारतातून गाशा गुंडाळला. सोळा हजारांत दिल्ली- न्यूयॉर्कचं तिकीट विकणारी वाव एअरलाईन दिवाळखोरीत गेली. कुणाचाही भरोसा नाही, काहीही होऊ शकतं. कठीण वेळी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बाकी आहोतच आम्ही तुमच्या दिमतीला अगदी हात जोडून आणि कंबर कसून.

विषयाला हात घातलेलाच आहे तेव्हा जेट एअरवेज आणि वीणा वर्ल्डविषयी थोडंसं जाणून घेऊया. या वर्षीचा सुट्टीचा सीझन सुरू झाला आणि जेट एअरवेजचा भूकंप सर्व पर्यटनसंस्थांवर, वैयक्तिकरित्या जाणार्‍या प्रवाशांवर आणि कॉर्पोरेट ट्रॅव्हलर्सवर कोसळला. दरवर्षी आम्ही ह्या तीन महिन्यात पंचेचाळीस ते पन्नास हजार पर्यटकांना देशविदेशात पर्यटन घडवतो. देशातल्या डोमेस्टिक एअरलाईन्ससोबत एतिहाद्, एमिरेट्स, सिंगापूर, मलेशियन, ओमान, टर्कीश, कतार, एअर इंडिया, थाई एअरवेज, कॅथे पॅसेफिक इ. एअरलाईन्ससोबत आमच्या पर्यटकांचा सप्तखंडात संचार सुरू असतो. कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा अशी आपली भारतीय (होम ग्रोन) एअरलाईन म्हणजे जेट एअरवेज. जेटच्याच वेळी सुरू झालेल्या दमानिया ईस्ट वेस्ट, राज, सहारा व नंतर किंगफिशरसारख्या एअरलाईन्स कधी नाहीशा झाल्या ते कळलंही नाही, पण आत्ता- आत्तापर्यंत जेट एअरवेज आपली आवडती एअरलाईन होती. नेमकं काय घडलं माहीत नाही पण एवढी मोठी एअरलाईन भारतीय अवकाशातून लुप्त होणं आपल्या देशाला भूषणावह नाही आणि त्याचा त्रास सर्वांनाच होणार. आतातर ऐन सुट्टीचा मौसम, आमच्याप्रमाणे अनेक इंडिव्हिज्युअल्सनीही बुकिंग केलेलं. आमचेही पन्नास हजारातले एक हजार प्रवासी जेट एअरवेजच्या इंटरनॅशनल रूटवर आहेत. ह्या सर्व पर्यटकांचं बुकिंग आम्ही आठ महिने ते एक वर्ष आधी पैसे भरून केलेलं. आता एअरफेअर्स गगनाला भिडलीयेत आणि कुठे पर्यायही फारसे नाहीत. चॅलेंज आहे पण काही ना काही मार्ग निघतोय. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सहलींसाठी क्वांटास एअरवेज असते पण ती भारतात येत नसल्याने सिंगापूर, बँकॉक किंवा हाँगकाँगपर्यंतचा प्रवास हा आत्तापर्यंत नेहमीच जेट एअरवेजने होत होता. ह्या सहली हाऊसफुल्ल आहेत. आम्ही पर्यटकांच्या संपर्कात आहोत. काहीतरी मार्ग निघतोय. सहली सुरळीत सुरू आहेत. अर्थात मोठे ग्रुप्स दोन-दोन, तीन-तीन फ्लाइट्सवर डीव्हाईड करून न्यावे किंवा आणावे लागताहेत. पर्यटकांना जादा पैसे भरावे लागू नयेत ह्यासाठी सर्व प्रयत्न आहेत. पण नाईलाज असेल तिथे मात्र पर्यटकांना आम्हाला सांगावच लागेल, आणि जादा पैसे पर्यटकांना सहलीपूर्वी भरावे लागतील. आता सहलींची पूर्ण तयारी झाली आहे. कोणताही रीफंड कुठूनही मिळू शकत नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं एवढच हातात आहे. ही गोष्ट आम्हालाही रूचणारी नाही पण ह्या ओढवलेल्या आणीबाणीजन्य परिस्थितीत या सीझनचं ते वास्तव असणार आहे. युरोपला ह्यावेळी बारा हजार पर्यटक वीणा वर्ल्डसोबत निघालेत त्यातील तीनशे पन्नास पर्यटक जेट एअरवेजवर आहेत. इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड सहलीला मॅन्चेस्टरला पोहोचणं व लंडनहून परत येणं हा जेट एअरवेजचा अतिशय चांगला पर्याय उपलब्ध असल्याने त्या सहली आम्ही जेटवर ठेवल्या. आता मॅन्चेस्टर फ्लाइट कॅन्सल झालंय आणि जेट एअरवेजने लंडन फ्लाइटला सीट्स कन्फर्म केल्यात. अजूनही फ्लाइट सिस्टीमवर आहे, पण... प्रश्‍न आहेच. ट्युलिप गार्डन्स स्पेशलच्या दोन अ‍ॅमस्टरडॅम सहलींचीही तीच परिस्थिती. पर्यायी व्यवस्था देण्यासाठी आमची टीम मेहनत घेतेय. एप्रिलच्या नेपाळ सहली जेटने फ्लाइट कॅन्सल केल्यावर रद्द कराव्या लागल्या, कारण नेपाळसाठी विमानाचे पर्याय कमी. पर्यटकांनी सहकार्य केलं आणि ह्या सर्व पर्यटकांना मे महिन्यात पर्यायी व्यवस्था देण्यात आम्हाला यश आलं.

आयुष्य काय किंवा प्रवास काय, अडथळ्यांची शर्यत आणखी तीव्र होत जाणार आहे, शांत राहणं चांगलं. समथिंग ऑर अदर विल कम आऊट! व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे! जो होगा सो होगा... लेट्स बी पेशंट! लेट्स बी ऑप्टिमिस्टिक! लेट्स लूक फॉरव़र्ड टू अवर वेल डीझव्हर्ड व्हेकेशन... मे बी विथ सम चॅलेंजिंग एक्सपीरियन्सेस बट दॅट टू वुई विल एन्जॉय!

 

(हा लेख मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2019 रोजी लिहिला आहे. त्यानंतर झालेल्या घडामोडी व त्याचे परिणाम ह्यात घेतलेले नाहीत.)

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
प्रवासाला निमित्त कशाला?
13 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

नमस्ते लंडन!
13 mins, read

नमस्ते लंडन!

Published in Loksatta Lokrang. Date 24th May, 2026 ...लंडनच्या राणीला भेटायला उत्सुक असलेल्या पुसी कॅटपासून ते कायम स्मरणात राहणाऱ्या ‌‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन‌’पर्यंत अनेक नर्सरी ऱ्हाइम्स अनेकां

अनुभवावं ते नवलच!
13 mins, read

अनुभवावं ते नवलच!

Published in Sakal Saptrang. 17th May, 2026 काही प्रवास हे केवळ सुट्ट्या नसतात, तर खऱ्या अर्थाने एक एक्सपेडिशन असतात. दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका एकत्र अनुभवणं म्हणजे विरोधाभासांनी भरलेला, भव्य

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top