Published in the Saturday Lokasatta on 19 July 2025
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ती कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं होतं. दोन्ही पक्ष जेव्हा आपापल्या मतांवर ठाम असतात तेव्हा त्यांना तिसराच मार्ग दाखवणं गरजेचं असतं...
‘टू बी ऑर नॉट टू बी?’ अनादी कालापासून अनंत कालापर्यंत हा प्रश्न प्रत्येकासमोर कधी ना कधी उभा ठाकतोच. त्यात अडकून न पडता चर्चा संवाद परीसंवाद आणि कधी विसंवाद होऊन पण तो प्रश्न मार्गी लावणं फार महत्वाचं असतं. कधी सर्वमताने प्रश्न सुटतील तर कधी काही मतं अनुकूल नसतील पण गोष्टी पुढे जाण्यासाठी ‘अग्री टू डिस्अग्री’ तत्वावर हिरवा झेंडा दाखवून ‘गो अहेड’ करता आलं पाहिजे. अन्यथा निर्णय होत नाहीत, गोष्टी पडून राहतात, अकम्प्लिशमेंटचा आनंद मिळत नाही, मनावरचं प्रेशन वाढत जातं आणि शरीरावर त्याचा परिणाम होत राहतो आपल्या नकळत. पॅन्डेमिकनंतर नाही म्हटलं तरी थोड्याशा हळव्या झालेल्या आपल्या मनःस्वास्थाला आणि नाजूक झालेल्या शरिरस्वास्थ्याला आणखी ताण कसा देता येणार नाही ह्याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे, कुटुंबात वा कार्यालयात. आणि इथेच आपला सर्वांचा कस लागतो. तरीही आपल्याला ते जमलं पाहिजे, जमवता आलं पाहिजे. आमच्याकडे ह्याला ` लेट्स कम ऑन दे सेम पेज’ असं म्हटलं जातं. एखादा प्रश्न इमेल वर किंवा व्हाट्सॲपवर `बॅक ॲन्ड फोर्थ’ व्हायला लागला की समजायचं आता इथे ऑनलाइन किंवा ऑफलाइन एकत्र यायची, चर्चा करायची आणि सर्वानुमते तो प्रश्न सोडवायची गरज आहे. आणि ज्या ज्या वेळी असं केलंय तेव्हा तो प्रश्न मार्गी लागल्यावर जो काही आनंद होतो नं की विचारू नका. त्या बॅक ॲन्ड फोर्थ कम्युनिकेशनमध्ये नाही म्हटलं तरी वेळ वाया गेलेला असतोच पण मनःस्वास्थ्यही बिघडायला लागलेलं असतं. आमच्याकडे तर ऑफिसमध्ये महिलांची संख्या जास्त आणि टूरवर टूर मॅनजर्स म्हणून मेल डॉमिनेशन. दोन्ही मनःस्वास्थ्य उत्तम असणं हे हेल्दी ऑर्गनायझेशनचं लक्षण आहे आणि त्यासाठी फाऊंडर्स, जनरल मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर्स, मॅनजर्स आदि सर्वांनी मिळून सतत जागरूक राहिलं पाहिजे. मागच्या महिन्यात असंच एका नव्हे दोन प्रश्नांनी डोकं वर काढलं.ऑनलाईन-ऑफलाईन, ट्रेडिशनल-मॉडर्न, ओल्ड स्कूल-न्यू जेन, कन्सल्टंट - चॅट जिपीटी... ह्यासारख्या सध्या ऐरणीवर असलेल्या विषयांना अनुसरूनच प्रश्न होते. पहिला प्रश्न होता, ‘ब्रांच ऑफिसेस उघडून एक्स्पान्शन करायचं की ऑनलाइवर भर द्यायचा?’ एक सूर होता, ‘आपले पर्यटक अजूनही ऑफिसला येतात. चर्चा करतात. शंकानिरसन करून घेतात. आणि मगच बुकिंग करतात. टूरपूर्वी एक दोन वेळा ऑफिसला येतात, खऱ्या अर्थाने त्यांची टूर ही ऑफिसला येऊनच सुरू होते. तो अनुभव त्यांना हवा असतो. त्या बुकिंग पेमेंट व्हिसा डॉक्युमेंटेशन ह्या संपूर्ण प्रोसेसमधून त्यांना जायचं असतं, त्यांना आवडतं ते त्यामुळे आपल्याला ब्रांच ऑफिसेस करूनच एक्स्पान्शन करावं लागणार’. तर, ‘जग सगळं ऑनलाईनकडे चाललंय, नव्हे गेलंय, तेव्हा हा ब्रांच ऑफिसेसचा विचार आता आपल्याला सोडून द्यावा लागणार आणि ऑनलाइन पेनिट्रेशनवर भर द्यावा लागणार’ ह्या विचारावर अनेकजण ठाम.‘तसं जर असेल तर रीअल इस्टेटचे भाव खाली यायला पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही. उलट मोक्याच्या ठिकाणी जागा मिळत नाहीत आणि जागेची भाडी गगनाला भिडली आहेत. अनेक कंपन्या मोठमोठ्या शोरूम्स करताहेत. सगळं घरूनच होतंय हल्ली एका क्लीकवर पण मग माणसं घरातच कोंडली जातील की, काहीतरी कारणाने माणसं बाहेर आलीच पाहिजेत. पर्यटनाचा मुख्य हेतूच तो आहे नं. कम् ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट असं आपणच म्हणतो नं’ दुसरी फळी नमतं घ्यायला तयार नव्हती. ह्या चर्चेचं घमासान युद्धात रूपांतर होताना दिसत होतं. काहीजणं तर चेन्नई, कोइम्बतोर, कोचिनच्या सेल्स ऑफिसेसमध्ये काल्पनिकरित्या पोहोचून बुकिंग घेत असल्याची स्वप्न बघत होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ती कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं होतं. दोन्ही पक्ष जेव्हा आपापल्या मतांवर ठाम असतात तेव्हा त्यांना तिसराच मार्ग दाखवणं गरजेचं असतं. आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी किमान दोन आणि कमाल कितीही मार्ग असू शकतात ह्यावर माझा विश्वास आहे आणि अनुभवही. मी सूर लावला, 'दोन्ही पार्टीज् आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. फक्त एकच गोष्ट आपण विसरलो ती म्हणजे संदर्भ. कॉन्टेक्स्ट. ज्यावेळी आपण ही ‘फर्दर एक्स्पान्शनची’ पहिली मिटिंग केली तो महिना होता मार्च, जो एकदम प्रॉमिसिंग महिना होता, आपण आपलेच पुर्वीचे सर्व रेकॉर्डस् तोडले होते आणि एका नव्या क्षितिजाकडे झेपावत होतो. त्यानंतर एप्रिलमध्ये काश्मीर, मे मध्ये अहमदाबाद, इराण-इस्रायल ह्या सगळ्यामुळे आपला महत्वाचा सीझन संपूर्णपणे वाइप-आउट झाला. आता पुन्हा जोरदार बुकिंग सुरू झालंय. काळजीचं कारण दिसत नाहीये पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळे झालेली हानी आधी भरून काढणे, सध्याच्या मायनस वरून आपल्या अपेक्षित प्लस कडे जाणे हे सर्वप्रथम महत्वाचं काम आहे. त्याकडे आधी लक्ष देऊया. साधारण दिसणाऱ्या ट्रेंडप्रमाणे ह्याला सहा महिने लागतील. सहा महिन्यांनंतर पुन्हा भेटूया आणि हीच चर्चा पुढे नेऊया. तोपर्यंत आहेत त्या गोष्टी आणखी सुधारूया. छोट्या छोट्या डीटेल्सकडे मनःपूर्वक लक्ष देऊया जेणेकरून आपल्या पर्यटकांची टूर आणखी आनंददायी होईल कारण आपला अल्टिमेट गोल तोच आहे. तुम्ही खूप तयारीनिशी आलाय त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडं नाराज व्हायला होईल, पण आजच्या मोस्ट अनप्रेडिक्टेबल जगात, आपल्या विचारात-मानसिकतेत फ्लोक्सिबिलिटी रूजवणं ही काळाची गरज आहे. आपल्याच जाहिरातीत एक हेडलाईन होती पुर्वी, ‘परिस्थिती बदलणार नाही मन:स्थिती बदलूया’. आत्ताच्या कॉन्टेक्समध्ये असं म्हणता येईल की, ‘सतत बदलत राहणे - चांगले वाईट धक्के देत राहणे हा परिस्थितीचा स्थायीभाव झालाय, त्यात बदल होणार नाही’ ही वस्तुस्थिती आपण पचवली पाहिजे. त्यामुळे मार्च आणि जुलै ह्यामध्ये जे काही घडलं, जे हादरे आपल्याला बसले त्याने कॉन्टेक्स्ट पूर्ण बदललाय आणि आपल्या लॉजिकनुसार ‘कॉन्टेक्स्ट चेंज - डिसिजन चेंज’. आणि धिस इज नॉट द एन्ड ऑफ द वर्ल्ड. आपण लाँग टर्म प्लेअर आहोत. किमान शंभर वर्ष संस्था चालली पाहिजे हा गोल घेऊन आपण काम करतोय. त्यामुळे आपल्याला पेशन्स आणि स्पीड ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स राखता आला पाहिजे. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा पेशन्स राखणं, उद्यावर विश्वास ठेवणं, डगमगून न जाणं, धैर्याने काम सुरू ठेवणं हा मार्ग जोखावा लागेल तर जेव्हा परिस्थिती आणि जनमाणसाची मन:स्थिती सुधारेल तेव्हा स्पीड आपल्या रोमारोमात भिनवावा लागेल. कधी ही तारेवरची कसरत ठरेल. कधी अगदी कमी काम असेल तर परिस्थिती सुधारल्यावर कामाचे डोफ्लगर उपसावे लागतील. त्याला आपण तयार राहिलं पाहिजे. आत्ता ज्या जगात आपण वावरतोय तिथे रुटीन आणि प्रेडिक्शन्स ह्याचे बारा वाजलेत मग त्याची कारण जिओपोलिटिकल असतील वा टेक्नॉलॉजिकल रीव्हॉल्युशनमध्ये असतील, लेट्स बी रेडी, वेलकम टू द न्यू वर्ल्ड!’दुसरा प्रश्न होता तोही ह्याच धर्तीवर.‘फिजिकल ऑफिसेस की ऑनलाईन’ प्रमाणेच ब्रोशर की वेबसाईट? ट्रॅव्हल प्लॅनर असावं की नसावं? सगळंच जर वेबसाईटवर आहे तर पुर्वीसारखं ब्रोशर काढणं हे म्हणजे ‘आपण पुढे जाण्याऐवजी मागे जातोय’ असं नाही वाटत? हा मुद्दा. ट्रॅव्हल प्लॅनर म्हणजे आम्ही वीणा वर्ल्डमध्ये जे काही करतो त्या सगळ्या ॲक्टिविटीज्ची तोफ्लडओळख करून देणारं एक छोटंसं पुस्तक, म्हणजे पुस्तीकाच ती. पण ती हवी-नको ह्यावर आमचं डिस्कशन. ‘वीणा वर्ल्डची वेबसाईट छान आहे, त्यावर संपूर्ण माहिती मिळते’ ह्या तऱ्हेची प्रशंसापत्र आम्हाला अनेकदा येतात. तिथे जर सगळं काही आहे तर मग ट्रॅव्हल प्लॅनरचा हा द्रविडी प्राणायाम का करायचा? प्रश्न रास्त आहे नो डाऊट. पण जर आपला पर्यटक आजही आपल्याकडे ब्रांच ऑफिसेसना किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये फिजिकली येऊन बुकिंग करण्यात आनंद मानत असेल तर ह्या आपल्या पर्यटकाला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनची जास्त गरज आहे. त्यांना आपल्या टीमशी बोलायचंय, काय काय आहेत पर्याय ते समजून घ्यायचंय. चर्चेतला आनंद मिळवायचाय. मग जेव्हा हे घडत असतं तेव्हा त्यांच्यासमोर स्क्रीन वा मॉनिटरपेक्षा एक छोटी पुस्तिका ट्रॅव्हल प्लॅनर स्वरूपात असली तर आपल्या टीमलाही एक्स्प्लेन करायला सोप्पं जाईल. आणि जेव्हा पर्यटक संक्षिप्त रूपात दिलेल्या त्या टूर्समधून त्यांच्या आवडीची, सवडीत बसणारी आणि बजेटमध्ये असणारी टूर निवडतील तेव्हा डीटेल्ससाठी तो टूर कोड टाकून वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळवणं किंवा टीमने ती त्यांना देणं सोप्पं जाईल. हा डिस्कशनचा विषय. पुर्वीसारखं जाडजूड ब्रोशर नाही पण हे ट्रॅव्हल प्लॅनर मलाही व्यक्तीश: असायलाच हवं अस वाटतं. अर्थात माझ्यावरून हा निर्णय होऊ शकत नाही, कारण ब्रोशर्स ह्या विषयासाठी माझा कायम सॉफ्टकॉर्नर. माझ्या पुस्तकवेड्या ट्रेडिशनल ओल्ड स्कूल मेंटॅलिटीला असं काहीतरी फिजिकल ट्रव्हल प्लॅनर असणं हे अपरिहार्य वाटतं कारण माझ्या करियरमध्ये पुर्वी माझा अर्धावेळ टूरवर टूर मॅनेजर म्हणून जायचा तर उरलेला वेळ ऑफिसमध्ये ब्रोशर्स आणि जाहिराती बनविण्यात खर्च व्हायचा. त्यामुळे ब्रोशर्स वा जे ट्रॅव्हल प्लॅनर आहे तो माझ्यासाठी नॉस्टॅल्जिया आहे, त्यामुळे माझा निर्णय हा एककल्ली होऊ शकतो. एक मात्र आहे की आपला भारत अजूनही ऑनलाईन-ऑफलाईन ह्या दोन्हीमध्ये आहे. थोडासा दोलायमान पण `जुनं ते सोनं आणि नवं ते हवं’ ह्या दोन्हींचा आस्वाद घेतोय. त्यामुळे वेबसाईट्स-ॲप्स ह्यामध्ये वेगाने प्रगती करताना अर्ध्या नॉन-टेकी भारतीयांचाही विचार केला पाहिजे. त्यात अनेकजण हल्ली मोबाईल डीटॉक्सच्या पाठी लागलेत. त्यामुळे मोबाइलवर वेबसाईट चेक करण्यापेक्षा हातात एखादा कॅटलॉग बघायला बरं वाटतं. हे खूप जाडजूड ब्रोशर नव्हतं त्यामुळे खर्चही आटोक्यात होता. हो-नाही करत सर्वसमंतीने गेल्या आठवड्यात हे ट्रॅव्हल प्लॅनर फायनल झालं आणि त्याची डिजिटल कॉपी आणि फिजिकल कॉपी दोन्ही पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. आमच्या प्रॉडक्ट, मार्केटिंग, प्राइसिंग, एअर रीझर्वेशननं अफलातून काम केलंय. इथेही ट्रॅव्हल प्लॅनरचा QR कोड दिला आहे. तुम्हीपण पहा तर आजमावून.मगाशी म्हटलं तसं परिस्थिती ढासळली तेव्हा शांत राहिलो आणि परिस्थिती सुधारली तेव्हा जोमाने कामाला लागलो. गेला संपूर्ण महिना वा गेले तीन महिने हे पेशन्स आणि स्पीड ह्या दोन्ही गोष्टी अंगात भिनण्यासाठी खूप चांगल्या तऱ्हेने डेमॉन्स्ट्रेशन देऊन गेले. असं म्हणतात नं की अडचणी आपल्याला आणखी कणखर बनवतात. खरंच आहे ते. आम्हीतर ह्या कठीण परिस्थितीचा उपयोग आमची मनःस्थिती खंबीर करण्यासाठी केला. नव्या जगाला आम्ही दिलेली ही नवी सलामी!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.