Published in the Sunday Sakal on 20 July 2025
सर, आमच्या ऑफिसमध्ये एक प्रयोग सध्या सुरू आहे. क्लोजर. एखादी गोष्ट सुरू केली की ती संपवायचीच. बऱ्याचदा गोष्टी पडून राहतात, त्यामुळे त्या आपल्या डोक्यात भिरभिरत राहतात आणि आत्ताच्या जमान्यात जगाबरोबर चालायचं असेल तर एकापाठी एक प्रोजेक्ट पूर्ण झाले पाहिजेत. त्यामुळेच वीणा वर्ल्डमध्ये लीडरशीपमध्ये जे काही नव्वद शंभर मॅनेजर्स किंवा लीडर्स आहेत त्या सर्वांनी मिळून हे 'क्लोजर' नावाचं प्रकरण आमचं एक शॉर्ट टर्म गोल ठरवलंय आणि त्याची डिस्क्रिप्टिव्ह लाईन आहे 'क्लोजर इज लीडरशीप अँड कम्प्लिशन इज रिस्पेक्ट!' लीडरशीपला गोष्टी, प्रॉब्लेम्स, प्रोजेक्टस् पूर्ण करण्याची हातोटी हवी आणि पूर्णत्व म्हणजे सर्वांच्या वेळेचा, कष्टांचा, प्रयत्नांचा, विचारांचा सन्मान आहे याची जाणीव असायला हवी." मग कोणतीही गोष्ट वा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर अकम्प्लिशमेंटचा जो आनंद मिळतो, त्याचं सुख काय वर्णावं!” माझ्या पेंटिंग्जच्या क्लासच्या अभिजीत घवाले सरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. त्यांना कळेना हा पेंटिंगचा क्लास आहे की एखादं मॅनेजमेंटचं लेक्चर. माझ्या लेक्चरी व्यक्तिमत्वाला थोडंस बाजूला सारून मी म्हटलं, 'सर सांगायचा मुद्दा असा की, मागे दोन पेंटिंग्ज करताना मला मी थोडंसं ड्रॅग करतेय असं वाटलं, तर आपण ही 'क्लोजर थिअरी' इथे वापरूया का? एका क्लासमध्ये म्हणजे आपल्या दोन तासात पेंटिंग पूर्ण करता येईल का? म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये अकम्प्लिशमेंटचा आनंद मिळवता येईल आणि उत्साह वाढेल.' सरांनी कपाळाला हात लावला आणि हसायला लागले. 'अहो, तो तुमचा बिझनेस आहे आणि ही कला आहे. दोन्ही परस्परविरोधी गोष्टी आहेत. बिझनेस रोखठोक आहे तर कला म्हणजे साधना, आत्मानंद आणि संयमाचा प्रवास. तिला वेळेच्या चौकटीत बसवणं म्हणजे अपराध. कला म्हणजे तुम्ही तुमच्याशी केलेला संवाद. कविता सुचते तशीच एखादी कलाकृती घडवावी लागते. कला विकली जाते, पण बनवली जात नाही म्हणूनच एखाद्या ऑफिससाठी कमिशन्ड केलेली कला किंवा पेंटिंग्ज तेवढी खोलवर पोहोचत नाहीत. कलेच्या बाबतीत संपलं म्हणजेच पूर्ण असं नसतं, आणि अधुरं राहिलं म्हणजे अपयश नाही. सो, गो विथ द प्लो! प्रत्येक ब्रश स्ट्रोक एन्जॉय करा, रंगांमध्ये रंगून जा, आणि मग बघा, तुमचा उत्साह कसा द्विगुणित होईल तो.’ सरांनी माझी खऱ्या अर्थाने शाळा घेतली आणि मला भानावर आणलं. त्यांना म्हटलं, "येस सर, यू आर राईट, दिवस रात्र बिझनेसच्या आणि परिस्थितीच्या जोखडात अडकलेले आम्ही प्रत्येक गोष्ट त्याच दृष्टीकोनातून बघतो. आम्ही 'सीईओ मेंटॅलिटीचे' बळी. एव्हरिथिंग इज वॉन्टेड यस्टरडे! अनेक गोष्टीत आम्हाला, नव्हे मला, कळतं पण वळत नाही अशी स्थिती. आता माझ्या लक्षात आलंय आणि मी प्रयत्न करीन की बिझनेस बिझनेसच्या जागी आणि कला किंवा बिझनेस व्यतिरिक्तच्या गोष्टी त्यांच्या जागी. चला आज नवीन चित्राला सुरुवात करते. नो टाइमलाइन नो एक्झामिनेशन, नो प्रोग्रेस कार्ड, आय आय विल जस्ट एन्जॉय द मोमेंट "
सीईओ मेंटॅलिटी ही शाप की वरदान? स्वतःच्या करियरसाठी, ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी महत्वाकांक्षा असणं, स्मार्ट आणि फास्ट डिसिजन्स घ्यायची सवय असणं, आचार विचारांमध्ये क्लॅरिटी असणं, फ्लेक्सिबल मानसिकता ठेवणं, सतत नवनिर्मितीचा ध्यास बाळगणं ह्या सर्व क्षमता एका आदर्श सीईओचं दर्शन घडवतात. पण त्याच सवयींची जेव्हा कार्यालयाबाहेर कुटुंबामध्ये मित्रमंडळींमध्ये वा नातेवाईकांमध्ये त्याच कार्यालयीन तऱ्हेने अंमलबजावणी होते तेव्हा ते भावनिकदृष्ट्या बांधल्या गेलेल्या सगळ्यांना पचवणं जड जातं. घर आणि ऑफिसमध्ये हा बॅलन्स साधता आला पाहिजे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की हाय अचिव्हर माणसांमध्ये थोडा तऱ्हेवाईकपणा किंवा हेकेखोरपणा असतोच. एका किंवा अनेक गोष्टींमध्ये ते ओसीडीचे शिकार असतात. ऑब्सेसिव्ह कम्पल्सीव्ह डिसॉर्डर. मी हाय अचिव्हर नसले तरी ओसीडीची शिकार आहे, स्वच्छता नीटनेटकेपणा आणि 'आज अभी इसी वक्त' च्या बाबतीत. माझ्या माहितीतला एक सीईओ आहे अतिशय हुशार आणि बिगटाईम अचिव्हर, त्याच्याविषयी म्हटलं जातं, 'हा त्याच्या केबिनमधनं इमेल पाठवणार आणि तो इमेल पोहोचण्याआधी डेस्कवर येऊन विचारणार, झालं का ते काम?' ऑलवेज ‘राईट नाऊ, राईट हियर!’ स्पीड त्याच्या रोमारोमात भिनलाय. त्याच्या यशस्वितेचं तेही एक कारण असावं.
काही काही माणसं खरंच वेडाने झपाटलेली असतात. आम्ही आमच्या पर्यटकांना इटलीला घेऊन जातो तेव्हा काही टूर्समध्ये रोममध्ये वसलेल्या एका स्वतंत्र छोटयाशा देशाला, व्हॅटिकन सिटीला भेट देतो. तेथील सिस्टीन चॅपल आणि मायकेल एंजेलोने रंगवलेले फ्रिस्कोज बघायला घेऊन जातो. हे फ्रिस्कोज म्हणजे भिंतीवर किंवा छतांवर त्यांचं प्लॅस्टर ओलं असताना रंगवणं. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला बनवलेले हे फ्रिस्कोज आजही जगातलं एक अनमोल चित्र मानलं जातं. खरंतर मायकेल एंजेलोला हे काम करायचंच नव्हतं. तो म्हणायचा, 'मी शिल्पकार आहे, चित्रकार नाही.' त्याचं पाहिलं प्रेम शिल्प तयार करणं हे होतं. पण पोप ज्युलियस दुसरा याने व्हॅटिकनमध्ये सिस्टीन चॅपलचं छत रंगविण्याची आज्ञा दिली, जी नाकारली असती तर पोपच्या विरोधात गेल्यासारखं झालं असतं आणि त्याकाळी तसं करणं म्हणजे स्वतःला जेलच्या किंवा मृत्यूच्या दाढेत ढकलणं. त्यामुळे त्याने मुकाट्याने ती आज्ञा मानली. छतावर काम करणं म्हणजे स्वतःला उलटं टांगून शिक्षा दिल्यासारखं काम करीत राहणं. अत्यंत कष्टदायक, वेदनादायक असं ते काम होतं, पण एकदा ते स्वीकारल्यावर त्याने त्यात स्वतःला झोकून दिलं. कोणत्याही मदतीशिवाय तो एकटा ते करीत होता, त्यामुळे वेळ लागत होता. जेव्हा प्रोजेक्ट लांबतोय हे कळलं तेव्हा त्याच्यावर बराच दबाव येऊ लागला. सहकारी दिले गेले, पण त्यांनी केलेलं काम तो खोदून काढायचा आणि स्वतः ते पूर्ण करायचा. त्याचं व्हिज्युअलायझेशन दुसऱ्यांना कसं कळणार? योग करताना शीर्षासन किंवा तशा कठीण आसनांमध्ये आपण सर्वसामान्य माणसं जास्त वेळ राहू शकत नाही ही आपली अवस्था लक्षात घेतली तर आपल्याला मायकेल एंजेलोच्या अठरा ते वीस तास उलटं लटकून छत रंगविण्याच्या पराकोटीच्या कष्टांचं मोल कळेल. हे सगळं करीत असताना तो अनेकदा फ्रस्ट्रेशनमध्येही जायचा. परफेक्शनची आस धरणाऱ्या त्याच्या वेड्या मनाच्या वेदना आणि त्याच्या चिकाटीचं दर्शन एका पत्रातनं घडतं. 'ही शिक्षा असह्य झालीय, गळ्याला गाठ आलीय, मेंदू पिळून निघालाय, माझं शरीर थकलंय, मी चित्रकार नाही, हे माझं कामच नाही' असं तो म्हणतो. चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर सिस्टीम चॅपलचं छत मायकेल एंजेलोने जसं व्हिज्युअलाईझ केलं होतं तसं तयार झालं आणि व्हॅटिकनलाच नव्हे, इटलीलाच नव्हे तर जगाला 'लास्ट जजमेंट', 'क्रिएशन ऑफ ॲडम' आणि 'सेपरेशन ऑफ लाइट फ्रॉम डार्कनेस' या तीन अप्रतिम कलाकृती मिळाल्या. ही फक्त चित्रं नव्हती, तर हा होता माणूस, कल्पनाशक्ती आणि देव यांच्यातला एक मौन संवाद जो आजही जगाला थक्क करतोय कारण त्यामागे आहे मायकेल एंजेलोची जिद्द. जेव्हा आपण सिस्टिन चॅपल बघत असतो तेव्हा डोळे पाणावतात आणि आपण मनोमन म्हणतो, 'मायकेल एंजेलो काय वेडा नव्हता, तो भक्त होता. स्वतःच्या कलेचा, स्वतःच्या दृष्टीकोनाचा. वेळ, शरीर, सत्ता, टीका यातलं काहीही त्याचं चित्र थांबवू शकलं नाही. कारण त्याच्यासाठी ते छत म्हणजे एखादी भिंत नव्हती वा कॅनव्हास नव्हता, तर ती त्याची प्रार्थना होती’. सिस्टिन चॅपलमधून बाहेर पडताना आपण शोधायला लागतो की आयुष्यात आपण किती गोष्टींमध्ये अशा डेडिकेशन किंवा डिव्होशनने काम केलंय? आपण जेव्हा आपल्याला मायकेल एंजेलोच्या मोजपट्टीने मोजतो, तेव्हा आपल्या खुजेपणाची आपल्याला जाणीव होते.
ही ती माणसं असतात जी कधी वेडी वाटतात, अति बोलणारी, अति मागणारी, अति तपशिलात शिरणारी वाटतात. कधी भांडखोर वाटतात, तर कधी अगदी अतिरेक करणारी वाटतात. पण त्यांच्या झपाटलेपणामुळेच जगाच्या व्याख्या बदलतात. त्यांच्या सततच्या 'जास्त हवंय' या तगमगीतून वेगळी दिशा मिळते. स्टीव्ह जॉब्ज ने 'परफेक्ट फॉन्ट' साठी कॉम्प्युटरचं पूर्ण डिझाइन बदललं, स्नो व्हाइट तयार करताना वॉल्ट डिस्नीने परफेक्शनसाठी संपूर्ण टीमला जेरीला आणलं, सततच्या बदलामुळे वॉल्ट डिस्नी स्टुडियो विकायची वेळ आली होती, पण त्याने कॉम्प्रमाईज केलं नाही आणि स्नो व्हाईट जगभरात पॉप्युलर झाला. तसेच डिटेल्स आपल्याला डिस्नीलँडमध्ये दिसतात. रविंद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन उभं केलं एका वेगळ्या शिक्षणाच्या कल्पनेतून जी त्यावेळच्या भारताला थोडी वेडेपणाचीच वाटत होती. एलॉन मस्क एकाच वेळी रॉकेट्स, कार्स, ए आय, सूर्यऊर्जा, मंगळावर कॉलनीज, स्पेस एक्स अशा अनेक असामान्य गोष्टींवर विचार करतो ह्याला कारण त्याच्या डोक्यातली अस्वस्थता. अशा हजारो जीवित वा काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तिमत्त्वांची नावं आपल्याला प्रेरणा देत राहतील. नुसती व्यवस्था किंवा नुसत्या प्रोसेसेस किंवा नुसता बिझनेस या सगळ्यांमुळे जग निश्चितपणे स्थिर राहतं, पण पुढे जात नाही. जगाला पुढे नेणारं जर काही असेल तर ते ह्या वेडसर वाटणाऱ्या, अडगळीत टाकलेल्या, धडपडणा-या माणसांच्या खोल तळमळीत असतं. त्यांना आपण बिझनेस हेड, कलाकार, संशोधक, समाजसुधारक काहीही नाव देऊ पण त्यांना जग बदलायचं असतं. आणि म्हणूनच आपल्या आसपास अशा कुणाचं अति वागणं दिसलं तर त्यांच्यात चूक बघायच्या आधी थोडंसं थांबायला हवं. कदाचित ते आपल्याला नकोसं वाटेल, पण जगाला पुढे नेणारं असेल.
देखो अपना देश!
बुद्धिस्ट सर्किट
प्रमुख बौद्ध स्थळांची तीर्थयात्रा
बुद्धिस्ट सर्किट हा नेपाळ आणि भारत यांचा संयुक्त राजनैतिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे. यात बौद्ध धर्माशी निगडीत विविध स्थळांचा समावेश आहे. बौद्ध धर्म जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे जो आध्यात्मिक विकास, ध्यान आणि तत्वज्ञानाचा मार्ग अनुसरायला शिकवतो. बुद्धिस्ट सर्किट हा केवळ पर्यटन मार्ग नव्हे तर गौतम बुद्धांची शिकवण लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मार्ग म्हणून विकसित केला जात आहे. हा मार्ग सुमारे 1,500 किलोमीटर अंतर व्यापतो. या अंतर्गत महापरिनिर्वाण एक्सप्रेस नावाची एक लक्झरी ट्रेन सेवा भारताने सुरू केली आहे, जी प्रवाशांना प्रमुख बौद्ध स्थळांच्या 8 दिवसांच्या तीर्थयात्रेवर घेऊन जाते. हे बुद्धिस्ट सर्किट लुंबिनी, नेपाळ येथून सुरू होते जिथे सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांचा जन्म इसवीसनपूर्व 563 साली झाला होता. ज्या बोधगया या बिहारमधल्या ठिकाणी बोधी वृक्षाखाली सिद्धार्थला वयाच्या 35 व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाणही यात समाविष्ट आहे. इथलं महाबोधी मंदिर आणि बोधीवृक्ष ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. भगवान बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ (धर्मचक्र प्रवर्तन) येथे त्यांच्या पाच शिष्यांना दिले. या ठिकाणी धमेख स्तूप आणि इतर बौद्ध स्मारके आहेत. याशिवाय बिहारमधल्या राजगीर येथे गौतम बुद्धांनी काही काळ वास्तव्य केले आणि अनेक महत्त्वाचे उपदेश दिले. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथे भगवान बुद्धांनी सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास 24 वर्षं वास्तव्य केले. बिहार राज्यातील वैशाली या ठिकाणी भगवान बुद्धांनी शेवटचं प्रवचन दिलं आणि महिलांना मठात प्रवेश दिला. गौतम बुद्धांचे वयाच्या 80 व्या वर्षी उत्तर प्रदेशातील कुशीनगर इथे महापरिनिर्वाण झाले. बिहारमधील नालंदा येथे नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत जे बौद्ध शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. हे प्रमुख निवासी विद्यापीठ होते. या विद्यापीठात 10000 हून अधिक विद्यार्थी आणि 2000 हून जास्त शिक्षक होते. सम्राट अशोकाने यांसारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणांचे जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक ठिकाणी स्तूप उभारले. दोन प्रसिद्ध चिनी भिक्षू झुआनझांग आणि फॅक्सियान यांनी अनुक्रमे 5 व्या आणि 7 व्या शतकात या सर्किटमधून प्रवास केला होता. त्यांच्या भेटींचे तपशीलवार दस्तऐवजीकरण केलेले आपल्याला आढळते. गांधार आणि मथुरा सारख्या बौद्धकला शैली या सर्किटभोवती भरभराटीला आल्या, ज्यांनी पुढची अनेक शतके आशियामधली शिल्पकला आणि वास्तूकला प्रभावित केली. सारनाथ, वैशाली आणि संकिसा इथले अशोकस्तंभ हे प्राचीन भारतातील मूळ शिलालेखांपैकी आहेत. दरवर्षी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, जपान, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, चीन, भूतान आणि नेपाळ इथून मोठ्या संख्येने पर्यटक बुद्धिस्ट सर्किटला भेट देतात. मग तुम्ही कधी भेट देताय?
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
आफ्रिकेतील झँबीझी नदीवर जगप्रसिद्ध धबधबा आहे. हा उत्तरेकडील झँबिया आणि दक्षिणेकडील झिंबाब्वे या देशांच्या सीमेवर आहे. त्यामुळे दोन्हीही देशांमधून आपण इथे प्रवेश करू शकतो. व्हिक्टोरिया फॉल्स हे त्याचं नाव. हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत देखील हा समाविष्ट आहे. रुंदी आणि उंचीचा विचार करता उत्तर अमेरिकेतील जगप्रसिद्ध नायगारा फॉल्स पेक्षाही व्हिक्टोरिया फॉल्स मोठा आहे. हा झँबीझी नदीच्या संपूर्ण पात्रावरच विस्तारलेला आहे. अनेक मुखांनी प्रचंड आवाज करत हा खाली कोसळतो. या ठिकाणी धुक्याचे आणि पाण्याच्या तुषारांचे लोट निर्माण होताना दिसतात. त्यामुळेच तेथील कलोलो-लोझी लोकांनी या धबधब्याला ‘दी स्मोक दॅट थंडर्स’हे नाव दिलं आहे. सततच्या पाण्याच्या तुषारांमुळे इथे कायम इंद्रधनुष्याची छ्बीसुद्धा पहायला मिळते. त्यामुळे याला 'द प्लेस ऑफ रेनबो' असंही म्हणतात. इथे तुम्ही चंद्रप्रकाशात धुक्यातून परावर्तित होणाऱ्या रात्रीच्या इंद्रधनुष्याचा चंद्रधनु म्हणजेच मूनबो देखील पाहू शकता. युरोपियन एक्सप्लोरर डेव्हिड लिव्हिंग्स्टन ही हा फॉल पाहणारी पहिली व्यक्ती. त्यांनी ग्रेट ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ याला व्हिक्टोरिया हे नाव दिलं. व्हिक्टोरिया फॉल्सच्या परिसरात झिम्बाब्वेमध्ये 'व्हिक्टोरिया फॉल्स नॅशनल पार्क' आहे तर झँबियामध्ये 'मोसी-ओअ-तुन्य नॅशनल पार्क' आहे. इथे प्रवासी नाईफ-एज ब्रिजसारखे थ्रील्लिंग व्ह्यू पॉईंट पाहू शकतात. या राष्ट्रीय उद्यानांमध्ये खेळाच्या, हौशी शिकारीच्या आणि मनोरंजनाच्या सुविधाही आहेत. इथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे फेब्रुवारी ते मे. कारण पावसाळ्यानंतर हे धबधबे अधिकच प्रभावी वाटतात. पाण्याचा मोठा पडदा आणि दाट धुकं असं दृश्य कैक किलोमीटर अंतरावरून आपण पाहू शकतो. व्हिक्टोरिया फॉल्सचा चित्तथरारक व्ह्यू पाहण्यासाठी, हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट फ्लाइट घ्यावी लागते ज्याला 'फ्लाइट ऑफ एंजल्स' असंही म्हणतात. इथे सर्वात लोकप्रिय आहे व्हिक्टोरिया फॉल्स ब्रिजवरून बंजी जंपिंग म्हणजेच झांबेझी नदीवरची 111 मीटरची चित्तथरारक अशी प्लंज. याशिवाय व्हिक्टोरिया फॉल्सचे सौंदर्य अनुभवण्यासाठी झांबेझी नदीवरची सनसेट क्रूझ ही सर्वात रिलॅक्सिंग मार्गांपैकी एक आहे. तुम्ही पाहिलाय का हा अद्भुत व्हिक्टोरिया फॉल्स?
माय ट्रॅव्हल मिशन
प्रवास म्हणजे आनंद धम्माल आणि थ्रिल!
मी रमाकांत गरिबे. कल्याणला राहतो. मी बीएमसी च्या टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये नोकरीला होतो. 2008 साली दादरमधून रिटायर झालो. तोवर माझं देशात परदेशात अनेकदा फिरणं झालं होतं. जगभरातल्या अनेक ठिकाणी मी जाऊन आलो होतो. पण वीणा वर्ल्ड सोबत जायला सुरुवात केली ती 2016 साली. मी नवी मुंबईमधल्या घणसोलीच्या पेगॅसस हॉस्पिटॅलिटी एंटरप्रायझेस या वीणा वर्ल्डच्या सेल्स पार्टनर मार्फत टूर्स बुक करतो. आता मी 72 वर्षांचा आहे. आजवर मी आणि माझी मिसेस देवकी गरिबे आमच्या 12 टूर्स झाल्या आहेत. आमची वीणा वर्ल्ड सोबतची पहिली टूर होती रशियन हायलाईट्स. त्यानंतर परदेशातल्या दुबई अबुधाबी विथ फेरारी वर्ल्ड, साऊथ आफ्रिका केनिया व्हिक्टोरिया फॉल्स, इजिप्त ज्वेल्स, बेस्ट ऑफ जपान, मॉरिशस, हायलाईट्स ऑफ थायलंड, बेस्ट ऑफ बाली या टूर्स आम्ही केल्या. तर लॉकडाऊन नंतर भारतातल्या आसाम अरुणाचल मेघालय, धरमशाला डलहौसी पालमपूर प्रागपूर, वायझॅक दिंडी अराकू व्हॅली बोरा केव्ह्ज आणि गेल्या वर्षी बेस्ट ऑफ काश्मीर या टूर्स केल्या. साऊथ आफ्रिकेच्या टूरवर टेन्टमध्ये रहायला अगदी थ्रिल वाटलं. एखाद्या टूरवर जायचं ठरलं की मी अगदी मनापासून त्या ठिकाणाबद्दल वाचन करतो. कधीकधी आधीच्या टूरवरची मित्रमंडळी एखादी पुढची टूर ठरवतात. येणार का विचारतात. कधी दुसरे कोणी जाऊन आलेले त्या ठिकाणचे फोटोज व्हॉटस्ॲप करतात. त्यातून पुढची टूर ठरते. आम्ही वीणा वर्ल्ड सोबत जाणं प्रेफर करतो कारण इथले टूर मॅनेजर्स चांगले असतात. सिनियर सिटीझन सोबत चालणं, त्यांच्यासाठी थांबणं, त्यांना गरज पडली तर आधार देणं ही कामं सगळी मुलं अगदी मनापासून करतात. ज्या ठिकाणी जाऊ तिथली माहिती उत्तम देतात. इथल्या ॲक्टिव्हिटीज् मध्येही मजा येते. आम्ही फॅमिली ग्रुप टूर्स करणं प्रेफर करतो. कारण त्यात मिक्स एज ग्रुप असतो. तरुण पिढीसोबत गेलो की आपल्यालाही उत्साही वाटतं. असा प्रत्येक प्रवास म्हणजे आनंद, धम्माल आणि थ्रिलचं मिश्रण असतं.
प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्
सिंगापूर डिस्नी क्रूझ
विथ वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्
सिंगापूर आणि डिस्नी क्रूझ, हे जबरदस्त कॉम्बिनेशन आता वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज घेऊन आलंय खास तुमच्यासाठी! ह्या डिसेंबरपासून एशियामध्ये पहिल्यांदाच ही क्रूझ सेल करणार आहे. एक अशा प्रकारचा हॉलिडे जो तुमच्या संपूर्ण फॅमिलीला एकाच वेळी मजा, आराम, एक्साइटमेंट आणि मॅजिकचा अनुभव देतो. फक्त ₹99,000 पासून सुरू होणाऱ्या या 5 दिवसांच्या हॉलिडेमध्ये समाविष्ट आहे वर्ल्ड क्लास क्रूझ, आयकॉनिक डिस्नी कॅरेक्टर्स, आणि सिंगापूरसारखं सुंदर डेस्टिनेशनसुद्धा.
तुमच्या ह्या हॉलिडेची सुरुवात होते सिंगापूरपासून. इथे तुम्ही बोर्ड करणार आहात ब्रँड न्यू डिस्नी ॲडव्हेंचर क्रूझ. इथे तुम्हाला आणि तुमच्या बच्चेकंपनीला भेटतील डिस्नी, मार्व्हल आणि पिकसार चे फेव्हरेट कॅरेक्टर्स, आणि सोबत असतील लाईव्ह शोज्, डोळ्याचं पारणं फिटेल असा फायरवर्क्स शो, परेड्स आणि भरपूर इन्स्टा मोमेंट्सही. ह्यासोबत क्रूझच्या डेकवर स्टारलिट स्कायखाली बसून तुम्ही पॉपकॉर्न खात सिनेमाचा आनंददेखील घेऊ शकता. इथे प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. ब्रॉडवे-स्टाईल शोज्पासून थीम रेस्टॉरंट्सपर्यंत आणि वॉटरस्लाईड्स पासून स्प्लॅश झोन्स आणि स्पेशली डिझाईन्ड किड्स क्लब पर्यंत. क्रूझवरचा स्टे हा पूर्णपणे फॅमिली-फ्रेंडली असणार आहे आणि त्यामुळे सगळ्याच पर्यटकांना आराम आणि आनंद दोन्हीही पुरेपूर मिळेल. मोठ्यांसाठीसुद्धा इथे रिलॅक्सेशन झोन्स, डेक व्ह्यूज्, स्पा फॅसिलिटीज् आणि गुरमे फूड ची धम्माल आहेच. शिवाय क्रूझवर प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन, एक्साईटिंग आणि इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटी असते, त्यामुळे बोरडमला वावच नाही.
तुमच्या ह्या प्रायव्हेट हॉलिडे पॅकेजमध्ये समाविष्ट आहे 1 नाईट सिंगापूर हॉटेल स्टे, 3 नाईट्स डिस्नी क्रूझ स्टे, सर्व मील्ससोबत, आणि प्रायव्हेट कारने एअरपोर्ट-हॉटेल- क्रूझ-एअरपोर्ट ट्रान्सफर्स. भारतापासून जवळ आणि व्हिसा प्रोसेस देखील अत्यंत सोप्पी असल्याने तुम्ही सहज सिंगापूरला पोहोचू शकता. मात्र्ा सीट्स लिमिटेड असल्याने त्या भराभर भरताहेत. म्हणून आता अजिबात थांबू नका. आजच तुमचा ड्रीम क्रूझ हॉलिडे बुक करा.
अराऊंड द वर्ल्ड
झिरो फेस्टिव्हल
झिरो फेस्टिव्हल हा अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅलीमध्ये आयोजित केला जाणारा चार दिवसांचा ऍन्युअल म्युझिक कॉन्सर्ट आहे. नॉर्थ ईस्ट मधील टॅलेंट शोकेस करण्याच्या हेतूने याची सुरुवात 2012 मध्ये बॉबी हनो आणि अनुप कुट्टी यांनी केली. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. आपातानी ट्राईब मार्फत याचं आयोजन केलं जातं. यासाठी जगभरातील 40 हून अधिक सर्वोत्तम म्युझिक ऍक्टस्ची निवड करण्यात येते. यासाठीचा मंच जवळपास पूर्णपणे बायोडिग्रेडेबल सजावटीच्या मटेरियलने बांधला जातो. फेस्टिव्हलदरम्यान इथलं पर्यटन 25-30% ने वाढतं. ली रानाल्डो, स्टीव्ह शेली, लूव माजॉ, शाएअर अँड फंक, इंडस क्रीड, पीटर कॅट रेकॉर्डिंग कंपनी, मेनव्होपॉज आणि बार्मर बॉईज यांसारख्या नॅशनल - इंटरनॅशनल आर्टिस्टस्नी या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करून हजारो प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. इथे तुम्ही मासे, चिकन, कोलंबी, रामेन, रोस्टेड व्हेजिटेबल्स या पदार्थांचा आणि मिलेट वाइन, फ्रूट वाइन, अपाँग म्हणजे राईस बियर अशा पेयांचा आणि इतरही स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. मग तुम्हालाही आवडेल ना ही कॉन्सर्ट पहायला?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.