Language Marathi

हायेस्ट टॅक्स पेयर

आपल्या संस्कृतीत लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायची आणि मोठ्यांनी तेवढ्याच श्रध्देने आशिर्वाद द्यायची प्रथा आहे. आणि ह्या प्रत्येक आशिर्वादाला वास्तु तथास्तू म्हणते असं आपण मानतो. मोठी हो! यशस्वी हो! सुखी रहा! हे आशिर्वाद आता कॉमन झालेयत असं नाही वाटत तुम्हाला?

गेल्या महिन्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या तसंच वीणा वर्ल्डच्या महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकमधल्या प्रिफर्ड सेल्स पार्टनर्सच्या मिटिंग्ज होत्या. ह्यावर्षी आम्ही स्ट्रॅटेजी बदलली. वीणा वर्ल्ड चार वर्षांची झाली त्यामुळे संपूर्ण कारकिर्दीचा मागोवा घेणं, लेखाजोखा करणं, कोणत्या गोष्टी बरोबर आहेत त्या आणखी पॉलिश करून पुढे नेणं, कोणत्या बरोबर नाहीत-आउटडेटेड झाल्यात त्या काढून टाकणं किंवा त्यात बदल करणं ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला. खरंतर अशा मिटिंग्ज दरवर्षी होतात. एक सेल्सची, एक प्रिफर्ड सेल्स पार्टनर्सची वगैरे वगैरे, पण अशी एक-एक मिटिंग करण्याऐवजी किंवा एकाच दिवशी दोनशे-तीनशे लोकांना एका हॉलमध्ये बोलावून लेक्चर देण्याऐवजी यावर्षी आपल्या कॉर्पोेरेट ऑफिसमध्येच चाळीस-पन्नासच्या छोट्या छोट्या बॅचेस बोलावू, लहान ग्रुप्समुळे विचारांचं आदानप्रदान व्यवस्थित होईल, माणसांना माणसं कळतील, जवळ येतील जे आमच्या व्यवसायाचं तसं इंगित आहे, आणि महत्वाचंही आहे. आम्ही टूरिझममध्ये आहोतच पण माणसांच्या, माणसं घडविण्याच्या, माणसांच्या इमोशन्सच्या बिझनेसमध्ये जास्त आहोत असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे जे काम दोन-तीन दिवसांमध्ये झालं असतं अ‍ॅक्च्युअल मिटिंग्जद्वारे ते पंधरा दिवस पुरलं. पण एवढा भला मोठा एक्सरसाईज झाल्यावर समाधान मिळालं कारण ह्यामध्ये संवाद घडला. गोष्टी व्यवस्थित पोहोचल्या एकमेकांपर्यंत, आणि आता ‘चलो दौडते रहो मंझिल तक, रास्ता साफ दिखाई दे रहा है।’ ऑर्गनायझेशन अजून तशी छोटी आहे म्हणून हे शक्य आहे. पाया मजबूत झाला पाहिजे.

ह्या सर्व मिटिंग्जमध्ये ह्यावर्षी चर्चा होती जीएसटी ची. गूड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्सची, आपल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘गूड सिंपल टॅक्स’. प्रत्येक प्रिफर्ड सेल्स पार्टनरने जीएसटी रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं होतं. त्यामुळे पहिल्याच मिंटिंगमध्ये मी विचारलं, ‘‘कुणीकुणी हे रजिस्ट्रेशन केलंय?’’ पन्नास जणामंध्ये काही हात वर आले. आता माझा प्रश्‍न होता जे हात वर आले नव्हते त्यांच्यासाठी की, ‘‘तुम्ही अजून का नाही रजिस्ट्रेशन केलंत?’’ उत्तरं इंटरेस्टिंग होती. पहिलं होतं, ‘‘अहो मी आत्ताच एजन्सी घेतलीय, अजून बिझनेस यायला वेळ आहे नंतर करीन’’. दुसरं उत्तर, ‘‘राहून गेलं पण करीन काही दिवसांत’’. तिसरं उत्तर होतं, ‘‘अहो जीएसटी रजिस्ट्रेशन करण्याची आम्हाला गरजच नाही कारण आमचा बिझनेस वीस लाखाच्या आत आहे, आम्ही सुटलो त्या जीएसटीच्या कटकटीतून…’’

तिसर्‍या उत्तराने काही वेळाकरीता मिटिंग अजेंड्याच्या बाहेर गेली. माझ्या मनात धुमसत असलेल्या प्रश्‍नांनाच वाट करून दिली होती ह्या उत्तराने. लहानपणापासून बघत आलेय टॅक्स कसा चुकवावा? कॅपिटल कसं वाढवू नये? कार्यालयातल्या माणसांची संख्या कशी कमी ठेवावी? प्रॉव्हिडंट फंडाच्या जंजाळातून कशी सुटका करून घ्यावी? इनकम कसं कमी दाखवावं? इनकमटॅक्स वाचविण्यासाठी इन्शुरन्स कसा करावा? इनकमटॅक्समधून राहत मिळण्यासाठी  हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली कशी दाखवावी? पिकाचं उत्पादन न करता शेती इनकम टॅक्समधून रीबेट मिळवण्यासाठी कशी दाखवायची? असे एक ना अनेक सल्ले देणारी मंडळी आजूबाजूला असायची. जस्ट आठवून बघा की इनकमटॅक्स कसा वाचवायचा ह्याची चर्चा आयुष्यात एकदातरी आपण प्रत्येकाने केलीच असेल. ज्यावेळी सतत आपण हे असे सल्ले ऐकतो तेव्हा त्याचा परीणाम आपल्यावर होतोच आणि तो जनरेशन्सवर झालाय असं मला वाटतं कारण इनकमटॅक्स वाचविण्याच्या गोष्टींकडे आपण इतकं लक्ष केंद्रित केलं की इनकम वाढविण्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. प्रॉव्हिडंट फंड इएसआयसी या गोष्टींचीही इतकी धास्ती की माणसांची संख्या कमी ठेवण्याकडे किंवा त्यांना पे रोलवर न घेण्याकडे आपला कल गेला. कुठचाही बिझनेस वाढवायला माणसं महत्वाची, त्यांचं भविष्य महत्वाचं पण तिथे काटछाट झाल्याने नॅचरली बिझनेसच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला. इनकमटॅक्स न भरणं ही खरं तर चुकीची गोष्ट पण त्याकडे आपण तसं कधी बघितलंच नाही. ‘इनकम मिळविण्यासाठी मी कष्ट केलेत त्यावर टॅक्स का भरायचा? मी टॅक्स भरणार नाही’ अशी प्रतिज्ञा करीत सगळं लक्ष वाचवावाचवीकडे गेलं. इनकमटॅक्स न भरणं किंवा काहीबाही करून इनकमटॅक्स वाचविणं ह्याला राजमान्यता मिळाली. येणार्‍या प्रत्येक पुढच्या पिढीला आपल्या नकळत आपण सत्याच्या मार्गावरील पळवाट दाखवली. प्रगतीच्या मार्गातला पहिला अडथळा आपणच आहोत, आपले विचार आहेत हे आपल्याला आजतागायत कळलं नाही.

तिसरं उत्तर देणार्‍या आमच्या प्रिफर्ड सेल्स पार्टनरला मी म्हटलं, ‘‘अरे आपण आपल्या विचारांची आणि अपेक्षांची उंचीच किती कमी ठेवतो बघ. का नाही तू जीएसटी रजिस्ट्रेशन करून टाकून असा विचार केलास की भले आज माझा बिझनेस वीस लाखाच्या आत असेल पण तो मला वाढवायचाय, वीस लाख, दोन कोटी, वीस कोटीपर्यंत न्यायचाय, तेव्हा मला कदाचित जीएसटी रजिस्ट्रेशन करायलाही वेळ नसेल एवढा मी बिझी होईन, मग आत्ता वेळ आहे तर का नाही रजिस्ट्रेशन करून ठेवायचं. ते झंझट वाटतं म्हणून त्यापासून दूर पळायचं असेल तर बिझनेसची सुरुवातच करू नका. एकदा बिझनेसमध्ये आलात तर मात्र त्याचे सगळे प्लस-मायनस झेलता आले पाहिजेत. जीएसटी ही देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली गोष्ट घडलीय, मग आपण त्यामध्ये आत्तापासूनच का नाही सहभागी व्हायचं? काळ बदलतोय, विचार बदलायची गरज आहे आपल्या सगळ्यांना. वीणा वर्ल्ड एक खूपच छोटी आणि नवीन संंस्था आहे, सुरुवातीला पैसे नव्हते तेव्हापासून ठरवलंय की गर्व्हमेंटच्या रूल्स आणि रेग्युलेशन्समधला कोणताही डिफॉल्ट करायचा नाही. आज ताठ मानेनं उभं राहता येतं त्याचं कारणंच ही वन लाईन स्ट्रॅटेजी आहे. आज शपथ घे की तुझा बिझनेस वीस लाख नाही, दोन कोटी नाही, वीस कोटी नाही तर दोनशे कोटींपर्यंत पाहोचेल! अरे मागितलंच कमी तर मिळेलही कमी. इच्छाच केली नाही तर प्रयत्नांना कशी दिशा मिळणार आणि प्रयत्नांशिवाय प्रगती अशक्य आहे.’’

आपल्या संस्कृतीत लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायची आणि मोठ्यांनी तेवढ्याच श्रध्देने आशिर्वाद द्यायची प्रथा आहे. आणि ह्या प्रत्येक आशिर्वादाला वास्तु तथास्तू म्हणते असं आपण मानतो. मोठी हो! यशस्वी हो! सुखी रहा! हे आशिर्वाद आता कॉमन झालेयत असं नाही वाटत तुम्हाला? काळ बदलतोय, तेव्हा आपले आशिर्वादही बदलले पाहिजेत नाही का? आपण आपल्या मुलांना असा आशिर्वाद देऊ शकतो का की, ‘जा! जे काही करतोयस त्यात देशातला सर्वात मोठा टॅक्स पेयर बन. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. लेट अस् बी द प्राउड पेरेंट्स ऑफ अ हायेस्ट टॅक्स पेईंग पर्सन’ मी ठरवलंय, आमच्या मुलांनाही सांगितलंय, ‘असं काम करूया की वीणा वर्ल्ड आपल्या देशातली ट्रॅव्हल अ‍ॅन्ड टूरिझममधली हायेस्ट टॅक्स पेयर कंपनी असेल.’ इनकम असेल तर इनकमटॅक्स भरणार नाही का? आणि हायेस्ट इनकमटॅक्स पेयर व्हायचं असेल तर हायेस्ट इनकम नको का? ह्याला म्हणतात स्ट्रॅटेजी!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*