IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

रॉयल रुलर्स

11 mins. read

आयुष्यभर मेहनत करायची आणि आपलं उर्वरित आयुष्य सुखासमाधानात व्यतित करायचं, तसंच आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या पुढच्या पिढीसाठी जे काही करून ठेवता येईल ते करायचं ही आपणा सर्वांचीच इच्छा. आपल्या बहुतेकांच्या आयुष्याची मार्गक्रमणा ही अशीच चालू राहते. शक्यतोवर ह्यामध्ये आपण-आपले- आपल्यासाठी असा एक साधा सरळ हिशेब असतो आणि त्यात चुकीचही काही नसतं. पण मला नेहमीच अप्रुप वाटत आलंय किंवा त्या सर्वांप्रती एक कृतज्ञतेची भावना आहे आणि ते म्हणजे आपल्या पूर्वजांनी स्वार्थ साधताना परमार्थ करीत अशा अनेक गोष्टी येणार्‍या पुढच्या पिढ्यांसाठी करून ठेवल्या यासाठी. मग ते आपले हिंदू संस्थानिक असोत, मुघल असोत किंवा ब्रिटिश. नो डाऊट त्यांनी त्यांची आयुष्यं अक्षरश: उपभोगली. संस्थानिकांच्या किंवा कोणत्याही राजाच्या महालात गेल्यावर त्यांची चैन-त्यांचा रुबाब-त्यांचं ऐश्‍वर्य या सगळ्याने आपण दिपून जातो. पण त्याही पलिकडे जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येतं की हे जे काही वैभव त्यांनी उपभोगलं ते आज आपल्या देशाच्या कामी येतय. आज भारतात जे काही पर्यटन आहे त्यातलं किमान पन्नास टक्के पर्यटन हे इतिहासाच्या खाणाखुणा बघण्यासाठी असतं मग ते भारतीय पर्यटकांनी केलेलं पर्यटन असो किंवा परदेशी पर्यटकांनी. परदेशी पर्यटक भारताचं ऐतिहासिक ऐश्‍वर्य बघण्यासाठीच जास्त येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आपलं ऐतिहासिक ऐश्‍वर्य हे आपली शान आहे आणि आपल्या भारताच्या रोजीरोटी मधला तो महत्वाचा भाग आहे. मग हे जे ऐश्‍वर्य आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये कोणत्या राज्यांचा महत्वाचा भाग आहे असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं ते म्हणजे ज्या ज्या राज्यांना निसर्गाचा वरदहस्त होता तिथे हे ऐतिहासिक ऐश्‍वर्य किंवा त्याची टक्केवारी एकदमच कमी आहे. बघानं काश्मीर, हिमाचल, पंजाब, हरयाणा, पूर्वेकडची बहुतेक राज्य, गोवा, केरळ, अंदमान (अर्थात हा भाग नंतर विकसित झाला)... इथलं आपलं पर्यटन हे इतिहास अनुभवण्यासाठी नसतं, मग ती कोणती राज्य आहेत जी इतिहासामुळे ऐश्‍वर्यसंपन्न झाली आहेत हा विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूला थोडे मार्कस् मिळतील. त्याच्या वरचा नंबर लागेल तो कर्नाटक आणि मध्यप्रदेशचा. त्याच्याही वर जाईल ते दिल्ली आणि आग्रा. आणि आपण सगळे माझ्याशी सहमत व्हाल ते नंबर वन राज्य कोणतं असेल ह्याबाबतीत, तर ते नंबर वन राज्य आहे राजस्थान. बाहेर कोणत्याही देशात फिरताना आपण इंडियामधून आलोय हे जेव्हा समोरच्या माणसाला कळतं तेव्हा त्याच्या तोंडून जे काही शब्द येतात ते जनरली ह्या तीन प्रकारातलेच असतात. ओह! आम्ही आलो होतो तुमच्या देशात, आम्ही राजस्थानला गेलो होतो. आय वाँट टू व्हिजिट इंडिया एस्पेशियली राजस्थान. आणि तिसरा असतो, ग्रेट कंट्री! गोईंग टू बी अ सुपरपॉवर! परदेशी पर्यटकांमधल्या नव्वद टक्के पर्यटकांना राजस्थानला यायचं असतं तर आपल्या देशातल्या भारतीय पर्यटकांच्या लिस्टमध्येही राजस्थानचा नंबर अव्वल असतो. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला पहिल्यांदा काश्मीर, हिमाचलसारखी थंड हवेची ठिकाणं आकर्षित करतात आणि त्यानंतर केरळ व राजस्थान... मग राहिलेला भारत.

राजस्थानी लोकांच्या शौर्याच्या-चातुर्याच्या- हुशारीच्या अनेक कथा आपण वाचल्यात, मी पर्यटनाच्या माध्यातून जेव्हा राजस्थानचा विचार करते तेव्हा लक्षात येतं की ज्या काळात दळणवळणाची कोणतीही धड साधनं उपलब्ध नव्हती त्या वेळेपासून ह्या राजस्थानी राजे लोकांनी पर्यटनाचा विचार केला असावा. आपण आपल्या सुखासाठी जे काही निर्माण करतोय त्याचा उपयोग आपल्या निर्वाणानंतर आपल्या अखत्यारीतल्या- मुलखातल्या-राज्यातल्या पुढे येणार्‍या अनेक पिढ्यांना होईल किंवा व्हावा हीच त्यांची विचारधारा असावी. आता बघानं राजस्थान ही तशी सुजलाम सुफलाम भूमी नाही. राजस्थान हे भारतातलं सर्वात मोठं राज्य, आपल्या देशाचा साडे दहा टक्के भाग राजस्थानने व्यापलेला आहे पण त्याच राजस्थानचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट-थार, नाम तो सुना होगा। हे भारतातलं सर्वात मोठं डेझर्ट आणि जगातलं आकाराने नऊ नंबरचं ट्रॉपिकल डेझर्ट. म्हणजे राज्यातला एवढा भाग तसा फारसा कामाचा नाहीच. बिकानेर हे सर्वात मोठ्ठं शहर ह्या वाळवंटी भागातलं, ह्या संपूर्ण वाळवंटी भागात वस्ती फारच तुरळक प्रमाणात, कशी असणार हो, उन्हाळा पंचेचाळीस ते पन्नास डिग्रीपर्यंत पोहोचणारा, तर हिवाळा शून्याच्या खाली पारा पोहोचवीत थंडीने बोबडी वळविणारा, पाऊस म्हणजे ऐश त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही बोंब. तर आपल्या भारतातलं सर्वात मोठ्ठं हे राजस्थान राज्य अशा अनेक अडचणींचं आणि आपत्तीचं शिकार. पण म्हणतात नं, आयुष्यात जेवढ्या अडचणी जास्त तेवढा माणूस जास्त प्रयत्नशील बनतो. राजस्थानचं तसच झालेलं दिसतंय, आम्हाला परमेश्‍वराने देताना थोडा हात आखडता घेतलाय का? नेव्हर माईंड आम्ही निर्माण करतो, वाळवंटातही आम्ही कमळ फुलवतो, ह्याच धारणेचे हे लोक असावेत. 1928-29 मध्ये राजस्थानच्या ह्या वाळवंटी खडतर भागाला दुष्काळाचा सामना करावा लागला. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी काहीशी स्थिती. पण परिस्थितीशी सतत दोन हात करणार्‍या त्यावेळच्या राजाने म्हणजे महाराजा उम्मेदसिंग ह्यांनी त्या दुष्काळाच्या आगीत तडफडणार्‍या जनतेला काम मिळावं म्हणून 18 नोव्हेंबर 1929 साली एक राजवाडा बांधायला घेतला चित्तर पॅलेस म्हणून. त्या भागात मिळणार्‍या चित्तर नावाच्या दगडांनी ह्याचं काम सुरू झाल्याुमळे ते नाव त्याला चिकटलं. ह्या बांधकाममुळे त्या भागातल्या लोकांना जवळ जवळ चौदा वर्षं काम मिळालं आणि हा राजवाडा 1943 साली बांधून पूर्ण झाला, त्याचं नाव बदललं गेलं आणि ते झालं उम्मेद भवन पॅलेस. आज उम्मेद भवन पॅलेस हा जगातल्या सर्वात मोठ्या खाजगी महालातला एक महाल आहे. एका भागात 1972 साली सुरू झालेलं ताज पॅलेस हॉटेल, दुसर्‍या भागात जोधपूरचे महाराज गजसिंग ह्यांच्या रॉयल फॅमिलीचं निवासस्थान आणि तिसर्‍या भागात राजघराण्यातल्या इतिहासाला आपणासमोरं उलगडणारं एक मोठ्ठं म्युझियम ज्यामध्ये राजघराण्यात त्याकाळी वापरल्या जाणार्‍या अनेक अनोख्या विलक्षण मोटारींचा ताफाही आहे. आपण आपल्या सहलीत हे म्युझियम दाखवीत असतो पण कधी एखादा काही मोठा इव्हेंट असेल किंवा व्हिव्हिआयपी मुव्हमेंट असेल तर हा रॉयल फॅमिलीचा खाजगी मामला असल्याने पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. अर्थात जगप्रसिद्ध असा हा उम्मेद भवन पॅलेस बाहेरून बघणंसुद्धा डोळ्यांसाठी मोठ्ठी मेजवानी आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढणं ही पर्यटकांची आवडती गोष्ट. जोधपूर जसं उम्मेद भवन पॅलेससाठी प्रसिद्ध आहे तसंच ते सनसिटी किंवा ब्लू सिटी म्हणूनही प्रसिद्ध आहे, तेथील मेहरांगढ फोर्ट तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सगळ्यांचाच आवडता स्पॉट, बॅटमॅनचा द डार्क नाईट राइझेस आठवतोय? त्याचंही काही शूटींग इथे झालंय. जोधपूर म्हणजे राठोड डायनेस्टी, राव जोधाने 1459 च्या दरम्यान वसवलेलं, पण असं म्हणतात की ह्याचा म्हणजे जोधपूरचा आणि जोधपूरच्या लोकांचा खरा उदय झाला किंवा त्यांना बरकत मिळाली ती ब्रिटिशांच्या काळात. काहीही असो पण त्या काळापासून आजपर्यंत जोधपूर आपलं अव्वल स्थान टिकवून आहे सर्वच बाबतीत. ह्याच थार वाळवंटातली दुसरी महत्वाची ठिकाणं म्हणजे जैसलमेर बारमेर आणि बिकानेर. आपण मारवाडच्या सहलीत ह्यातील जैसलमेर आणि बिकानेर बघतो. किती विरोधाभास आहे ह्या थार डेझर्टच्या बाबतीत बघानं, आरवली पर्वतरांगा, लगतच्या पाकिस्तानातील सतलज आणि सिंधू नदी हे सारं थार डेझर्टच्या दूरदृष्टीत (सरस्वती नदीसुद्धा इथे ह्या वाळवंटाखाली येऊन लुप्त झाली म्हणे) समोर दिसतंय पण आपल्याला त्यातला फारसा काही लाभ नाही अशा परिस्थितीतल्या ह्या वाळवंटातल्या ठिकाणांनी हार मानली नाही. जैसलमेरचं वाळवंटच त्यांनी जगभराच्या पर्यटकांसाठी आकर्षण बनवून टाकलं. जैसलमेरला गोल्डन सिटी असंही म्हटलं जातं त्याचं कारण ह्या शहराला लाभलेल्या त्रिकुट नावाच्या टेकडीवरील सोनार फोर्ट किंवा जैसलमेर फोर्टमुळे. जगातली सर्वात जास्त लोकवस्ती जर कोणत्या अशा किल्ल्यात रहात असेल तर ती ह्या जैसलमेर फोर्टमध्ये. वर्ल्ड हेरिटेज साईट्सध्ये हा फोर्ट महत्वाचं स्थान राखून आहे. ह्याला सोनार किला किंवा गोल्डन फोर्ट म्हणण्याचं कारण त्या किल्ल्याच्या बांधकामात वापरलेला येलो सॅन्ड स्टोन. संपूर्ण पिवळ्या रंगाची ही अवाढव्य वास्तू ज्यावेळी त्यावर सूर्याची किरणं पडतात तेव्हा सोन्यासारखी दिसायला लागते.

राजस्थान म्हणजे जगातल्या सर्वात पुरातन अशा ज्या संस्कृती होत्या त्यापैकी एक मानली जाते. जोहारभूमी, डेझर्ट स्टेट, द लँड ऑफ किंग्ज, द लँड ऑफ कलर्स...अशी अनेक वैशिष्टपूर्ण नावं मिरविणार्‍या राजस्थानध्ये भरतपूर बर्ड सॅन्क्च्युरी, जंतर मंतर, कुंभलगढ फोर्ट, चितोडगढ फोर्ट, रणथंबोर फोर्ट, आमेर फोर्ट, जैसलमेर फोर्ट, झालावर किंवा गागरण फोर्ट ही सगळी ठिकाणं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतात. जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांना खेचण्यात सतत अग्रक्रमी रहात असलेल्या ह्या राजस्थानमध्ये काही विलक्षण गोष्टीही आहेत त्यामध्ये कुंभलगढ फोर्टची 36 किमी लांबीची सलग अशी भिंत ही ग्रेट वॉल ऑफ चायना नंतरची महत्वाची भिंत समजली जाते. जोधपूर पासून 25 किलोमीटर्सवर असलेलं गुडा बिश्‍नोई ह्या आदिवासी जातीचं आगळं गाव बघायला पर्यटक उत्सुक असतात. तसंच जोधपूरजवळ असलेलं पाली मधलं एक बुलेटबाबा टेंपल. इथे 350 सीसी च्या रॉयल इन्फिल्ड बुलेटलाच देव बनवलं गेलय आणि ह्या देवळात ह्या बुलेटची पुजा केली जाते आणि इथे देवाला अल्कोहोलचा प्रसाद चढवला जातो, अर्थात ह्यामागे एक छोटीशी कथा आहे ती तिथे ऐकण्यातच मजा आहे. जैसलमेरपासून वीस किलोमीटर्सवर असलेले कुलधारा गाव-हे एका रात्रीत डेझर्टेड झालेलं गाव. 1825 मध्ये एका रात्रीत हे कुलधारा गाव तसंच त्याच्या आजूबाजूची पंच्याऐंशी गावं लोकांनी सोडून दिली आणि ते जोधपूरजवळ कुठेतरी निघून गेले. अशा तर्‍हेचं मास मायग्रेशन हे राजस्थानी लोकांनी त्यांच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी केलं असल्याची कथा तिथे ऐकिवात येते. त्याचे अवशेष बघायला आता पर्यटक जातात. स्वत:चं शील वाचविण्यासाठी जळत्या चितेत उडी घेणार्‍या राजस्थानी महिलांच्या जोहार भूमीत ही गोष्ट अशक्य वाटत नाही. बिकानेरपासून तीस किलोमीटर्सवर असलेलं देशनोकचं कर्णीमाता मंदिरसुद्धा आगळं वेगळं, ह्या मंदिरात वीस हजारपेक्षा जास्त उंदरांचं वास्तव्य आहे.

राजस्थानचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जरी वाळवंटाने व्यापलेला असला तरी बाकीच्या अर्ध्या भागावर निसर्गाची मेहेरनजर आहे. हा भाग म्हणजे जयपूर, उदयपूर आणि माऊंट अबू साईडचा. हिमालयाच्याही आधी ज्याची उत्पत्ती झाली असं मानलं जातं अशा अरवली पर्वताच्या रांगांची देन राजस्थानला लाभली आहे आणि त्याच्या पायथ्याशी वसलेलं, जैन लोकांचं श्रद्धास्थान दिलवाडा टेंपल आणि ब्रम्हकुमारीचं हेड क्वाटर्स असलेलं माऊंट अबू हे राजस्थानचं एकमेव हिल स्टेशन. माऊंट अबूला ओअ‍ॅसिस ऑफ द डेझर्ट असंही म्हटलं जातं आणि हे सतत पर्यटकांनी बहरलेलं असतं. माऊंट अबूला नवीन हॉटेल्स बांधायला परवानगी नसल्याने इथे हॉटेल्स मिळवणं हे आम्हाला एक चॅलेंज असतं.

उदयपूर,  नुसतं नाव उच्चारलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. उदयपूरला किती ती नावं, व्हेनिस ऑफ द ईस्ट, गार्डन सिटी, व्हाईट सिटी, सिटी ऑफ लेकस्, मोस्ट रोमँटिक सिटी ऑफ इंडिया, काश्मीर ऑफ राजस्थान अशा नावांनी गौरवलेलं हे शहर देश-विदेशातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण न ठरलं तरच नवल. जेम्स बाँडच्या ऑक्टोपसी चित्रपटात उदयपूर आलं आणि ते जगविख्यात झालं. अरवली पर्वत रांगांची थोडी बॅकग्राऊंड आणि फतेसागर लेक-रंगसागर लेक-पिचोला लेक-स्वरुप सागर लेक- उदयसागर लेक अशा पाच महत्वाच्या लेकस्मुळे उदयपूर खूपच देखणं झालयं. 1553 मध्ये महाराणा उदयसिंगनी हे शहर वसवलं आणि त्यांच्याच नावाने ते पुढे प्रसिद्ध झालं. पिचोला लेकवरचा उदयपूर सिटी पॅलेस-तिथून दिसणारं जगनिवास आयलंड, त्यावरील सर पॅलेस म्हणजे आत्ताचं ताज हॉटेल्सचं लेक पॅलेस हॉटेल, राजकुमारी आणि तिच्या मैत्रिणींसाठी बांधलेली सहेलियों की बारी, महाराणा प्रताप आणि रजपूतांची शौर्य गाथा गाणारा चित्तोडगढ, राणी पद्मीनीची जोहार गाथा जिवंत करणारे चितोडगढ मधले गाईड्स... सगळं काही केवळ अविस्मरणीय.

राजस्थानचं सर्वात मोठं शहर म्हणजे राजधानी जयपूर. राजा सवाई जयसिंग द्वितीय ह्यांनी 1727 मध्ये त्यावेळचे सुप्रसिद्ध बंगाली आर्किटेक्ट पुरोहित, विद्याधर, भट्टाचार्य ह्यांच्या मदतीने जयपूरची रचना केली. जेनू कामं तेनू थाये प्रमाणे सवाई जयसिंगांनी एक्सपर्टची मदत घेऊन वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रावर आधारित एक अप्रतिम शहर निर्माण केलं. त्यानंतरच्या प्रत्येक राजाने त्यात भर घातली आणि अनोख्या वास्तु तयार केल्या. त्यात आहे 1799 मध्ये महाराजा सवाई प्रतापसिंगांनी राजघराण्यातील महिलांना रस्त्यावरील मोठ्या मिरवणूका बघता याव्यात म्हणून बांधण्यात आलेला हवामहल. त्यानंतर जयपूरचे महाराजा रामसिंग ह्यांनी 1876 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स ह्यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या सन्मनार्थ हे सारं शहर गुलाबी रंगात रंगविण्याचं ठरवलं आणि जयपूर पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध झालं. राजस्थानवर लिहिताना आज मला किती लिहू असं झालंय पण वेगवेगळे रंग ल्यालेलं राजस्थान ह्या एका पानात मावणं अशक्य, तेव्हा इथेच रजा घेते. हॅव अ हॅप्पी संडे!

September 22, 2019

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top