माय वाईफ!

0 comments
Reading Time: 9 minutes

अळूच्या वड्या केल्या आहेत माझ्या बायकोने, खाणार का? समीर नारकर आमचा एक उत्साही टूर मॅनेजर विचारत होता. म्हटलं, तू जर प्रश्‍न नीट विचारशील तर खाणार. त्याने जीभ चावली आणि म्हणाला अश्‍विनीने अळूच्या वड्या केल्या आहेत खाणार का? समीर तसा मिश्किल, बोलता बोलता मध्येच छोटे छोटे विनोद करून सगळ्यांना हसवणारा. तो चूप थोडा बसणार माझ्या हल्ल्यावर. पुढे म्हणाला, तुमचा गोंधळ नको नं व्हायला, इथे इतक्या सार्‍या अश्‍विनी आहेत म्हणून बायको म्हटलं. शब्द मागे घेतलेयस आता अश्‍विनीने केलेल्या अळूवड्यांवर आम्ही तुटून पडतो म्हणत हसत-हसत आम्ही त्यावर आडवा हात मारला.

वरचा संवाद घडायला आणि बायकोचं अश्‍विनी व्हायला आमचा वीणा वर्ल्डमधला एक नियम कारणीभूत ठरला. जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप नवीन नवीन होतं तेव्हा आपल्या सर्वांवरच फॉरवर्ड्स नामक गोष्टींनी हल्लाबोल केला होता. जोक्स, फोटोज्, मानसिक संतुलन नीट ठेवणार्‍या वा बिघडवणार्‍या पोस्ट्सनी आपली मती गुंग करून टाकली होती. शहाण्या माणसांनी हळूहळू त्यातून काढता पाय घेतला आणि खर्‍या अर्थाने मानसिक शांती मिळवली. त्यावेळी नवरा आणि बायको ह्या दोन्ही विषयांवर इतक्या गोष्टी फॉरवर्ड व्हायच्या की हळूहळू अशा पोस्ट आल्या की अनेकांनी त्या चवीने न वाचता डायरेक्ट डीलीट करायला सुरुवात केली. कितीही लाइट हार्टेड वा विनोदाने त्याकडे बघायचं म्हटलं तरी काही वेळा त्या विनोदांची पातळी इतकी हीन होऊन जायची की नवरा आणि बायको ह्या दोन्ही शब्दांची किंमत ह्या असल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे कमी होत गेली.

आमच्याकडे वर्षातून एकदातरी आम्ही एक टर्मिनॉलॉजी हे सेशन करतो ज्यामध्ये कोणत्या गोष्टीला काय म्हणायचं? एखाद्या गोष्टीला आपण एक म्हणतोय पण त्यापेक्षा वेगळा चांगला शब्द आहे का जो आपण आपल्या वीणा वर्ल्ड लँग्वेजमध्ये आणू शकतो? ह्यावर विचारविनिमय करुन चांगले शब्द दैनंदिन व्यवहारात रूजू करण्याचा निर्णय आम्ही घेतो. त्यातूनच अतिथी देवो भव: उक्तीनुसार आमचे पर्यटक गेस्ट झाले, सेल्स एजंट्स प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स झाले, टुगेदर वुई ग्रो संकल्पनेने एकत्र आलेली सगळी हरहुन्नरी उत्साही मंडळी स्टाफ न बनता वीणा वर्ल्ड टीम झाली. संस्था वाढतेय अशावेळी नवीन मंडळी जेव्हा जॉईन होतात तेव्हा कस्टमर, क्लायंट, स्टाफ, एजंट्स हे शब्द सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यात येतात आणि मग त्यांना वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते वीणा वर्ल्ड टर्मिनॉलॉजीची. वेळ लागतो पण तीही मंडळी हळूहळू ह्या वीणा वर्ल्डमध्ये टर्मिनॉलॉजी महत्त्वाची मध्ये सामील होतात आणि वन ऑर्गनायझेशन-वन लँग्वेज ही वाटचाल सुकर बनून जाते. खरंतर टर्मिनॉलॉजी हा वेगळा आणि मोठा विषय आहे. जमल्यास पुढे ह्या विषयावर संवाद साधूया.

अशा ह्या एका सेशनमध्ये आम्ही ठरवलं की बायको आणि नवरा हे शब्द शक्यतोवर टाळायचे. प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख म्हणून एक चांगलं नाव आईवडीलांनी दिलेलं असतं त्या नावानेच संभाषण करायचं. माझा नवरा किंवा माझी बायको हे ऐकताना आधी त्या सगळ्या पोस्ट्सनी ह्या शब्दांची खालावलेली पातळी दिसते, दुसरं सध्याच्या टपोरी भाषेत सांगायचं तर ही माझी प्रॉपर्टी आहे असा हक्क बजावण्यासारखा एक अहंकार कुठेतरी जाणवतो. म्हणजे हे दोघं एकमेकांचेच असतात नो डाऊट, पण हे नातं माझं-तुझं पेक्षा एकमेकांचे-एकमेकांसाठी असं जास्त आहे आणि त्यामुळे हे हक्क सांगणारे माझा नवरा-माझी बायको सारखे शब्द किमान आपल्याकडे नकोत.

आम्ही लहान असतानाचा एक किस्सा आठवला, अर्थात हा ऐकीव होता त्यामुळे तो खरा आहे की खोटा आणि नेमका दोघांपैकी कुणाच्या बाबतीत घडलाय हे ही आता आठवत नाही. बॉलीवूडची सुपरस्टार-ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी आणि त्यावेळचे प्रख्यात डायरेक्टर-अप्रतिम चित्रपट पाक़ीज़ा चे निर्माते कमाल अमरोही ह्यांनी लग्न केलं होतं. त्यांचं वैवाहिक जीवन वादळाचंच गेलं म्हणतात. त्यांच्या बाबतीतला एक किस्सा किंवा खटके उडण्याचं पहिलं कारण असं सांगितलं जातं की, एकदा मीना कुमारीने पाहुण्यांना कमाल अमरोहींची ओळख माझा नवरा अशी करून दिली होती ज्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि तिथून वादाची ठिणगी पडली.

एक भाग अहंकार आहे आणि दुसरा भाग नाव. व्यक्ती-संस्था-राज्य-देश ह्या सगळ्यांना एक चांगलं नाव असावं ह्यासाठी त्याच्याशी संलग्न असलेली मंडळी म्हणजे आईवडील, प्रवर्तक, राजकारणी मंडळी ह्यांनी विचारविमर्श केलेला असतो. संस्थेचं-देशाचं नाव पुढे यावं म्हणून जसं ब्रँडिंग केलं जातं, सतत ते नाव नजरेसमोर ठेवलं जातं तसंच व्यक्तीचं नाव सुद्धा नाही का. एक चांगलं नाव असताना का बरं आपण नवरा किंवा बायको  असा जनरिक सामान्य शब्द वापरायचा. दॅट्स नॉट फेअर! आपल्या लाईफ पार्टनरचं नाव घेऊन बोलावं म्हणजे सर्वांनाच ते नाव कळेल. अ‍ॅज फार अ‍ॅज पॉसिबल वूई शूड रेकग्नाईज एव्हरीवन बाय नेम. मोठ्या गोतावळ्यात हे कठीण असतं पण अ‍ॅटलिस्ट आपल्याकडून तसा प्रयत्न झाला पाहिजे.

टूर मॅनेजरच्या इयरली मीटिंगमध्ये दोन गोष्टींचा मी उल्लेख केला. आपण सेवा क्षेत्रात आहोत. संलग्न पार्टनर्सना आणि पर्यटकांना मनापासून मान देऊया आणि मग तुम्हा-आम्हालाही मान मिळत राहील. दुसर्‍याचा मन:पूर्वक आदर करणं हाच आपला व्यवसाय आहे. पण व्यवसायासाठी हे करावं लागतंय म्हणून मी करतोय किंवा करतेय अशी मानसिकता असेल तर मात्र ते टिकणं कठीण आहे, आणि मग आपला वैयक्तिक उत्कर्षही. हे सगळं मनापासून करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे प्रथम आपल्या घरी आपल्या माणसांचा आदर करायला शिकूया, आपल्या लाईफ पार्टनरचा मान सन्मान जोपासूया, अँड इट शूड बी टू वेज, गिव्ह अँड टेक. तुम्ही टूर करून येताय-थकून येताय तेवढंच तुमचा लाईफ पार्टनरही इथे करियर आणि कुटुंब ह्या रहाटगाडग्याने दमलेली वा दमलेला असतो, सो लेट्स केअर फॉर इच अदर. सहलीवर पर्यटकांशी म्हणजेच आपल्या गेस्ट्सशी संवाद साधताना तुमच्या घरातल्या गोष्टींचाही उल्लेख होेतो, तेव्हा माझा नवरा-माझी बायको असं म्हणू नका तर त्यांचं नाव घ्या आणि त्यांनाही संभाषणात सन्मानपूर्वक आणा. थोडक्यात माझा नवरा-माझी बायको हे शब्द आपल्याकडे बॅन्ड! दुसरी गोष्ट तुम्ही टूरवर असता त्यामुळे तुमचा लाईफ पार्टनर इथे त्याचं छोट-मोठं करियर घडवेल ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यांचं शिक्षण वाया जाऊ देऊ नका. अगदी दररोज नाईन टू फाईव्ह असा जॉब नाही पण आपल्या पार्टनरची गुणवैशिष्ट्ये-आवड जाणून त्यांना कौटुंबिक जबाबदारी व्यतिरिक्तच्या वेळात पार्टटाईम किंवा घरातून काहीतरी उद्योग करायला सांगा, प्रोत्साहीत करा, त्यासाठी सहकार्य करा.

जे टूर मॅनेजर्सच्या बाबतीत तेच आमच्याही. सुधीर, सुनिला, नील आणि मी असा आम्हा चार प्रवर्तकांचा कौटुंबिक गोतावळा पाहिला तर माझी बायको, माझा नवरा, माझा मुलगा, माझी आई, माझे बाबा, माझी बहीण, माझे जिजाजी असा रुढार्थाने मामला. घरातून ऑफिस सुरू झालं तेव्हा ठीक होतं. तीस-पस्तीस माणसं होती. बाहेरची देशविदेशातली माणसं येणं अजून सुरू झालं नव्हतं अशावेळी घरच्या नात्याने हाक मारण्याचा मामला ठीक होता. पण जसजसे पर्यटक वाढू लागले, ऑल ओव्हर द वर्ल्ड असोसिएट्सच्या आमच्या कार्यालयातील भेटी वाढू लागल्या, नवीन टीम मेंबर्स जॉइन व्हायला लागले तसतसं मॉम, डॅड, सन, सीस्टर असं संबोधणं थोडं गोधळाचं व्हायला लागलं. त्यातच आम्ही सर्वानुमते एक आणखी पॉलिसी आणली ती म्हणजे घर आणि ऑफिस ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यांची गल्लत करुया नको. घरच्या गोष्टी घरी, ऑफिसच्या ऑफिसमध्ये. ऑफिसच्या दारातून आत पाऊल टाकलं की मी तुझी बायको नाही, तू माझा नवरा नाही, हा माझा मुलगा नाही, मी त्याची आई नाही. लेट्स वर्क प्रोफेशनली. करियरमधली किंवा बिझनेसमधली ओळख ही स्व:कर्तृत्वाने असावी, केलेल्या कामांमुळे असावी. ती टिकणारी असते आणि प्रेरणादायीही. त्यामुळे कार्यालयातली ओळख कर्तृत्वाने मिळालेल्या डेसिग्नेशनप्रमाणे असावी.

ओळख कशी करून द्यावी ही एक कला आहे. इट्स अ‍ॅन आर्ट. आपला इगो मधे येऊ न देता, आपल्याला स्वत:ला कमी न लेखता समोरच्याचा यथायोग्य सन्मान करता आला पाहिजे. मी दहावीत असताना माझ्या बाबांसोबत काश्मीरला गेले होते. पर्यटकांमध्ये सेल्फ इंट्रोडक्शनचा कार्यक्रम घेतला जायचा. हा काळ चाळीस वर्षांपूर्वीचा. प्रत्येकजण आपापली ओळख करून द्यायचे. प्रत्येक सहलीत कुणीतरी यजमान असे निघायचेच की म्हणायचे, मी अमुक-अमुक, माझा व्यवसाय… वगैरे वगैरे आणि ही माझी बायको… इथे बाबा ऑब्जेक्शन घ्यायचे. ते म्हणायचे, हा सेल्फ इंट्रोडक्शनचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाची एक ओळख आहे. तुमच्या पत्नीला त्यांची स्वत:ची ओळख करून देऊ द्या. तेव्हापासून माझ्याही डोक्यात ते चपखल बसलं. गेल्यावर्षी द वाईफ नावाचा चित्रपट पाहिला. ग्लेन क्लोज ह्या प्रख्यात गुणी अमेरिकन अ‍ॅक्ट्रेसने खाऊन टाकलाय पूर्ण चित्रपट. बायको ह्या व्यक्तीची घुसमट इतक्या सुंदर तर्‍हेने सादर केलीय की जवाब नही! संधी आली तर जरुर बघा हा चित्रपट. इट्स वर्थ स्पेंडिंग टाईम! सीनियर्स स्पेशल सहलीवर सुधीर जर कधी आलाच तर मला प्रश्‍न पडायचा की ओळख कशी करुन द्यायची? माझा नवरा अशी केली तर तो अहंकार व्हायचा, नको ती ठिणगी पडायची मीना कुमारीसारखी. मी ह्यांची बायको म्हटलं तर नवरा-बायको शब्द डिक्शनरीतून गायब झालेला. मग मी मार्ग काढला, आज आपल्याला भेटायला आलेयत श्री. सुधीर पाटील, वीणा वर्ल्डचे फाऊंडर आणि फायनान्स डायरेक्टर. आणि बरं का आम्ही दोघं आहोत पती-पत्नी. हुश्यऽऽऽ मार्ग सापडला होता. दोघंही समान पातळीवर. तू मोठा नाही, मी छोटी नाही. एकमेकांसाठी एकमेकांचे बनून आयुष्याची मार्गक्रमणा करूया, येणार्‍या आव्हानांचा दोघं मिळून सामना करूया. लेट्स लिव्ह अ‍ॅन इगो फ्री, रीस्पेक्टफुल अ‍ॅन्ड हम्बल लाईफ!

 

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*