IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

रॉयल अफेअर

8 mins. read

‘ससेक्स रॉयल’ ह्या ब्रॅन्डची मालकी नक्की कुणाची यावरुन सध्या ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीमध्ये वाद सुरू आहे. हल्लीच आपल्या राजघराण्यातील पदांचा त्याग करत प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांनी आपण ब्रिटीश राजघराण्यातून विभक्त होत असल्याची घोषणा केली. आता ते इंग्लंड व नॉर्थ अमेरिकेत राहणार असल्याचेही नमूद केले. प्रिन्स हॅरी म्हणजे ‘ड्युक ऑफ ससेक्स’ आणि त्याची पत्नी प्रसिद्ध हॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस मेगन मार्कल म्हणजेच ‘डचेस ऑफ ससेक्स’ ह्यांनी ‘ससेक्स रॉयल’ या ब्रॅन्डचा ट्रेड मार्क मिळविण्याचा अर्ज दाखल केला होता. पण जर ते शाही ऑफिसचाच भाग नसतील तर हा ट्रेडमार्क वापरणे कितपत योग्य आहे या मुद्याने सध्या ग्रेट ब्रिटनला ग्रासले आहे. एका बाजूला आपण अत्याधुनिकतेची नवी शिखरे गाठत प्रगती करत आहोत आणि दुसर्‍या बाजूला हजारो वर्षांची परंपरा जपण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे.  ‘मोनारकी’ किंवा ‘राजेशाही’ ही सुद्धा हजारो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे आणि आता त्याला नवे रुप मिळत आहे. प्रिन्स हॅरीची आजी म्हणजे ‘क्वीन एलिझाबेथ द्वितीय’, ही त्र्याण्णव वर्षांची असून गेली अडुसष्ट वर्ष कारकिर्दित आहे व जगातील सर्वात दीर्घवेळ राज्य करणारी ती ब्रिटिश रॉयल ठरते. पण तिच्या सोबतीला चाळीस देशांवर राज्य करणार्‍या एकोणतीस मोनारकीस् आजसुद्धा जगात बघायला मिळतात. इतक्या मॉडर्न समाजाला आजच्या काळात सुद्धा अशा रॉयल्टीची खरंच गरज आहे का? किंवा कल्पना करा की हे राजेशाही घराणेच नसते तर काय झाले असते? लंडनच्या टूरचा अविभाज्य भाग असलेला ‘बकिंगहॅम पॅलेस’ समोरचा ‘चेंजिंग द गार्ड’ सेरिमनीच नसता तर खरंच लंडन आपल्या ओळखीतले लंडन शहर वाटले असते का? लहानपणी ऐकलेल्या राजा-राणीच्या कथेतील राजमहालांशिवाय आपले बालविश्‍वही जरा सुनेसुनेच वाटले असते नाही का?

बहुतेक भारतीय पर्यटकांचे स्वप्न असते ते युरोपला भेट देणे. खरंतर युरोपसोबतच भारत, जपान, चीनसारखे काही देश सांस्कृतिकरित्या अधिक परिपूर्ण आणि श्रीमंत जाणवतात ते त्यांना लाभलेला राजा-महाराजांचा, गड-किल्ल्यांचा पराक्रमी इतिहास, तिथल्या पॅलेस-कॅसल्सचा थाट ह्या सर्वांमुळेच. आपल्यालाही पर्यटनाचा आनंद पुरेपूर उपभोगू देण्यात ह्यांची महत्त्वाची भूमिका.  म्हणूनच तर एखाद्या देशाच्या भूगोलाने व इतिहासाने पर्यटनाच्या बाबतीत त्या देशाची लोकप्रियता ठरते असं म्हणतात ते १०० टक्के खरंय.

युरोपचाच विचार केला की डोळ्यासमोर अत्याधुनिक शहरे व उत्तम इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर उभे राहते ते या शहरांच्या ओल्ड टाऊनचे चित्र. एखाद्या परिकथेप्रमाणे तटबंदी केलेल्या या प्राचीन भागात कॉबल्ड स्टोनचे रस्ते, त्यावर उभारलेल्या ट्रेडिशनल इमारती, पॅलेसेस्, जुन्या मशाली, घोडागाडी इ. आजसुद्धा बघायला मिळतात. गेल्या काही वर्षांत भेट दिलेल्या देशांपैकी एक देश ज्याची माझ्यावर छाप पडली तो म्हणजे ‘क्रोएशिया’. एड्रियाटिक समुद्राच्या पूर्वेकडे स्थित क्रोएशियाची राजधानी झाग्रेब. झाग्रेबचे ‘ओल्ड टाऊन’ म्हणजे ‘अप्पर टाऊन’ आपल्या सौंदर्याने पर्यटकांना नक्कीच प्रभावित करून सोडते. इथले डोलाक मार्केट, सेंट मार्क चर्च, स्टोन गेट (कामेनिता व्राता) कॅथिड्रल आणि त्यामध्ये आगळे-वेगळे नव्या पीढीचे प्रतिक म्हणजे म्युझियम ऑफ ब्रोकन रीलेशनशिप्स... ह्या सर्व गोष्टी मोहक वाटतात आणि प्रवासात हे एक शांत पण चार्मिंग टाऊन वाटते. ‘सेंट मार्क स्क्वेअर’ हे झाग्रेबच्या अपर टाऊनचे आणि झागे्रब शहराचेही प्रतिक आहे. या स्क्वेअरच्या मधोमध सेंट मार्क चर्च आहे, ज्याच्या छतावर क्रोएशिया, डाल्मेशिया आणि स्लोव्हेनिया या त्रिपक्षीय राज्याचे ‘कोट ऑफ आर्मस्’ बघायला मिळते. झाग्रेबच्या अपर टाऊनचे हे प्राचीन वातावरण तसेच ठेवण्यासाठी इथे आपल्याला गॅसच्या कंदिलांचा वापर केलेला पहायला मिळतो. दीडशे वर्षांपासून झाग्रेबच्या अपर टाऊनचे रस्ते गॅस कंदिलाने प्रकाशित केले जातात. आजसुद्धा इथे ‘गॅस लॅम्प मेन’ आपली ड्युटी नेमाने पार पाडत रोज संध्याकाळी हे कंदिल हाताने लावतात व रोज सकाळी हे कंदिल बंद करतात. या प्रकाशाने झाग्रेबच्या अपर टाऊनचे संध्याकाळी एका रोमँटिक चार्मिंग शहरात रुपांतर होते. असे अधिक सुंदर दिसणारे हे शहर अनेक कवींची प्रेरणाही बनलंय. पर्यटक या नजार्‍याचा आनंद तर लुटू शकतातच शिवाय या ‘गॅस लॅम्प मेन’च्या कामाचा फर्स्ट हॅन्ड अनुभव घेत त्यांच्याबरोबर लॅम्प लावत अपर टाऊन मध्ये रोशणाई करत सुद्धा फिरू शकतात.

क्रोएशियाचे सर्वात प्रसिद्ध शहर म्हणजे डुब्रोव्हनिक. या शहरात पोहोचताच मी या शहराच्या प्रेमात पडले. खडकाळ लाईमस्टोन पर्वतांच्या पार्श्‍वभूमीवर एड्रियाटिक सागरात घुसून डुब्रोव्हनिक शहराचे ओल्ड टाऊन हे जगातील सर्वात उत्तमप्रकारे संरक्षित असलेल्या मध्ययुगीन शहारांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते. ११ व्या व १७ व्या  शतका दरम्यान बांधल्या गेलेल्या भव्य दगडांच्या भिंतींमुळे डुब्रॉव्हनिकचे ओल्ड टाऊन सुरक्षित राहू शकले, आणि शक्तिशाली व्हेनिस शहराला सुद्धा व्यापारात तोडीची स्पर्धा करू शकले. डुब्रोव्हिनक ओल्ड टाऊनच्या या भक्कम दगडी तटबंदीच्या भिंतींवर चालताना आपल्याला एच.बी.ओ च्या प्रसिद्द ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या फॅन्टसी मालिकेतील किरदार असल्याचा भास नं झाला तर नवलंच. आजसुद्धा या शहरातील ओल्ड टाऊनचे रस्ते रोज रात्री धुतले जातात. ओल्ड टाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत फेरफटका मारताना तिथली ही स्वच्छता मोहिम पाहतो तेव्हा खरंच तिथल्या लोकांचं खूप कौतूक वाटतं. तसंच इथल्या अनेक रेस्टॉरंट्स,बारमध्ये आपण रात्री उशिरापर्यंंत बसण्याचा व जेवणाचा आस्वादही घेऊ शकतोे. तसंच डुब्रोव्हनिक शहरातर्फे वीकेन्डला ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये तिथे राहणार्‍या नागरिक आणि पर्यटकांसाठीही मोफत गाण्याचे कॉन्सर्ट आयोजित केले जातात.  युरोपमधल्या जवळ-जवळ प्रत्येक शहरात तिथले ओल्ड टाऊन, त्यातले टाऊन स्क्वेअर, चर्च, कॅथिड्रल व पॅलेस तर बघायला मिळते. ‘स्क्वेअर’ या शहरांची जणू ओळख बनले आहेत. त्यांचा शहराच्या सामाजिक जडणघडणीत मोठा सहभाग ठरतो. इथेच फार्मस् मार्केट्स, इतर व्यापार व सोशल मीटिंग्ज घडतात. अनेक स्क्वेअर्समध्ये वाहनांची वाहतूक बंद केल्याने आरामात पायी फेरफटका मारण्यासाठी ही उत्तम जागा आहे. मग ते व्हेनिसचे पिआझ्झा सॅन मारको असो, ब्रसेल्सचे ग्रँड प्लेस असो किंवा बेल्जियम मधल्याच अतिशय रोमँटिक ब्रुज शहरातले स्क्वेअर असो. ब्रुजेस या शहरात कॅनल सिस्टम व त्यातून वाहतूक करणार्‍या बोटी, हिरव्यागार झाडांची लागवड केलेले अ‍ॅव्हेन्यूस्, रस्त्यांसोबतच त्यावरून फिरण्यासाठी असलेली टापटीप व सुंदर घोडागाडी पर्यटकांवर मोहिनी टाकण्यात हमखास यशस्वी ठरतात.

असे ओल्ड टाऊन पाहिले की त्या काळातले राज्य कसे चालत असेल, राजा-राणीचे राहणीमान कसे असेल असा देखील प्रश्‍न पडतो. ह्याचे उत्तर फ्रान्सच्या अनेक पॅलेसेस् व शॅटूजची सैर करताना सापडते. व्हर्साय पॅलेसला भेट देताना राजाच्या बेडरूममधला छोटा बेड पाहून आश्‍चर्य वाटलं तेव्हा गाईडने समजाविले की बहुतेक राजे सावधान राहण्यासाठी बसल्या-बसल्याच झोपायचे. पॅरिसपासून केवळ दोन-तीन तासांवर लुआर व्हॅलीमध्ये अनेक एकसे एक शॅटूज बघायला तर मिळतातच पण आपण इथे राजेशाही थाटात वास्तव्यसुद्धा करू शकतो. आपल्या भारतातसुद्धा भारतीय व फॉरिन पर्यटकांच्या आवडत्या  लक्झरी हॉटेल्समध्ये आपल्याकडच्या अनेक पॅलेस हॉटेल्सनीच अग्रक्रम पटकावलाय. उदयपूरच्या लेक पिचोलामध्ये थाटात उभे असलेले ‘उदयपूर लेक पॅलेस’ हे जगातील सर्वात रोमँटिक हॉटेल म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर भारतात अनेक पॅलेसेस् आणि हवेल्या आपल्याला एका रॉयल हॉलिडेचा अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये सुद्धा अनेक कॅसल्समध्ये आपण वास्तव्य करू शकतो. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये घराणेशाहीचा थाट  दाखविण्यासाठी एखाद्या खानदानी श्रीमंती व्यक्तिरेखेच्या घराची भूमिका या कॅसल्सने बजावली आहे. त्यातले काही अगदी छोटेसे आहेत तर काही अगदी प्रशस्त दिसतात. आयर्लंडच्या एशफर्ड व ड्रोमोलँड कॅसलला भेट दिली तेव्हा मला त्या कॅसलच्या रूम्सपेक्षाही तिथले कॅसल ग्राऊंड्स फार आवडले. लेकस्, गॉल्फ कोर्सेस, घोडे सवारी करण्यासाठी उत्तम मैदाने या कॅसलच्या भोवती दिसतात. मला आठवते इथे एखाद्या राजघराण्यात असल्याप्रमाणेच आम्ही हातावर फाल्कन्स्ना बसवून ‘बर्डस् ऑफ प्रे’ टूर केली होती. तेव्हा फाल्कन्स्, हॉकस्, ओऊल्स व इतर शिकारी पक्ष्यांच्या जगातली झलक आम्हाला अतिशय आवडली.

एखाद्या देशाच्या इतिहासानं तिथल्या कल्चर, आर्किटेक्चर, राहणीमान, भाषा आणि पर्यटनावर फरक पडतो. तसं पाहिलं तर काही साम्राज्यांनी दुसर्‍या देशांत जाऊन त्या देशांवर राज्य करत आपल्या कला-परंपरेची छापही त्या देशांवर सोडली. इथे ब्रिटिश आणि युरोपीयन कॉलनीज् ही  महत्त्वाची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. अगदी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाच बघा नं. या देशांमधील कोलोनियल आर्किटेक्चर या अत्याधुनिक शहारांनासुद्धा एक पारंपरिक वलय देतात.

रॉयल ट्रीटमेंट तर आपल्या सर्वांनाच आवडते मग ती वैयक्तिक टूर असो की बिझनेस ट्रिप असो. गेल्या महिन्यातच फ्रान्समधल्या शॅटूमध्ये आम्ही एका कॉर्पोरेट ग्रुपसाठी कॅसलमधले गाला डिनर आयोजित केले होते. त्याचबरोबर कॅसल्स्  आणि खासकरून भारतातील पॅलेसेस्मध्ये डेस्टिनेशन वेडिंगची मागणीही वाढतेय. आज ह्या राजघराण्यात राहणार्‍यांना सर्वसामान्य लोकांचं आयुष्य जगण्याची ओढ दिसून येतेय, ते त्यासाठी प्रयत्नही करतायत. मग चला आपणही आपल्या सर्वसामान्य आयुष्यात एखाद्या रॉयल हॉलिडेचा एक्सपीरियन्स घेऊन आपल्याही आयुष्याला एक रॉयल टच देऊया. सो लेट्स प्लॅन युअर नेक्स्ट रॉयल हॉलिडे!

February 23, 2020

Author

Sunila Patil
Sunila Patil

Sunila Patil, the founder and Chief Product Officer at Veena World, holds a master's degree in physiotherapy. She proudly served as India's first and only Aussie Specialist Ambassador, bringing her extensive expertise to the realm of travel. With a remarkable journey, she has explored all seven continents, including Antarctica, spanning over 80 countries. Here's sharing the best moments from her extensive travels. Through her insightful writing, she gives readers a fascinating look into her experiences.

More Blogs by Sunila Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top