Language Marathi

सिम्प्लिफाय

जागतिक स्पर्धेला, प्रगतीच्या वेगाला, मनावरच्या ताणतणावाला कधी नव्हे एवढ्या प्रखरपणे आपल्याला समोर जायचंय आणि त्यासाठी महत्वाचं आहे सिम्प्लीफाय सिम्प्लीफाय आणि सिम्प्लीफाय, आमचा ह्यावर्षीचा अनेक प्रकल्पांमधला एक प्रकल्प..

‘कुछ भी एक्स्ट्रॉऑर्डिनरी करनेकी जरूरत नही है।’ हे वाक्य होतं माननीय पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ ह्या ऑक्टोबर महिन्यातल्या रेडिओच्या कार्यक्रमातलं. एका श्रोत्याने लहान मुलांना डायबिटीस होण्यावर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरातलं हे वाक्य, साधी सरळ सोपी जीवनशैली अवलंबण्यावर, मुलांच्या आउटडोअर अ‍ॅक्टिविटीजवर भर देण्यावर ते सांगत होते. शारीरिक कसरतींचा अभाव आणि फास्ट फूड, जंक फूड, ऑइली फूड अशा खाण्याच्या बदललेल्या सवयी हा मुळ मुद्दा होता. आता खरंतर आपल्या पंतप्रधानांनी बघायला गेलं तर वेगळं काहीच सांगितलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर जाता येता आदळतच असतात. हल्ली सर्वांना सर्व काही माहीत असतं, जास्तच ज्ञान असतं म्हणानं. पण सगळ्यांना सगळं काही माहीत असूनही समस्या वाढताहेत हीच समस्या आहे आणि म्हणूनच ह्या ‘मन की बात’ कार्यक्रमातलं हे ‘कुछ भी एक्स्ट्रॉऑर्डिनरी करने की जरूरत नही है।’ ह्या वाक्याने एक महत्वाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं. साधं जीवन जगणं हा सर्व ‘समस्याआें का एक ही इलाज’ आहे पण साधं म्हणजे काय हेच समजणं अवघड आहे. साधं राहणीमान म्हणजे काय? असा प्रश्‍न मी आमच्या एका मिटिंगमध्ये विचारला, ‘उंची कपडे नकोत’‘हाय फाय लाइफस्टाईल नको’ ब्रँडेड गोष्टींचं वेड नको’‘पैशांची उधळपट्टी नको’‘गाड्या उडवणं नको’ मग कुणीतरी म्हणालं, ‘पण हे सगळं भौतिक झालं ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे जो तो राहत असतो, ह्या सगळ्या रीलेटिव्ह गोष्टी आहेत. कुणाला बाटाची चप्पल महाग वाटेल तर कुणाला साल्वातोरे फेरागामोची ची चप्पल स्वस्त वाटेल. ज्याच्याकडे गाडीच नाही त्याला मारूती कार म्हणजे ऐशआरामी विलासी जीवनशैली वाटेल तर कुणी माझ्याकडे रोल्स रॉईस नाही म्हणून नाराज असेल किंवा त्याच्या कम्युनिटीत त्याला रोल्स रॉईस किंवा बेंटली नाही म्हणून त्याचं राहणीमान साधं वाटेल’. साधं राहणीमान म्हणजे ह्या बाह्य भौतिक गोष्टी नव्हेत तर त्याचा मनाशी संबंध आहे, विचारांशी संबंध आहे’. अरे बापरे, साधं राहणीमान ह्या विषयावरची ही चर्चा किंवा संवाद कॉम्प्लिकेटेड होत चालला होता एकंदरीत. आणि हेच होतं साधं म्हणजे काय हे समजणच कठीण असल्याने आपण खरंतर गोंधळून जातो.

मागच्या आठवड्यात आमचे दुबईचे असोसिएट आले होते. खूप मोठा आणि चांगला बिझनेस आहे. साउथ ईस्ट एशिया कंट्रीज आणि भारतामधला बर्‍यापैकी बिझनेस ह्यांच्याकडे आहे, पण एवढं सगळं असूनही माणूस साधा. नीलने विचारलं ‘दुबईमध्ये तुम्ही कुठे राहता, यू मस्ट बी हॅविंग अ पॅलेशियल बंगलो?’ तर म्हणाले, ‘दुबईत आत्तापर्यत मी घर घ्यायचा विचारच केला नाही. बिझनेस वाढवत राहीलो. आत्ता सहा महिन्यांपूर्वी मात्र निर्णय घेतला की आता जरा स्वत:चं घर घेऊया’ आम्ही आश्‍चर्यात. ह्याला साधी राहणी म्हणाचयी का? इथले धनाड्य दुबईत घर घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात अशावेळी इतकी वर्ष दुबईत एवढा मोठा बिझनेस करून ह्या माणसाने अजून स्वत:चं घर घेतलं नाही? त्यांना म्हटलं, ‘तुमची आमची जातकुळी एकच. आम्हीही भाड्याच्या जागेवर बिझनेस सुरू केला. हळूहळू स्थिरावलो, बिझनेसही सेट होतोय आणि तो वाढत राहणार पण हे करताना आम्ही चार डिरेक्टर्सनी सुरुवातीलाच काही गोष्टी ठरवल्या. पहिल्यांदा म्हणजे आपण बिझनेस सतत वाढवत राहायचा. बिझनेस करायला घेतलाय म्हणजे तो मोठा झालाच पाहीजे, नो ऑप्शन. बिझनेसमध्ये सहभागी होणार्‍या, झोकून देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, प्रत्येकाला भविष्य मिळालं पाहिजे ह्यावर आपला भर असला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर आपल्या प्रत्येकाला स्वत:चं एक घर असलं पाहिजेे, ते व्यवस्थित नीटनेटकं सोयीचं असावं. राहायचं घर आणि काम करायचं ऑफीस ह्या दोन्ही गोष्टी वेलकमिंग असल्या पाहिजेत कारण ह्या दोन्ही ठिकाणी आपलं आयुष्य बरोबर अर्ध अर्ध डिव्हाइड होतं. ह्याव्यतिरिक्त सेकंड होम, थर्ड होम, फार्म हाऊस, ज्वेलरी, हिरे, सॉलिटेर… ह्या स्पर्धेत आपण उतरायचं नाही. राहायला घर आणि काम करायला ऑफिस एवढं सिम्प्लिफाय करून टाकूया आयुष्य. कारण एकदा का आपल्या मला हे पाहिजे, मला ते पाहिजे ह्या वॉन्टस वाढायला लागल्या तर आयुष्य अवघड बनून जाईल, रात्रीची शांत झोप कधी उडून जाईल ते कळणारही नाही. ‘लेट्स सिम्प्लिफाय’ आत्तातरी आम्ही म्हणजे मी सुधीर नील सुनिला आणि आमचे छोटे राज सारा हे सगळे ह्या विचारांसोबत आहोत असं दिसतंय, आणि भविष्यातही ते तसंच राहावं ही देवाजवळ प्रार्थना.

नवीनशी बोलता बोलता मी आमच्या भारतातल्या आणि जगभरच्या असोसिएट्सचा विचार केला तर बर्‍यापैकी असोसिएट्स हे ह्याच विचाराचे, बिझनेसमध्ये स्वत:ला झोकून देणारे, आपल्या पंतप्रधानांच्या ‘सबका साथ सबका विकास’ ह्या विचाराप्रमाणे काम करणारे असे दिसले. अशातर्‍हेने वेव्हलेन्थ जमली म्हणूनच कदाचित आम्ही गेली अनेक वर्ष एकोप्याने एकमेकांशी संबंध राखून आहोत. सगळ्यांचा एकच प्रयत्न जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा, अडीअडचणींवर मात करण्याचा आणि आयुष्य साधं सरळ सोपं करण्याचा.

आमच्या टीमबरोबरची चर्चा सुरूच होती, भौतिक गोष्टींवरून सगळे आता थोड्या उच्च विचारांवर गेले होते. अनेक विचारांचं आदान प्रदान झालं. कुणी म्हणालं,’  इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेटने आपल्याला बिझी ठेवलंय, डोक्याचं खोबरं केलंय, एकाग्रता घालवून टाकलीय, नो डाउट फायदे आहेत पण गरगरायला झालंय’ दुसर्‍याची मल्लिनाथी, ‘ अरे तू दोन दोन फोन का घेऊन फिरतोयस, एका फोनवर ये. अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समधून बाहेर ये. कशाला तुझ्या डोक्याला कायम बिझी ठेवतोस, आपण नको तो कचरा डोक्यात भरतो. यामुळे आणि मग ज्या गोष्टींवर खरा विचार व्हायला पाहिजे ते कुठेतरी बाजूला पडतं. चांगला विचार करायचा असेल तर मन आधी रिकामं करूया’ अरे वा! इंटरेस्टिंग! आज टीम टूर्स, परफॉर्मन्स, ट्रॅव्हल, नंबर्स ह्याव्यतिरिक्त वेगळं काहीतरी विचारमंथन करीत होती. कधीतरी अशी जनरल सेशन्सही मिटिंगचा भाग असावी असा विचार मी केला. त्यातच ऑर्किडच्या विशाल कामतचा मोबाईलवर एक फॉरवर्ड दिसला, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पैसे मिळविण्याचा मार्ग………….’  आमच्या एकूणच संवादात हा विचार एकदम चपखल बसला. एकच आयुष्य आहे ते सिम्प्लिफाय करूया, सोप्प सरळ करून टाकूया, कमी बोलूया जास्त विचार करूया, भूत-भविष्याचा विचार कमी करूया वर्तमानावर चित्त एकचित्त करूया, घरातल्या वस्तू कमी करूया जागा मोकळी करूया, टीव्ही मोबाईल कमी बघूया जास्त वाचन करूया, शक्य असल्यास गाड्यांमधून फिरणं कमी करूया जास्त चालूया, एकाच वातारणात सतत राहण्यापेेक्षा थोडसं खुल्या मोकळ्या जागी हिंडूया, आव्हानांची काळजी न करता हसत हसत त्याला सामोरं जाऊया, हसत हसत आयुष्य झेलायची सवय करूया. आमच्या टीमसोबतच्या मिटिंगमधून त्या दिवशी खूप  काही गवसलं.

मी म्हटलं, आयुष्य सिम्प्लिफाय करतानाच ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हलिंग हे सुद्धा सिम्प्लिफाय होणं किंवा त्यावर उलटसुलट चर्चा करणं, विचारांचं आदानप्रदान होणं हा आपल्या पुढच्या मिटिंगमधला अजेंडा असेल. हे ऐकल्याबरोबर आमच्या कामात बुडालेल्या, आणि कामं पूर्ण करण्याकडे सुपरफास्ट वेगात निघालेल्या शिल्पा आणि टीम मॅनेजर्सच्या चेहर्‍यावरचे भाव मी वाचले,‘ कधीतरी काम पण करूया…..’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*