शब्दावाचून कळले सारे!

0 comments
Reading Time: 9 minutes

या गोष्टीला साधारण सतरा-अठरा वर्षं तरी झाली असतील पण आजसुद्धा ती ट्रिप आठवली की हसू येते. या ट्रिपवर मी टूर मॅनेजर होते आणि पर्यटकांना युरोप दाखविण्याचा माझा मनापासून प्रयत्न सुरू होता. त्यात पहिल्याच दिवशी मला धक्का बसला, जेव्हा बसबरोबर निकोला दिसला. साधारण मध्यम वयाचा सुदृढ बांध्याचा हसतमुख निकोला बसजवळ उभा होता. बस कंपनीकडून कळले की,अतिशय अनुभवी ड्रायव्हर आहे पण एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे त्याला इंग्लिश येत नाही…

सिनिस्त्रा सिनिस्त्रा हातवारे करत निकोलाने मला मॅपवर रस्ता दाखविला. आपला रस्ता चुकला नाही ना याची खात्री करुन घेत मी त्याला हसत हसत आनदियामो असे म्हणत मॅप खाली ठेवला. चला! पुढच्या शंभर कि.मी हायवेवर कुठेही न वळता सरळ रस्ता असल्याने किमान एक तास तरी मॅप बघायची गरज नव्हती. रोमवरून निघून आम्ही पुढे फ्लोरेन्सकडे निघालो होतो. निकोला, फ्लोरेन्सला साधारण कधीपर्यंत पोहचू आपण असे मी त्याला चक्क मराठीत विचारले आणि त्याने दी सेरा म्हणजेच संध्याकाळी असे इटालियन भाषेत उत्तर दिले. रेडियोवर इटालियन गाणी लावून हसत हसत तो बस चालवू लागला. या गोष्टीला साधारण सतरा-अठरा वर्षं तरी झाली असतील पण आजसुद्धा ती ट्रिप आठवली की हसू येते. या ट्रिपवर मी टूर मॅनेजर होते आणि पर्यटकांना युरोप दाखविण्याचा माझा मनापासून प्रयत्न सुरू होता. त्यात पहिल्याच दिवशी मला धक्का बसला, जेव्हा बसबरोबर निकोला दिसला. साधारण मध्यम वयाचा सुदृढ बांध्याचा हसतमुख निकोला बसजवळ उभा होता. बस कंपनीकडून कळले की, अतिशय अनुभवी ड्रायव्हर आहे पण एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे त्याला इंग्लिश येत नाही. पण तू काळजी करू नकोस, टूर व्यवस्थित होईल. तो फोन ठेवताच माझ्या हाताला नेहमीपेक्षा जास्तच घाम फुटला आणि हृदयाचे ठोके जोरजोरात वाजू लागले. पुढचे पंधरा दिवस इंग्रजी न येणार्‍या ड्रायव्हर बरोबर टूर कशी कंडक्ट करायची ह्या चिंतेनं मला घेरलं. त्या काळात तर गुगल मॅप्ससुद्धा नव्हते आणि बसमध्ये जी.पी.एस सुद्धा नव्हते. हातातले युरोपच्या रोड मॅप्सचे पुस्तक घट्ट धरून आठवतील त्या सर्व देवांची नावं घेत मी बसमध्ये चढले. बस चालू करत आनदियामो! हे निकोलाचे बोल ऐकून अजूनच टेंशन आले. त्याला इंग्रजी येत नसेल तर मी तरी इंग्रजीत बोलून काय करू? अशा विचाराने मी त्याच्याशी चक्क मराठीत बोलायला लागले आणि त्याचे चोख उत्तर तो इटालियनमध्ये देऊ लागला. गंमत म्हणजे जसजसे दिवस पुढे गेले तसतसे आम्ही एकमेकांना पूर्णपणे समजू लागलो. शब्द कळत नसले तरी आम्हाला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होऊ लागले आणि चेहर्‍यावरचे हावभाव नकळत बरंच काही समजवू लागले. एकमेकांची भाषा येत नसली तरी एकमेकांना समजणे फारसे कठीण नव्हते हे जाणवले. हळूहळू काही इटालियन शब्द मी शिकले आणि रोज सकाळी निकोलाही गणपती बाप्पा मोरयाचा नारा देऊ लागला. चार-पाच दिवसांनी बस कंपनीकडून कळले की इंग्लिश स्पीकिंग ड्रायव्हर आता मिळू शकतो, तर निकोलाच्या जागेवर त्याला पाठवून देऊ का? याचे उत्तर अर्थातच ग्रात्झिए मा नो अफात्तो म्हणजेच Thank you but not at all असे होते.

एक पर्यटक म्हणून जगाचा आविष्कार पहायला आपण निघतो तेव्हा बर्‍याचदा त्या देशातली भाषा आपल्याला येत नाही किंवा इंग्रजी भाषा आपल्याला चांगली बोलता आली पाहिजे अशी काळजी असते. परदेशीच कशाला, भाषेचा प्रश्‍न हा आपल्याला भारतातल्या अनेक वेगवेगळ्या प्रांतात फिरताना सुद्धा सतावतो. खासकरून स्वतंत्रपणे फिरताना आपण तिथल्या रहिवाशांबरोबर संवाद कसा साधणार, स्थलदर्शन करताना भाषा येत नसल्याने आपली पंचाईत होईल का? असे अनेक प्रश्‍न हॉलिडेवर निघायच्या आधीच आपली काळजी वाढवतात. पण खरंतर आपण ह्याची काळजी करायलाच नको. जगात सर्वात अधिक प्रमाणात बोलल्या जाणार्‍या पहिल्या दहा भाषांच्या यादीत हिंदी भाषेचा समावेश आहे. त्यात भारताबाहेर मोठ्या संख्येने स्थायिक असलेल्या परदेशस्थ भारतीयांमुळे हिंदी भाषा आता जगात सगळीकडेच ऐकायला मिळते. लंडनमध्ये फिरताना कुठल्याही कनव्हीनियन्स स्टोअर व जनरल ग्रोसरी दुकानात गेलात तर बहुतेक दुकानदार हिंदी किंवा गुजराती बोलताना आढळतील. आपण लंडन एअरपोर्टवरून अंडरग्राउन्ड मेट्रो ट्रेन घेऊन म्हणजेच टयुब ट्रेनने लंडनमध्ये कुठेही प्रवास करू शकतो. असेच एकदा एअरपोर्टच्या ट्रेन स्टेशनवर मी ट्रेन तिकीट काढण्यासाठी तिकीट काऊन्टरवर पोहोचले तेव्हा वन टिकिट टू पॅडिंगटन स्टेशन प्लीज चे उत्तर आप कितने दिन रहोगे लंडन में, शायद ट्रेन पास आपके लिए ज्यादा किफायती होगा असे हिंदीत उत्तर आले. तिकीट काऊन्टरवरचा ब्रिटिश रेलचा कर्मचारी हा अमृतसरचा पंजाबी माणूस होता. तो माझ्याशी हिंदीत तर बोललाच पण मला योग्य ट्रेन पास देऊन त्याने माझे पैसेसुद्धा वाचविले.

प्रवास करताना लोकल भाषा येत असली तर अर्थातच त्याचा उपयोग होतो पण भाषेचे अर्धवट ज्ञान असले की त्याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. स्थलदर्शनाच्या ठिकाणी अनेक विक्रेत्यांचीही गर्दी जमते व जो तो आपले सुवेनियर्स, पोस्टकार्डस् इ. गोष्टी आपल्याला विकायचा प्रयत्न करीत असतो. पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळ अशाच काही विक्रेत्यांपासून सुटका मिळविण्यासाठी मी माझ्या मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेचा उपयोग केला. मला एकटे सोडा-Just leave me alone असे फ्रेंचमध्ये (Laisse moi) मी म्हणण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यानंतर ते विक्रेते माझ्याकडे बोट दाखवत खो-खो हसत पळाले कारण मी चुकून त्यांना म्हणाले Lechez-Moi म्हणजेच Lick me. अर्थातच मला काय झाले हे काहीच कळले नाही. असो, चुकीचे का होईना मला हवे ते घडले यातच मी खुश होते. असंच एकदा आमच्या पर्यटकांचा एक ग्रुप जर्मनीला हॉलिडे करत असताना त्यातल्या एका युवा पर्यटकाने तिथला लोकल अनुभव घेण्यासाठी तिथल्या एका हेअर स्टाईलिस्टला भेट दिली. केस कापून झाल्यावर आपल्या डोक्यावर जवळजवळ काहीच केस कसे उरले नाहीत ह्या विचारात तो पडला. काही वेळाने त्याला जाणवले की त्याने जर्मन शब्द क्लाईन म्हणजेच छोटे-शॉर्टच्या ऐवजी काईनं म्हणजेच काहीच नाही किंवा नन चा वापर केला होता. अशा गमती जमती तर घडतच असतात आणि बर्‍याचदा प्रवासातले काही अविस्मरणीय क्षणसुद्धा यामुळेच तयार होतात. थायलंडच्या पट्टाया शहरात सलग चार दिवस थाई फूड खाल्ल्यानंतर चेंज म्हणून आम्ही पिझ्झा खायला गेलो. आमच्या ग्रुपमधली काही मंडळी व्हेजीटरियन असल्याने पिझ्झामध्ये नक्की काय घातलेले आहे हा प्रश्‍न पडला? आमची ऑर्डर घेणार्‍या थाई मुलाने फार विचार केला व नंतर खाली जमिनीवर बसून एका कापडाची शेपटी बनवून ती हलवत ऑइंक ऑइंक असे डुकराचे आवाज काढत त्या पिझ्झामध्ये पोर्क आहे हे आम्हाला कळविले. त्याच्या ह्या इनोवेटिव्ह संभाषणाचे आम्हाला कुतूहल आणि कौतुक दोन्हीही वाटले. अशाच गमतीदार अनुभवांमुळे आपला प्रवाससुद्धा अधिक रुचकर बनतो, नाही का? पट्टायामध्येच तिथली लोकल रिक्षा म्हणजे टुकटुक घेताना बसायच्या आधीच भाडे ठरवा व भाडे ठरवताना आधी नीट भाव करुन मगच टुकटुकमध्ये बसा, असे अनेक वर्षांपूर्वी माझ्या थायलंडच्या पहिल्यावहिल्या टूरवर मला अनुभवी लोकांकडून शिकायला मिळाले होते. थायलंडच्या लोकल करन्सी थाई बाथमध्ये जवळच्या अंतराचे भाडे साधारण चाळीस बाथ इतके होईल असे मला ठाऊक होते. तेव्हा टुकटुक थांबवून आमच्या बार्गेनिंगची सुरुवात झाली. पन्नास बाथवर अडून असलेल्या ड्रायव्हरला आम्ही जेव्हा पंचेचाळीस बाथ कबूल केले तेव्हा थोडेसे चिडून त्याने नो! नॉट फोर्टी फाईव्ह- आय वॉन्ट मोअर थर्टी फाय लास्ट. असे म्हणत आमच्याकडून चक्क पस्तीस बाथच घेतले. आम्ही उदार होऊन त्याला अधिक पाच बाथ टिप का दिली ह्याचा शोध त्याला अद्याप लागला नसावा. भाषा न कळल्यामुळे सर्वात जास्त गमती-जमती होतात त्या बहुधा जेवणाची ऑर्डर देताना. मलेशियात कॉफी ऑर्डर केल्यानंतर त्या स्टुवर्डने मला हसतमुखाने विथ सुसु? विचारल्यावर माझ्या तोंडचे पाणी पळाले. मलेशियन भाषेत सुसु म्हणजे दूध हे कळले तरी काही केल्या दोन दिवस तरी मला कॉफी घशाखाली उतरेना.

आजकाल तर अर्थातच आपल्याला टेक्नॉलॉजीचा बराच फायदा होतो. प्रत्येकाच्या फोनवर रस्ता दाखविण्यासाठी गुगल मॅप्स आणि भाषांतर करणारे अनेक ट्रॉन्सलेटर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण ऐनवेळी फोनवर नेटवर्क नसले किंवा फोन बॅटरी डिसचार्ज झाली तरी काळजी करू नका. कधी कधी काही गोष्टी न कळण्यात सुद्धा आनंद असतो. भाषा कळली नाही तरी चित्रावर हात ठेवून जपानमध्ये अनेक पर्यटक जेवणाची ऑर्डर देतात. प्रत्येक मेनूवर त्या डिशचे चित्र छापलेले असते. मग ती डिश ऑर्डर केल्यानंतर ती मिळेपर्यंत आपण नक्की काय मागविले याचे कुतूहल असते. पण जपानसारख्या देशामध्ये सुद्धा प्रवास करताना मला कुठलाच त्रास जाणवला नाही. उलट इंग्रजी भाषा कळत नसली तरी हातवारे आणि चेहर्‍यावरच्या हावभावांनी जपानी लोक आपल्याला बरचं काही सांगून जातात. त्यांच्या हालचालीत आणि वागणूकीतच एक अनोखा शिष्टाचार आहे. तिथे रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला पत्ता विचारल्यावर आपल्याला रस्ता सापडेपर्यंत किंवा थेट  आपल्याला पत्त्यापर्यंत नेऊन सोडेपर्यंत सोबत करणार्‍या जपानी माणसाला समजण्यासाठी भाषेची गरज भासत नाही. त्यासाठी फक्त चेहर्‍यावरचे स्मितहास्य आणि मनामध्ये कृतज्ञता असली की झाले. तर परदेशवारीला निघताना भाषा येते की नाही याची फार काळजी करू नका. गुड मॉर्निंग, थँक यू,  प्लीज ह्या काही गोल्डन शब्दांची नोंद करा म्हणजे झाले. स्पॅनिशमधल्या ग्रासियास, इटालियनमधल्या ग्रात्सिए, फ्रेंचमधल्या मेएसी किंवा मराठीतल्या धन्यवाद या सगळ्या शब्दांचा अर्थ जरी एकच असला तरी मनापासून असल्याशिवाय ह्याचा काहीच अर्थ लागणार नाही, नाही का? अठरा वर्षांनंतर देखील इटलीमध्ये फिरताना सकाळी सकाळी बुनजोर्नो एकेले की आजसुद्धा निकोलाची आठवण येते व तो सुद्धा कुठेतरी गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार करत असेल अशी आशा वाटते. चला तर, थँक यू, प्लीज, सॉरी आणि आपली स्माईल घेऊन जगाची सफर करायला निघूया. आनदियामो! लेट्स गो!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*