International Tiger Day How I Spotted Tigers in National Parks in India scaled

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन: भारतातील राष्ट्रीय उद्यानांत मला घडलेलं व्याघ्र-दर्शन

0 comments
Voiced by Amazon Polly
Reading Time: 8 minutes

मी त्याला आयुष्यात पहिल्यांदा बघितलं ते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी. त्या आधी त्याच्या विषयी बरंच काही वाचलं होतं, खूप काही ऐकलं होतं पण त्याला बघण्याचा योग आला नव्हता, अर्थात त्याला बघायचं तर त्याच्याच ‘टेरिटरीत’ जावं लागतं म्हणा. बरं तुम्ही गेलात तरी तो लगेच दिसेल याचीही खात्री नसते, तसा तो एकदम सावध, चपळ आणि त्याचबरोबर भितिदायकही, पण त्यामुळेच तर त्याला बघण्याची मजा काही औरच ……… मी हे कोणाबद्दल बोलतोय सांगितलंच नाही का? असं होतं माझं, त्याचा विषय निघाला की भानच हरपतं. मी बोलतोय भारतीय वन्य जीवनाचा मानबिंदू असलेल्या पट्टेरी वाघाबद्दल. होय होय रॉयल बेंगॉल टायगर अर्थात Panthera tigris tigris  बद्दलच बोलतोय मी. गेली पंचवीस वर्षे भारतातील निरनिराळ्या जंगलांमध्ये, नॅशनल पार्क्समध्ये जंगल सफारी करताना अनेकवेळा पाहूनही माझे डोळे आणि मन ज्याला पुन्हा पुन्हा पाहायला आतुर असतात असा प्राणी म्हणजे पट्टेरी वाघ. जीम कॉर्बेटने ज्याचे वर्णन ‘जंटलमन ऑफ जंगल ’ असे केले आहे तो वाघ म्हणजे रुबाबदारपणा, आक्रमकता आणि शिस्तबध्दता याचे अनोखे मिश्रण आहे. यावर्षी कोव्हिड १९ मुळे सगळं जीवनच थांबलंय आणि लॉकडाऊनमुळे मला नेहमीप्रमाणे प्रत्यक्षात जंगलात जाऊन वाघोबाचं दर्शन घेता आलं नाही त्यामुळेच मग या लेखामधून त्याच्या आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न करतोय.

या लेखाला आणखी एक औचित्य ही आहे, दरवर्षी जगभरात २९ जुलै रोजी इंटरनॅशनल टायगर डे साजरा केला जातो. याच दिवशी २०१० साली तेरा टायगर रेंज कंट्रीज (भारत, भूतान, नेपाळ, व्हिएतनाम, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, चायना, रशिया, बांग्लादेश, थायलंड, लाओस, कंबोडिया) रशियामध्ये एकत्र आल्या आणि त्यांनी पुढच्या बारा वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत (कारण हे चायनिज पध्दतीनुसार व्याघ्र वर्ष आहे) जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी काय करावे लागेल याची योजना आखली. या सगळ्यामध्ये आपल्या देशाला विशेष स्थान होते कारण जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी ( सुमारे ३९०० पैकी) ७५% वाघ ( नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार) आपल्या भारतात आहेत. त्यामुळेच भारतातील नॅशनल पार्क्स आणि अभयारण्यांना जगभरातील वन्यजीव प्रेमी वाघ बघण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात.

जो वाघ भारतीय जंगलांच्या आरोग्याचा निर्देशक मानला जातो तो पट्टेरी वाघ मूळात भारतीय नाही हे माहित आहे का ? खरंच आज भारतातील हिमालयातल्या जंगलांपासून ते राजस्थानच्या वाळवंटी भागापर्यंत आणि  सुंदरबनमधल्या मँग्रूव्ह फॉरेस्टपासून ते केरळमधल्या सदा हरित जंगलांपर्यंत भारतात सर्वत्र आढळणारा वाघ मूळात सायबेरियाच्या बर्फाळ परिसरातला प्राणी आहे. सुमारे अकरा-बारा हजार वर्षांपूर्वी वाघ तिथून भारताच्या भूमीवर आला. भारताच्या भूमीवर वाघाला अतिशय अनुकूल वातावरण होते. घनदाट जंगले, भरपूर भक्ष्य आणि भरपूर पाणी यामुळेच भारताच्या विविध भागांमध्ये वाघ स्थिरावला. दुर्गा मातेचं वाहन म्हणून वाघाला धार्मिक महत्व आणि संरक्षण देण्यात आले आहे तरीही राजे-महाराजेंच्या काळात आणि ब्रिटिश राजमध्ये या जंगलाच्या राजाची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. १९ व्या शतकाला सुरवात व्हायच्या आधी भारतात चाळीस हजारांच्या आसपास पट्टेरी वाघ जंगलात शिल्लक होते पण पुढच्या अवघ्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये भारतात फक्त दोन हजार वाघ शिल्लक राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळेच या राजेशाही आणि डौलदार शिकारी प्राण्याला वाचवले नाही तर भविष्यात वाघ फक्त प्राणी संग्रहालयात बघावा लागेल अशी भीती निर्माण झाली, त्यातूनच १९७३ साली भारत सरकारने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट टायगर’ हा उपक्रम सुरू केला. पहिल्या टप्प्यात नऊ राष्ट्रीय उद्यानांमध्ये सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ प्रकल्पामुळे आता भारतातील ५० जंगलांमधील वाघांना संरक्षण मिळाले आहे. तमिळनाडूतील मुदुमलाई पासून ते अरुणाचल प्रदेशमधील नामदफापर्यंत आणि राजस्थानमधील रणथंबोरपासून ते ओडिशामधील सिमलीपालपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या इको सिस्टिम्समधील वाघांना या प्रकल्पाने संरक्षण मिळाले आहे. या प्रकल्पामुळे भारतातील वाघांचे संवर्धन होत आहे याची खात्री पटवणारे टायगर सेन्ससचे आकडे नुकतेच जाहीर झाले आहेत. भारतातील विविध संरक्षित क्षेत्रांमध्ये व्याघ्र गणनेसाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. २०१८-१९ च्या गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या २९६७ असल्याचे जाहीर करण्यात आले. २०१० मध्ये हाच आकडा होता १७०६.

मात्र भारतातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढलेली असली तरी व्याघ्र दर्शन फार सहज साध्य नाही हं. किती झालं तरी तो जंगलातला मुक्त वन्य पशू आहे, भई अपने मर्जी का मालिक है, तुम्ही गेलात म्हणून तो उभाच असणार आहे का? त्यामुळे भारतातील जंगलांमध्ये, नॅशनल पार्कमध्ये वाघोबांची भेट घ्यायची असेल तर आधी त्याला समजून घ्यावं लागतं. वाघ हा कॅट फॅमिलीमधला शिकारी प्राणी आहे मात्र तो कळपाने राहात नाही. सर्वसाधारणपणे मिलनाच्या काळात नर-मादी एकत्र असतात तेव्हढेच. एकदा का मादीला पिल्लं होण्याची चाहूल लागली की ती जोडीदाराला लांब हाकलते. नंतर पिल्लांना जन्म दिल्यानंतर पुढची दोन वर्षे ती आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी अतिशय जागरुक आणि आक्रमक असते. त्याचबरोबर ही लहान पिल्ले खूप मस्तिखोर असतात त्यामुळे पिलांच्या मागे मागे तिला फिरावच लागतं, म्हणजे ज्या जंगलात बच्चे वाली मादी आह तिथे गेलात तर आई आणि पिल्ले बघायला मिळायची शक्यता जास्त असते. नर वाघाचे तंत्र वेगळेच असते. त्याची स्वतःची अशी एक टेरीटेरी म्हणजे इलाका असतो. एका नर वाघाच्या ताब्यात सर्वसाधारणपणे दहा ते वीस स्क्वेअर किलोमीटरचा परिसर असतो आणि प्रत्येक नर वाघ आपल्या इलाक्यात रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक फेरी मारून कोणी घुसखोर (म्हणजे दुसरा नर वाघ) शिरलेला नाही ना याची खात्री करुन घेतो. नरांच्या इलाक्यात माद्यांना आडकाठी नसते. शिवाय ऐन उन्हाळ्यात जेंव्हा तापमान चाळीस आणि बेचाळीस डिग्रीचा पारा गाठू लागते तेंव्हा गरम हवेने हैराण झालेला वाघोबा हमखास एखाद्या झऱ्यावर नहीतर पाण्याच्या डबक्यावर ठाण मांडून बसतो. या गोष्टी माहित असतील तर जंगलातला वाघ पहायला मिळायची शक्यता नक्की वाढते.

गेली पंचवीस वर्षे मी महाराष्ट्रातील ताडोबा, मध्यप्रदेशातील कान्हा, बांधवगड, सातपुडा, पेंच, राजस्थानमधिल रणथंबोर, उत्तराखंडामधील जीम कॉर्बेट, प.बंगालमधील सुंदरबन, आसाम मधील काझिरंगा या जंगलांमध्ये वारंवार जंगल सफारी करत आलो आहे. त्यातला एक अनुभव सांगतो आणि माझं व्याघ्रपुराण सध्या आटोपतं घेतो.

….. ऐन  मे महिन्यातील त्या जंगल सफारीमधली आमची शेवटची पार्क राउंड होती. दुपारच्या रणरणत्या उन्हात आमची जिप्सी बांधवगडच्या खितौली गेटवर पोहोचली. सलिमने – आमचा चालक नेहमीप्रमाणे एंट्री करताना गेटवरच्या फॉरेस्टरकडुन सकाळची मूव्हमेंट जाणून घेतली. खितौलीचा मेल(नर वाघ) रोज संध्याकाळी त्याच्या ठरलेल्या पाणवठ्यावर न चुकता पाणी प्यायला येतो, त्यामुळे आज मनसोक्त वाघ बघता येईल (आणि हो फोटो ही काढता येतील!) असा दिलासा त्याने दिला. वाघाचे साइटींग हा ‘ गेम ऑफ पेशन्स ’ असतो. एकाच ठिकाणी किमान तासभर थांबण्याची तयारी असेल तर डोळेभरुन दर्शन व्हायची शक्यता असते. सुरवातीला सगळ्यांना उत्साह असतो, त्यामुळे आसपासच्या जंगलावर नजर फिरवत आणि ऐकू येणाऱ्या आवाजांचा अर्थ लावत सगळेच वाघ शोधत असतात. थोड्या वेळाने हा उत्साह मावळायला लागतो. हवेतली उन्हाची धग आता कमी झाली होती, घड्याळातील काटे साडेपाचची वेस ओलांडून पुढे सरकु लागले होते, खितौली नराचा काही पत्ता नव्हता. तशी वाघ मंडळी वेळेच्या बाबतीत भलतीच वक्तशिर असतात, मग आजच काय झाले का ही संधी पण हुकली? अचानक शेजारच्या टेकडीवरुन माकडाचा अलार्म कॉल ऐकु आला, तसे सगळेच सावध झाले. माकड ओरडतंय म्हणजे वाघोबांची स्वारी चालतेय तर, आता तो कुठुन पाणवठ्यावर येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. अचानक एका गाडीतून हलकासा चित्कार ऐकू आला, म्हणजे त्यांना वाघ दिसला होता. आमची गाडी सगळ्यात कडेला होती, त्यामुळे आम्हाला तो अजिबात दिसत नव्हता. सलिमची गाडी उभी करायची जागा चुकली काय? आता काय करायचं? पण ही शंका चुकिची ठरली कारण त्या टेकडीवरुन खाली उतरुन महाराज सरळ चालत आले ते आमच्या गाडी समोर आणि समोरच्या पाण्याला तोंड लावुन लपालपा पाणी पिऊ लागले. दुपारच्या उन्हाच्या तडाख्याने स्वारी चांगलीच तहानलेली होती. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर वाघोबा थेट पाण्यात शिरले. आता जणू आमच्या गाडीसाठीच तो नर वाघ पाण्यात बसला असावा अशी परिस्थिती होती. समोर असलेल्या जिप्सि, त्यातली माणसे, त्यांच्या हालचाली, आवाज या कशाचाही जराही परिणाम त्या वाघावर झालेला दिसत नव्हता. किंबहुना आम्ही त्याच्या खिजगणतीत ही नव्हतो. दिवसभराचा उन्हाचा ताप घालवण्यासाठी तो छानपैकी पाण्यात डुंबत होता. मध्येच त्याने वळून आमच्याकडे बघितलं तेंव्हा त्याच्या नजरेतील जरब आमच्यापर्यंत ठळकपणे पोहोचली. तेवढ्यात जणू शो संपावा त्याप्रमाणे तो वाघ पाण्यातुन बाहेर आला आणि आमच्याकडे एकवार वळून बघत जंगलाच्या दिशेनं चालू लागला…………

पाचवर्षांपूर्वीचा हा प्रसंग पण आजही जस्साच्या तस्सा आठवतो, कारण काळ्या पिवळ्या पट्ट्यांचे गारुडच तसे आहे. म्हणून तर मी नेहमी म्हणतो जगात माणसांचे दोनच प्रकार असतात एक वाघ बघितलेले आणि दुसरे वाघ न बघितलेले.

लेखक: मकरंद जोशी

Marathi, Tiger, Wildlife

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*