जगाच्या टोकावर पोहोचायचं, अथांग सागराला नजरेत साठवताना डोळे बंद करायचे, एकचित्त व्हायचं आणि गायत्री मंत्र म्हणायचा. डोळ्यातून नकळतपणे आनंदाचे समाधानाचे अश्रू पाझरायला लागतात त्याना तसंच पाझरू द्यायचं, शांत व्हायचं. ही असते अचिव्हमेंट. जगाचं प्रत्येक टोक गाठायचं आणि तिथे गायत्री मंत्र म्हणायचा हे माझं मीच घेतलेलं चॅलेंज, पोलर चॅलेंज. केप ऑफ गूड होप, केप कॅमोरिन, नॉर्थ केप...बरीच टोकं पालथी घातली आणि बरीच अजून खुणावताहेत
अॅज अ ‘ट्रॅव्हलर’ माहीत नसलेल्या ठिकाणी जाऊन पदोपदी नवनव्या गोष्टी जाणून त्याने चकित व्हायला आम्हाला खूप आवडतं. काही वर्षांपूर्वी असंच आम्ही एक दिवस नॉर्वेचं विमानाचं तिकिट काढलं, आणि पोहोचलो ऑस्लोला. पूर्वी ऑस्लोला गेलो असल्याने माहितीचं शहर होतं, पुन्हा एकदा व्हीजलँड पार्कला भेट दिली आणि दुसर्या दिवशी निघालो ट्रॉम्सोकडे कारण नॉदर्न लाइट्सचा प्रवास तिथून सुरू होणार होता. पहिल्यांदाच एवढ्या थंडीत हा स्कॅन्डिनेव्हियाचा प्रवास आम्ही करणार होतो. नॉदर्न लाइट्सचा सीझन सुरू व्हायच्या आधीच आम्ही तिथे पोहोचल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. फक्त तीन ते चार तासांचा दिवस, ट्रॉम्सोची अर्धी जनता घरात नाहीतर बीयर बारमध्ये किंवा पबमध्ये. तिथल्या टूरिझमच्या लोकांना आम्ही भेटलो. भारतातून इथे टूरिस्ट घेऊन येण्याची आमची इच्छा त्यांना सांगितली आणि त्यांनी आम्हाला तुम्ही कसा प्रवास करा ह्याची संपूर्ण माहिती दिली. विमानाच्या तिकिटांचं रीझर्वेशन करून दिलं आणि जसं हॉलिवूडच्या सिनेमात दाखवतात तसा आमचा प्रवास पार पडला. बर्फाने आच्छादलेली शहरं, रस्त्यावर कुणीही नाही. मधूनच मुख्य रस्त्यावरून ये-जा करणार्या गाड्या किंवा त्यांचे आवाज, अक्षरश: शुकशुकाट. मॉलमध्ये किंवा ऑफिस बिल्डिंगमध्ये तेवढा लोकांचा वावर. कधी कधी प्रश्न पडायचा, ‘कसे राहतात इथे लोकं?’ ट्रॉम्सोपासून नॉर्थ केप पर्यंत आम्ही विमानाने-बोटीने असा प्रवास केला.
बर्फाच्छादित नॉर्थ केपच्या व्हिजिटर सेंटरवरून नॉर्थ पोलकडे एकचित्त होऊन पहायचं होतं. इथून नॉर्थ पोल साधारण अडीच हजार किलोमीटर्सवर आणि मध्ये फक्त पाणी. त्यामुळे जगाच्या टोकांवर उभं राहण्याचा आनंद जो काही असतो तो अगदी मनमुराद लुटला. ह्याच प्रवासात आम्ही पहिल्यांदा हस्की राईड केली. एस्किमो असल्याचा फील आला अक्षरश: आजही हे हस्की राईड अॅडव्हेंचर आठवलं की तेवढाच आनंद होतो जेवढा अॅक्च्युअली ती राईड करताना झाला होता. आम्ही आमची ही साहसी सहल पूर्ण केली ती नॉर्दन लाइट्स बघून. आकाशात होणारी रंगांची उधळण बघणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि आम्ही ते साध्य केलं. मला नेहमीच टूरिझममध्ये असल्याचा अभिमान वाटतोच पण आपण खूप नशीबवान आहोत असं जास्त वाटतं. निसर्गाचे, इतिहासाचे, भूगोलाचे, माणसांचे, देशांचे... अनोखे आगळेवेगळे अनुभव घेताना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आम्ही ह्या नॉर्दन लाइट्सच्या कायम आठवणीत राहिल अशा सहलीवरून परत आलो आणि भारतातून नॉर्दन लाइट्सच्या सहली सुरू केल्या.
आता नॉर्दन लाइट्स-पोलर सर्कल, आर्क्टिक रीजन, ह्याविषयी थोडक्यात जूजबी माहिती मिळवूया. नॉर्थ पोल म्हणजे कोणाचीही, कोणत्याही देशाची मालकी नसलेला जगातल्या शेवटच्या वसाहतींपासून सुमारे अडीच हजार किलोमीटर्सवर असलेला उत्तर ध्रुव. आपल्या सर्वांच्या डोक्यावर असलेला हा भाग. आर्क्टिक महासागर आणि लहानमोठ्या समुद्रांनी वेढलेला. ह्या पोलर रीजनमध्ये म्हणजे नॉर्थ पोलच्या जवळ असणारे देश म्हणजे अलास्का (युएसए), कॅनडा, ग्रीनलँड (डेन्मार्क), आइसलँड, नॉर्वे, रशिया, फिनलँड आणि स्वीडन. ह्या आठ देशांपैकी फिनलँड आणि स्वीडनला डायरेक्ट अॅक्सेस नाहीये पण आर्क्टिक कौन्सिलचा ते भाग आहेत. सायबेरिया, युकॉन, ट्रॉम्स, लॅपलँड, टुंड्रा प्रदेश, इनूइट्स, एस्किमो, सामी, इग्लू अशी सगळी शाळेत शिकवलेली नावं ह्या आर्क्टिक पोलर रीजनमधलीच. इथे दोनच प्रकारचं हवामान, थंड आणि अतिथंड. पोलर बेअर, स्नो आऊल, आर्क्टिक फॉक्स, आर्क्टिक वुल्फ ह्यांच्या गोष्टींनी आपलं बालपण सजलं होतं तेही सारे इथलेच प्राणी. इनूइट्स, एस्किमो, सामी असे अनेक नावांनी ओळखले जाणारे इथले रहिवासी आजही तेवढंच खडतर आयुष्य जगताहेत. गरीबी-दारिद्य्र-रोगराई ह्यांनी ग्रासल्याने, कॅनडा स्वीडनमध्ये माणसाचा लाईफ स्पॅन जर पंच्याऐंशी वर्ष असेल तर तो इथे ह्या पोलर रीजनमध्ये साठहून खाली आहे. तिथे पुरुषाने शिकार करून आणायची आणि बाईने रांधायचं, जेवण सगळ्यांना पुरेसं नसेल तर स्वतः उपाशी रहायचं अशा पद्धती आहेत आपल्यासारख्या. तेल, वायू, खनिजं, गोड पाणी आणि मासे ही संपत्ती आहे पोलर रीजनची. जगातला गोड्या पाण्याचा दहा टक्के साठा आर्क्टिकमध्ये आहे. पण आता एकच धास्ती आहे ती ग्लोबल वॉर्मिंगची. सतत बर्फाळलेला हा प्रदेश तीस वर्षांनी उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ विरहीत होईल, म्हणजे आर्क्टिकमधला बर्फ बघायचा असेल तर आपल्याला उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये जाता येणार नाही. हा प्रंचड बर्फाचा साठा वितळल्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि त्याने काही नवीन आव्हानं आपल्यापुढे उभी राहतील. आपण अतिप्रगत लोकं उत्सर्जित करीत असलेल्या कार्बन डायऑक्साइडचा हा प्रसाद किंवा प्रताप. असो. तो खूपच मोठा विषय आहे आणि तज्ञ मंडळी त्यावर काम करताहेत, अर्थात त्यांनी दिलेल्या गाईडलाइन्सने वागणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे पुढचा अनर्थ टाळण्यासाठी.
पोलर रीजनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात (मे ते सप्टेंबर) मिडनाइट सनच्या वेळी जून जुलैमधला चोवीस तासांचा दिवस आपल्याला बघायला मिळतो, तर थंडीच्या दिवसात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) डिसेंबर जानेवारीत ह्याच ठिकाणी आपण बघतो चोवीस तासांची रात्र. सतत अंधारात असणार्या ह्या थंडीच्या दिवसांमध्ये नॉर्दन लाइट्सचा चमत्कार म्हणजे निसर्गाचा आशिर्वाद म्हणायला हरकत नाही, त्याद्वारे जगभरच्या पर्यटकांची ये-जा इथे सुरू राहते आणि इथल्या इकॉनॉमीला मदत होते. नॉर्दन लाइट्स म्हणजे ‘ओरोरा बोरेआलिस’. ओरोरा म्हणजे रोमन भाषेत सूर्यदेवता तर बोरेआलिस हा उत्तरी वारे दर्शविणारा ग्रीक शब्द. आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील वेगवेगळे वायू आणि सोलर विंड्स ह्यांची अवकाशात जेव्हा टक्कर घडते तेव्हा मोठा आवाज होतो आणि त्या कोलिझनमुळे वेगवेगळ्या रंगांची उधळण आपल्याला आसमंतात दिसते ह्या पोलर रीजनमधून. हिरवा, पिवळा, गुलाबी रंग आसमंतात असा पसरलेला बघणं हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा. जेव्हा शास्त्रीय कारण शोधलं गेलं नव्हतं तेव्हा तिथल्या रहिवाशांच्या मते ‘हा रंग किंवा आवाज म्हणजे त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचा आत्मा असतो’ किंवा ‘आपल्या मृत आप्तांचा आत्मा आपल्याशी संवाद साधतो’ अशा समजूती होत्या आणि काही ठिकाणी अजूनही तसं मानलं जातं. पण हा नैसर्गिक चमत्कार बघायला आता मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक जायला लागलेत हे मात्र खरं.
अद्भुत, अप्रतीम, अनोखं, चमत्कारीक, विशाल असं हे जग बघायला एक आयुष्य अपूरं आहे. जेवढं जमेल तेवढं बघून घ्यायचं आणि सर्वांना दाखवायचं हा वसा घेतलाय. तुमच्यासाठीच नाही तर आमच्यासाठीही सतत बॅक ऑफ द माईंड एकच मंत्र असतो. ‘चलो! बॅग भरो, निकल पडो!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.