सध्याच्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ‘स्पीड इनोव्हेशन कल्चर’ ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या तीनही गोष्टी इंडिगो एअरलाईन्सच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. त्यावर आधारीत भाषण मनाला भिडलं. भाषण येवढंच छोटं असावं, मुद्देसूद असावं आणि खरं असावं तर ते समोरच्यांपर्यत पोहोचतं.
मागच्या आठवड्यात इंडिगो एअरलाईन्सची टॉप परफॉर्मर्स मीट होती. कुठेही प्रवासाला गेेले नव्हते, व्हेन्यू आमच्या ऑफिसपासून जवळ होता त्यामुळे नाही जायचं काही कारण नव्हतं, आणि इंडिगो ही आमची रोल मॉडेल एअरलाईन. आपली वैयक्तिक किंवा ऑर्गनायझेशनल अशी रोल मॉडेल्स असतात आणि ती एकच नाही तर अनेक असू शकतात. म्हणजे विश्वासासाठी टाटा, स्पीडसाठी रिलायन्स, रीस्क टेकिंग एबिलीटीसाठी व्हर्जिन अटलांटिक, इनोव्हेशनसाठी इंडिगो अशी. जग जवळ आलंय त्यामुळे जिथे जे चांगलं आहे ते घ्यावं ह्या मताची मी आहे. वैयक्तिक रोल मॉडेल्स ही शक्यतोवर जिवित नसलेली व्यक्ती असावी असं मी कुठेतरी वाचलं होतं कारण एखाद्या व्यक्तीला आपलं रोल मॉडेल बनवावं तर उद्या त्या व्यक्तीच्या बाबतीत वेगळंच काही ऐकू येतं किंवा निदर्शनास येतं. म्हणूनच रोल मॉडेल म्हणून शिवाजी महाराजांचं एक अढळ स्थान लाखो करोडोंच्या मनात अखंड आहे आणि त्याला शह देणारी पर्सनॅलिटी अजूनही दिसत नाही. बिझनेस लँग्वेजमध्ये ‘ब्रँड शिवाजी’ एकदम स्ट्राँग आहे, अनबिटेबल.
तर सध्याच्या युगात व्यवसाय वाढवायचा असेल, सतत आघाडीवर राहायचं असेल, प्रयत्नांमध्ये सातत्य राखायचं असेल तर आपल्यासारख्याच साम्य असलेल्या पण वेगवगेळ्या क्षेत्रातल्या व्यवसायांचा आणि त्या संस्थांचा आपण सर्वजण अभ्यास करीत असतो, आणि तो करणं व्यवसायाचा एक महत्वाचा भाग आहे. मला नेहमी वाटतं की, आपण जर बिझनेसमध्ये असू तर तो वाढलाच पाहिजे. आणि तो वाढवायचा असेल तर त्यासाठी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या बिझनेससोबत नेहमी आपण स्वत:ची तुलना केली पाहिजे. तेही एक कारण होतं इंडिगोच्या मीटिंगला मनापासून यायचं. साडेअकरा वर्षात इंडिगोने जी गगनभरारी घेतलीय, सर्व एअरलाईन्स बर्यापैकी तोट्यात असताना ही चांगल्या नफ्यात आहे ते प्रेरणादायी आहे. आमच्याकडे सतत ह्या एअरलाईन्सचा केसस्टडी अभ्यासला जातो. त्यामुळे हे सगळं करण्यात मुख्य सहभाग असलेले इंडिगोचे प्रेसिडेंट आणि होलटाईम डिरेक्टर श्री. अदित्य घोष ह्यांचं वीस मीनिटांचं भाषण ऐकणं हा हायलाइट होता. ‘आम्ही काय केलं? आम्ही काय करतोय? आणि आम्ही काय करणार आहोत?’ ह्याचा संपूर्ण फॅक्ट्स अॅन्ड फिगरसहचा अहवाल जणू त्यांनी आमच्यासमोर ठेवला. सध्याच्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ‘स्पीड इनोव्हेशन कल्चर’ ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या तीनही गोष्टी इंडिगो एअरलाईन्सच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. त्यावर आधारीत भाषण मनाला भिडलं. भाषण येवढंच छोटं असावं, मुद्देसूद असावं आणि खरं असावं तर ते समोरच्यांपर्यत पोहोचतं. कार्यक्रमानंतर श्री. घोषना भेटून त्या इन्स्पायरिंग भाषणाबद्दल धन्यवाद दिले तर म्हणाले, ‘थँक्यू, इट वॉज स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’.
जे मनापासून बोललं जातं तेच आतपर्यत पोहोचतं आणि तेच खरा आनंद देतं. ‘मनापासून किंवा फ्रॉम द हार्ट’ केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. तिला यश मिळतंच. ‘आपण जे काही करतोय ते मनापासून करुया’ अशातर्हेचं वातावरण वीणा वर्ल्डमध्ये रुजतंय किंवा ते रुजविण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करतोय. ‘स्पीड इनोव्हेशन कल्चर’ मध्ये स्पीड आणि इनोव्हेशन ह्या गोष्टी प्रगतीच्या यंत्राचं बाह्यांग आहेत तर कल्चर ही गोष्ट ऑर्गनायझेशनच्या आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगाचा भाग आहे. प्रत्येकाच्या बाबतीत टू पर्सनल न होता कल्चरची-संस्कृतीची रुजवात करायची हे सोपं काम नाही, पण अवघड कामं केल्यावर त्याचा निखळ आनंद घेण्यातल्या आनंदाला सीमा नाही. तो आनंद प्रत्येकाला मिळायला पाहिजे ह्यासाठी सर्व धडपड.
‘काय जे करतोय ते मनापासून करुया’ ह्याची सुरुवात किंवा मूळ हे त्याठिकाणी नसतं तर काही वर्षांपासून किंवा खूप पूर्वी त्याची सुरुवात झालेली असते. आणि म्हणूनच जेव्हा मुलं टूरिझममध्ये प्रवेश करतात तेव्हा पहिला प्रश्न आम्ही विचारतो तो म्हणजे, ‘तुला या क्षेत्राची मनापासून आवड असेल तर तू इथे ये’. प्रत्येक व्यवसायाप्रमाणेच इथे प्रचंड कष्ट आणि मेहनत आहे आणि ते करण्याची, त्यातून आनंद मिळण्याची प्रक्रिया तेव्हाच होते जेव्हा आपल्याला मनापासून ती गोष्ट करायला आवडते. म्हणतात नं, ज्याला आवडीचं काम मिळालं तो सुदैवी, पण मिळालेल्या कामात रुची निर्माण करून त्यात मनापासून प्रयत्न करणारा सुदैव खेचून आणतो म्हणून तो जास्त यशस्वी होतो आणि आनंदीही. आजच आमच्याकडे विद्याविहार कॉर्पोरेट ऑफिसला असिस्टंट टूर मॅनेजर्सचे इंटरव्ह्युज सुरू आहेत. दरवर्षीच असतात, आणि सिलेक्ट झालेल्यांमधली साधारणपणे साठ टक्के मुलं पुढे कंटिन्यू करतात. ग्लॅमर बघून किंवा जग फिरायचं स्वप्न बघून मुलं येतात पण कुणाचातरी राँग नंबर हा हमखास लागतो. कुणाला इतके कष्ट नको असतात तर कुणाला प्रवास झेपत नाही. आणि ह्या साठ किंवा पन्नास टक्के वारीला ‘आय अॅम हॅप्पी’, दोन्ही दृष्टीने. ही तरूण मुलं जेवढ्या लवकर समजतील की हे क्षेत्र माझं आहे किंवा नाही तेवढं चांगलं. आयुष्यात करियरमध्ये ‘काय करायचं’ ह्या चाचपडण्यातून एका क्षेत्राचा यस किंवा नो हा निर्णय होऊन जातो, वेळ वाचतो, वर्ष वाचतात. जसा त्याचा किंवा तिचा वेळ वाचतो तसाच तो ऑर्गनायझेशनचाही. जनरली मुलांचा आणि ऑर्गनायझेशनचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून आम्ही ‘रीक्रुट-रीव्ह्यू-रीअॅशुअर-रीलोकेट-रीव्ह्यू-रीलीज’ ही प्रणाली वापरतो जेणेकरून त्या मुला-मुलींची, ‘क्षमता-आवड-रस-ज्ञान’ ह्याची सांगड घालून चांगल्यात चांगलं काम ते करतील. त्यापासून स्वत:ला समाधान मिळवतील आणि अगदी निखळ आनंद त्यांच्या पदरी पडेल. वीणा वर्ल्ड असं आनंदी माणसांचं कुटुंब बनतंय आणि बनवायचंय कारण वीणा वर्ल्डमधला प्रत्येक सर्व्हीस प्रोव्हाइडर म्हणजे वीणा वर्ल्ड टीम जर आनंदी असेल तर तो पर्यटकांना जास्त आनंद देऊ शकतो. विमानात ‘पहिल्यांदा स्वत: ऑक्सिजन मास्क लावा आणि नंतर बाजूच्याला’ तसाच हा प्रकार वाटतो मला. मी जर स्वत: आनंदी असेन तरच मी दुसर्याला आनंद देऊ शकतो, आणि स्वत:ला मनापासून आनंद मिळविण्यासाठी मनापासून कष्ट घ्यावे लागतात, आणि मनापासून कष्ट करण्यासाठी मनापासून आवडणार्या कामाचा शोध घ्यायला पाहिजे किंवा ‘पदरी पडले पवित्र झाले’ प्रमाणे मिळालेल्या कामात मनापासून आनंद मिळण्यासाठी झोकून दिलं पाहिजे.
मनापासून काम करणं, मनापासून बोलणं, मनापासून दुसर्याची प्रशंसा करणं, मनापासून दुसर्याविषयी कणव वाटणं, मनापासून हसणं आणि येणार्या प्रत्येक दिवसाला, क्षणाला मनापासून स्विकारणं हे सगळं आपल्यात मनापासून असलं पाहिजे. तरंच आपण प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद मिळवू शकू.
वीणा वर्ल्डची वुमन्स स्पेशल असा निखळ आनंद मिळवून देते. कारण प्रत्येक महिलेला पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या भारताची आणि जगाची ओळख करून द्यावी, तिने स्वत:साठी वेळ काढावा, स्वत:वर प्रेम करावं… ह्या सगळ्यातून वुमन्स स्पेशलची संकल्पना आली आणि प्रत्यक्षात उतरली. आज अकरा वर्षानंतरही तिची लोकप्रियता तसूभरही ढासळली नाही किंवा ती वाढतेच आहे ह्याला कारण, हा एक प्रामाणिक स्तुत्य असा महिलांना आनंद देणारा उपक्रम आहे आणि जो पुर्णत्वाला जेव्हा जेव्हा पोहोचतो तेव्हा तेव्हा त्यातून निखळ आनंद आम्हालाही मिळतो. सीनियर स्पेशल सहलींची गोष्ट वेगळी नाही. आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजे एक सुवर्णयुग आणि ते गोल्डन डेज सेलिब्रेट करण्याचं अंशत: काम आम्ही करतो सर्व सीनियर सीटिझन्सना देशाची-जगाची भ्रमंती करायला लावून. तिथेही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंद फुलवताना आम्हालाही आनंदाचा खजिना मिळतो. वीणा वर्ल्ड टीम सतत उत्साही असते त्याचं कारणही तेच असावं कारण मनापासून-कळकळीने केलेल्या कामाची पावती मिळत राहते.
येणार्या जगाला, परिस्थितीला, स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी अशा निखळ आनंदी प्रवृत्तीला निर्माण करण्याची जबाबदारी जर प्रत्येक घराने, प्रत्येक ऑर्गनायझेशनने, प्रत्येक लीडरने घेतली तर संबंधितांचं आयुष्य सुसह्य बनून जाईल आणि त्याने निश्चितपणे सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी या नात्याने आपलं योगदान आपल्याला समाजाप्रती आणि देशाप्रती देता येईल. आपली रिस्पॉन्सिबिलीटी आहे ती.