Published in the Sunday Sakal on 22 June 2025
तुम्ही एवढ्या शांत कशा? मला हे शिकायचंय.' दर शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या ओपन हाऊस मध्ये काँट्रॅक्टिंग अँड ऑपरेशन्स मधल्या स्मिता घाडी ने प्रश्न केला. ‘जेव्हा जेव्हा मुंबईत असेन तेव्हा तेव्हा शुक्रवारी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हा वेळ आपण रिझर्व ठेवायचा. आपली कॉनव्हर्सेशन्स नेहमी सिनियर मॅनेजर्स आणि इनचार्ज बरोबर होतात. ज्युनियर टीमशी वर्षातून एकदा वा फारफार तर दोनदा भेटण्याचा योग येतो, तेही एखाद्या ट्रेनिंग सेशनमध्ये. पण वन-टू-वन सेशन कधी होणं दुरापास्तच. वेळेअभावी ते शक्यही नाही. पण असं भेटता आलं तर अगदी काल जॉइन झालेल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला?‘ कुटुंबात म्हणा किंवा कॉर्पोरेटमध्ये, आपण एक दुसऱ्यांना जेवढं जाणून घेऊ तेवढं चांगलं. माणसामाणसांमधला संवाद वाढला पाहिजे. ह्या विचारातून सुरू झालं 'ओपन हाऊस’. ओपनली बोला, जनरल पर्सनल करियर संदर्भात चर्चा करा, अगदी ऑर्गनायझेशनविषयी, माझ्याविषयी वा मॅनेजमेंट विषयी एखादी खटकणारी किंवा सुधारणावाली गोष्ट सांगा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल ही याची संकल्पना. पण कधीकधी अचानकपणे कामांचा डोंगर समोर उभा राहतो. दोन महिन्यापूर्वी असंच झालं. काश्मीर प्रश्नाने हाहा:कार माजवला. त्यातून बाहेर पडतोय, नव्हे त्यात अजूनही अडकलो आहोतच. काश्मीरला जायचं बुकिंग केलेल्या हजारो पर्यटकांना वेगवेगळे ऑप्शन्स देत असताना आमच्या संपूर्ण टीमची दमछाक झाली होती. त्यातच मागच्या आठवड्यात अहमदाबादला विमानाचा भीषण अपघात झाला आणि निष्पापांचा बळी गेला. ही भयानक घटना ऐकणं, बघणं, समजणं, पचवणं सगळंच अवघड होतं. प्रत्येक माणसाची असे धक्के पचवायची क्षमताही मर्यादित असते नं. कधीकधी ‘बस हो गया यार, जीने भी दो यारो!’ असं जग चालविणाऱ्या त्या सुपर पॉवर्सना सांगावसं वाटतं. काही काळासाठी अहमदाबाद एअरपोर्ट बंद झाला आणि आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची कोंडी झाली. हे सगळं कमी होतं म्हणून की काय तर इस्राईलने इराणवर हल्ला केला आणि तो एअरपॅसेजच बंद झाला. आमच्या टूर्सची मुंबईहून-दिल्लीहून युरोपकडे निघालेली विमानं दोन अडीच तासांचं फ्लाईंग करून परत आली. बॅक टू पॅव्हेलियन, आणि असं अनेक विमानांचं झाल्याने त्या दोन तीन दिवसांसाठी एअरपोर्टस् वर आणिबाणीजन्य परिस्थिती निर्माण झाली. जाणाऱ्या विमानांची ही परिस्थिती तर येणारी विमानंही ठप्प झाली. पर्यटकांना युरोपातून अमेरिकेतून सहीसलामत आणणं ही जबाबदारी नव्याने आली. एक बरं असतं, टूरवर सगळे पर्यटक एकत्र असतात आणि त्यांच्या जोडीला टूर मॅनेजर असल्याने आम्हाला इथून सर्वांशी संपर्क साधणं, त्यांना आपण काय करतोय हे सांगण आणि त्यांची काळजी दूर करणं सोप्पं जातं. दोन दिवसांची उलथापालथ दमवून गेली आमच्या टीमला, पर्यटकांना, आणि एअरलाईन्सनाही. दोष कुणाचाच नव्हता पण त्या थोड्या कालावधीपुरते आपण परिस्थितीचे बळी पडलो. हे सगळं बऱ्यापैकी लवकर स्थिरस्थावर झालंही. येणारे पर्यटक परत आले, जाणारे आता युरोप अमेरिकेत मजा करताहेत. घडणारं घडून जातं आणि काळ पुढे चालत राहतो, आपल्यालाही नव्या उमेदीने वाटचाल सुरू ठेवावी लागते. तर या सगळ्या घडामोडींमध्ये हा ओपन हाऊसचा शुक्रवार आला होता आणि आमच्या प्राची प्रधानजवळ त्यासाठी बरीच नावं आली होती. सर्वांना झालेल्या उलथापालथीची कल्पना होती आणि आम्ही या वेळचं ओपन हाऊस पुढे ढकलू शकत होतो. प्राचीने तसं विचारलंही. तिला म्हटलं, थांब, अशावेळीच आपला कस लागतो. ओपन हाऊस त्यातील सातत्यासह आपण सुरू ठेवलंय गेली दोन वर्षं. जगात काहीतरी कुठेतरी होणं आणि त्यातून अडचणी निर्माण होणं हे आता आपलंच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचं भविष्य आहे. वुई शुड बी स्ट्राँग इनफ टू डील विथ इट! ओपन हाउस पुढे ढकलू नकोस. मी मलाच टेस्ट करते की, एवढं सगळं सुरू असतानाही मी येणाऱ्या प्रत्येक टीम मेंबरला शांतपणे व्यवस्थित वेळ देऊ शकते का? त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकते का? नेहमीप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारू शकते का? आणि तसं जर झालं तर माझ्या स्वतःच्या परीक्षेत मी पास झाले असं मी म्हणेन. ओपन हाऊसचं सातत्य आपण तोडूया नको आणि आम्ही संबंधित टीमसोबत सद्य परिस्थितीवर तोडगा काढतोय. तिथे दुर्लक्ष होणार नाही. सो परिस्थितीचं कारण पुढे आणूया नको. एखादं काम न करण्याची किंवा पुढे ढकलण्याची अनेक कारणं आपल्या जीभेवर वास करीत असतात, त्यांना शक्यतोवर ओठांच्या आतच ठेवणं चांगलं, हिंमतीने काम करणं किंवा पुढे नेणं ही मानसिकता आपण अंगी बाणवूया आणि ॲकम्पलिशमेंटचा आनंद मिळवूया.’ त्या भागादौडीत तो आनंद मिळवता आला हे महत्वाचं. स्मिता घाडीला काय चाललंय त्याची कल्पना होती, कारण ती ही त्यात डील करीत होती आणि म्हणूनच तिने प्रश्न विचारला, ‘तुम्ही इतकं शांत कसं राहू शकता?’
मी शांत होते का? की मी तसं दाखवत होते? दॅट्स द क्वेश्चन. माझा पिंड शांत माणसाचा नाहीच मुळी. त्यात नाव पाटील म्हणजे अशांतता पाचवीला पुजलेली. लग्न झाल्यानंतर ही अशांतता टीपेला पोहोचण्याची स्थिती, कारण सासरही पाटलांकडेच. पण सुधीरची पाटीलकी शांत कुळातली. लग्नानंतर आमचं कधी कडाक्याचं भांडण झालंय असं आठवतच नाही. ती इच्छा अपुरी राहिली. आणि याला कारण सुधीरच. माझा कितीही कडकडाट गडगडाट झाला तरी ही स्वारी शांत राहणार, मग कसला भांडणाचा आनंद. एक दिवस आम्ही गप्पा मारत बसलो होतो. 'ये नील के साथ कभी अनबन, झगडा करना बहुत डिफिकल्ट है, ही इज सो काम अँड कंपोज्ड'. हेता म्हणजे आमची सूनबाई बोलली. झालं, म्हणजे सुधीरने वारसा नीलकडे सुपूर्द केला होता तर. माझ्याप्रमाणेच हेतासुद्धा भाग्यवान ठरली होती. ‘शांतता राखा’ हे सुधीरने कधी मला सांगितलं समजावलं नव्हतं, पण 'हम साथ साथ है' म्हणताना आयुष्याच्या प्रवासात हळूहळू मी शांत होत गेले. त्यात आयुष्यातली पंधरा वर्षं टूर मॅनेजर होते त्यामुळे पर्यटकांसोबत सप्लायर्ससोबत शांतपणे गोष्टी करण्यात जास्त आनंद होता आणि शहाणपणाही. माझ्या व्यवसायामुळे, पर्यटकांच्या सहवासाने आणि अनेक प्रसंगांनी मी शांत बनले. आपल्या अनेकांचाही असाच काहीसा अनुभव असेल याची मला खात्री आहे. जसं वय वाढतं, शहाणपण यायला लागतं तसे आपण शांत होत जातो. पण तरीही मागच्या आठवड्यात मी शांत होते का? तर नक्कीच नाही. मागच्या शुक्रवारी गुजरात समाचारला दोन महिन्यांनंतर जाहिरात होती फुल पेज. फायनल कॉपी दाखवायला मार्केटिंगचे गायत्री नायक आणि जितेश घाग गुरुवारी समोर येऊन बसले. जाहिरात दाखवता दाखवता म्हणाले, ‘तुम्हाला कळलं का?’ त्यांचा चेहरा काळजीयुक्त. जस्ट मंथली मीटिंग संपली होती. ‘उद्यापासून जाहिराती पुन्हा सुरू होताहेत, नव्या उमेदीने चला कामाला लागूया’ या तऱ्हेचा संदेश आम्ही त्या मीटिंगमध्ये सर्वांना दिला होता. मीटिंग संपल्यावर हुश्य होऊन कामाला सुरुवात केली होती. ‘का काय झालं?’ माझा प्रश्न. ‘अहमदाबादला लंडनला जाणारं विमान कोसळलंय आणि सगळंच जरा गंभीर वाटतंय, ॲडव्हर्टाईज कॅन्सल करू का?’ संपूर्ण कॅम्पेन थांबवलं गेलं. शुक्रवारी रात्री निघता निघता गायत्रीने विचारलं, ‘कधी आपण कॅम्पेन सुरू करणार?’ तिचा रडवेला काळजीयुक्त चेहरा बघून मलाही वाटलं की आपणही एकदा जोरात रडून घ्यावं. अर्थात मी ते करू शकत नव्हते. तिला म्हटलं, गायत्री ‘वन डे ॲट अ टाईम.’ सोमवारी बघूया. आता शांतपणे घरी जा.
काश्मीरच्या वेळी ऐन सीझनमध्ये अशीच तंतरली होती आमची सर्वांची. उत्तरेकडचे एअरपोर्टस् बंद झाले आणि मुंबई, दिल्ली एअरपोर्टस् ही बंद होतील अशा बातम्या किंवा अफवा हवेत राज्य करू लागल्या. इतकं काही अनाकलनीय घडत होतं की परिस्थितीने कमकुवत झालेल्या मनांना काहीही खरं वाटत होतं. हे दोन एअरपोर्टस् बंद झाले तर काय घडेल याची कल्पनाच न कलेली बरी, त्यामुळे त्या विचाराला आत घुसू द्यायला किंवा ते उघडपणे बोलायलाही आम्ही धजावत नव्हतो. कोविडमध्ये अडकलेल्या पर्यटकांची आणि त्या सगळ्याची आठवण येऊन अंगावर काटा येत होता. त्या काश्मीर डिसरप्शनमध्ये रात्री खूप उशीरा अश्याच एका इमर्जन्सी कॉन्फरन्स कॉलवर आम्ही सगळे त्या क्षणाचा तो जो काही प्रॉब्लेम होता तो सोडवत होतो. फोन संपल्यावर नीलचा पुन्हा फोन आला, ‘तुला काय वाटतं? जर इंटरनॅशनल फ्लाईटस् सुद्धा बंद झाली तर आपण स्ट्रॅटेजी करून ठेवायची का?’ प्रश्न रास्त होता. आणि प्रत्येक व्यवसायाने तसं 'इफ नॉट व्हॉट?' साठी तयार रहायलाच पाहिजे. तरीही नीलला म्हटलं, ‘मध्यरात्र झालीय, आता आपण झोपूया, साऊंड स्लीप मिळवूया. कारण उद्या पुन्हा नवीन उद्यासाठी उत्साहाने उभं रहायचंय. 'वन डे ॲट अ टाईम' 'वन प्रॉब्लेम ॲट अ टाईम.' ‘उद्या जे काही होईल त्याला संपूर्ण भारत तोंड देणार आहे. वुई विल डील विथ इट टुमारो. आपल्या काळज्यांमध्ये आणखी भर टाकूया नको.’ नशिबाने तसं काही घडलं नाही आणि आमचीच नव्हे तर संपूर्ण भारतवासियांची सुटका झाली.
शांत संयमाने राहणं अवघड होतंय पण शांत रहायलाच लागणार आहे आपल्या भल्यासाठी. माझं आणि सुधीरचं कधी भांडण झालं नाही, कारण मी कितीही अशांत झाले तरी सुधीर शांत असायचा. सर्व काही नीट सुरळीत चालवायचं असेल तर एकाने शांत राहणं गरजेचं आहे. सध्या जग खूप अशांत झालंय आणि म्हणूनच आपल्याला 'शांतता राखा' हे सूत्र पाळावंच लागणार आहे.
उगवत्या सूर्याची भूमी - अरुणाचल
भारताच्या चारही दिशांना निसर्गसौंदर्याने नटलेले अनेक प्रदेश आहेत. त्यातही ईशान्य भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट मधल्या हिरव्यागार आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या प्रदेशांची आपल्याला भुरळ पडते. अशा सर्वात आकर्षक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्यांपैकी एक आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल म्हणजे ‘उगवत्या सूर्याची भूमी’. भारतात प्रथम सूर्योदय इथे होतो. देशाच्या ईशान्य भागात वसलेले हे राज्य त्याच्या समृद्ध स्थानिक संस्कृती आणि स्ट्रॅटेजिक महत्त्वामुळे ओळखले जाते. याच्या उत्तरेला चीन (तिबेटचा स्वायत्त प्रदेश), पश्चिमेला भूतान, दक्षिणेला आसाम आणि पूर्वेला नागालँड आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत हे ईशान्येकडील सर्वात मोठे राज्य आहे. मात्र या राज्यात लोकसंख्येची घनता भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी म्हणजे इटानगर. बर्फाच्छादित शिखरं, डोंगराळ प्रदेश, जैवविविधतेने नटलेली घनदाट जंगलं आणि विस्तीर्ण नद्या ही या प्रदेशाची वैशिष्ट्यं आहेत. अरुणाचलचा बहुतांश भाग पूर्व हिमालयाने व्यापला आहे. निसर्गाने या राज्याला अपार सौंदर्य आणि संपत्ती दिली आहे. इथे जून ते सप्टेंबर मध्ये मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे शेती, फळे, फुले, झाडे यांची विपुलता आहे. विविध सण इथे साजरे केले जातात. अरुणाचल प्रदेश हे राज्य त्याच्या अस्पर्शित सौंदर्यासाठी प्रिस्टिन ब्युटी म्हणून ओळखलं जातं. इथे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स अशा साहसी लोकांना आकर्षित करणारे अनेक नयनरम्य लँडस्केप्स आहेत.अरुणाचलमध्ये, विशेषतः इथल्या तवांग सारख्या ठिकाणी, थुक्पा हे लोकप्रिय नूडल्स सूप आहे. यात चविष्ट मटणाचा रस्सा बनवून त्यासोबत नूडल्स सर्व्ह केल्या जातात. त्यात भाज्या, मांस किंवा अंडी घातली जातात. व्हेज थुक्पा सुद्धा असतो. इथले मोमोज म्हणजे वाफवलेले किंवा तळलेले डंपलिंग्ज् असतात, ज्यात सहसा भाज्या किंवा मांसाचं फिलिंग असतं. याशिवाय बांबू शूट करी, किंवा अपाँग म्हणजे राईस बियर हे पारंपारिक पदार्थ प्रसिद्ध आहेत.तवांग मॉनेस्ट्री भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध मॉनेस्ट्रीज्पैकी एक आहे. इथेच ‘सेला पास’ हा बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला हाय अल्टिट्युड पास आहे. इथले तवांग युद्ध स्मारक 1962 च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून बांधण्यात आले आहे. हे स्मारक शैक्षणिकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. अरुणाचल प्रदेशात माधुरी लेक हा निसर्गरम्य तलाव आहे. `कोयला’ या बॉलिवूड चित्रपटाचं काही चित्रीकरण इथे करण्यात आलं होतं. डेव्हलपिंग स्टेजला असलेला अरुणाचल हा वळणदार रस्ते, नयनरम्य बर्फाच्छादित पर्वत आणि धुके यामुळे कोणत्याही ऋतूत तुमचं मन जिंकून घेतो. तर मग तुम्ही कधी पहायला जाताय हा निसर्गरम्य प्रदेश?
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
साऊथ डकोटाच्या ब्लॅक हिल्समध्ये असलेलं माऊंट रशमोर नॅशनल मेमोरिअल युनायटेड स्टेट्समधल्या सर्वात प्रतिष्ठित स्मारकांपैकी एक मानलं जातं. याचा शिल्पकार गुट्झॉन बोर्गलम याने या स्मारकात चार राष्ट्रपतींच्या डोक्यापासून कंबरेपर्यंतच्या आकृत्या कोरण्याची योजना आखली होती. त्यासाठीचं काम सुरू झालं होतं 1927 साली. पण बोर्गलमच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या फक्त डोक्याचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर हा प्रकल्प त्याचा मुलगा लिंकन बोर्गलम याने पूर्णत्वास नेला. यासाठी 1927 ते 1941 अशी चौदा वर्षं लागली. या प्रकल्पाचा आकार प्रचंड मोठा असूनही तो तुलनेने मूलभूत साधनांचा वापर करून पूर्ण करण्यात आला. माऊंट रशमोरसाठी निवडण्यात आलेले चारही राष्ट्रपती अमेरिकेच्या इतिहासातील प्रमुख पैलूंचे प्रतिनिधीत्त्व करतात. या देशाची कायदा आणि सुव्यवस्था विकसित करण्यासाठी मदत करणाऱ्या राष्ट्राच्या माजी नेत्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने हे स्मारक बनविण्यात आले आहे.
यापैकी जॉर्ज वॉशिंग्टन हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या राष्ट्राच्या जन्माचे प्रतीक आहेत तर थॉमस जेफरसन राष्ट्राच्या विस्ताराचे प्रतिनिधीत्त्व करतात. थिओडोर रूझवेल्ट हे उद्योगक्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अमेरिकेच्या विकासाला मूर्त रूप देतात, तर अब्राहम लिंकन यादवी युद्धादरम्यान संघटन जपण्याचे समर्थन करतात. या माऊंट रशमोर पर्वतावर त्यांचे अर्धपुतळे आहेत. यातून लोकांना 150 वर्षांचा अमेरिकन इतिहास समजू शकतो. अब्राहम लिंकन यांच्या डोक्यामागे एक खोली आहे. इथे अमेरिकन इतिहासातील महत्त्वाचे रेकॉर्डस म्हणजेच दस्तऐवज आणि कलाकृती ठेवण्यात येणार होत्या. पण निधीच्या कमतरतेमुळे आणि बोर्गलमच्या मृत्यूमुळे, हा कक्ष जवळजवळ रिकामाच राहिला. 1990 च्या दशकात काही वस्तू तिथे ठेवल्या. यात स्वातंत्र्याच्या घोषणेच्या ग्रॅनाईट प्रतिकृतीचाही समावेश होता. माउंट रशमोर नॅशनल मेमोरियल दरवर्षी 20 लाखांहून अधिक पर्यटकांना आकर्षित करते. वीणा वर्ल्डच्या अमेरिकन एक्सप्लोरर, अमेरिकन डिस्कव्हरी आणि अमेरिकन डिलाईट्स या टूर्समध्ये आपण इथे भेट देतो. तुम्ही जाऊन आलात की नाही अजून युएसए ला?
प्रवास म्हणजे रिलॅक्सेशन!
मी छाया नहार. पुण्यात राहते. डेक्कन जिमखाना, भांडारकर रोडच्या ऑफिसमधून टूर्स बूक करते. माझ्या आजवर वीणा वर्ल्डसोबत 19 टूर्स झाल्या आहेत. त्यापैकी 14 वुमन्स स्पेशल टूर्स होत्या. मी वुमन्स स्पेशल टूर्स निवडते, कारण मी एकटीच फिरते. गेल्या सहा महिन्यात मी बाहेरच्या देशातल्या 3 टूर्स केल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये साऊथ कोरिया तैवान टूर केली. फेब्रुवारीत म्यानमार लाओस टूर केली. तर मार्चमध्ये अझरबायजान, जॉर्जिया अर्मेनिया टूरवर जाऊन आले. या तीनही टूर्स मी ग्रुप टूर्स केल्या. कारण ही डेस्टिनेशन्स ऑफबीट असल्यामुळे तिथे ग्रुप टूर्सच उपलब्ध होत्या. लॉकडाऊन नंतरच्या माझ्या टर्कीच्या टूरमध्ये माझी एक मैत्रीण झाली. तिच्यासोबतच गेल्या सहा महिन्यांमधल्या तीनही टूर्स मी केल्या.
माझी दोन्हीही मुलं परदेशात सेटल झाली आहेत. त्यामुळे युरोपमधले देश आणि लंडन मी मुलांकडे रहायला गेले असताना पाहून घेतलं. युएसए ईस्ट अँड वेस्ट कोस्टची ऑफबीट टूर मी वीणा वर्ल्ड सोबत केली. माझे आजवर 42 देश फिरून झालेत. भारतात आता मी एकटीच असते. एकटं फिरायला जायचं तर कंपनी चांगली हवी म्हणून मी वीणा वर्ल्ड सोबत फिरते. त्यांचे टूर मॅनेजर्स उत्तम असतात. केअरिंग असतात. ऑफिस टीम देखील प्रॉम्प्ट आहे. एकदा पैसे भरले की कसलं टेन्शन नसतं. एकटी असले तरी रूम पार्टनर शोधावा लागत नाही.
माझी वीणा वर्ल्ड सोबतची पहिली टूर होती काश्मीरची. त्यानंतर मी राजस्थान मारवाड, लेह लडाख, सिमला कुलू मनाली, नैनिताल जिम कॉर्बेट, जगन्नाथ पुरी भुवनेश्वर, अयोध्या वाराणसी सारनाथ लखनौ या टूर्स केल्या. शिवाय मी भूतान, नेपाळ, बाली, इजिप्त, श्रीलंका, टर्की, मॉरिशस, दुबई अबुधाबी आणि आत्ताच्या तीन अशा परदेशातल्या वेगवेगळ्या टूर्स केल्या. मी आता 71 वर्षांची आहे. माझ्यासाठी प्रवास म्हणजे रिलॅक्सेशन असतं. एकटं प्रवास करताना अनेक जणींची सुखदु:खं कळतात. आपली दु:खं छोटी वाटायला लागतात. आपला दृष्टिकोन व्यापक बनतो. एकंदरीतच प्रवास आपल्याला सर्वांगाने समृद्ध करून जातो.
प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्
हिडन जेम्स’ बाय वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज
रेग्युलर टूरिस्ट्सपेक्षा काहीतरी हटके करू इच्छिणाऱ्यांसाठी वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् घेऊन आलंय ‘हिडन जेम्स’- एक अफलातून नवीन हॉलिडे सेगमेंट. ह्यात फक्त आपली नेहमीची डेस्टिनेशन्स नाहीत, तर ह्यात आहेत पॉप्युलर ठिकाणांच्या पलीकडची आणि आपल्या नावाला साजेशी अशी काही छुपी रत्न. कल्पना करा, तुम्ही एका सव्वा दोनशे वर्ष जुन्या हवेलीमध्ये राहताय, किंवा 70 फूट उंच ट्री हाऊसमध्ये! तुंगभद्रेच्या किनारी विल्डरनेस लॉज, बालीतील पूल व्हिला, किंवा हिमालयाचं विहंगम दृश्य दाखवणारा माउंटन लॉज... असे काही अफलातून पर्याय तुमची वाट पाहतायत. यासोबतच पॉटरी, कूकिंग सेशन्स, जीप सफारीज्, नेचर वॉक्स, सनडाउनर्स, कॅण्डललाइट डिनर्स, हेरिटेज वॉक्स असे कितीतरी एकसे एक एक्सपिरिएन्सेस तुम्हाला ह्या हॉलिडेजवर घेता येतील. वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्च्या हिडन जेम्स आयटीनरीज् अधिक आरामदायी, ईमर्सिव्ह आणि पर्सनलाइझ्डरित्या डिझाईन केलेल्या आहेत. तुमचा हा प्रायव्हेट हॉलिडे तुम्ही हवं त्या तारखेला घेऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार त्यात काही बदलही करू शकता हे काही वेगळं सांगायला नको.
मात्र लक्षात ठेवा, हिडन जेम्स हॉलिडेज्च्या या नेव्हर बिफोर प्राइझेस फक्त सप्टेंबर पर्यंतच्या हॉलिडेज्साठीच उपलब्ध आहेत. नंतर हाय सीझनमध्ये मात्र प्राइझेस प्रचंड वाढतील. राजस्थान, केरळ, कर्नाटक, बाली आणि नेपाळसाठीच्या ह्या खास हॉलिडेज्पैकी तुमचा स्पेशल हिडन जेम हॉलिडे‘ आजच बुक करा. बाकी सगळी काळजी घ्यायला आम्ही आहोतच! चलो
व्हेनिस कार्निव्हल
व्हेनिस कार्निव्हल म्हणजे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि जुन्या सांस्कृतिक उत्सवांपैकी एक. हा दरवर्षी इटलीतील व्हेनिस इथे फेब्रुवारीच्या आसपास आयोजित केला जातो. या वार्षिक प्री लेंटेन फेस्टिव्हलमध्ये शेकडो वर्षांपूर्वीची व्हेनेशियन संस्कृती अनुभवता येते. मास्कस् हे या कार्निव्हलचे मुख्य आकर्षण आहे. यावेळी 13व्या ते 18व्या शतकातील पारंपरिक मास्क्स् आणि ड्रेसेस घातले जातात. मनोरंजक कार्यक्रम आणि स्पर्धा होतात. खाण्यापिण्याची रेलचेल असते. जगभरातील सुमारे 10 लाख लोकं पारंपरिक वेशभूषा करून कार्निव्हलचा भाग होतात. मास्कस्च्या आडून गरीब श्रीमंत, उच्च नीच असे भेद विसरून सगळ्यांसोबत मौजमस्ती करता येते. व्हेनिस कार्निव्हलचे सेंटर सेंटमार्क स्क्वेअर आहे. इथे दररोज परेड, मास्क्सची स्पर्धा, ओपन एअर परफॉर्मन्स, स्ट्रीट थिएटर आणि म्युझिक शोज असतात. ‘द फ्लाईट ऑफ द एंजेल’ आणि फेस्टाडेले मेरी यांसारखे लोकप्रिय कार्यक्रम सादर केले जातात. अशा या इतिहास, कल्पनाविश्व आणि कलात्मकतेने नटलेल्या, प्राचीन युरोपच्या वैभवाच्या खुणा दाखवणाऱ्या कार्निव्हलला तुम्ही यंदा जाताय ना?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.