IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10AM - 7PM

सिम्प्लिफाय! ॲम्प्लिफाय!

18 mins. read

Published in the Sunday Sakal on 06 April 2025

मागे एकदा नील आणि हेताकडे गेलो होतो. म्हणजे आमचा मोठा मुलगा आणि सूनबाई. आमच्या घराचा मुलांनी आणि आम्ही केलेला एक नियम आहे. लग्न झालं की मुलांनी वेगळं रहायचं. तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करा आणि आम्ही आमचं. बाकी आपण आहोत एकमेकांचे एकमेकांसाठी. नील वेगळा राहायला गेला तेव्हा भारतीय आईवडील असल्याने बऱ्यापैकी गिल्ट वाटत होतं. त्या गिल्टमध्येच आमच्या धाकट्याला, राजला विचारलं, ‌’तुला काय वाटतं एकत्र रहावं की वेगवेगळं?‌’ त्याचं स्पष्ट शब्दात एका वाक्यात उत्तर, ‌’मम, एकत्र रहायचं नाही.‌’ आता हा निर्णय घेऊन तीन वर्षं झाली आणि हा निर्णय खूपच चांगला घेतला गेला हे आम्हा सर्वांनाच पटलं. एका निर्णयाने आयुष्य सुकर झालं. वेळ कुठे आहे ‌’तू का असं बोललीस‌’ आणि ‌‘त्याने का असं केलं‌’ यावर काथ्याकूट करायला? जे काही आयुष्य आहे ते आनदांत जगूया. जेवढ्या गोष्टी सुलभ करता येतील तेवढ्या करूया. या निर्णयामुळे व्यर्थ खिटपीट करण्यात खर्च होणारा वेळ आणि शक्ती पूर्ण वाचली, जी आम्हा सर्वांना चांगल्या कामासाठी वापरता आली. असो. तेव्हाच्या नील हेताच्या भेटीत बऱ्याच गप्पा झाल्यानंतर हेता म्हणाली, ‌’मॉम यू मस्ट सी धिस, वुई ऑर्गनाईज्ड रिमोट्‌‍स. बेडरूमध्ये टीव्हीचा रिमोट, साऊंड सिस्टिमचा रिमोट, ॲपल रिमोट माझ्या साईडला ठेवायचे की नीलच्या साईडला हा नेहमी प्रश्न असायचा. कधी मनात आलं म्युझिक लावावं तर रिमोट नेमका त्या दुसऱ्या साईडला. यावर सोल्युशन काढायचं ठरवलं आणि आम्ही सगळे रिमोट  बेडच्या मध्यावर लावले. ॲमेझॉनवर आम्हाला हे सोल्युशन मिळालं.‌‘ ‌’वाह! क्या बात है!‌‘ त्यांना दाखवलं नाही पण मनातून मी खूप खूश झाले. एकमेकांच्या सहाय्याने आणि संमतीने आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर सोल्युशन्स काढण्याची सवय खूप चांगली आहे. ही छोटी छोटी सोल्युशन्स मोठा आनंद मिळवून देतात.

अनावश्यक गोष्टींमध्ये उगाचच खर्च होणारा वेळ वाचविण्यासाठी आणि तोच वेळ चांगल्या कामात वापरण्यासाठी लोकांनी काय काय केलंय. अल्बर्ट आईनस्टाईन नेहमी एकाच रंगाचे, एकाच प्रकारचे कपडे घालायचा. त्याचा प्रश्न, ‌‘व्हाय मेक इट कॉम्प्लिकेटेड?‌‘ ग्रे कलरचा सूट, लेदर जॅकेट, सॉक्स न घालता पायात शूज हा पोशाख त्याने आयुष्यभर आपलासा केला आणि काय कपडे घालायचे ह्या स्ट्रेसपासून तो मुक्त राहिला. अर्थात त्याच्याकडे एकाच प्रकारच्या कपड्यांचे अनेक सेट्‌‍स होते. स्टीव्ह जॉब्ज ने ॲपलचा लोगो असलेला काळा टर्टल नेक टी शर्ट आणि ब्लू जीन्स ही स्टाईल इसे मियाके ह्या जपानी फॅशन डिझायनरकडून बनवून घेतली होती. त्याचं म्हणणं, ‌’आज काय कपडे घालायचे? या डिसीजनमध्ये जाणारा वेळ मी वाचवला, तो इतर गोष्टींसाठी वापरला आणि डिसिजन फटिगमधनं स्वतःची सुटका केली.‌‘ आपल्याला माहितीये स्टीव्ह जॉब्जचा हा ड्रेस जगात पॉप्युलर झाला, आयकॉनिक बनला. फेसबुक किंवा मेटा चा फाउंडर मार्क झुकरबर्ग ने स्टीव्ह जॉब्जच्या पावलावर पाऊल ठेवलं. त्यानेही ग्रे टी शर्ट जीन्स आणि स्निकर्स या तीन गोष्टी जवळ केल्या. त्याचा हा ड्रेस इटालियन डिझायनर ब्रुनेल्लो कुचिनेली ने बनवलेला आहे. मार्क झुुकरबर्गच्या म्हणण्यानुसार, एकच ड्रेस घालण्याचं कारण आपली शक्ती इतर महत्त्वाच्या कामांवर केंद्रित करता येते. ह्या मंडळींनी हे ड्रेसेस डिझाईनरकडून बनवून घेतले कारण त्यांना कोणी त्याची कॉपी केलेली नको होती. ॲपलचा सध्याचा सीईओ टिम कूक म्हणे दररोज चिकन राइस सॅलड खातो. त्याचंही तेच म्हणणं, सिलेक्शन करण्यात एवढा वेळ का वाया घालवायचा? ही जगज्जेती माणसं किती सखोल विचार करतात. वेळ वाचवतात. स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करतात. आपणही अशा वाया जाणाऱ्या वेळाबद्दल आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

मागे युएसए आणि जपानच्या टूरमध्ये मी भरपूर कपड्यांचं शॉपिंग केलं. म्हणजे इफ गिव्हन अ चान्स आय ॲम अ कंप्लीट शॉपोहोलिक. जपानहून घरी आले आणि गिल्टमध्ये बुडाले, का आपण एवढं शॉपिंग केलं? गरज तर नव्हती, मग कुठे स्वस्त आहे म्हणून, कुठे स्टाईल म्हणून तर कुठे जस्ट आवडलं म्हणून गरज नसताना एवढं शॉपिंग? आता झालं ते झालं, युएसए आणि जपानला जाऊन कपडे तर परत करता येणार नव्हते. मग प्रायश्चित्त काय घ्यायचं आपण ह्या अविचारी कृतीचं, अनावश्यक शॉपिंगचं? ठरवून टाकलं पुढची अडीच वर्षं कपड्याचं शॉपिंग करायचं नाही. सुधीरच्या मते हे असे अतिरेकी निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक वेळी विचारपूर्वक निर्णय घेण्याची सवय कर. असो, त्याला कधीतरी मला सुनवायला चान्स मिळाला. हा निर्णय घेतल्यानंतर माझा मॉलमध्ये दिशाहीन भटकण्याचा स्ट्रेसच संपला. शॉपिंगची अँगझाईटी खतम. त्यामुळे प्रवास अर्थपूर्ण बनला. शॉपिंगच्या बाबतीत तसं म्हटलं तर हा टोकाचा निर्णय घ्यायला आमचा राज पण कारण ठरला. मी आणि सुनिला युएसएत शॉपिंग करताना राजला म्हणायचो, ‌’अरे तू घे नं तुझ्यासाठी काहीतरी‌’ तर म्हणायचा, ‌’मला काहीही नको. आय डोन्ट नीड इट!‌’ ‌’अरे चांगली गाडी घे तुझ्यासाठी‌’. पण जॉबला लागेपर्यंत त्याने गाडी काही घेतली नाही. जॉब सुरू झाल्यावर एक साधी गाडी घेतली ज्याचं लोन त्याला त्याच्या पगारातून भरता येईल. ‌’राज तुला पैसे हवेत का?‌’ ‌’नको मम मी आता जॉब करतोय.‌’ सध्या आम्हाला नवीनच स्ट्रेस आहे, मुलं पैसे मागतात याचा नाही तर मुलं पैसे मागत नाही याचा. राजचं म्हणणं ‌’आय डोन्ट वॉन्ट थिंग्ज अननेसेसरीली‌’. शेअर्ड अपार्टमेंटमध्ये त्याच्या रूममध्ये झोपायला बेड, काम करायला डेस्क आणि समोर टीव्ही एवढंच. काहीही एक्स्ट्रा आणायचं नाही. हल्ली मुलं आपल्याला शिकवतात तसं झालंय आणि चांगलं आहे ते. त्या शिकण्यातूनच बहुदा असेल किंवा आईन्स्टाईन इन्स्पिरेशन असेल आमची गाडी घ्यायचा प्रसंग आठवला.

आधीची गाडी दहा वर्षं जुनी झाली म्हणून आता नवीन गाडी घेऊया, या गाडीच्या मेंटेनन्समध्येच जास्त पैसा खर्च होतोय म्हणत शोरूममध्ये गेलो आणि अर्ध्या तासात त्याच रंगाची तशीच गाडी फक्त नेक्स्ट व्हर्जन बुक करून बाहेर पडलो. दहा शोरूम्स धुंडाळा, ऑनलाइनवर गाड्यांचे रिव्ह्यूज आणि पॉडकास्ट बघण्यात तासनतास घालवा, यातून आमची सुटका झाली होती.

अनावश्यक गोष्टींनी भरलेली घरं साफ करण्यात, अमेरिकन माणसांना ‌’सेल‌’ च्या नावाखाली लागलेलं वेड काढण्यात तसंच ‌’प्राब्लेम ऑफ प्लेंटी‌’ सोडविण्यात मारी कोंडो आणि तिच्यासारख्या अनेक जणांनी स्वत:ला कोट्याधीश बनवलं. अमेरिकन्स या मॅडनेसमधनं बाहेर पडतील कदाचित पण आपण भारतीय मात्र ऑनलाइनच्या नव्या समुद्रात गटांगळ्या खायला लागलोय. रोज आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात या ऑनलाइन शॉपिंगचे किती बॉक्सेस येतात याचं परीक्षण करायला हवं. खरंच एवढ्या गोष्टी आपल्याला लागतात? पूर्वी कुठे आपण एवढ्या वस्तू बाजारातून घेऊन यायचो? कोविडमध्ये आपल्या सर्वांनाच ऑनलाइन शॉपिंगने भुरळ घातली. आमच्या घरात येणाऱ्या वस्तू बघून एक दिवस आम्हालाच नॉशिया आला. हे कुठेतरी थांबायलाच हवं. मग आम्ही ठरवलं, ज्याला वस्तू मागवायच्यायत त्याने त्या ऑनलाइन शॉपिंगच्या कार्टमध्ये टाकायच्या, दुसऱ्याने त्या चेक करायच्या आणि तिसऱ्याने पैसे भरताना री-चेक करायच्या. डू वुई रियली नीड धिस? याशिवाय चालवू शकतो का आपण? हे प्रश्न स्वतःला विचारायचे आणि सर्वांचं एकमत झालं तरंच ती वस्तू घ्यायची. हळूहळू बॉक्सेस कमी झाले. स्ट्रेस कमी झाला. त्या बॉक्सेसचा कचरा वातावरणाला जेवढी हानी पोहोचवतो ती कमी करण्यात आम्ही खारीचा वाटा उचलला, आमच्या घरातून बाहेर जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी केलं.

माझी आत्या कमल सावे बोर्डीला रहायची, तिच्याकडे मी आठवी-नववीची दोन वर्षं शिकले. त्यावेळी तिथल्या जवळपासच्या आदिवासींच्या गावात जायला मिळायचं. त्यांची घरं आजही जशीच्या तशी नजरेसमोर आहेत. छोटी सारवलेली घरं. फळ्यांवर रचलेली मोजकी भांडी, एका साईडला पातळ बिछाने आणि सतंरज्या किंवा चटई, सारवलेल्या भिंतींवर किंवा कुडावर छानशी वारली पेंटीग्ज. ही आनंदी घरं दाखवून द्यायची की सुखी समाधानी कुटुंबासाठी खूप कमी गोष्टींची गरज आहे. आपण सारखं सामान वाढवत राहतो घरातलं आणि मग स्ट्रेस वाढतो.

सध्या मला घरात स्ट्रेस आहे तो अनेक रिमोट्‌‍सचा. तरी बरं आम्ही फार काही ऑटोमेशन नाही केलं, नाहीतर लाइटचा रिमोट, पंख्यांचा रिमोट, टीव्हीचा रिमोट, स्पीकर्सचा रिमोट या जंजाळात पडद्यांचे, काचांचे, खिडक्यांचे रिमोट वाढले असते. पूर्वीची घरं बरी असायची. बटण दाबलं की फॅन सुरू, घरात आल्यावर एक ट्युबलाईट लावली की अख्खं घर प्रकाशात न्हाऊन निघायचं. आता इतके दिवे आपण लावतो की नेमका हवा तसा उजेड काही मिळत नाही. वस्तूंमुळे स्ट्रेस वाढतो तो असा. कधीकधी असंही वाटतं, असे सगळे नो स्ट्रेसवाले निर्णय घ्यायचे तर मग आयुष्य एकदम निरस होऊन जाईल. ओव्हर सिम्प्लिफिकेशन सुद्धा त्रासदायकच. सो ही ‌‘टू बी ऑर नॉट टू बी‌’ ची लढाई सुरू राहीलच, पण ॲटलिस्ट काय चांगलं आणि काय वाईट याची जाणीव होतेय ही महत्त्वाची गोष्ट आहे. शक्य तेवढे विचारपूर्वक निर्णय घेऊया. गोष्टी थोड्या सोप्या करूया. मनावरचा अनावश्यक ताण कमी करूया. नवीन गोष्टी शिकूया. आयुष्य रसरसून जगूया. लेट्‌‍स सिम्प्लिफाय थिंग्ज अँड ॲम्प्लिफाय द हॅप्पीनेस इन लाईफ!


देखो अपना देश दिल से! प्यार से! सम्मान से!

रताचा नकाशा पाहताना आपल्याला हिंदी महासागरात समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर छोटी छोटी बेटं पहायला मिळतात. ही बेटं म्हणजे अंदमान निकोबार बेटं. अंदमान निकोबार ठिकाण हे बंगालच्या उपसगरातील स्वर्ग मानलं जातं. तुम्हाला नकाशातल्या त्या लहानशा  आकारावरून त्या बेटांच्या प्रत्यक्ष आकाराबद्दल कल्पनाही करता येत नाही. पण असं असलं तरीही अंदमान म्हटलं की आपल्याला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर, सेल्युलर जेल आणि त्यांनी इथे भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा. सेल्युलर जेल या ठिकाणी आपल्याला लाइट अँड साऊंड शो पहायला मिळतो. अंदमानमधील राधानगर, एलिफंट, आणि काला पथ्थर हे प्राचीन बीचेस इथल्या स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यासाठी आणि मऊ पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहेत. इथले हॅवलॉक आणि नील आयलँडस व्हायब्रंट कोरल रीफसह अंडर वॉटर ॲडव्हेंचर्ससाठी हॉटस्पॉट्स मानले जातात. इथे तुम्ही स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. हॅवलॉक इथे बायोल्युमिनेसन्स म्हणजेच रात्रीच्या वेळी समुद्राचा मॅजिकल ग्लो बघण्याच्या दुर्मिळ नैसर्गिक घटनेचे साक्षीदार होऊ शकता. तुम्हाला जर इथल्या लाईमस्टोन केव्हज, ऐतिहासिक अवशेष आणि वॉटर स्पोर्ट्सचा आस्वाद घ्यायचा असेल तर बारातांग, रॉस आणि नॉर्थ बे आईसलँड एक्सप्लोअर करा. या ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लक्झरी किंवा बजेट हॉटेल्समध्ये राहू शकता. कारण इथे प्रीमियम बीच फ्रंट रिसॉर्टस पासून ते आरामदायी बजेट हॉटेल्सपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. या आयलंडवर तुम्ही स्पा थेरपी, समुद्र किनाऱ्यावर योग आणि शांत निवांत अशा समुद्रकिनारी विश्रांती घेण्याचा रम्य अनुभव घेऊ शकता. समुद्रकिनारी राहणार म्हटलं की जेवणात मासे खाणं आलंच. तुम्हाला नॉन व्हेजच्या मेजवानीत इथे ताजे पकडलेले मासे, लॉबस्टर्स, क्रॅब्स असं नॉन व्हेज फूड तर मिळेलच, शिवाय नारळापासून बनवलेल्या काही खास पदार्थांचा सुद्धा आस्वाद घेता येईल. त्याशिवाय इथे जेट स्कीईंग, पॅरासेलिंग, सी वॉकिंग, आणि स्वच्छ, नितळ पाण्यात कयाकिंग अशा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुद्धा चालू असतात. तुम्ही असे चित्तथरारक अनुभवही घेऊ शकता. सो, उन्हाळी सुट्टी असो किंवा हिवाळ्याची, तुम्ही वर्षभरात कधीही अंदमानला जाऊ शकता आणि हे ऑल सीझन डेस्टिनेशन एक्सप्लोअर करू शकता.


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

आपल्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आकर्षणांनी आपल्याला भुरळ घालणारा देश म्हणजे इटली. सिसिली हे इटलीच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेले एक आयलंड आहे. ऑफिशियली हे इटली प्रजासत्ताकचा भाग आहे. सिसिलीला इटलीमध्ये एक स्वायत्त प्रदेश म्हणून विशेष दर्जा आहे. सिसिलीच्या कॉर्लिऑन प्रदेशातील साव्होका ही जागा प्रसिद्ध आहे तिच्या हॉलिवूड कनेक्शनमुळे. ‌‘द गॉडफादर‌’ या सुपरहिट चित्रपटाचं चित्रीकरण साव्होका इथे झालं आहे या कारणाने हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. ‌‘बार व्हिटेली‌’ हा ‌‘द गॉडफादर‌’ या चित्रपटात  चित्रित करण्यात आलेला लिजेंडरी बार अजूनही या चित्रपटाच्या आठवणी जतन करीत इथे उभा आहे. अनेक पर्यटकांना हा त्याच्या रस्टिक चार्ममुळे भुरळ घालतो. इथलं सॅन निकोलो चर्च हे एक मध्ययुगीन चर्च आहे जिथे ‌‘द गॉडफादर‌’ चित्रपटात मायकेल कॉर्लिऑन आणि अपोलोनिया यांच्या लग्नाचे चित्रीकरण झाले होते. सिसिलियन शहरात 1954 साली बांधण्यात आलेल्या प्राचीन कॅपुचिन मॉनेस्ट्रीचे सुद्धा जतन करण्यात आले आहे. या ठिकाणी खानदानी लोक त्यांचे शिक्षण घेत आणि उदारमतवादी लोकं ही कला शिकू शकत. या ठिकाणी 18 व्या शतकातील सिसिलियन राजघराण्यातील 300 हून जास्त लोकांचे ममीजच्या रूपात असलेले मृतदेह आहेत. या गावातील वळणदार गल्ल्या आयोनियन कोस्ट आणि माऊंट एट्नाची विहंगम दृश््यं आपल्याला दाखवतात. सिसिली साव्होका इथे तुम्ही शहरातील मुख्य चर्च मानल्या जाणाऱ्या सांता मारिया चर्चला सुद्धा भेट   देऊ शकता. या चर्चचा समावेश इटालियन राष्ट्रीय स्मारकात केला गेला आहे.

सिसिली साव्होका जवळ असलेलं भेट देण्यासाठी एक अद्भुत गाव म्हणजे ‌‘फोरझा दि आग्रो‌’. मेसिना आणि कॅटानिया यांच्यामधील प्राचीन भूमी असलेलं, मध्ययुगातील एक लपलेलं रत्न म्हणजे हे गाव. हे ताओर्मिनापासून फार दूर नसलेलं एक छोटसं सिसिलियन गाव आहे. हे ठिकाण म्हणजे द गॉडफादरच्या चित्रीकरणात वापरण्यात आलेला आणखी एक बॅकड्रॉप. गॉडफादर 2 आणि गॉडफादर 3 मध्ये या ठिकाणचे चित्रीकरण झाले आहे. इथेच असलेले सांतिसीमा त्रिनीता चर्च हे ही एक नैसर्गिक पार्श्वभूमी असलेले एक अप्रतिम बरोक शैलीतील चर्च आहे. इथे आपल्याला सिसिलीच्या भूतकाळावर प्रकाश टाकणाऱ्या मध्ययुगातल्या नॉर्मन किल्ल्याचे अवशेष पहायला मिळतात. इथल्या पिआझा जिओव्हानी XXIII या स्क्वेअरच्या इथे शांतपणे बसून आपल्याला स्टनिंग सी व्ह्यू पहायला मिळतो. या ठिकाणी इथली पारंपरिक घरांची रचना पाहता येते, इथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येतो. हे सिसिलियन शहर परंपरा, धार्मिक उत्सव जतन करताना दिसतं.  ही दोन्हीही ऑफबीट ठिकाणं आमच्या ऑल ऑफ इटली आणि ट्युनिशिया माल्टा सिसिली या टूर्समध्ये समाविष्ट आहेत. तेव्हा तुम्हालाही ती बघायची असतील तर चलो, बॅग भरो, निकल पडो!


कल्पनेपलीकडच्या जगाचा प्रवास

मी मुकुंद वैद्य. पुण्याला राहतो. 2017 साली मी ‌‘वीणा वर्ल्ड‌‘ बरोबर माझी पहिली फॉरेन टूर केली. आत्ता मी 73 वर्षांचा आहे. म्हणजे तेव्हा साधारण माझ्या वयाच्या पासष्टीत असेन. आयुष्यात काही कारणाने एकटेपणा आला. घरी तेच ते रुटीन, तेच विचार या सगळ्यापासून ब्रेक म्हणून पहिल्यांदा वीणा सोबत अमेरिका वारी केली. आणि खरं सांगायचं तर त्या सहलीने माझा एकटेपणा कुठेतरी लांब निघून गेला. त्या आधीही मी फिरत होतो. पण बाकीच्या टूर्ससोबत जाताना रूम पार्टनर शोधायला लागायचा. तेव्हा प्रत्येक वेळी कोणी माझ्यासोबत यायला उपलब्ध असायचं असं नाही. मग ते फिरणं पोस्टपोन व्हायचं. पण वीणा ने माझी ही काळजीचं मिटवली मला रूम पार्टनर देऊन. आता मी बिनधास्त एकटा टूर्स बुक करतो. पुण्याच्या भांडारकर रोडवरच्या ऑफिसमधून मी बुकिंग करतो. आणि मुंबई ते मुंबई टूर्स करतो. मी आजवर वीणा वर्ल्ड सोबत 12-13 टूर्स केल्या आहेत. ईस्ट-वेस्ट अमेरिका, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, आणि भूतान या भारताबाहेरच्या टूर्स तर लेह लडाख कारगिल, राजस्थान मेवाड मारवाड, गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी, पाँडिचेरी कांचीपुरम, भुवनेश्वर पुरी, सिक्कीम दार्जिलिंग गंगटोक, आसाम मेघालय या भारतातल्या टूर्स मी केल्या आहेत. सगळ्या टूर्स सिनियर्स स्पेशल. कारण समवयस्क असले की गप्पा होतात, चालण्याचा स्पीड मॅच होतो, थोडक्यात ऑड मॅन आऊट वाटत नाही. मी परदेशात गेलो तर वर्षातून एखाद-दोन नाहीतर आपल्या देशात वर्षभरात तीन-चार टूर्स करतो. अमेरिका, ऑस्ट्रेलिया टूरवर गेलो तेव्हा मला हेलिकॉप्टर राईड सुद्धा करता आली. भूतानच्या ट्रिपमध्ये 12 किलोमीटरचा ट्रेक होता, एकदा रिव्हर राफ्टिंग केलं. लेह लडाखला गेलो तेव्हा 16000 फुटांवर गेलो होतो. वयोमानामुळे ऑक्सिजन कमी पडेल का? थंडीचं काय? हे प्रश्न होते पण सगळेच सिनियर सिटिझन्स. आपोआपच कॉन्फिडन्स आला. शिवाय सगळीकडे जेवणाची उत्तम सोय असते. म्हणजे अगदी परदेशातही. इंडियन फूड आणि तिथल्या लोकल चवींचा  छान मेळ असतो. त्यामुळे परक्या देशातही परकेपणा जाणवत नाही. शिवाय टूर मॅनेजर अगदी आपलेपणाने मॅनेज करतात सगळं. या वर्षी खरंतर जपानला जाणार होतो. पण नेमका पासपोर्ट संपला म्हणून ती टूर पोस्टपोन करावी लागली. जानेवारीत तो रिन्यू केला आणि आत्ता गेल्याच आठवड्यात भूतानला जाऊन आलो. आता मला नेपाळ, व्हिएतनाम बाली, जपान, साऊथ आफ्रिका, इजिप्त आणि परत एकदा अमेरिकेला जायचंय. जोवर फिरू शकतो तोवर जमेल तेवढं जग फिरायचंय. आज एवढ्या टूर्समधून 300 हून जास्त लोकं भेटली. काही अजूनही संपर्कात आहेत. काही पुण्यात राहणारे आम्ही अधूनमधून भेटतो सुद्धा. टूरवर असताना घरचा विचारही मनात येत नाही. वेगळ्याच विश्वात असतो आपण आणि पुन्हा घरी येतो तेव्हाही पुढची ट्रिप कोणती करायची याचं प्लॅनिंग मनातल्या मनात चालू झालेलं असतं. आपल्या छोट्याश्या जगाच्या पलीकडे एक मोठ्ठं जग आहे. त्याची झलक बघायला तरी प्रत्येकाने फिरायला हवं असं मला मनापासून वाटतं.


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

रीफपासून रेनफॉरेस्टपर्यंतचा प्रवास - क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया

क देश आणि एक काँटिनेंट असा दोन्ही असलेला जगातला एकमेव देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. गेल्या काही वर्षांपर्यंत काहीसा लांबचा वाटणारा ऑस्ट्रेलिया, वीणा वर्ल्डने आपल्या पर्यटकांच्या आवाक्यात आणला आणि आजतागायत हजारो पर्यटकांनी आपलं ऑस्ट्रेलिया पाहण्याचं स्वप्न वीणा वर्ल्डसोबत पूर्ण केलं. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आश्चर्यांनी नटलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड ह्या राज्यात तुम्ही अनेक भन्नाट अनुभव घेऊ शकता. चला त्यावर एक नजर टाकूया...

द ग्रेट बॅरियर रीफ आणि व्हिटसंडेज्‌‍:

जगातील सर्वात मोठ्या कोरल रीफ सिस्टम - द ग्रेट बॅरियर रीफमध्ये स्नॉर्कलिंग किंवा स्कुबा डायव्हिंग करा.

हेलिकॉप्टरमधून व्हिटसंडेज्‌‍ येथील प्रसिद्ध हार्ट रीफचे विहंगम दृश्य पहा.

अंडरवॉटर रीफ स्वीटमध्ये राहून पाण्याखालच्या जगाशी एकरूप होण्याचा भन्नाट अनुभव घ्या.

व्हिटसंडेज्‌‍मध्ये एक लक्झरी कॅटामरॅन हायर करा आणि प्रायव्हेट पूल व्हिलामध्ये रहा.

ॲडव्हेंचर इन गोल्ड कोस्ट अँड ब्रिस्बेन:

हॉट एअर बलून फ्लाइटमधून गोल्ड कोस्ट शहर आणि हिन्टरलँडचे विहंगम दृश्य पहा.

प्रसिद्ध टँगालुमा रेक्स येथे स्नॉर्कलिंग किंवा कयाकिंग करा. इथे 15 बुडालेल्या जहाजांनी एक कृत्रिम रीफ तयार केली आहे. इथल्याच मॉर्टन बे मध्ये 600 हून अधिक वाइल्ड डॉल्फिन्स आहेत, आणि सनसेटच्या वेळी अपण त्यांना फीड देखील करू शकतो.

गोल्ड कोस्टमधील ड्रीमवर्ल्ड, मूव्ही वर्ल्ड आणि सी वर्ल्ड या थीम पार्क्सना भेट द्या.

ब्रिस्बेन नदीवर क्रूझ किंवा कयाकिंगचा आनंद घ्या.

टँडेम स्कायडाईव्हचा थरारक अनुभव घ्या आणि 12,000  फूट उंचीवरून उडी मारून गोल्ड कोस्ट सिटी आणि पॅसिफिक ओशनचं विहंगम दृश्य पहा.

ब्रिस्बनमधील स्टोरी ब्रिजवर चढून शहराच्या स्कायलाइन, नदी व माउंटन्सचे 360 दृश्य पहा.

सर्फर्स पॅराडाईजमध्ये जेट बोटिंग करून पाण्यात 360 स्पिन्स आणि हाय स्पीड ॲक्शनचा रोमांच अनुभवा.

कुरांडा, डेनट्री रेनफॉरेस्ट आणि केप ट्रिब्युलेशनला भेट द्या:

मॉस्मन गॉर्जमधील स्वच्छ आणि निर्मळ पाण्यात रिव्हर ड्रिफ्टचा अनुभव घ्या.

डेनट्री नदीवर क्रूझवरून क्रोकोडाईल स्पॉटिंग करा.

कुरांडामधील घनदाट रेनफॉरेस्टवरून सिनीक ट्रेन राइड किंवा केबल वे राइडचा अनुभव घ्या.

लोकल अबोरिजिनल ट्राइब्सचे उत्साही सांस्कृतिक नृत्यप्रदर्शन पहा.

सनशाइन कोस्ट:

ऑस्ट्रेलिया झू (स्टीव्ह इरविन ह्यांचे फेमस वाईल्डलाईफ पार्क) येथे कांगारू, क्रोकोडाईल्स आणि कोआला यांना जवळून पहा.

नूसा एव्हरग्लेड्समध्ये निसर्गरम्य बोट क्रूझ घ्या आणि इथल्या स्वच्छ नितळ वाहत्या नद्या आणि सब-ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट एक्सप्लोअर करा.

नूसा येथून 40-माईल बीच व रेड कॅनयनला 4WD टूर द्वारे भेट द्या.

चला तर मग, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये तुमच्या मनासारखा अफलातून प्रायव्हेट हॉलिडे घ्यायला, वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेजसोबत!


अझरबायजान

अझरबायजान, 'तप्त अग्नीची भूमी' हे आजच्या काळातील एक ट्रेंडिंग डेस्टिनेशन आहे. हा युरोपियन चार्म, समृद्ध संस्कृती आणि वैविध्यपूर्ण लॅण्डस्केप्सची अनुभूती देणारा, पर्शियन तुर्की आणि रशियन परंपरांच्या वैविध्याने नटलेला देश आहे.  याची राजधानी बाकू इथे पॅरिसियन शैलीतील बुलेव्हार्डस तसंच आधुनिक काळातील गगनचुंबी इमारतींचा मिलाफ आहे. भारत आणि युरोपमधल्या ट्रॅडिशनल विंटर हॉटस्पॉट्स व्यतिरिक्त इथे शाहदाग आणि तुफानदाग ही डेस्टिनेशन्स विंटर स्पोर्ट्ससाठी परफेक्ट आहेत. इथले आयकॉनिक फ्लेम टॉवर्स, बाकू बुलेव्हार्डस आणि हैदर अलियेव्ह सेंटर यामुळे हे शहर आधुनिक वास्तुकलेचा एक आदर्श नमुना बनले आहे. या युनेस्को लिस्टेड साईटवर प्री हिस्टोरिक काळातील खडकांवरील कोरीवकाम आणि उकळता लाव्हा आपल्याला बघायला मिळतो. इथे युरोपपेक्षा कमी किंमतीत तुम्ही पंचतारांकित हॉटेल्स, शॉपिंग आणि उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. कॅस्पियन सी च्या किनाऱ्यावरच्या रिसॉर्ट्समध्ये सी फूडचा आनंद घेऊ शकता. तसंच सुगंधित केशरयुक्त प्लॉव्ह सारख्या पाककृतींचा आस्वाद घेऊ शकता. गबाला मध्ये उन्हाळ्यातील हायकिंग असो किंवा शाहदाग मधील थंडीतलं स्कीईंग, अझरबायजान प्रत्येक ऋतूत परिपूर्ण असा अनुभव देते. तर मग तुम्ही कोणता सीझन निवडताय?

April 04, 2025

Author

Veena World
Veena World

We are an Indian travel company founded in 2013 and excel at domestic and international tour packages including guided group tours, specialty tours, customized holidays, corporate MICE travel, inbound travel and destination weddings.

More Blogs by Veena World

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top