जग म्हणतंय ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ आम्ही म्हणतो, ‘मुलगी आनंदी झाली, घर आनंदी झालं’. शिक्षणाने प्रगती आणि प्रगतीनंतर आनंद हे चक्र सुरू राहिलं पाहिजे. आणि त्या आनंदासाठी गेली बारा वर्ष म्हणजे एक तप सातत्याने वुमन्स स्पेशलच्या माध्यमातून आम्ही योगदान देतोय. वुमन्स स्पेशल हा व्यवसायाचा भाग असला तरी त्यामुळे महिलांच्यात होणारे बदल स्तुत्य आहेत, ह्यात समाधान आहे…
नव्वदीच्या दशकात मी टूर मॅनेजर म्हणून हिमाचलच्या सहली करीत असे. किमान दहा वर्ष सातत्याने मी ते काम केलं नंतर मग युरोप अमेरिका साउथ ईस्ट एशिया सुरू झालं. माणसाला जर आपलं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल, रफटफ बनायचं असेल, आयुष्यातल्या प्रत्येक चॅलेंजला सामोरं जाऊन त्यावर मात करायची असेल तर किमान दोन वर्ष ही टूर मॅनेजरशीप करावी. सिंगापूरमध्ये किंवा अनेक देशांमध्ये कसं मिलिटरी ट्रेेनिंग प्रत्येकाला सक्तीचं आहे तसंच हे टूर मॅनेजरशीपचं. माणसाला तावून सुलाखून काढणारी एक कार्यशाळा. तर ह्या कार्यशाळेची विद्यार्थिनी असताना अनुभवाने अनेक गोष्टी शिकता आल्या. शिस्त, नीटनेटकेपणा, आखणी, नियोजन, त्याची अंमलबजावणी ह्या गोष्टी बर्यापैकी अंगी बाणत गेल्या. निरीक्षणाची आणि त्यातून आकलनाची सवय लागली, त्यातूनच काही गोष्टी उलगडत गेल्या. वुमन्स स्पेशल ही त्यातलीच ‘एक देन’ असं मी म्हणेन.
त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी, ख्रिसमस ह्याचवेळी फक्त पर्यटनाला लोकं बाहेर पडायचे. ३६५ दिवसांचं पर्यटन ही संकल्पना मी दोन हजार सालात राबवली, पण त्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक घराबाहेर पडायचे नाहीत. एकट्या महिलांचं फिरण्याचं प्रमाण जवळजवळ नगण्य. बहुतेक करून सहलीला फॅमिलीज आणि सीनियर कपल्स ह्यांचाच भरणा असायचा. ‘पर्यटक सहलीला का येतात? त्यांच्या आवडी-निवडी काय असतात? वर्षातून एकदा की दोन वर्षांतून एकदा ते प्रवास करतात? मुलांना सहलीवर काय हवं असतं? आजी-आजोबा नेमकं काय घेतात ह्या सहलीतून?’… सहल करता करता शांतपणे माझं निरीक्षण आणि रीसर्च सुरू असायचा. त्यातूनच निदर्शनाला आल्या महिला आणि त्यांचं सहलीवरचं काम. फॅमिलीसोबत सहलीला आलेली महिला किचन-कुकिंग ह्या गोष्टी मागे ठेवून आलेली असते, ती त्यात खूशही असते पण इथेही किचन वगळता बाकी मुलांचं, पतीराजांचं सगळं हवं नको तिलाच बघायला लागायचं. आता स्विमिंग पूलचा विषयच घ्या ना. कपडे सांभाळत, पूलमध्ये डुंबणारी मुलं आणि ‘अहो’ बघून त्यांचे फोटो काढण्यात तिला आनंद मिळायचा पण कॉश्यूम घालून स्विमिंग पूलमध्ये स्वत: डुंबत फॅमिलीसोबत आनंद घ्यायची कल्पना कदाचित त्यावेळी तिच्या डोक्यात आली असेल पण ते धाडस व्हायचं नाही. आणि स्विमिंग पूलमध्ये झोकून देणं ही एक मनात दडलेली सुप्त इच्छा होऊन जायची. साधं कपड्यांचंच उदाहरण घ्या, ‘नऊवारीवरून सहावारीवर आणि सहावारीवरून पंजाबी ड्रेसवर यायला किती वेळ लागला आपल्याला’. मलाही नव्वदीत लग्न झाल्यावर, ‘फक्त साडीच नेसायची, पंजाबी ड्रेस घालायचा नाही, जीन्सचं तर नावही काढायचं नाही, नो लिपस्टीक अॅन्ड ऑल दॅट नखरा’ अशी सक्त ताकीद मिळाली होती. काही महिने मी ते आदर्श सून बनण्यासाठी केलंही पण नंतर लक्षात आलं की हे काही खरं नाही. हळूहळू काळ बदलला, मनपरीवर्तनं झाली आणि मला एकदाच आहे त्या वेशात स्विकारलं सासूबाईंनी. गेल्यावर्षी त्यांना इव्हिनिंग गाऊन चढवून त्यावर ब्लेझर घालून त्यांचे फोटो काढून मी त्याचा वचपा काढला ही गोष्ट वेगळी. पण ह्या स्थित्यंतराला अठ्ठावीस वर्ष लागली ही अनेक घरातली वस्तुस्थिती. त्यावेळी जेव्हा टूर मॅनेजर होते तेव्हा बहुतेक महिला साडीच नेसायच्या, पंजाबी ड्रेस किंवा जीन्स टॉप घालणारी महिला जरा पुढारलेली आणि फॅशनेबल वाटायची. कुणाला आपल्याला तिच्यासारखे कपडे नाही घालता येत म्हणून खंत वाटायची तर कुणाला थोडीशी असूया. मला एकच दिसायचं की, ‘जी नऊवारीत आहे तिला सहावारीची ओढ आहे, जी सहावारीत आहे तिला पंजाबी ड्रेसची, जी पंजाबी ड्रेसमध्ये आहे तिला मॅक्सीची, जी मॅक्सीमध्ये आहे तिला मिडीची आणि मिडीवालीला शॉर्टसची’. आता मॅक्सीचा गाऊन झालाय आणि मिडीचा वनपीस. नावं बदलत राहिली पण ओढ आजही ती आहेच. तसं बघायला गेलं तर नऊवारी-सहावारी साडी प्रकरण सहलीला जरा अवघडंच. पंजाबी ड्रेस-जीन्स टॉप हे ड्रेसेस कसे सुटसुटीत आणि सडाफटिंग. सहलीवर तसेच कपडे असावेत. त्यामुळे सोयीसाठी म्हणूनपण आणि सुप्त इच्छा म्हणूनही मी वीडा उचलला की सहलीवर असताना महिलांना ह्या साडीपासून मुक्त करायचं, मी तसा प्रपोगंडाही करीत असे पण एवढं सोप्पं नव्हतं ते. ‘कोण काय म्हणेल?’ एक अदृश्य भीती प्रत्येकीच्या मनात असायची. आता चॅलेंज माझ्यासमोर होतं. वर्षभर ‘घर आणि करियर’ ह्या दबडग्यात अडकलेल्या प्रत्येकीला पहिल्यांदा घराबाहेर काढायचं होतं, ‘एकटीला’. तिच्या मनातली ‘कोण काय म्हणेल’ची भीती घालवून कॉन्फिडंट बनवायचं होतं. जे कपडे इथे घरात-शेजार्यांमध्ये घालता येत नाहीत ते घालून तिच्या मनाची सुप्त इच्छा पूर्ण करायची होती. तिलासुद्धा त्या दुसरीसारखं फॅशनेबल बनवायचं होतं. ह्यासाठी एकच करायचं होतं ते म्हणजे जिथे आपली माणसं अशी सभोवताली दिसणार नाहीत तिथे तिला घेऊन जायचं होतं. आणि दोन हजार सहामध्ये थायलंडच्या वुमन्स स्पेशलची घोषणा केली आणि धडाधड तीनशेहून अधिक महिलांनी बुकिंग करुन मला दाखवून दिलं की अशातर्हेची एखादी सहल किती गरजेची होती महिलांसाठी. रेस्ट इज हिस्ट्री. वीणा वर्ल्ड सुरू झाल्यानंतर फक्त परदेशात जाणारी वुमन्स स्पेशल भारतातही सुरू केली आणि ज्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता किंवा भारत बघायचा राहिला होता त्यांची सोय झाली. वुमन्स स्पेशलला एका गाला इव्हिनिंगला मी जाऊन सर्व महिलांना भेटते. एक संध्याकाळ आम्ही आनंदात घालवतो. मी आणि ह्या सार्या सख्या रीज्युविनेट आणि रीफ्रेश होऊन अधिक एनर्जी घेऊन घरी येतो आणि आनंदाने तयार होतो, घर आणि करियरची कसरत सांभाळायला.
पूर्वी मी वर्षांतून चार-पाच टूर्स करीत असे पण हल्ली मला महिन्यातून चार-पाच टूर्स कराव्या लागतात. आणि जिथे आमच्या महिला ह्या वुमन्स स्पेशलद्वारे जातात तिथे भारताच्या किंवा जगाच्या कानाकोपर्यात जाऊन मी त्यांना भेटते. माझाही स्वार्थ आहेच त्यात, माझी प्रवासाची आवड आणि माझ्यातली टूर मॅनेजर ह्या दोन्ही सुप्त इच्छांची पूर्ती होते. आता आमच्या महिलांना छोट्या टूर्सही हव्यात. तीन दिवसांच्या-चार दिवसांच्या टूर्ससाठी आग्रह चाललाय. पण माझं कॅलेंडर आता पुढच्या वर्षीच्या म्हणजे एकोणीसच्या मार्चपर्यंत काठोकाठ भरलंय. महिलांची प्रत्येक इच्छा आम्ही ह्या टूर्सद्वारे पूर्ण केलीय आजपर्यत. छोट्या टूर्सना नाही कसं म्हणणार? मी म्हटलं, “तुम्हाला ह्या छोट्या सहलींचा खजिना उघडून देते, सर्व काही साग्रसंगित होईल आपल्या प्रत्येक सहलीसारखं”, वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स आणि त्यांना सपोर्ट करणारी ऑफिस टीम खरं तर ती सहल शंभर टक्के यशस्वी करीत असतात, मी जाते ती यशाच्या मोहोरचं शिक्कामोर्तब करायला. त्यामुळे ह्या छोट्या सहली डीजे डान्सवाल्या गाला इव्हिनिंगने मस्त होतीलच. मी फक्त येऊ शकणार नाही. आणि आमच्या वुमन्स स्पेशलवाल्या सुज्ञ महिलांनी माझी अडचण ओळखून ह्या छोट्या सहलींनाही गर्दी करायला सुरुवात केली. शेवटी मी आणि आमची सर्व यंत्रणा चोवीस तास व्हर्च्युअली तुमच्याशी जोडलेले असतोच की. सो, अशा तर्हेने आता ह्या छोट्या सहलींचं यशस्वी आयोजन करायला आम्ही सुरुवात केलीय.
‘वुमन्स डे’ येतोय आणि तो सेलिब्रेट झालाच पाहिजे नाही का? त्यासाठी आम्ही चार दिवसांची अमृतसर वाघा बॉर्डर फार्म स्टे, सहा दिवसांची अमृतसर वैष्णोदेवी फार्म स्टे आणि सहा दिवसांची थायलंड, अशा सहली आयोजित केल्या आहेत. वुमन्स डे सेलिब्रेशन असल्याने मी प्रत्येक सहलीला हजेरी लावणार आहे बरं का! तेव्हा भेटूयाच तिथे. आजच वेबसाइटवर जा. ह्या सहलींची माहिती घ्या आणि निघा रीज्युविनेट व्हायला. ‘आखिर साल में एक सेलिब्रेशन तो बनताही है।’