सोलो ऑर टुगेदर?

0 comments
Reading Time: 9 minutes

एकट्याने पुढे जायचं? सर्वांसोबत जायचं? सर्वांना बरोबर घेऊन जायचं? हा प्रश्‍न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम जटील बनलाय. एकट्याने जाणं धाडसाचं आणि भितीदायकही अर्थात आपण ते तडीस नेऊ शकलो तर त्यासारखा दुसरा आनंद आणि समाधान नाही. पण जर का सोबत जायचं म्हटलं एकत्रितपणे सर्वांबरोबर किंवा सर्वांना सोबत घेऊन तर मग त्याचे काही नियम आहेत, मानसिकता आहे ज्याचा अंगिकार करावाच लागतो. एकदा का त्यात आपण खरे उतरलो की आनंद आणि समाधान दुपटीने तिपटीने वाढतं. पर्यटनातही तेच आहे की.

परवा नाशिकच्या वोवन मिस्ट्रीजच्या शोभनाताई दातार ऑफिसला आल्या होत्या. भेटल्या भेटल्या त्यांना म्हटलं काय मग आता कोणता खंड पालथा घालणार? त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एकटीने पर्यटन करायला खूप आवडतं, आणि त्यांना त्यांच्या मनासारखा कस्टमाईज्ड हालिडे बनवून द्यायला आमची टीम आनंदाने तयार असते. शोभनाताई एक्सप्लोरर कॅटॅगरीतल्या. आय कॅन ट्रॅव्हल अलोन अराऊंड द वर्ल्ड ही त्यांची धाडसी मानसिकता मला आवडते. एकट्याने पर्यटन करणं ज्याला ज्याला जमेल त्याने ते कधीतरी करावंच असं मला वाटतं. वेगवेगळी पर्यटनस्थळं धुंडाळताना आपण स्वत:लाही शोधून काढतो. स्वत:ची नव्याने ओळख, स्वत:चा वाढता आत्मविश्वास, यस्! आय कॅन चा आनंद आणि अनेक नवीन देश पाहिल्याचं समाधान, हे फलित असतं अशातर्‍हेच्या सोलो-एकट्याने करणार्‍या पर्यटनाचं. ह्यावेळी मात्र शोभनाताई त्यांच्या मैत्रिणींसोबत आल्या होत्या, आणि त्यांना युरोपला जायचं होतं. म्हटलं, तुम्हाला आम्ही छानसं कस्टमाईज्ड पॅकेज बनवून देतो युरोपचं, सच अ लव्हली कॉन्टिनेंट! तर म्हणाल्या, नाही, ह्यावेळी आम्ही ग्रुप टूर बरोबर यायचं म्हणतोय. मी आश्‍चर्यात पडले पण मला त्यांचा निर्णयही आवडला कारण माझाही सल्ला असतो युरोपचा विचार करणार्‍या पर्यटकांना ग्रुप टूरने जा म्हणून.

युरोप भाषा-भोजन-भूगोल ह्या बाबतीत पूर्णत: वेगळा आहे. बाहेर पडलो, हात दाखवला, टॅक्सी थांबवली, रेस्टॉरंटला जाऊन हवं ते खाल्लं इतकं ते सोप्प नाहीये. बरं युरोपातल्या अनेक देशातल्या लोकांचा इंग्लिश भाषेवर राग आणि तेवढंच प्रेम त्यांच्या स्वत:च्या भाषेवर, त्यामुळे जर तुम्ही नेहमी जाणारे-फ्रीक्वेंट ट्रॅव्हलर नसाल तर गोंधळायला- बावरायला होतं. आणखी एक म्हणजे युरोप खंंडातले देश जवळजवळ असले तरी पर्यटनस्थळं बर्‍यापैकी एकमेकांपासून लांब आहेत. ग्रुप टूरचा प्रत्येक दिवसाचा आखीव रेखीव कार्यक्रम आणि दिमतीला वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर असल्याने ठरलेल्या वेळी गोष्टी पार पडतात आणि पर्यटकांना एका फटक्यात बरंच काही बघता येतं. ग्रुप टूरला जाण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता, त्यामुळे आता त्यांचा दुसरा प्रश्‍न होता, किती दिवसांची सहल घेऊ? हा प्रश्‍न अपेक्षित असतोच कारण वीणा वर्ल्डकडे युरोपचे नव्वद पर्याय आहेत ग्रुप टूरचे. जेवढे पर्याय जास्त तेवढी निवड प्रक्रिया कठीण होते हे साहजिक आहे. पण जास्त पर्याय आपल्याला जे नेमकं हवंय ते देतात. आपण ड्रिल डाऊन करून आपल्या आवडीनुसार, सवडीनुसार आणि बजेटनुसार आपल्याला हवी ती सहल निवडू शकतो. आमच्या टीमने सर्व सहलींची माहिती दिल्यावर त्यांनी पंधरा दिवसांची युरोपियन ज्वेल्स नावाची दहा देशांना भेट देणारी सहल निश्‍चित केली आणि म्हणाल्या, एकदा जातोय तर सर्वच बघून येऊ इथे शोभनाताईंनी स्वत:ला सोलो ट्रॅव्हलरवरून टुगेदर वुई ट्रॅव्हलमध्ये बदललं होतं.

ग्रुप टूर करणार्‍या पर्यटकांचं हे ठरलेलं वाक्य आहे. एकदा जातोय तर जास्तीत जास्त बघून येऊया हे नुसतं वाक्य नाही तर ती मानसिकता आहे, ज्याचा आम्ही आदर करतो आणि देशोदेशीच्या ट्रान्सपोर्ट-नियमांचा सन्मान करीत, त्यांच्या दिवसभरात गाडी किती वेळ चालवायची ह्या ठरलेल्या तासांप्रमाणे सहल कार्यक्रमाची आखणी करतो, वीणा वर्ल्डचा एक्सपर्ट टूर मॅनेजर त्यानुसार स्किलफुली संपूर्ण कार्यक्रम घडवून आणतो. आम्हाला अभिमान आहे की दरवर्षी आम्ही जवळ-जवळ वीस हजार पर्यटकांना युरोप अमेरिकेची वारी घडवतो, ज्यांना सहलीचा तो आखीव रेखीव भरीव कार्यक्रम आवडतो.

शक्यतो पर्यटक एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा जात नाहीत कारण एका आयुष्यात जग बघून होणं अशक्य आहे, मग प्रत्येक वेळी नवीन पर्यटनस्थळ- नवा देश का नको? असा विचार पर्यटक करतो, आणि म्हणूनच प्रत्येक सहलीत जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. पर्यटकांनी भरलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे. इथे एक खर्च दाखवायचा आणि तिथे गेल्यावर ऑप्शनलच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार नाही. अरे तुम्ही लंडनला जाऊन हे पाहयलं नाही? ऑस्ट्रेलियाला जाऊन फिलिप आयलंड केलं नाहीत? किंवा नायगराची हेलिकॉप्टर राईड केलीत की नाही? लास वेगासला ग्रँड कॅनियन आणि हूवर डॅम पाहिलंत की नाही? असे प्रश्‍न विचारून कोणी डिवचू नये म्हणून जिथे- जिथे शक्य आहे तिथे-तिथे महत्त्वाच्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. जेव्हा सगळ्या गोष्टी ऑप्शनल ठेवल्या जातात आणि अवाच्या-सवा पैसे भरून पर्यटकांना त्या करायला लावतात तेव्हा आणखी एक गोष्ट घडते सहलीवर ती म्हणजे ज्यांच्याजवळ पैसे असतात ते हे ऑप्शनल साईटसिईंग करतात. बाकीच्यांना आपण काय करायचं आता? हा प्रश्‍न पडतो. डिस्क्रिमिनेशन सुरू होतं. हे मी स्वत: माझ्या पहिल्या-वहिल्या स्कॅन्डिनेव्हीया सहलीला जेव्हा लंडनच्या एका सहल संस्थेमार्फत गेले होते तेव्हा अनुभवलंय. तेव्हाच ठरवून टाकलं होतं की, सहलीवर पैशाचा विषय नको, त्यामुळे निराश- उदास व्हायचा प्रकार नको. आपल्या सहलीत आपल्या भारतीय पर्यटकाला जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं दाखवायचं. ही गोष्ट आमच्या पर्यटकांनाही भावली. त्याचाच परिपाक असावा की, भारतातून दरवर्षी जास्तीत जास्त पर्यटक वीणा वर्ल्डसोबत युरोप अमेरिकेला जातात. असो!

शोभनाताई आणि त्यांच्या मैत्रिणींनी ग्रुप टूरला जायचं पक्क केलं, साधारण कोणती, किती दिवसांची सहल घ्यायची हे ही ठरवलं, आता त्यांचा प्रश्‍न होता जनरल फॅमिली टूर घेऊ की वुमन्स स्पेशलला जाऊ की सीनियर्स स्पेशल? हाही महत्त्वाचा प्रश्‍न होता.

वीणा वर्ल्डचा सर्वात मोठा बिझनेस आहे तो पॉप्युलर फॅमिली टूर्सचा. पंचाहत्तर टक्के पर्यटक ह्या सहली घेतात. सीनियर्स स्पेशल, वुमन्स स्पेशल मिळून दरवर्षी दहा ते बारा हजार पर्यटक वीणा वर्ल्डसोबत देशविदेशात पर्यटन करतात. ह्यावर्षी ही संख्या वीस हजार होईल असा आमचा अंदाज आहे कारण त्यांची लोकप्रियता. सीनियर्स स्पेशल सहलींची सुरुवात मी केली ती मुख्यत्वे ज्येष्ठांनी करीयर-व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर आता वेळ कसा घालवायचा हा प्रश्‍न पडू नये म्हणून, तसेच रीटायर्ड बट नॉट टायर्ड, वुई कॅन रोम अराऊंड द वर्ल्ड हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी. मी स्वत: जेव्हा टूर मॅनेजर म्हणून सहली केल्यायत तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पॉप्युलर फॅमिली टूर्सना छोट्यांपासून मोठ्यांपर्यत सर्व वयोगटातील मंडळी असतात. सीनियर मंडळींचा पेस हा यंगस्टर्सना स्लो वाटायचा. कुणी काही बोललं नाही तरी नजरा बरंच काही बोलून जायच्या. काही पर्यटक तर सुचनाही करायचे की, अहो यंगस्टर्सच्या वेगळ्या सहली करा आणि सीनियर्सच्या वेगळ्या. माझं म्हणणं असायचं, भारतात एकत्र कुटुंबपद्धती आहे. लहान मोठे आनंदात रहायची सवय आहे आपली, तशीच ही फॅमिली टूर. इथेही आनंदात सहल पार पाडूया. आणि तसं ते घडतंयही. पण हळूहळू मलाही जाणवायला लागलं की सीनियर्सची वेगळी सहल कॅटॅगरी करूया जिथे सहलीचा पेस एकच ठेवता येईल. आणि ही स्ट्रॅटेजी यशस्वी झाली. ह्या सहली सुरू झाल्यापासून आजतागायत त्यांची लोकप्रियता वाढतेच आहे.

वुमन्स स्पेशल ही महिलांची आवडती सहल. लेट्स एन्जॉय अवर मी टाईम! वुई डिझर्व्ह इट ह्या संकल्पनेने ही सहल सुरू झाली आणि ती वीणा वर्ल्डचा सरताज बनली. इथे प्रत्येक महिला स्वत:च्या विश्वात मग्न असते. तिला नव्याने ती गवसलेली असते. जे काही आयुष्याच्या रामरगाड्यात करायला मिळालं नाही ते सगळं ती इथे करीत असते. सगळाच आनंदाचा मामला. इथे कुणाला एकमेकींकडे बघायला वेळच नसतो. डीसेन्सी-डिग्निटी-सेफ्टी-सिक्युरिटी-विश्वास अशा सर्व गोष्टीत चपखल बसणारी ही सहल प्रत्येक कुुटुंबाने त्यांच्या घरातील महिलेची गरज म्हणून स्विकारलीय ही मोठ्ठी यशस्वीता आहे ह्या सहलींची. वुमन्स स्पेशल सहलीत ह्यावर्षी आम्ही युरोप आणि जपानसाठी रेग्युलर वुमन्स स्पेशल सोबत गर्ल्स बीलो फोर्टी ही कॅटॅगरी आणलीय. त्यामुळे सिंंगल यंगस्टर्सना-कॉलेज गोअर्सना त्याचा फायदा होईल. आणि हो वुमन्स स्पेशलचा विषयच आलाय तर आणखी एक नवीन गोष्ट आम्ही यावर्षी करतोय ती म्हणजे 2020-T20 वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाला आहे त्यासाठी वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलच्या तीन सहली आणल्या आहेत. पर्थ वाका ग्राऊंड- सिडनी शो ग्राऊंड आणि मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड MCG वर होणर्‍या ओपनिंग/ फायनल मॅचला आपल्या वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलला जाणार्‍या महिला सहलीसोबत ह्या वुमन्स वर्ल्ड कप क्रिकेटचा थरारही अनुभवणार आहेत. नित्य नवं काहीतरी आम्ही घेऊन येत असतो आणि आमचे पर्यटक त्याला पाठिंबा देऊन आमचा उत्साह द्विगुणित करीत असतात त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार.

या तीनही टूर्सची खासियत ऐकल्यानंतर शोभनाताईंनी आणि त्यांच्या मैत्रिणींनी चार मे ची पंधरा दिवसांची वुमन्स स्पेशल युरोप टूर निवडली. सोलो-टुगेदर-वुमन्स स्पेशल असा त्यांचा निवडीचा प्रवास झाला आणि आम्हालाही बरं वाटलं. कारण त्या सहलीला नेहमीच्या सर्व स्थलदर्शनासोबत अ‍ॅमस्टरडॅमचे रंगबिरंगी फुलांनी बहरलेले ट्युलिप गार्डन्स बघायला मिळणार आहेत.

सोलो ट्रॅव्हलर असो फॅमिली ग्रुप टूर असो किंवा वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशलसारखी स्पेशालिटी टूर, पर्यटकाने स्वत:च्या आवडी- निवडी-स्वभाव ह्या सगळ्याचा विचार करूनच सहल निवडावी किंवा जर मी-मायसेल्फ-माय- फॅमिली म्हणजे माझ्या कुटुंबासोबत मला प्रायव्हेट टाईम हवा असेल तर आमच्याकडून कस्टमाईज्ड हॉलिडे बनवून घ्यावा. ज्याला जे हवं ते द्यायला वीणा वर्ल्ड कटिबद्ध आहे.

जाता जाता आणखी एक सल्ला, 2020 मध्ये वीणा वर्ल्डसोबत युरोप अमेरिकेला निघालेल्या पर्यटकांनी व्हिसा प्रोसेसला ऑलरेडी सुरुवात केलीय. अनेकांचे युएसए व्हिसा झालेसुद्धा. तुम्ही मागे राहू नका कारण ह्यावर्षी युरोप-अमेरिकेला जाणार्‍या पर्यटकांचा अक्षरश: महापूर येणार आहे, ज्यामुळे कॉन्स्युलेटमधली गर्दी वाढणार आहे. व्हिसा मिळायला आज लागणारा दहा पंधरा दिवसांचा कालावधी एक-दीड महिन्यांपर्यंत वाढू शकतो,  त्यामुळे सहलीला जायला मिळतंय की नाही? ही अनिश्‍चितता वाढणार आहे. सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात कितीही अनिश्‍चितता असली तरी तुमच्या सहलीविषयी तुम्ही निश्‍चित, निर्धास्त आणि निश्‍चिंत व्हा.

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*