Published in the Saturday Lokasatta on 20 April 2025
...एखादं काम असो, एखादं नातं असो, देशाप्रति प्रेम असो वा आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अखंड धावणं असो जर ते आपण मनापासून केलं, प्रेमाने निभावलं आणि...
‘अरे आजकाल काय मस्त झोप लागते म्हणून सांगू. साऊंड स्लीप म्हणजे काय हे बहुदा मी आत्ता अनुभवतेय’ आमच्या टेलिफोनिक गप्पांमध्ये सुनिलाचा सूर. ‘काय म्हणतेस, माझंपण तसंच झालंय, म्हणजे हे झोपायचे दिवस नाहीत तर झोप कायमची उडण्याचे दिवस. जगात एवढं सगळं घडत असताना किंवा खरंतर काहीच घडत नसताना, व्यवसायाचा पूर्ण बोजवारा उडालेला असताना, भविष्यावर एक भलंमोठं प्रश्नचिन्ह दिसत असताना, ह्या पॅन्डेमिकमध्ये दिवसभर घरात अडकून पडलेलो असताना, झोप लागूच कशी शकते?’ आणि नुसती झोप नाही तर साऊंड स्लीपचा आनंद आम्ही अनुभवत होतो. ‘आपणा दोघींनाही हा आनंद मिळत असेल तर त्याचं काहीतरी कारण असणार, काय वेगळं केलं आपण अलीकडच्या काळात?’ चोवीस तास घरात अडकून पडलेलो असताना समथिंग डिफरंट करायला स्कोप नव्हता. विचार करता करता एकदम उत्तर गवसलं. ‘सुनिला हमारे साऊंड स्लीप की जिम्मेदार है रेणूका, येस, दॅट्स द ओन्ली थिंग वुई डिड डिफरंट’ युरेका! आम्हाला उत्तर मिळालं होतं.
ती दोन वर्षं घरात अडकलेलो असताना ऑनलाईन-ओटीटी-वेबिनार या शब्दांनी आपल्या आयुष्यात भर टाकली वेगवेगळ्या गोष्टींची. ऑनलाईन क्लासेस आणि वेबिनारच्या सेशन्सनी प्रत्येक दिवस भरून टाकला. अनेक ऑनलाईन कोर्सेसच्या जाहिरातवजा व्हॉटस्अप मेसेजेसनी आपला मोबाईल ओव्हरफ्लो होत होता. असाच एक मेसेज आमच्या टुरिझम इंडस्ट्री फ्रेंड आणि आफ्रिका या विषयाबद्दल किंवा या देशांच्या टुरिझमबद्दल संपूर्ण जाणकार असलेल्या रेणुका नातू हिच्याकडून आला. कैवल्यधाम योग इस्टिटयूटची ती सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. तेव्हा आपल्या सर्व मैत्रिणींना या ज्ञानाचा आणि ध्यानाचा उपयोग व्हावा यासाठीची तिची तळमळ. रेणुका योग शिकवणार म्हटल्यावर ते चांगलंच असणार ह्यावर पूर्ण विश्वास होता. कारण तिची टुरिझममधली सिन्सिॲरिटी आम्ही अनुभवत होतोच. तिचं प्रत्येक काम अगदी मनःपूर्वक असायचं. एकदम दिल से आणि प्यार से. रेणुकाला आम्ही दोघींनीही ‘हो’ म्हटलं, पण मला योग शिकवणं हे चॅलेंज होतं. आजपर्यंत अनेकवेळा योग इन्स्टिटयूटला वा योग टीचरला पैसे भरून दोन-तीन दिवसांत माझा उत्साह मावळल्याची अनेक उदाहरणं मी निर्माण केली होती. शेवटी ‘माझ्या अतिउत्साही मनाला शांत संयमी योग जमणं ही खूपच दूरची गोष्ट आहे, त्या फंदात आपण न पडलेलं बरं’ हा विचार माझ्या मनात पक्का झाला होता. बाकी सर्व व्यायामाचे प्रकार मी आपलेसे केले, पण योग ही गोष्ट माझ्यापासून कोसो दूर राहिली. रेणुका सकाळ संध्याकाळ योग घेत होती आणि मला ते जमायला आणि आवडायलाही लागलं. आमचा ऑनलाईन क्लास संपला, पण रेणुकाच्या सुचनांबरहुकूम आम्ही स्वतःची प्रॅक्टीस सुरू ठेवली. आज माझ्याच पाठीवर शाबासकीची थाप मारून म्हणावसं वाटतं की गेली चार वर्षं रात्री झोपण्यापूर्वी योग साधना करण्याची एक चांगली सवय जडलीय आणि ‘वयपरत्वे झोप न लागणे’ या समस्येची मी बळी पडले नाही.नुसती झोपच नाही तर गाढ झोप म्हणजे साऊंड स्लीप, शिवाय पहाटे एकदम रीफ्रेशड् अशी जाग अगदी अलार्मशिवाय यायला लागली. प्रत्येक दिवस आनंद आणि समाधानात व्यतीत व्हायला लागला. थँक्स टू रेणुका आणि थोडसं माझ्या सातत्याला. आता रात्रीचं माझं हे योग सेशन रोजच्या दात घासणं, अंघोळ करणं या नियमित गोष्टींसारखी नित्यनेमाची बाब ठरलीय. कोणाच्या धाकाने नाही किंवा त्यासाठी कुठे पैसे भरलेत म्हणून नव्हे, तर हे न चुकता रोज घडतंय कारण ते आता दिल से आणि प्यार से होतंय म्हणून. आणि सम्मान से असंही मी म्हणू शकते, कारण आता माझ्या मनात योग ह्या गोष्टीसाठी सन्मानाची भावना जागृत झालीये. भले हे खूपच उशीरा सुचलेलं शहाणपण असेल, पण म्हणतात नं की, ‘इट्स नेव्हर टू लेट!’ योग जेव्हापासून माझ्या रुटीनचा अविभाज्य घटक बनला, तेव्हापासून माझ्यात अनेक बदल झालेले मला जाणवले ते म्हणजे, चित्त ठिकाणावर आलं. शांतता, संयम आणि परिपक्वता या गोष्टींची माझ्या स्वभावात भर पडली. या सर्वांमुळे फोकस्ड अटेंशन, फास्ट डिसिजन्स, राईट सोल्युशन्स या गोष्टी घडल्या ज्याचा उपयोग मला वीणा वर्ल्ड साठी व्हायला लागला. रोजच्या आव्हानांसोबत जेव्हा जागतिक संकटांचा सामना करायला लागला तेव्हा मानसिक स्थिती मजबूत असल्याने कोण्ात्याही समस्येतून मार्ग काढणं खूप सोप्पं गेलं-आणि म्हणूनच दररोज रात्रीचं योग सेशन ही त्या यशस्वी दिवसाला वंदन करीत, देवाचे आभार मानीत, आनंदाने करण्याची एक पूजनीय गोष्ट झाली.
खरं तर दिल से! प्यार से! सम्मान से! ही आमच्या जाहिरातीतील लाईन. ‘देखो अपना देश’ हे आमचं कॅम्पेन कधीतरी तुमच्या नजरेत आलं असेल, त्यातली ही हेडलाईन. मात्र ती आमची नव्हे तर ती आहे आपल्या अतुल्य भारताची. माननीय पंतप्रधानांनी साडे पाच वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना एक आवाहन केलं होतं. आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबवताना त्यांनी म्हटलं होतं, ‘प्रत्येक भारतीयाला आपला भारत देश माहीत असला पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून गुवाहाटीपर्यंत पसरलेल्या आपल्या सुजलाम् सुफलाम् भारताची अर्थव्यवस्था मजबून राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पर्यटन केलं पाहिजे. स्टॅटिस्टिक्सनुसार, एक पर्यटक किमान आठ लोकांना वा उद्योगांना काम देतो. आपल्या भारताची अवाढव्यता आणि आपली लोकसंख्या याचा विचार करता आपणच आपल्या उद्योगांना चालना देऊ शकतो. ‘चला, एक प्रतिज्ञा करूया. येत्या तीन वर्षांत प्रत्येक भारतीयाने आपल्या भारतातील किमान पंधरा पर्यटनस्थळांना भेट देऊया.’ साधारणपणे अशा अर्थाचं ते आवाहन होतं. ज्यात त्यांनी ‘देखो अपना देश’ हे फार कळकळीने म्हटलं होतं. त्यांचं हे आवाहन आम्ही आमचं मिशन बनवलं. म्हणजे ते काम आम्ही करीतच होतो, पण आता जणू त्याला एक प्रेरणा मिळाली होती. भारतीयांना भारताचं पर्यटन घडवणं ही फक्त व्यवसायाशी निगडित गोष्ट न राहता त्याला कर्तव्य आणि ध्येय्य याची जोड मिळाली आणि आम्ही आमची दिशा पक्की केली. भारताच्या प्रत्येक जाहिरातीचं टायटल गेली अनेक वर्षं आम्ही ‘देखो अपना देश’ ठेवण्यात सातत्य राखलं. अर्थात आम्ही त्यामध्ये आमचं म्हणून एक सबटायटल दिलं, दिल से! प्यार से! सम्मान से! आणि जाहिरात बनली, ‘देखो अपना देश! दिल से! प्यार से! सम्मान से!’ आजतागायत ही जाहिरात अतिशय चांगल्या तऱ्हेने पर्यटकांकडून स्वीकारली जातेय आणि त्यामुळेच गेली अनेक वर्षं भारतीयांना भारत दाखविण्याचं काम अव्याहतपणे सुरु आहे. आता त्यात अभिमानाची भर पडलीये. कारण आता आम्ही आपल्या अनिवासी भारतीयांना आणि फॉरिनर्सनाही दिल से, प्यार से, सम्मान से आपला भारत दाखवतोय.
दिल से, प्यार से, सम्मान से हे फक्त जाहिरातीचं सबटायटल नाही तर मला ते आयुष्याचं एक महत्वाचं सूत्र वाटतं. 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत केलेलं भाषण अजरामर झालं याचं कारण त्यांनी आपली भारतीय संस्कृती, आपली परंपरा आणि भारतीय तत्वज्ञान यावर अपार श्रध्दा ठेवून मनापासून आणि आत्मीयतेने जगासमोर आपल्या हिंदुस्थानचं भव्य दर्शन घडवलं. आयुष्यभर त्यांनी कोणत्याही अहंकाराशिवाय प्रेमाने, समजूतदारपणे आणि आदरभावनेने सर्व धर्मांचा गौरव केला. त्यांचा ‘अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड!’ हा संदेश कोणत्याही सकारात्मक कामात मनःपूर्वक झोकून देण्याची शिकवण देतोय असं मला वाटतं. डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलामांनी म्हटलंय की, ‘एक्सलन्स अपघाताने घडत नाही तर ती एक सतत चालू राहणारी प्रक्रिया असते.’ आणि त्याचं जितंजागतं उदाहरण ते स्वतःच बनले. एका अतिसामान्य घरात जन्मलेले ते, कठोर परिश्रम, जे करतोय त्यावर निष्ठा, भारतावर- आपल्या देशावर अगाढ प्रेम आणि विज्ञान तंत्रज्ञानाप्रति आदर याच्या जोरावर भारताचे ‘मिसाईल मॅन’ बनले, राष्ट्रपती बनले आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचं आयुष्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्ची घालत आपल्या सर्वांसाठी एक प्रचंड प्रेरणास्थान बनले. जमशेदजी टाटा यांचं उदाहरणही आपल्याला व्यवसाय म्हणजे निव्वळ नफा नव्हे तर समाजासाठी आणि देशासाठी आपलं योगदान देण्याची बांधिलकी दर्शवणारं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पासून टाटा स्टीलपर्यंतची त्यांची संपूर्ण वाटचाल ही देशप्रेम आणि भारतीयांचा सन्मान पावलोपावली दर्शविणारी. नेल्सन मंडेलांनी सत्तावीस वर्षं तुरूंगात काढली. पण त्यासंबंधी कोणतीही कटूता न ठेवता त्यांनी शांततेचा आणि समतेचा मार्ग निवडला. कारण ते मनापासून माफ करणारे , सन्मान देणारे आणि प्रेम पसरविणारे नेते होते. मदर तेरेसा म्हणून गेल्यात की प्रत्येकाला आयुष्यात मोठं काम करणं जमणार नाही, पण जे काही छोटं मोठं काम आपण करतोय ते प्रेमाने करणं हे तर आपण निश्चितच करू शकतो. आणि हे सर्व करताना गरजूंना प्रेम देणं, त्यांची सेवा करणं आणि प्रत्येक माणसाला सन्मान देणं ही जबाबदारी मनःपूर्वक स्वीकारली पाहिजे, हे आयुष्याचं ध्येय्य असायला हवं.
‘दिल से! प्यार से! सम्मान से! हे नुसतं सूत्र नाही तर ती जगण्याची पध्दत वाटते मला. एखादं काम असो, एखादं नातं असो, देशाप्रति प्रेम असो वा आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अखंड धावणं असो, जर ते आपण मनापासून केलं, प्रेमाने निभावलं आणि सन्मानाने जगलं तर आपल्या वाटचालीतला प्रत्येक क्षण अर्थपूर्ण होईल, आनंदी होईल, त्यातून अपरंपार समाधान मिळेल. एक आहे, कधी यश मिळेल किंवा कधी यश थोडं दूर पळेल. बट नेव्हर माईंड, आयुष्य थोडंच रेड कार्पेट घालून उभं आहे आपल्या स्वागताला? पण ह्या माईंडसेटमुळे आपल्या आयुष्याचा प्रवासमात्र मस्त बनेल. आणि म्हणतात नं, मंझिलसे खुबसूरत होना चाहिये रास्ता!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.