Language Marathi

यंग अॅन्ड फ्रेश

Reading Time: 4 minutes

अ‍ॅज अ लीडर दुसर्‍यांच्यातील गुणदोष ओळखून त्यातील दोषांना दुर्लक्षित करून त्याच्या गुणांना प्राधान्य देत त्यात दडलेला हिरा शोधण्याचं काम मला जमतं का? ही स्वःपरीक्षाही घेता आली पाहिजे. स्वतःच स्वतःची परिक्षा घेणं हे महत्वाचं अस्त्र आम्ही आमच्यासाठी वापरतोय जे अतिशय प्रभावी आहे. अर्थात आम्हा सगळ्यांना सगळं काही कळतं असं नाही. आत्तातर कुठे पाच वर्ष झालीयेत. पहिलीत प्रवेश मिळवण्यास आम्ही पात्र झालोय कदाचित…

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा सर्वसाधारणपणे सर्वांना आवडणारा सुविचार किंवा जीवनशैली. ह्यातील ‘उच्च’ ह्या शब्दाचं उच्चाटन करून त्याऐवजी ‘चांगली’ विचारसरणी जी सर्वांना भावेल जमेल अशी मांडणी आम्ही केली आमच्यासाठी. उच्च या शब्दाचा दबाव येऊ नये एवढीच इच्छा होती. प्रत्येकाला संत महात्मा बनता येत नाही पण एक चांगली व्यक्ती-‘अ गूड ह्युमन बीइंग’ बनणं शक्य आहे. साधं सरळ सोप्पं गुंतागुंतीशिवायचं आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकाला निदान त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपण तसा प्लॅटफॉर्म तयार करून देतोय का? हा विचार मनात घोळत असतो. आता पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तर ह्या विचाराची तीव्रता वाढत चाललीय. तसं बघायला गेलं तर वीणा वर्ल्ड ही यंग अ‍ॅन्ड फ्रेश अशी ऑर्गनायझेशन. म्हणजे ‘बापरे! पाच वर्ष झाली?’ की ‘ओ, फक्त पाच वर्ष झाली?’ नेमकं काय म्हणायचं कळत नाही. पाच वर्षांत बरंच काही केलं किंवा पाच वर्षांत अजून खूप काही करता आलं असतं अशी संमिश्र भावना आहे जेव्हा सध्याच्या जगाचा एकुणच वेग बघते तेव्हा. पण जे काही आम्ही सर्वजण मिळून पर्यटकांच्या पाठिंब्याने करू शकलो त्याचं समाधान आहे. आणि त्याचसोबत साथ देणारे हात वाढलेत म्हणून धेय्याकडे झेपावायचा उत्साहही चांगलाच वाढलाय. व्यवसाय म्हटला म्हणजे तो वाढलाच पाहिजे, त्याच्याशी संलग्न असलेल्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट व्यक्तीची प्रगती, संलग्न उद्योगांची वाढ, ग्राहकांचा आनंद ह्या गोष्टी द्विगुणित झाल्या पाहिजेत. अर्थात हे सर्व होण्यासाठी संस्थेतला प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. तसं बघितलं तर ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आम्ही फ्लॅट ठेवलंय. कामाने, अनुभवाने, जबाबदारीने जी काही एक-दोन थरांची मांडणी करावी लागते तेवढीच, अन्यथा सर्वांशी थेट संवाद. अर्थात हे आता ऑफिस, टूर मॅनेजर्स आणि प्रिफर्ड सेल्स पार्टनर्सची मिळून फक्त तेराशे जणांची टीम आहे म्हणून शक्य आहे पण जेव्हा ही संख्या वाढेल तेव्हा खरी कसोटी आहे. त्यामुळे मॅनेजर्स किंवा इन्चार्ज मंडळी म्हणजे जी माणसं नवीनांना घडविणारी आहेत ते आम्ही सर्वजण या आठवड्यात भेटतोय. ज्या सवयी, नितीमूल्य, नियम, सिध्दांत…ह्या सगळ्याच्या बळावर आम्ही मार्गक्रमणा केली, जी बर्‍यापैकी यशस्वी ठरली त्या सगळ्याचा उहापोह करून पुन्हा एकदा सर्वांनी एका समान टॅ्रकवर येणं महत्वाचं आहे सर्वांसाठीच. एक दिशा, एक भाषा, एक गोल ह्याची खुंट आणखी मजबूत करणं, आणि सर्वांना समान धाग्यात ओवताना प्रत्येकाची इंडिव्हिज्युअ‍ॅलिटी जपणं, त्याच्या कल्पकतेला वाव देणं, उत्साहाला अखंड ओसंडू देणं ह्या गोष्टीचं भानही ठेवायचंय. म्हणजेच माणसांना घडविणार्‍या माणसांचं ओव्हरहॉलिंग करायचंय, इयरली मेंटेनन्स चेक करायचाय. शारिरीक, मानसिक, वैचारिक स्पेअर पार्टस् फिट करायचेत आणि पुढे जायचंय. तसं बघायला गेलं तर आमच्या छोट्या संस्थेतील छोट्या छोट्या गटांचं नेतृत्व करणारी व्यक्ती स्वतः सर्वदृष्टीने तंदुरूस्त असली पाहिजे हा आमचा अजेंडा. कारण माणसं व्यवस्थित असतील, विचारांची दिशा पक्की असेल त्याला प्रामाणिक आचाराची साथ असेल, तर आकडे, प्रगती, पैसा, प्रसिध्दी ह्या गोष्टी आपोआप मिळत जातात, त्याच्या मागे जावं लागत नाही हे आपण दैनंदिन जीवनातही अनुभवतो. मोठी वलयांकित माणसंही तेच सांगत असतात.

प्रॉडक्ट मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये एक मॅट्रिक्स आहे. व्यवसायाची वृध्दी करताना त्यावर उहापोह केला जातो. ‘ओल्ड प्रॉडक्ट-ओल्ड मार्केट, ऑल्ड प्रॉडक्ट-न्यू मार्केट, न्यू प्रॉडक्ट-ओल्ड मार्केट आणि न्यू प्रॉडक्ट-न्यू मार्केट’ असा सर्व बांजूनी विचार करून मग स्ट्रॅटेजी आखली जाते. व्यवसायात असणार्‍या प्रत्येकाला हे मॅट्रिक्स आवडतं आणि कधीनाकधी त्याचा उपयोग केला जातो किंवा तो करता आलाच पाहिजे कारण व्यवसाय तर सतत वाढतंच राहिला पाहिजे. आणि तसाही आपल्याला चॉईस कुठे असतो की मी व्यवसाय वाढवू की नको ह्याचा? ती अपरिहार्य गोष्ट असते. जसजसा व्यवसाय पुढे जातो तशी माणसं त्याच्याशी जोडली जातात, संस्था जोडल्या जातात, छोटे व्यावसायिक जोडले जातात आणि त्या प्रत्येकाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्णपणे किंवा अंशतः आपल्यावर येते आणि ती आनंदाने स्विकारायची असते. इथे स्विकारणं हा शब्द थोडा उपकारी वाटतोय तर तशीही मनोधारणा होता कामा नये इतकं ते सहजपणे अंगिकारलं गेलं पाहिजे. सो अशी जडणघडण करणारी जी आमच्यासह संपूर्ण मॅनेजर्स किंवा इन्चार्जेसची टीम आहे ती पहिल्यांदा आम्ही फिट अ‍ॅन्ड फाइन करतोय, मार्केटिंग मॅट्रिक्सप्रमाणे माणसांचं मॅट्रिक्स सुध्दा आहे बरं का. शेवटी माणसंच जर बदल घडविणार असतील तर आपण प्रत्येकाने स्वतःला ह्या मॅट्रिक्सप्रमाणे चेक करायला काय हरकत आहे? तर हे मॅट्रिक्स आहे, ‘लूक ओल्ड-फील यंग, लूक यंग-फील ओल्ड, लूक ओल्ड-फील ओल्ड आणि लूक यंग-फील यंग’ आहे की नाही एकदम इंटरेस्टिंग? ‘साठ साल के बुढे या साठ साल के जवान’ ही जाहिरात आठवली मला. आणि ह्याचा प्रत्ययही तसं पाहिलं तर प्रत्येक सहलीवर आम्हाला येत असतो. लेह लडाखसारख्या सहलीवर कधी तरूण मंडळींना मी दमताना बघते तर पंचाहत्तर वर्षांच्या आजीबाई एकदम तरतरीत उत्साही दिसतात. सीनियर्स स्पेशल सहलींवर तर असे अनेक अनुभव येतात. उत्साह असा ओसंडून वाहताना दिसतो विचारू नका, आणि मग वाटतं की वय आणि उत्साह-आनंद ह्यांचा काहीही संबंध नाही. मी ठरवलं तर मी उत्साही आणि आनंदी होऊ शकते. आणि आम्ही सगळे हे जे एकेका जबाबदारीचे लीडर्स आहोत त्यांच्यात तो उत्साह ठासून भरलेला असला पहिजे. कोणत्याही औषधाने तो आणता येणार नाहीये. किंवा जादुची कांडी फिरवून मिळणार नाहीये. उत्साह नैसर्गिकरित्या अंगी बाणवण्यासाठी आयुष्याला-सवयींना विचारांना चॅनलाईज करता आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही जी महत्वाची गोष्ट शिकतोय ती म्हणजे ‘वेळेवर यायचं आणि वेळेवर घरी जायचं, वेळेत कामं पूर्ण करून’. पूर्वी मी स्वतः आणि बरेचशे आमचे मॅनेजर्स पहाटे पहाटेपर्यंत कामं करायचो मात्र त्यात आम्ही खूपच भरडले गेलो. तेच काम फोकस्ड आणि ऑर्गनाइज्ड पध्दतीने वेळेत करता येऊ शकत होतं पण ‘मिडनाईट ऑईल बर्न केल्याशिवाय कामं होऊच शकत नाहीत’ हा पगडा संपूर्ण पिढीवर इतका जबरदस्त होता की आजही वेळेत घरी जायचं म्हटलं की आपण काही चूक तर करीत नाही नं असं थोडंसं गिल्टी फीलिंग येतं. पण गेल्या ‘चार-पाच’ वर्षांत सर्वांनी मिळून झपाटून जे काम केलं त्यामुळे आता आत्मविश्‍वास बळावलाय, कारण ह्या चार वर्षांत आम्ही बर्‍यापैकी वेळेत घरी जात होतो, वेळेत झोपत होतो, त्यामुळे खर्‍या अर्थाने दिवसा जागे रहात होतो, उत्साहात कामं करीत होतो, बरीचशी कामं त्यामुळे वेळेआधीही पूर्ण होत होती. म्हणजेच उत्साह ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि तो उत्साह मोठ्या-छोट्या टीम्समध्ये म्हणजेच संपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये सळसळता राहिला पाहिजे. अपुरी झोप ते देऊ शकत नाही. ‘वेळेत या, वेळेत काम पूर्ण करा, वेळेवर घरी जा, घरच्यांना वेळ द्या, वेळेवर झोपा, दुसर्‍या दिवशी ताजंतवानं होऊन देवाला धन्यवाद देत प्रसन्नचित्ताने उठा, आणि उत्साहाने दिवसाची कामं सुरू करा’ हा मंत्र बर्‍याचजणांनी आत्मसात केलाय. एकदाका हे उत्साहाचं कांरजं आपल्या अंतर्मनात आणि शरिरात सळसळतं राहिलं की मन खंबीर बनायला आणि कोणत्याही प्रोब्लेम्स आणि चॅलेंजेसना फेस करायला आपण तयार होतो आणि मग गोष्टी आपल्याला हव्या तशा घडायला लागतात. फ्रेश, यंग आणि एनर्जेटिक असल्याने आमची मानसिक स्थितीच इतकी मस्त असते की आज दिवसाला पंचवीस प्रॉब्लेम्स येतील ते हसतहसत सोडविण्याची आमची तयारी असते. आणि मग पंचवीस ऐवजी पंधराच आले तर आम्ही आणखी खूष होतो. प्रत्येक मॅनेजर किंवा इन्चार्ज असा खंबीर असेल तर त्याची टीम आणि ऑर्गनायझेशन झपाट्याने प्रगती करेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. ‘बोले तैसा चाले’ किंवा ‘प्रॅक्टीस व्हॉट यु प्रीच’ प्रमाणे लीडर असला पाहिजे तरंच तो लोकप्रिय होतो. आमच्या टेन कमांडमेंट्समध्ये ‘अ‍ॅम आय पॉप्युलर?’ असा एक प्रश्‍न आहे आपण स्वतःच स्वतःला विचारून स्वतः मुल्यमापन करण्याचा. तसंच अ‍ॅज अ लीडर दुसर्‍यांच्यातील गुणदोष ओळखून त्यातील दोषांना दुर्लक्षित करून त्याच्या गुणांना प्राधान्य देत त्यात दडलेला हिरा शोधण्याचं काम मला जमतं का? ही स्वःपरीक्षाही घेता आली पाहिजे. स्वतःच स्वतःची परिक्षा घेणं हे महत्वाचं अस्त्र आम्ही आमच्यासाठी वापरतोय जे अतिशय प्रभावी आहे. अर्थात आम्हा सगळ्यांना सगळं काही कळतं असं नाही. आत्तातर कुठे पाच वर्ष झालीयेत. पहिलीत प्रवेश मिळवण्यास आम्ही पात्र झालोय कदाचित. खरं शिक्षण तर आता मिळणार आहे. तेव्हा ह्या शालेय प्रवासासाठी आपल्या शुभेच्छा हक्काने मागून घेतेय. हॅव अ ग्रेट संडे!

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*