जंगल जंगल बात चली है…

0 comments
Reading Time: 6 minutes

भारत असा देश आहे की जिथे एकाच भेटीत तुम्ही महासागरातील कोरल्सची मनमोहक दुनिया, हिमालयातील हाय अल्टीट्यूडवरील प्राणी आणि वाळवंटातले ग्रेट इंडियन बस्टर्डसारखे पक्षीही पाहू शकता. या वैशिष्ट्यांमुळेच भारताला भेट देणार्‍या पर्यटकांमध्ये केवळ वन्यप्राणी दर्शनासाठी येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण लक्षणिय असते. भारतीय पर्यटकांची पावलेही डिजिटल क्रांतीमुळे ‘फोटोग्राफी’ करण्यासाठी भारतातल्या जंगलांकडे वारंवार वळू लागलीयत. पर्यटनातल्या नव्या संधी हेरणार्‍या माझ्या रडारवर याची नोंद झाल्याशिवाय कशी राहील?  त्यामुळेच अनेक नॅशनल पार्क्सना समाविष्ट करणार्‍या सहलीचा नजराणाच वीणा वर्ल्डने सादर केलाय पर्यटकांसाठी.

आपल्या भारतीय जंगलांची त्यातील प्राण्यांची बाहेरच्या जगाला विशेषतः पाश्‍चिमात्य जगाला ओळख झाली ती रुडयार्ड किपलिंगच्या ’जंगलबूक’ या रसाळ कथा संग्रहामुळे. त्यातूनच लांडग्यांनी वाढवलेला मोगली, ‘बालू-अस्वल‘, ‘बगिरा-ब्लॅक पँथर‘, ‘का-अजगर‘ अशा अजरामर व्यक्तिरेखा निर्माण झाल्या. आज मध्यप्रदेशातल्या जंगलाना भेट देताना आपले डोळे नकळत बालू आणि बगिराला शोधत असतात. मध्य प्रदेशमधील कान्हा नॅशनल पार्क हा सुमारे दोन हजार चौ.कि.मी. पसरलेला आहे. हिरव्यागार साल वृक्षाची दाट बने, त्यातून वळत जाणारे मातीचे रस्ते, मध्येच समोर उलगडणारी गवताची सळसळणारी कुरणे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि वर्णन करता न येणारा रानाचा गंध… कान्हा मधून एक पार्क सफारी जरी केली तरी हे सगळं आपल्या मनावर कायमचं कोरलं जातं. कान्हाची खासियत म्हणजे इथल्या जंगलात ओपन जिप्सीमधून मारलेला फेरफटका आपल्याला कधी निराश करत नाही. चितळ, सांबर, वानर, कोल्हा, बारासिंगा हे प्राणी हमखास बघायला मिळतात. आता व्याघ्रदर्शन ही जरा खास गोष्ट आहे. आपल्याच मस्तीत जंगलात मुक्तपणे राहाणार्‍या वाघोबांची स्वारी कधी समोर येईल ते अचूकपणे सांगण कठीण, पण कान्हामध्ये वाघांची संख्या भरपूर असल्याने सहसा कान्हा तुम्हाला निराश करत नाही. मध्यप्रदेशातील वनवैभवाचा आनंद घेता यावा म्हणून वीणा वर्ल्डतर्फे मध्यप्रदेश ज्वेल्स ही आठ दिवसांची सहल आयोजित केली जाते. ह्या सहलीत कान्हाच्या जंगलाबरोबरच नर्मदा नदीच्या प्रवाहात निर्माण झालेल्या धुआंधार ह्या धबधब्याचाही समावेश आहे. भेडाघाट येथे नौकाविहार करुन तिथल्या संगमरवराच्या डोंगरात तयार झालेले नैसर्गिक आकार आपण पाहातो तर खजूराहोमध्ये कंदारिया महादेव मंदिर,जैन मंदिर पाहण्यासोबतच दैदिप्यमान साउंड आणि लाईट शो एन्जॉय करतो. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून प्रचलित असणार्‍या सांची आणि भोपाळमध्ये अनेक प्राचिन मंदिरं, केव्हज, बौद्ध स्तूपं, मठ, कोरीव कलाकुसर केलेले स्तंभ पाहतो.

भारतीय जंगलातील थरारक सत्यकथा बहारदारपणे लिहून, आपले जंगलानुभव जगासमोर मांडले ते जिम कॉर्बेट ह्या जातीवंत निसर्गपुत्राने. सुरवातीला शिकारीचे वेड असलेला जिम आपोआप निसर्ग संरक्षक बनला. उत्तर भारतातल्या जंगलांमध्ये नरभक्षक बनलेले आणि तिथल्या गरीब शेतकर्‍यांचे कर्दनकाळ ठरलेले अनेक हिंस्र वाघ आणि बिबटे जिम कॉर्बेटने अक्षरशः जीवावर उदार होऊन मारले. ह्याच निसर्गपुत्राचे नाव उत्तराखंडमधील नॅशनल पार्कला देण्यात आले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी, रामगंगा नदीला कुशीत घेऊन हे तराई पध्दतीचं जंगल पहुडलेलं आहे. इथे भारतीय हत्तींचे कळप अनेकदा पाहायला मिळतात. त्याबरोबरच घेरियल (सुसर), हिमालयन स्लॉथ बेअर, हॉग डिअर, ओटर्स असे अनोखे प्राणीही ह्या जंगलात आढळतात. तसेच इथे पाचशेपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आहेत, ज्यांमध्ये खलीज फिजंट, लॅमर गिअर, हिमालयन वुडपेकर असे फक्त हिमालयातच दिसणारे पक्षीही आहेत. कॉर्बेट पार्क मधल्या हिमालयन जंगलाचा थरारक अनुभव तुम्हाला वीणा वर्ल्डच्या नैनिताल कॉर्बेट पार्क, किंग्डम ऑफ ड्रीम्स या सहा दिवसाच्या आणि नैनिताल मसूरी हरिद्वार कॉर्बेट किंग्डम ऑफ ड्रीम्स या नऊ दिवसाच्या सहलीतही घेता येतो.

भारतीय वन्यजीवनाचे वैशिष्ट्य हेच की हिमालयातल्या दाट जंगलांपासून ते राजस्थानमधल्या रखरखीत वाळवंटापर्यंत भारताच्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही वाइल्ड लाइफचा अनुभव घेऊ शकता. आता तसं बघितलं तर वाघ हा मूळात थंड हवामानाच्या प्रदेशातला प्राणी. आपल्या भारतात वाघ अवतरले ते थेट सायबेरियातून, आता कधी काळी शेकडो वर्षांपूर्वी बर्फाळ प्रदेशात राहाणार्‍या ह्या प्राण्याने स्वतःला इतके अ‍ॅडजस्ट करुन घेतलं आहे की राजस्थानच्या गरमा गरम हवेतही तो राहू लागला, म्हणून तर जयपूरजवळचे रणथंबोर हे पट्टेरी वाघांचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. अरवली आणि विंध्य पर्वतारांगांमध्ये पसरलेल्या रणथंबोर पार्कचा सगळा भाग हा ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट आणि गवताळ कुरणे यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे इथे वन्यप्राण्यांचे दर्शन तसे सहज होऊ शकते. पदम, मिलक आणि राजबाग असे तीन मोठे तलाव इथे आहेत. ह्या तलावांमध्ये मोठमोठ्या मगरी आहेत. वाघ हा तसा एकटा राहाणारा प्राणी आहे, सिंहाप्रमाणे तो कुटुंब कबिला सांभाळत नाही, पण रणथंबोरच्या जंगलातच पहिल्यांदा ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात लक्ष्मी टायग्रेसची फॅमिली एकत्र राहाताना पाहायला मिळाली होती. या जंगलात दहाव्या शतकात उभारलेला बुलंद किल्ला आहे. पट्टेरी वाघांच्याबरोबर रणथंबोरमध्ये बिबळ्या, अस्वल, तरस, लंगूर, सांबर, चितळ, निलगाय, रानडुक्कर, घोरपड, मुंगुस आणि मगरी असे वन्यजीव आहेत. रणथंबोरच्या राजेशाही वन्यजीवनाचे जवळून दर्शन घडते ते वीणा वर्ल्डच्या ’राजस्थान मेवाड’ ह्या आठ दिवसांच्या सहलीत. ह्या सहलीत आपण माऊंट अबू, उदयपूर, जयपूर, अजमेर, पुष्कर या शहरांना भेट देण्यासोबतच एक रात्र रणथंबोरला थांबतो तिथल्या नॅशनल पार्कमधली सफारी अनुभवण्यासाठी.

सगळ्या भारतात सर्वात वेगळं वन्यजीवन पाहायला मिळतं ते वीणा वर्ल्डच्या नॉर्थ ईस्टच्या सेव्हन सिस्टर्स सहलीत. जगातल्या एकूण वन हॉर्न्ड र्‍हायनोजपैकी एक तृतियांश र्‍हायनोज काझिरंगामध्ये आढळतात. काझिरंगासोबत मणिपूर राज्यातील केबुल लामजो ह्या अनोख्या नॅशनल पार्कचाही समावेश आहे. हा जगातला एकमेव फ्लोटींग म्हणजे तरंगता नॅशनल पार्क आहे, कारण मणिपूरमधल्या लोकटक सरोवरात हा नॅशनल पार्क आहे. ह्या सरोवरातील मेलेल्या आणि डीकंपोज होऊ लागलेल्या पाणवनस्पतींच्या बेटांनी हा नॅशनल पार्क बनलेला आहे. ह्या ठिकाणी ब्रो अ‍ॅन्टलर्ड डिअर ही हरणाची धोक्यात आलेली जात पाहायला मिळते. ’संगाई’ म्हणूनही हे हरण ओळखले जाते. ह्याच सहलीत त्रिपुरा राज्यातील ’सेपाइझाला’ या अभयारण्याचाही समावेश आहे. या अभयारण्यात जसे जंगलात मुक्तपणे फिरणारे प्राणी, पक्षी आहेत त्याचप्रमाणे एनक्लोजरमध्ये ठेवलेले ’क्लाउडेड लेपर्डस’ आहेत. नॉर्थ ईस्ट एक्सप्लोरर ह्या वीस दिवसांच्या सहलीत भारताच्या इशान्येतील ह्या जंगलांची झलक अनुभवता येते.

भारतातल्या जंगलबूकची पानं चाळताना गुजराथमधल्या सासनगीर नॅशनल पार्कला कसं विसरता येईल? सगळ्या जगात फक्त इथेच एशियाटिक लायन्स पाहायला मिळतात. सिंह हा एकदम कुटुंब वत्सल प्राणी, म्हणजे एकावेळी किमान दोन नर, चार-पाच माद्या आणि असली तर अर्धा डझन बच्चे कंपनी पाहायला मिळणारच. वीणा वर्ल्डच्या गुजराथ- एक्सप्लोरर ह्या टूरमध्ये आपण सासनगिरच्या देवलियातील इंटरप्रिटेशन झोनला भेट देतो आणि भारतीय सिंहाचे दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो.

तर मंडळी भारतातल्या जंगलबूकचं हे निसर्गाचं पुस्तक आहेच असं विशाल, अफाट आणि सगळ्या वयोगटाच्या लोकांना गुंतवून ठेवणारं. ह्या पुस्तकाचा आनंद आता तुम्ही वीणा वर्ल्डसोबत प्रत्यक्ष या जंगलांना भेट देऊन जरुर घेऊ शकता, त्यासाठीच आजच वीणा वर्ल्ड वेब साईटला भेट द्या.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*