Language Marathi

पायातली वहाण…

पुर्वी एखाद्या माणसाच्या पायातली चप्पल किती घासलेली आहे त्यावरून त्या माणसाच्या आयुष्याची, कष्टांची आणि एकुणच त्याच्या व्यक्तिमत्वाची कल्पना यायची. आता अशी घासलेली चप्पल क्वचितच दिसते. खरंतर उलट झालंय, माणसाच्या पायातली चप्पल आजकाल स्टाईल स्टेटमेंट झालीय. आय कॉन्टॅक्टपेक्षा शूज कॉन्टॅक्टमुळे माणसाच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो. आणि शूज कंपन्यांनी ते बरोबर पटवून दिलंय आजच्या जनरेशनला…

‘अरे नील दोन पाय तुझे आणि किती हे शूज? आता मी घरात दुकान लावते.’ माझ्या ह्या वक्तव्यावर नीलची मल्लिनाथी, ‘अग मला एवढीच एक आवड आहे. एक्स्पेन्सिव्ह घड्याळ, गाड्या हे काय मी वापरतो का? आणि माझ्या पैशाने मी घेतो नं, तुझ्याकडे कधी मागितलेत का पैसे?’ ‘वा! वा! काय हे आदर्श विचार, पुत्र व्हावा ऐसा!’ ‘एकच लक्षात ठेव इमेल्डा मार्कोसच्या चैन आणि विलासी वृत्तीच्या कथा बाहेर आल्या तेव्हा तिच्याकडे तीन हजार शूजच्या जोड्या होत्या ही बातमी आली. तीचं स्पष्टीकरण तीन हजार नाही माझ्याकडे दीड हजार शूज आहेत. असं तुझ होऊ नये’ आमची तू तू मै मै शांतपणे ऐकणार्‍या सुधीरने पेपरातून डोकं वर काढलं. डायरेक्ट इमेल्डा मार्कोसची तुलना केल्यावर पुत्रप्रेम जागृत झालं असावं त्याने एकच प्रश्‍न केला, ‘वीणा मला वाटतं तुम्ही दोघही एकाच माळेचे मणी आहात. तुझ्याकडेही गरजेपेक्षा थोड्या जास्त चपला आणि शूज आहेत असं नाही वाटत?’ सुधीरकडे रागाने कटाक्ष टाकतानाच नील हसत हसत मला चिडवत कशी जिरली म्हणत नवे शूूज घालून घराबाहेर पडला. एकंदरीत आमचा रविवार चप्पल पुराणाने सुरू झाला आणि आज काय लिहायचं हा विचार करीत असताना आयताच विषय मिळाला.

शूज हा आमच्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे. चांगले शूज हे पर्यटनव्यवसायासाठी खूप आवश्यक आहेत. पर्यटन म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणं, ते ठिकाण, तिथली स्थळं पाहणं आणि हे करण्यासाठी चालणं फार महत्वाचं आहे. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल-एक्स्प्लोअर-सेलिब्रेट! ह्या ब्रिदवाक्याप्रमाणे पर्यटनासाठी भरपूर चालणं आणि चालण्यासाठी एकदम कम्फर्डेबल शूज वापरणं हे ओघाने आलं, आणि तुम्ही भरपूर चाललात तरच वीणा वर्ल्डचं पर्यटनही चालणार आहे. त्यामुळे तुमच्या पायांची काळजी आम्हाला असते. देवाशी प्रार्थना करताना आम्ही पर्यटन कंपन्यांवाली मंडळी बहुतेक करून ‘देवा सर्वांचे पाय व्यवस्थित राहूदे, सर्वांना भरपूर चालण्याची क्षमता दे, ओम पायो पायाय नमः!’ असं म्हणत असणार.

‘पायातली वहाण पायातच राहीली पाहीजे’ ही पूर्वी स्त्रियांसाठी किंवा कोणत्याही कनिष्ठ समजल्या जाणार्‍या व्यक्तिसाठी वापरली जाणारी म्हण. अतिशय वाईट आणि एकदम निम्न स्तरावरची अशी ही म्हण ऐकली तरी अंगाची लाही लाही होते. प्रत्येक माणूस महत्वाचा आहे पण स्त्री-पुरूष, श्रेष्ठ-कनिष्ठ ह्या विचाराची पायमल्ली करणारी ही म्हण कुणाच्या डोक्यातून निघाली कोण जाणे. माझी आत्या एक किस्सा सांगायची, दोन मित्र होते, रस्त्याने चालले होते. चालता चालता दोघांच्याही चपलांना काहीतरी घाण लागली. एका मित्राने बाजूच्या गवतावर चप्पल घासली आणि तो चालू लागला. दुसरा मित्र थोडा चिकित्सक, काय लागलं चपलेला म्हणून बघायला गेला. चप्पल हातात उचलली, त्याचा वास घेतला, हाताला आणि नाकाला दोन्हीकडे त्या घाणीचा प्रसाद मिळाला. कोणत्या बाबतीत चिकित्सक असावं आणि कोणत्या नाही ह्यासाठी ती हे उदाहरण द्यायची. ह्या एका गोष्टीच्या बाबतीत मी पायतली वहाण.. ही म्हण या अर्थाने बनविणार्‍याने बनवली असेल असं म्हणत माझं समाधान करून घेतलं. पण तरीही ह्या पायातल्या वहाणीच्या म्हणीमुळे आपण चप्पल ह्या गोष्टीला फारसं महत्व दिलं नाही

असं वाटतं. कपड्यांना जेवढं फुटेज-महत्व-वाहवा अनादीकालापासून मिळत आली तेवढी चप्पलांना नाही मिळाली आणि त्यामुळे आजही कपड्यांच्या बरोबरीनं चपलांना तसं तेवढं महत्व मिळत नाही. अर्थात शूजच्या कंपन्यांनी आपल्या सर्वांच्या मनावर ह्या वहाणीचं महत्व पटवून दिलंय आणि शूज हे स्टाईल स्टेटमेंट झालेत. आपल्या संपूर्ण शरीराला पेलणारे, आपली चाल रुबाबदार करणारे, पायाला शरीराचा भार सांभाळताना मदत करणारे शूज घेताना विचार करणं गरजेचं आहे. लक्झुरियस स्टाईल स्टेटमेंटवाले शूज असले तरी ते कम्फर्टेबल असणं महत्वाचं आहे. को को शनेल ह्या फ्रेंच फॅशन डिझायनरने म्हटलंय, लक्झरी जर कम्फर्टेबल नसेल तर ती लक्झरीच नव्हे. एखाद्या महिलेचं व्यक्तिमत्व आपण तिच्या पेहेरावावरून, दागिन्यांवरून, हावभावावरून तीच्या पर्सवरून जाणू शकतो. पुरूषांच्या बाबतीत म्हणे त्यांचं घडयाळ आणि त्यांचे शूज बघावे की अंदाज येतो त्या व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या एकंदरीत परिस्थितीचा. एक छान फॉरवर्ड होता, ‘माझं घड्याळ पस्तीसशेचं तर माझ्या मित्राचं पस्तीस लाखांचं, दोन्ही तर वेळच दाखवतात नं? उत्तर होतं, ‘ये दोनो घडी आप दोनोका आजका वक्त बता रही है!’ असो, एकंदरीत ग्लोबलायझेशनने -मार्केटिंगच्या तंत्रांनी-मल्टिनॅशनल कंपन्यांनी ह्या ‘स्टाईल स्टेटमेंट’ च्या क्रेझचा पगडा आपल्या मनावर पुर्णपणे बसवलाय. त्यात किती अडकायचं किंवा त्यातून किती लवकर बाहेर पडायचं हे प्रत्येकाने जाणायचंच. पण कम्फर्टेबल शूज असणं प्रत्येकाजवळ ह्या विचाराची मी पुर्ण पुरस्कर्ती आहे.

सिंड्रेलाची गोष्टसुध्दा आपल्याला हेच सांगते की नवीन शूजच्या जोडीने आयुष्य बदलू शकतं. आता तर ह्या सिंड्रेलाच्या सँडलचे आणि एकुणच शुजचे किती प्रकार आलेयत, मुलींसाठी स्टिल्लेटोज, पम्प्स, वेजेस, प्लॅटफॉर्म, थाय हाय, नी हाय, पीपटोस, किटनहिल, इन्कल स्ट्रॅप, म्यूर्ल, ओडिसी, स्नीकर्स, वेलिंग्टन, काऊबॉय, टिंबरलँड, क्लॉग, स्लीपऑन, …अबब किती ते प्रकार. मुलांचे आणिक वेगळे डर्बी, ऑक्सफर्ड, ब्रॉग, लोफर्स, मॉन्क, स्नीकर्स, बोट, सॅन्डल्स, चुक्का, डेझर्ट, कॅम्प मॉक… एक मात्र आहे की शूज आपली बॉडी लँग्वेज तसंच आपलं पोश्‍चर बदलतात. आपण कोणत्या टाईपच्या शूजमध्ये कम्फर्टेबल आणि स्मार्ट दिसतो ते आपल्याला कळलं पाहीजे. चांगले शूज घेताना त्याची हिल-उंची आपल्याला सोसवेल एवढी असावी, त्याचसोबत आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चरही लक्षात घ्यावं, पॉईंटेड हिल कधी कधी धोक्यात आणू शकते. माझी मैत्रिण एकदा अशी निमूळती हिल असलेली सँडल घालून कुणाच्यातरी लग्नाला जायला निघाली. सोसायटीत असलेल्या ड्रेनेज पाईपवरच्या भोकवाल्या झाकणाकडे लक्ष गेलं नाही आणि नेमकी ती निमुळती हिल त्यात रुतली, आणि ही अशी काही पडली की डायरेक्ट हॉस्पिटल बेडवर. तीन महिने बेडरेस्ट आणि कामावर यायला, रुटीन सुरू व्हायला पाच महीने लागले. चप्पल आयुष्य बदलून टाकते ती अशी सुध्दा. तेव्हा चपलांची शुजची खरेदी करताना काळजी घ्यायला हवी.

पर्यटन खूप वाढलंय, पूर्वी वर्षांतून एकदा पर्यटन केलं जायचं हल्ली वर्षातून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चार पाच वेळा पर्यटन करणारे पर्यटक मला दिसतात. आत्ताच नेपाळच्या सहलीवर आमचे एक पर्यटक यशवंत बोडरे मला म्हणाले माझी वीणा वर्ल्डसोबतची ही दहावी टूर, फक्त दोन वर्षातली, सांगायचा मुद्दा पर्यटन वाढलंय आणि माझा एक सल्ला पर्यटकांना असतो तो म्हणजे जिथे जाता तीथे भरपूर चाला. एक्सप्लोअर करा. अर्थात आमच्या ऑल इन्क्लुसिव्ह, मॅक्सिमम स्थलदर्शन असलेल्या सहलीत आम्ही तुम्हाला भटकंतीसाठी असा सडाफटिंग वेळ नाही देऊ शकत कारण कमी दिवसात खूप काही बघायचं असतं पण स्थलदर्शन जेव्हा असतं तेव्हा भरपूर चाला आणि ह्या भरपूर चालण्यासाठी चांगले कम्फर्टेबट शूज तुमच्या पायात असु द्या. प्रवासात मोस्ट सुटेबल स्पोर्टस शूज हे सतत पायात पाहीजेत ज्याने दमायला होणार नाही. माझी फॅन्टसी म्हणजे मला चालत जगप्रदक्षिणा करायचीय, अर्थात ह्या जन्मात हे शक्य होईल असं वाटत नाही कारण जबाबदार्‍या आणि प्रॉयॉरिटीज वेगळ्या आहेत. पण आजही माझ्या जगभरच्या प्रवासात मी फक्त हॅन्डबॅग घेऊन फिरत असले तरी पायात वॉकिंग शूज आणि बॅगेत जॉगिंग सुट हमखास असतो अविभाज्य घटक म्हणून. जेव्हा मिळेल तेव्हा चालायचं. आमच्या पर्यटनाच्या भाषेत सांगायचं तर, ‘अ जर्नी ऑफ थाऊजंड माइल्स बिगिन्स विथ अ गूड पेअर ऑफ शूज…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*