अवमूल्यन

0 comments
Reading Time: 8 minutes

‘‘…म्हणजे आपले किती रुपये?’ ओळखीचा वाटतोय नं हा प्रश्‍न. अहो हे तर आपलं प्रत्येक फॉरिन टूरवरचं संभाषण. इतका जगभराचा प्रवास करतेय वर्षानुवर्ष पण साधी कॉफी घ्यायची म्हटली कुठल्याही देशात की मनातल्या मनात गुणाकार भागाकार सुरू. अर्थात सर्वत्र गुणाकारच करावा लागतो. ‘अरे बापरे, म्हणजे कॉफीसाठी पाचशे रुपये भरायचे?’ लगोलग मन म्हणतं, खरंच हवीय का कॉफी? थोड्या वेळात जेवायचंच आहे की…

माझं स्वप्न आहे, खरंतर फॅन्टसीच म्हणावी लागेल. युरोपमध्ये आम्ही मैत्रीणी मैत्रीणी भटकंती करताना एक घड्याळाच्या दुकानात घुसलोय. एकेका घड्याळाची किंमत आम्ही बघतोय. पाच हजार युरो, दहा हजार युरो आणि आम्ही एकमेकींना म्हणतोय. ‘वॉव! सो चीप, चला घेऊन टाकूया दोन-तीन घड्याळं’ आणि आम्ही घड्याळं घेतो कारण त्यावेळी आमचा एक रुपया म्हणजे त्यांचे पंचाऐंशी युरो असतात. स्वप्न बघितली तर ती प्रत्यक्षात येतात म्हणे. सो कीप ड्रीमिंग! असो. आज ह्याच्या उलट परिस्थिती आहे. युरोपीयन्स आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याकडची शंभर रुपयाची वस्तू त्यांना सव्वा युरोला पडतेय. एक युरो म्हणजे पंचाऐंशी रुपये. आपसूकच त्या युरोपीयन्सच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ‘ओह! इंडिया इज सो चीप!’ त्यांचा आनंद आमच्या हृदयात मात्र वेदना  देऊन जातो.

व्हाय वुई आर सो चीप? मला फॉरिन एक्चेंज समजायला लागलं तेव्हा एका डॉलरची किंमत पस्तीस भारतीय रुपये होती, जी आज पंचाहत्तर रुपये झालीय. पूर्वी युरोपमधल्या देशांच्या वेगवेगळ्या करन्सीज होत्या. आठवतात का काही नावं? इटालियन लिरा, जर्मन डॉइश मार्क, फ्रेंच फ्रँक्स, ऑस्ट्रियन शिलिंग, नॉर्वेजीयन क्रोना, डच गिल्डर, फिनिश मार्का, ग्रीक ड्राचमा, आयरिश पाऊंड, स्पॉनिश पेसेता, पोर्तुगीझ एस्कुदो, बेल्जियन फ्रँक्स… १९९९ मध्ये एक सामुहिक करन्सीची प्रोसेस सुरू झाली आणि एक जानेवारी २००२ मध्ये युरोपमधल्या अठ्ठावीस देशांपैकी एकोणीस देशांनी एकत्र येऊन युरोझोनद्वारे एक करन्सी अस्तित्वात आणली, ती म्हणजे युरो. ज्यावेळी युरोचा जन्म झाला त्यावेळी एक युरो म्हणजे साधारणपणे पंचेचाळीस भारतीय रुपये होते. आजच्या घडीला एक युरो म्हणजे पंचाऐंशी रुपये झालेयत. गेल्यावर्षीपर्यंत पंचाहत्तरवर असलेला युरो आज पंचाऐंशी झाला. रुपयाचं हे अवमूल्यन निश्‍चितपणे त्रासदायक आहे, अर्थात यामुळे एक्सपोर्टला चालना मिळेल ही जमेची बाजू. आमच्या ट्रॅव्हल अ‍ॅन्ड टूरिझम क्षेत्राचा विचार करायचा झाला तर आम्ही परदेशी नागरिकांना भारत दाखविण्यासाठी जास्त संख्येने प्रवृत्त करू शकतो कारण रुपयाच्या घसरणीमुळे त्यांच्यादृष्टीने भारतात पर्यटन करणं आता खूपच स्वस्त आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, जागतिक घडामोडी, डॉलर वाढणं, ब्रिटीश पाऊंड कमी होणं, रुपया घसरणं ह्या गोष्टी म्हणजे तज्ञांचे विषय, त्यावर मी भाष्य करू शकत नाही कारण तो माझा विषय नव्हे. आमच्या पर्यटकांचीही गोष्ट काही वेगळी नाही. सहलीचे पैसे अमेरिकन डॉलर, युरो, ऑस्ट्रेलियन डॉलर असे वेगवेगळे का घेता? एकदाच काय ते आमच्याकडून भारतीय रुपयांत पैसे घ्या. आम्हाला ह्या फॉरिन एक्चेंज, रेट फ्लक्चुएशन, रुपया घसरला, रुपया वधारला ह्या फंदात पाडू नका ही मागणी. अर्थात सहलीतला अर्धा भाग हा त्या त्या देशातल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे हॉटेल, ट्रान्सपोर्ट, ट्रेन, बोट, क्रुझ, विमानांसाठी असतो आणि तो त्यांच्या देशाच्या करन्सीमध्ये तिथे द्यावा लागतो त्यामुळे तो आपल्याला त्या त्या देशांच्या करन्सीमध्ये भरावा लागतो. म्हणूनच प्रत्येक परदेश सहलीची किंमत ही भारतीय रुपये आणि फॉरिन एक्चेंज-फॉरेक्समध्ये असते. परदेशी जाणार्‍या पर्यटकांचं प्रमाण वाढतंय आणि आता बर्‍यापैकी पर्यटकांना ही गोष्ट माहितीची झालीय. पर्यटकांनी मागणी करायची आणि आम्ही ती पुरवायची हे ठरलेलं त्यामुळे दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही पुढील वर्षीच्या युरोप अमेरिकेचं बुकिंग संपूर्णपणे भारतीय रुपयांत करून आणि फॉरिन एक्चेंजच्या चढउताराची चिंता करू न देण्याची सोय पर्यटकांसाठी करतो आणि अनेक पर्यटक त्याप्रमाणे नियोजन करतात. इथे आम्ही रिस्क घेतो फॉरिन एक्चेंजमधल्या चढउताराची पण पर्यटक निश्‍चिंत होतात. यावर्षीही आम्ही सालाबादप्रमाणे ही गोष्ट सुरू केली पण आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीमुळे रिस्क खूपच वाढलीय. लवकरच ही गोष्ट मागे घ्यावी लागणार आहे आणि मग नेहमीप्रमाणे भारतीय रुपये आणि युरोमध्ये सहलीचा खर्च द्यावा लागणार आहे. जरी पर्यटकांची सोय असली तरी ही युरो किंवा युएस डॉलरची प्रचंड वाढ तेवढीच प्रचंड जोखीम घेऊन आलीय ज्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला बॅक टू पॅव्हेलियन जावं लागणार आहे. तर पर्यटक मंडळी, जोपर्यंत युरोप-अमेरिका २०१९ चं बुकिंग संपूर्ण भारतीय रुपयांत सुरू आहे तोपर्यंत त्याचा फायदा घ्या, सर्वात कमी किमतीत सर्वात चांगली सहल मिळवा. तुम्हाला युरो वाढीची चिंता करण्याचे कारण नाही आतातरी, जर लागलीच बुकिंग केलं तर.

जर युरो वा डॉलर खाली आला नाही तर बाहेरच्या देशातली कॉफी खरंच महाग पडणार आहे. कॉफी ही तीन-चार किंवा पाच युरोलाच (तिथल्या तिथल्या लोकल किंवा इंटरनॅशनल ब्रँडप्रमाणे) पडणार आहे पण रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे पाच युरो गुणिले पंचाहत्तर ऐवजी पाच युरो गुणिले पंचाऐंशी करावं लागणार आहे. म्हणजे तीनशे पंचाहत्तर ऐवजी चारशे पंचवीस रुपये. विदेशातलं पर्यटन महागणार ते असं. ग्रुप टूर्समध्ये सगळं काही समाविष्ट असतं आणि एकदा पैसे भरल्यानंतर पुन्हा पुन्हा पाकिट उघडावं लागत नसल्याने युरोप अमेरिकेला जगभरातून ग्रुप टूर्सद्वारे येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त असते. ते स्वस्त पडतं, शोधाशोध करावी लागत नाही. काय खाऊ? कुठे खाऊ? कसं खाऊ? हेही प्रश्‍न उरत नाहीत. अर्थात आम्ही कधीतरी मुद्दाम पर्यटकांना स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून कॉफी प्यायचा आग्रह करणार. खासकरून युरोपच्या मग ते ईस्टर्न युरोप असो वा वेस्टर्न युरोप, स्पेन असो वा स्कॅन्डिनेव्हिया, तिथल्या स्क्वेअर वा पियात्झा वा रोडसाईड कॅफेज्मध्ये बसून कॉफी घ्यायला सांगणार. त्याचं बिल मग पाचशे येवो वा हजार, ते कॉफीचे पैसे नाहीत तर तो एक अनुभव आहे आणि तो जिथे शक्य होईल तिथे घ्यायचा. तिथे रुपयाची आणि युरोची तुलना करायची नाही. ग्रुप टूर्समध्ये कमी दिवसांत भरपूर काही स्थलदर्शन शहरं देश बघायचे असल्याने असा फारसा वेळ मिळत नाही पण जर टूर मॅनेजरने एखाद्या ठिकाणी एक-दीड तास दिला असेल तर त्यात हा कॉफी ब्रेक आपण घेऊ शकतो. जे पर्यटक आमच्याकडून कस्टमाईज्ड पॅकेज घेऊन जातात त्यांनी भटकंतीत युरो-डॉलर-रुपया अशी तुलना करणं टाळावं नाहीतर हॉलिडेची मजाच निघून जाईल.

‘तुलना’ मग तो युरो आणि रुपयाची असो, माणसामाणसातली असो, स्वत:ची इतरांशी असो, आपल्या मुलांमधली असो, विद्यार्थी-विद्यार्थ्यांमधली असो, ती वाईटच. मन:स्वास्थ्य हिरावून घ्यायचं असेल तर ह्या तुलना किंवा कंपॅरिझन प्रकारात पडावं. पर्यटनाच्या बाबतीत म्हटलं तर एका देशाची दुसर्‍या देशाशी, एका शहराची दुसर्‍या शहराशी, एखाद्या स्थळाची दुसर्‍या स्थळाशी जेव्हा तुलना केली जाते तेव्हा पर्यटक त्या सहलीचा आनंद घालवून बसतात. जसं प्रत्येक मूल हे युनिक आहे, त्यात कितीतरी गोष्टी चांगल्या आहेत, ज्याचा खूप चांगल्या तर्‍हेने विकास होऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. त्या मुलाची दुसर्‍याबरोबर तुलना करणं हे महापाप आहे, त्याच्या उमेदीचं खच्चीकरण आहे. तसंच मला प्रत्येक देशाविषयी- शहराविषयी वाटतं. सहलीवर अनेकदा असा अनुभव येतो. पॅरिसचा कॅब्रे शो बघताना कुणीतरी म्हणतं, ‘मलानं ह्यापेक्षा पट्टायाचा अल्काझार शो आवडला.’ युरोप करून अमेरिकेला गेलेला पर्यटक म्हणतो, ‘अमेरिका चांगलीच आहे हो पण आम्हाला युरोप जास्त आवडलं.’ अमेरिका करून ऑस्ट्रेलियाला गेलेला पर्यटक म्हणतो, ‘मला अमेरिका जास्त आवडली.’ जपान करून चायनाला आलेला पर्यटक म्हणतो, ‘जपान जास्त छान होतं.’ ‘तुम्हाला न्यूझीलंड आवडलं की स्वित्झर्लंड?’ हा किंवा अशा प्रकारचा प्रश्‍न मला हमखास विचारला जातो. ह्याचं उत्तर देणं खूप अवघड आहे. सर्वसाधारणपणे आपण पर्यटन करतो ते अशाच देशांत ज्यांच्याकडे पर्यटनसदृश आकर्षणं आणि सोयी आहेत. मग त्या देशाला किंवा शहराला किंवा स्थळाला जसं आहे तसं स्विकारूया, तिथल्या युनिकनेसचा आनंद उपभोगूया. आपल्या कष्टाचे पैसे खर्च करून आपण तिथे गेलेलो असतो त्यामुळे आधीच्या कोणत्याही स्थळाची तुलना न करता त्या क्षणांचा आनंद द्विगुणित करूया. त्यात सर्वार्थाने फायदा आहे.

रुपयाची-माणसांची-देशांची तुलना करताना एक महत्वाचा मुद्दा आठवला आणि तो म्हणजे आपण ज्यावेळी बाहेरच्या देशात जातो तेव्हा तिथला सगळा लखलखाट बघून स्तिमित होतो. आणि व्हायलाच पाहिजे कारण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत त्यांनी केलेली प्रगती अतुलनीय आहे. तिथली सिस्टिम्स, सुखसोयी, सहजता, दैनंदिन जीवनातला टेक्नॉलॉजीचा वापर ह्यात झालेली प्रगती आणि त्याला सरावलेली माणसं आपल्याला अचंबित करतात. आपण नकळत पण सहजतेने त्या देशाची आपल्या देशाशी तुलना करायला लागतो, दुषणंही देतो त्याहीपुढे जाऊन खच्ची होतो. इथे मात्र अगदी स्वत:ला कंट्रोल करायचं. नो कंपॅरिझन अ‍ॅट ऑल. तुमचा देश तुमच्याकडे आमचा देश आमच्याकडे. मेरा भारत महान. आमच्यात काही उणिवा असतील पण प्लसपॉईंट्स जास्त आहेत ज्याचा आम्हाला अभिमान आहे. रुपयाचं अवमूल्यन चालेल पण देशाचं अवमूल्यन आपल्याकडून कदापि घडणार नाही ह्याची खबरदारी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*