Language Marathi

स्लीक लाइट अॅन्ड क्लीअर

‘अप इन द एअर’ ही आमची जातकुळी. जेवढा वेळ जमिनीवर तेवढाच वेळ हवेत(?) म्हणजे विमानात, हा आमचा व्यवसाय. अर्थात सततचा प्रवास आणि वेगवेगळ्या देशातली भटकंती बरंच काही शिकवून जाते…

‘हे येवढं हातातलं काम संपलं न की मी जरा फ्री होईन मग आपण आपल्या हॉलिडेला जाऊ’ म्हणता म्हणता बत्तीस वर्ष गेली आणि गेल्या वर्षी कुठे आम्ही आमच्या खर्‍या हॉलिडेला गेलो. ही अवस्था थोड्या फार फरकाने आपली सर्वांचीच आहे. कामाचं ओझं कसं कमी करायचं हा यक्ष प्रश्‍न आहे. आपण म्हणतो की आपण सर्वजण आता मल्टिटास्किंग झालोय, एकावेळी अनेक कामं आपण हातावेगळी करतो पण ही मल्टिटास्किंग अवस्था आपल्यावरचा तणाव तर वाढवत नाहीये नं हे ही तपासून पाहायला पाहीजे. हे सगळं आज आठवायचं कारण वीणा वर्ल्डचं ब्रीदवाक्य आहे ‘सेलिब्रेट लाईफ’. गेल्या वर्षीच्या वीणा वर्ल्डच्या कॅलेंडरवर लिहीलं होतं, ‘एक वर्ष, बारा महिने, बावन्न आठवडे, तीनशे पासष्ट दिवस, आठ हजार सातशे साठ तास, पाच लाख पंचवीस हजार सहाशे मिनिटे, तीन करोड पंधरा लाख छत्तीस हजार सेकंद, एन्जॉय इच वन!’ मग ह्या ‘सेलिब्रेट लाईफ’ आणि ‘सेलिब्रेट एव्हरी मोमेंट’ची आपल्याला सवय लावून घ्यायला पाहीजे. मल्टिटास्किंग ही काळाची गरज आहे. जागतिकीकरण, स्पर्धा, डिजिटलायझेशन, टेक्नो आऊटब्रेक… हे सगळं आपल्यापुढची आव्हानं आणखी मोठी करणार आहे. मल्टिटास्किंग वरून आपला प्रवास सूपर मल्टिटास्किंग कडे जाणार आहे किंवा तो ऑलरेडी गेला आहे. बाहेरचं बदलणारं जग टोटली आउट ऑफ कंट्रोल आहे आपल्या. हे जग थांबणारं नाही, मात्र आपण थांबलो तर संपलो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला पण थांबायचं नाहीये. मग नेमकं करायचं काय आणि ह्या वस्तुस्थितीला हसत हसत झेलत धैर्याने तोंड कसं द्यायचं हे आपल्या प्रत्येकाला शिकायचंय.

‘अप इन द एअर’ ही आमची जातकुळी. जेवढा वेळ जमिनीवर तेवढाच वेळ हवेत(?) म्हणजे विमानात, हा आमचा व्यवसाय. अर्थात सततचा प्रवास आणि वेगवेगळ्या देशातली भटकंती बरंच काही शिकवून जाते. आता हेच बघानं, प्रवास जास्त म्हणून अनेक एअरलाईन्सच्या एअरक्राफ्टस विषयी खुप काही माहिती मिळते. पूर्वीची एअरक्राफ्टस आणि आत्ताची ह्यामध्ये सगळ्यात मोठा बदल कोणता असेल तर तो डिझाइनमध्ये. पूर्वीच्या विमानाच्या सीट्स खूप मोठ्या जाड अगदी बल्की अशा प्रकारच्या होत्या. आत्ताच्या विमानातल्या सीट्स ह्या एकदम लाइटवेट स्लीक अशा झाल्या आहेत. आता त्यांच्याकडे बघितलं की वाटतं हा विचार पूर्वीच का नाही झाला? का येवढं वजन घेऊन ही विमानं आकाशात झेप घेत होती. जेवढं वजन जास्त तेवढं इंधन जास्त, आणि इंधन जास्त म्हणजे पैसे जास्त. शेवटी तो भार प्रवाशांवर किंवा मग नुकसानीवर. अर्थात प्रत्येक डेव्हलपमेंटला वेळ जातोच पण आता ह्या अशा डेव्हलपमेंट्सही वेगाने होत आहेत. विमानकंपन्यांनी जसं फुकाचं ओझं कमी केलं तसं आपल्यालाही करायला हवं नाही का? आपण करीत असलेली कामाची पध्दत वर्षानुवर्ष बरोबर वाटत असली तरी कदाचित आणखी चांगली पध्दत शोधून काढून आपण सर्वांचे श्रम वेळ आणि त्यायोगे पैशांची बचतही करू शकतो पण आपण तो विचारच करायला धजावत नाही कारण जे चाललंय ते चांगलं आहे नं, त्यात बदल करायचा म्हणजे प्रत्येकाला नव्याने शिकवावं लागणार, नवीन गोष्टी कराव्या लागणार, त्यापेक्षा आहे ते बरं आहे. व्हाय टू चेंज? हा असतो आपला कम्फर्ट झोन आणि त्यातून बाहेर यायला आपल्याला अजिबात आवडत नाही. पण ह्या थोड्या चेंजमुळे आपलं आयुष्य आणखी छान होऊ शकतं ह्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आज येणार्‍या आव्हानांना झेलण्यासाठी आपल्याला आपल्या एकुणच जीवनशैलीकडे नव्याने पाहायला हवं, मग ते कौटुंबिक असो किंवा व्यावसायिक. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे आणि अधिक चांगले मार्ग उपलब्ध असतात किंवा आहेत आणि ते आपण जोखायलाच हवेत, तशी आपली मानसिकता निर्माण करायला हवी, ती काळाची गरज आहे. ‘परफॉर्म ऑर पेरिश’चं जग आहे आणि ह्या नव्या जगात निभाव लागण्यासाठी आपल्याला स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या परिवाराला तयार करायचंय. नो ऑप्शन.

मल्टिटास्किंग किंवा सुपरमल्टिटास्किंग ही जीवनशैली सुध्दा अपरिहार्य आहे. आपल्याला चॉइस नाहीये. हे करावंच लागणार आहे मग त्यासाठी थोडे बदल करावे लागणार आहेत. एकावेळी अनेक कामं जेव्हा आपण करीत असतो तेव्हा खरंतर खूप गोंधळ उडतो, नेमकं कुठे बघू? कशावर एकाग्र होऊ? हेच कळत नाही आणि गोंधळ आणखी वाढतो. ह्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही वीणा वर्ल्डच्या टेन कमांडमेट लिहिल्या आहेत आणि त्या आत्मासात करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातली एक कमांडमेंट ह्या गोंधळलेल्या मानसिक अवस्थेला काबूत ठेवण्यासाठी सहकार्य करते आणि ती आहे ‘अ‍ॅम आय फोकस्ड अँड इन कंट्रोल?’ दिवसाला पंचवीस कामं करायची असतील तरी एकावेळी मला एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचंय आणि जेव्हा मी असं एकाच कामावर एकाग्र होते तेव्हा त्या कामासाठी आवश्यक असणारे माझे विचार त्या कामाकडे पुर्णपणे वळविण्यावर माझा ताबा असला पाहीजे नाहीतर काम हातात घेतलंय खरं पण विचार भलतीकडे किंवा पुढच्या कामावर असतील तर हे हातातलं काम पूर्ण व्हायला आणखी वेळ लागेल. त्यामुळे प्रत्येक काम एकाग्रतेनेे जास्तीत जास्त लवकर हातावेगळं करून नंतर दुसरं काम हातात घेणं आणि पुन्हा ‘अ‍ॅम आय फोकस्ड अँड इन कंट्रोल?’ कमांडमेट वापरून तेही काम हातावेगळं करणं हे जास्त आनंद देणारं तर ठरतंय पण त्यामुळे एकापाठोपाठ एक कामं संपवायला उत्साहही मिळतो. अर्थात एक काम संपवून आपण दुसरं काम जेव्हा हातात घेतो तेव्हा मध्ये काही क्षणांची किंवा वेळाची विश्रांती घेऊन पहिल्या कामातून मेंटली फिजिकली बाहेर पडून दुसरं काम हातात घेणं महत्वाचं. ही जी मधली विश्रांती असते त्याला आम्ही ‘कॉफी स्मेल’ असं म्हणतो. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी असेल जेव्हा मी पहिल्यांदा इजिप्तला गेले होते तेव्हा तिथे आमचा गाईड आम्हाला एका परफ्यूम फॅक्टरीत घेऊन गेला. तिथे अनेक परफ्यूमचा सुगंध ते आम्हाला देत होते. आणि मध्ये कॉफी पावडर हुंगायला सांगत होते जेणेकरून आधीचा सुवास मरून जावा आणि नवीन सुगंध घ्यायला आपलं नाक तयार व्हावं. सो, हा ‘कॉफी स्मेल’ आम्ही कधीच विसरत नाही. अर्थात हे सगळं लिहिलंय तेवढं सोप्प नाहीये ह्याची मला जाणीव आहे पण प्रयत्न करीत राहणं हे आपलं काम आहे, आणि मनापासूनचे प्रयत्न असतील तर अशक्य काहीच नाही हे ही आपण सर्वांनीच अनुभवलंय. आता इथली जागा समाप्तीची घोषणा, त्यामुळे हा विषय पुन्हा कधीतरी… लेट्स बी रेडी फॉर द फ्यूचर व्हाइल सेलिब्रेटींग लाईफ!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*