We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

छोट्या छोट्या गोष्टी

10 mins. read
Veena Patil
Veena Patil
10 Mins Read
April 27, 2026
April 27, 2026

Quick Summary

हॉटेलमध्ये शॅम्पू कंडिशनर बॉडी वॉशच्या छोट्या बाटल्यांमुळे त्रास होऊ शकतो, म्हणून चष्मा सोबत ठेवा.

सुटकेसचा भार कमी करण्यासाठी तुमचा स्वतःचा शॅम्पू कंडिशनर टाळा आणि केबिन बॅगमध्येच प्रवास करा.

बाथरूममध्ये बाटल्यांचा क्रम आधीच अभ्यास करा, मग आंघोळीचा अनुभव पटकन आणि त्रासाशिवाय होईल.

हॉटेलच्या डिझाइनमध्ये मोठ्या अक्षरांचा विचार दिसला तर तो गेस्ट केअरचा पुरावा मानून आनंद घ्या.

घरात शूज आणि चप्पल नेहमी नीट जागी ठेवा, कारण छोट्या सवयींमुळे शांतता आणि नीटनेटकेपणा वाढतो.

सकाळी बेड व्यवस्थित लावण्याची सवय शिस्त आणि आत्मविश्वास वाढवते, म्हणून ती तुमच्या रुटीनमध्ये आणा.

Published in the Saturday Loksatta Chaturang on 25 April 2026

...तिने तिचे शूज नेहमीच्या जागी ठेवले, अगदी सरळ रेषेत आणि त्याच्या बाजूला तेवढ्याच नीटपणे ठेवलेल्या घरातल्या स्लीपर्स घालून ती आत गेली...

 

शॅम्पू कंडिशनर बॉडी वॉश ह्या तीन नावांनी किंवा वस्तूंनी एवढं इरिटेट केलंय नं की काही विचारू नका. आणि मला माहितीय माझ्यासारखाच अनेकांचा हा अनुभव असणार आहे. जगातल्या असंख्य हॉटेल्समध्ये मी आत्तापर्यंत वास्तव्य केलंय, अगदी टू स्टार पासून सेव्हन स्टार्स पर्यंत. पण जवळजवळ नव्वद टक्के हॉटेल्समध्ये हे इरिटेशन मी अनुभवलंय. पूर्वी प्रवासात मी माझा शॅम्पू माझं कंडिशनर असं सगळं साग्रसंगीत घेऊन जायचे. पण जसजशी समज यायला लागली, तशी मी सुटकेसची साथ सोडली आणि फक्त एका केबिन बॅगवर जगाचा प्रवास केला. ‌‘लेस लगेज मोअर कम्फर्टस्‌‍.‌’ त्यामुळे बॅकपॅकसारखं सोबतचं सामान कमी करावंच लागलं. शॅम्पू कंडिशनर्सनाही बायबाय म्हटलं. हॉटेल्समध्ये जे असेल त्यावरच भागवायचा निर्णय घेतला आणि गेली अनेक वर्षं तो पाळला. ह्या निर्णयाची किंमत मात्र मला इरिटेशनच्या स्वरूपात मोजावी लागली. आपण हॉटेलमध्ये ज्यावेळी आंघोळीला बाथरूमध्ये जातो तेव्हा तिथे जनरली तीन बाटल्या ठेवलेल्या असतात किंवा हल्ली तर बाथरूमच्या वॉललाच फिक्स केलेल्या असतात. शॅम्पू कंडिशनर बॉडी वॉश/जेल अशा त्या बाटल्या असतात. त्यावरची अक्षरं एवढी छोटी असतात की डोळे कितीही मोठे केले, किलकिले केले तरी ती कळत नाहीत. त्यात मी काय? जगातल्या तीन पैकी दोन माणसांना चष्मा असतो. म्हणजे चष्म्याशिवाय ही अक्षरं दिसणं केवळ दुरापास्त आणि बाथरूममध्ये चष्मा कोण घालून जाणार? त्या बाटल्यांशी जमवून घेताना डिझायनरला माझ्याकडून सभ्य लाखोली वाहिली जायची. हळूहळू राग राग करण्याऐवजी मी सुधारले. एन्ट्री केल्यावर चष्मा घालून बाथरूममध्ये जाऊन माझ्या उजव्या हाताला काय, डाव्याला काय आणि मध्ये कोणती बाटली आहे ह्याचा चक्क अभ्यास करायचे. मग माझी लाखोली कमी व्हायला लागली. पण तरीही हॉटेलमधली बाथरूम्स ही काय अभ्यास करून जायची जागा आहे का? अर्थात कधीतरी एखाद्या हॉटेलमध्ये भल्यामोठ्या अक्षरात ही नावं लिहिलेल्या बाटल्या दिसल्या आणि चष्म्याशिवाय ती नावं वाचता आली की माझ्याकडून त्या हॉटेलच्या डिझाईन एजन्सीला धन्यवादही दिले जातात. कुणीतरी त्या हॉटेल गेस्टचा विचार करतंय हे बघून बरं वाटतं. बघायला गेलं तर ही छोटी गोष्ट, पण त्यामुळे ती हॉटेल्स किती लेव्हलपर्यंत त्यांच्या गेस्ट्सचा विचार करताहेत हे कळतं. ‌‘शॅम्पू कंडिशनर बॉडी वॉश‌’ हा ॲक्चुअली माझ्यासाठी एक केस स्टडी ठरलाय. टीम मीटिंग्जमध्ये अशा गोष्टींची उदाहरणं, आमच्याकडच्या रिलेटेड गोष्टींचं महत्त्व पटवून द्यायला खूप उपयोगी पडतात. आणि मी अनेकदा अनुभवलंय की ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा फरक निर्माण करू शकतात.

आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टींना सामोरं जातो, ज्या क्षुल्लक वाटतात पण त्यामागे विचार असेल तर त्या अनुभवाला एक वेगळीच उंची मिळते. आणि विचार नसेल तर त्या त्रासदायक बनतात. एखादं डिझाईन, दिली जाणारी सर्व्हिस, आपलं वागणं हे सगळं काही शेवटी माणसांसाठीच तर असतं, पण अनेकदा आपण त्या केंद्रस्थानी असलेल्या माणसालाच विसरतो. जेव्हा मी या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू लागले तेव्हा इतक्या गोष्टी डोक्यात फेर धरून नाचू लागल्या की काही विचारू नका.

एक दिवस आम्ही जपानी चित्रपट बघत होतो. त्यात ती जपानी मुलगी घरात आली. तिने तिचे शूज नेहमीच्या जागी ठेवले, अगदी सरळ रेषेत आणि त्याच्या बाजूला तेवढ्याच नीटपणे ठेवलेल्या घरातल्या स्लीपर्स घालून ती आत गेली. हा फक्त दोन सेकंदांचा सीन होता, पण त्यात किती शिकवण होती. आपण बऱ्याचदा शूज काढतो, पण ते कसे ठेवतो याकडे फारसं लक्ष देत नाही. त्या मुलीच्या त्या छोट्याशा कृतीत एक शांतता होती. एक नीटनेटकेपणा होता. मी आणि सुधीरने एकमेकांकडे पाहून म्हटलं, ‌‘किती सुंदर सवय आहे ही‌’ आणि त्या दिवसापासून आम्हीही ती सवय आत्मसात केली. घरात बाहेरच्या वा आतल्या चप्पल अस्ताव्यस्त राहणार नाहीत याची काळजी घ्यायला लागलो. सवय छोटी, पण नीटनेटकेपणाचा मोठा परिणाम घडवून गेली. आजकाल मॅनेजमेंट स्कूलमध्ये एक गोष्ट अगदी हमखास शिकवली जाते ती म्हणजे ‌‘सकाळी उठल्यावर घरात कितीही माणसं कामाला असली, तरी आपला बेड आपण व्यवस्थित लावायचा.‌’ ‌‘यूएस नेव्ही सील‌’ चे ॲडमिरल विल्यम मॅकरेवन यांनी त्यांच्या प्रसिद्ध भाषणात सांगितलं होतं, ‌‘तुम्हाला जर जग बदलायचं असेल तर सकाळी उठल्यावर तुमचा बेड व्यवस्थित लावा.‌’ यु ट्यूबवर हे भाषण जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पटकन उमजलं नाही, पण जरा खोलात जाऊन विचार केला तेव्हा कळलं की ही सवय फक्त बेड लावण्याची नाहीये, तर ती शिस्त, सातत्य, समाधान, आत्मविश्वास आणि ॲकम्प्लिशमेंटची सवय आहे. आपण स्वतः आपला बेड तयार केल्यावर खरंच एक वेगळीच अनुभूती मिळते. त्या भाषणाने आमच्यावर निश्चित परिणाम केला आणि आम्ही आता नियमितपणे ती गोष्ट करतो आणि सुकून मिळवतो. खरंच सांगते तो बेड व्यवस्थित केल्यावर आज आपण काहीतरी छान करून दिवसाची सुरुवात करतोय या विचाराने किंवा भावनेने दिवसाची दिशाच बदलते. मीटिंगमध्ये बसलेलो असताना फोन सायलेंट ठेवणं किंवा उलटा ठेवणं किंवा ॲक्च्युअली फोन घेऊनच न येणं, हा म्हटलं तर एटिकेट आहे, पण त्यातून समोरच्याला आपण किती महत्त्व देतो हे दिसतं. मीटिंगमध्ये एखाद्याशी वा टीमशी वा पाहुण्यांशी बोलताना मध्येच फोन बघणं म्हणजे आपण फिजिकली तिथे असलो तरी मेंटली नाही आहोत हे आपल्या कृतीने आपण समोरच्याला दर्शवितो आणि तो समोरच्याचा अपमान असतो. फिजिकली आणि मेंटली आपण तिथे असणं, समोरच्याचा आदर करणं, बिअिंग फोकस्ड इन प्रेसेंट मोमेंट ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी गोष्ट झाली आहे.

रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालविताना आपण किंवा आपला ड्राईव्हर लेन डिसिप्लिन पाळतो का? रेड सिग्नलला आपण थांबतो का? यावर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणतात नं, ‌‘इन इंडिया, एव्हरीबडी इज इन अ हरी, बट नो बडी इज ऑन टाईम.‌’ अनेक देशांमध्ये लेन डिसिप्लिन, झेब्रा क्रॉसिंग, रेड सिग्नलला थांबणं या गोष्टी जीवनशैलीचा भाग आहेत. अंगात ते लहानपणापासून मुरल्यामुळे तिथे या शिस्तीच्या गोष्टी करताना त्यांना प्रयास पडत नाहीत. शिस्तप्रियतेमुळे त्यांच्या ट्रॅफिकमध्येही एक फ्लो असतो. आपल्याकडे ट्रॅफिकमध्ये प्रत्येकजण स्वतःचा मार्ग काढतो आणि मग गोंधळ होतो. समाज घडतो किंवा बिघडतो तो अशाच छोट्या गोष्टींनी.

आपण एखाद्या कॅफेमध्ये बसतो, उठताना खुर्ची नीट जागच्या जागी लावतो का? ती जागा फक्त आपली नाही तर ती शेअर्ड स्पेस आहे. त्याचा आदर करणं ही छोटी सवय आहे. खोलीतून बाहेर पडताना किंवा कार्यालयात मीटिंगरूममधून बाहेर पडताना आपण लाईट फॅन एसी बंद करतो का? पूर्वी आपल्याकडे ‌‘सेव्ह एनर्जी‌’ यावर एक कॅम्पेन होतं. बहुतेक सरकारचंच होतं, पण ते आजही लक्षात आहे. एक तरुण ऑफिसला जायला निघतो. गाडीत बसतो, गाडी स्टार्ट करतो, थोडासा पुढे जातो, आणि अचानक एकदम दचकल्यासारखा किंवा काहीतरी महत्त्वाचं आठवल्यासारखा गाडीला ब्रेक लावतो. उतरतो, घरात येतो आणि फॅन चालू असतो तो बंद करतो. आणि हसत हसत एक विजयी भाव चेहऱ्यावर घेऊन गाडीत बसतो आणि ऑफिसला जातो. ही एक साधी छोटी गोष्ट, तो जागरूक, जबाबदार, सजग नागरिक असल्याचं दाखवून देते. आणि निसर्गनिर्मित वा मानवनिर्मित जे रिसोर्सेस आहेत, त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे हे ठळकपणे आणि ठणकावून सांगते.

‌‘थँक यू‌’आणि ‌‘सॉरी‌’ हे दोन छोटे शब्द, पण नात्यांमध्ये मोठा फरक निर्माण करतात. आपण अनेकदा मनात आभार मानतो... पण बोलून दाखवत नाही. आणि कधी कधी एक सॉरी म्हणायलाही आपण कचरतो. आपला इगो आड येतो. पण हे छोटे शब्द नात्यांना जोडून ठेवतात. आमच्याकडे सुधीरची एक सवय सर्वांना बरंच काही शिकवून जाते ती म्हणजे गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हिनिंग अगदी मोठ्या आवाजात म्हणणं आणि ऑफिसमधला माहोल एकदम उत्साही बनवून टाकणं. सुधीरला आम्ही ‌‘जगन्मित्र‌’ म्हणतो. त्याची ती वेलकलिंग पर्सनॅलिटी बनण्याचं मूळ त्या गुड मॉर्निंगमध्ये असावं असं मला अगदी ठामपणे वाटतं.

छोट्या गोष्टींची ताकद नेमकी काय असते हे समजून घ्यायचं असेल, तर टोयोटापासून आपल्या रोजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास बघायला हवा. टोयोटाबद्दल एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये बिकट परिस्थिती होती. रिसोर्सेस कमी, पैसा कमी, पण काम करायची इच्छा प्रचंड. त्या वेळी टोयोटाने एक वेगळीच वाट निवडली. ‌‘मोठा बदल करायचा नाही, रोज छोटा बदल करायचा.‌’

फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगितलं गेलं, ‌‘तुम्हाला काही छोटंसं सुधारता येत असेल, तर सांगा.‌’ हे ऐकायला खूप साधं वाटतं पण इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली.

टोयोटाने ‌‘कायझेन‌’ म्हटलं ते काही मोठं तत्त्वज्ञान नव्हतं. फॅक्टरीमध्ये उभ्या असलेल्या एका कामगाराने “हा पार्ट थोडा वर ठेवला तर मला वाकावं लागणार नाही” असं सांगितलं, आणि त्या छोट्या बदलाने हजारो सेकंद वाचायला लागले. कुणी मशीन बदललं नाही, कुणी करोडो खर्च केले नाहीत, फक्त लक्ष दिलं, बदल केला, आणि तो सातत्याने केला.  टोयोटामध्ये अजून एक खूप वेगळी गोष्ट होती, अँडोन कॉर्ड. कोणत्याही वर्करला प्रोडक्शन लाईन थांबविण्याचा अधिकार होता. जर त्याला काही डिफेक्ट दिसला किंवा काही बरोबर नाही वाटलं तर तो दोरी ओढून संपूर्ण लाईन थांबवू शकत होता. आपल्याला वाटेल, ‌‘अरे, लाईन थांबवणं म्हणजे नुकसान!‌’ पण टोयोटाचा विचार वेगळा होता. ‌‘चूक पुढे जाऊ देण्यापेक्षा ती तिथेच थांबवणं स्वस्त.‌’ छोटा डिफेक्ट लगेच पकडला तर भविष्यातलं मोठं नुकसान टळतं. टोयोटाने ‌‘5S सिस्टीम‌’ आणली. Sort, Set in order, Shine, Standardize, Sustain. सोप्या भाषेत सांगायचं तर जे आवश्यक आहे तेच ठेवा, सगळं नीट ठेवा, स्वच्छ ठेवा, सगळ्यांसाठी एकच पद्धत ठेवा. आपल्याला हे ऐकून वाटतं, ‌‘अरे हे तर घरातही सांगतात!‌’ पण फरक एवढाच की त्यांनी ते रोज पाळलं. टोयोटाचं काम पाहून जग थक्क झालं. अमेरिकन कंपनीज्‌‍नी अभ्यास केला की ‌‘हे लोक वेगळं काय करतायत?‌’ फोर्ड, जनरल मोटर्स सारख्या कंपन्यांनी टोयोटाच्या पद्धती शिकायला सुरुवात केली. ‌‘लीन  मॅन्युफॅक्चरिंग‌’ हा शब्द तिथूनच आला. मोटोरोला आणि जी ई ने सिक्स सिगमा मध्ये कायझेन एलिमेंट्स घेतले. आज आयटी कंपन्या, हॉस्पिटल्स, एअरलाईन्स सगळीकडे ‌‘सतत सुधारणा‌’ ही संकल्पना वापरली जाते. भारतामध्येही अनेक कंपन्यांनी हे घेतलं. मारूती सुझुकीनी टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम ॲडॉप्ट केली. टाटा मोटर्सने ‌‘सतत सुधारणा‌’ हे त्यांचं कल्चर घेतलं. इन्फोसिसने प्रोसेसेस रिफाईन करणं आणि छोट्या सुधारणा घेतल्या.पण मजेशीर गोष्ट म्हणजे या सगळ्याची सुरुवात कुठे झाली? तर एका वर्करच्या छोट्या निरीक्षणातून. टोयोटाने जगाला एक मोठा धडा दिला की मोठं होण्यासाठी मोठे बदल करावे लागत नाहीत, छोट्या गोष्टी सातत्याने नीट कराव्या लागतात.

खरं सांगायचं तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जसं की चप्पल सरळ करणं, लाईट बंद करणं, फोन बाजूला ठेवणं, एखाद्याला हसून भेटणं किंवा एखाद्याला मनापासून ‌‘धन्यवाद‌’ म्हणणं या सगळ्या गोष्टींचं कुठेही मोठं कौतुक होत नाही. त्यासाठी ॲवॉर्डस्‌‍ मिळत नाहीत, पण या सगळ्या गोष्टी मिळून आपला स्वभाव, आपली पर्सनॅलिटी आणि आपलं आयुष्य घडवतात. मोठ्या गोष्टींचा आपण सगळेच विचार करतो, पण आयुष्य खरं तर या छोट्या गोष्टींच्या पायावर उभं असतं. जाणीव, काळजी आणि थोडासा जिव्हाळा एवढंच पुरेसं असतं. बाकी सगळं आपोआप घडत जातं. म्हणून प्रश्न हा नाही की आपण मोठं काय करतो, प्रश्न इतकाच आहे की आपण छोट्या गोष्टी किती मनापासून करतो? कारण आयुष्य समृद्ध करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, छोट्या गोष्टी मनापासून केल्या, की आयुष्य आपोआप अर्थपूर्ण होतं.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
10 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
10 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
10 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!